Tuesday 8 November 2022

अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास ! -भाग २

                                                                              १

९ मार्च २०१९ रोजी मी 'संत अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती' वर आधारित एक ब्लॉग लिहिला होता . त्यावेळी व्हॉट्स अँपवर फिरत असलेल्या गणेश स्तुतीचे शब्द मिळवण्याच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन करणारा तो ब्लॉग होता. ब्लॉग मध्ये मी त्या गणेशस्तुतीचे लिखित शब्द आणि त्या स्तुतीचा व्हिडीओ( म्हणजे त्याचा खरं तर ऑडिओ ट्रॅक) ही पोस्ट केला होता.
सर्वसाधारणपणे माझं ब्लॉगचं लिखाण हे मला आलेले अनुभव(बहुतांशी चांगले!) व्यक्त करून ते पोस्ट करणं या स्वरूपाचं असतं. ब्लॉग लिहिणं ही माझ्यासाठी खरं तर एक आनंददायी प्रक्रिया असते. त्या त्या वेळचे अनुभव ब्लॉग लिहीत असताना मी ते पुन्हा जगत असतो आणि या अनुभवांचे  नवे कंगोरे मला लिखाण करताना दिसतात.(शिवाय ब्लॉगर हे माझे विचार मांडायचं आयतं आणि फुकटचं माध्यम उपलब्ध आहे तेव्हा लिहायला मोकाट रानच आहे !)  
संत अमृतराय यांच्यावरील ब्लॉग देखील याला अपवाद नव्हता. पण कसं कोण जाणे माझा हा ब्लॉग खूप लोकांपर्यंत पोचला. कदाचित माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांना त्या गणेश स्तुतीच्या शब्दांनी भुरळ घातली असावी आणि ते शब्द शोधायला ते गुगल शरण गेल्यावर माझा ब्लॉग वाचायला मिळाला असावा. थोडासा आत्मप्रौढीचा धोका पत्करून सांगावंसं वाटतं की आजपर्यंतचा हा माझा सर्वाधिक वाचला गेलेला ब्लॉग आहे आणि आजच्या तारखेपर्यंत त्याला सुमारे ७४०० जणांनी भेट दिली आहे. (ज्यांनी या आधी हा ब्लॉग वाचलेला नाही त्यांच्यासाठी मी त्याची लिंक आहे -https://rajeshpusalkar.blogspot.com/2019/03/blog-post_8.html 
आधीचा ब्लॉग वाचला तर हे पुढचं लिखाण जास्त सुसंगत वाटेल.) 

जसा हा माझा सर्वाधिक वाचला गेलेला ब्लॉग आहे, तसंच याच ब्लॉगवर मला सर्वाधिक कॉमेंट्स देखील आल्या आहेत. लोकांच्या प्रतिक्रियांना ब्लॉगवर उत्तर देणं याबाबत जरा माझ्याकडून ढिलाईच होते. पण तरीही प्रयत्नपूर्वक मी त्या कॉमेंट्स ना उत्तरं देत होतो. ९ मार्च २०१९ ला ब्लॉग लिहिल्यानंतर मला २७  जून २०१९ ला श्री राहुल तळेगांवकर यांची पुढील कॉमेंट आली -
नमस्कार राजेशजी.या रचनेच्या शब्दांसाठी आपण केलेलें अथक प्रयत्न वाचुन तुमच्या चिकाटीची कमाल वाटते. संत कवी श्री अमृतराय महाराज यांच्या रचनांचे पुस्तक अमृतराय संस्थान पैठण यांनी प्रकाशित केले आहे. तुम्हाला अजून काही रचना हव्या असतील तर अवश्य संपर्क साधा."शिवाय संपर्कासाठी त्यांचा  इ मेल आयडी दिला होता. मी मात्र या कॉमेन्टला माझ्या ब्लॉगवरच ६ जुलैला उत्तर दिलं आणि त्यांच्याकडे संत अमृतराय यांच्या इतर रचनांचं पुस्तक कुठे मिळू शकेल अशी विचारणा केली होती. यानंतर मध्ये बराच काळ लोटला .खरं तर एक वर्ष उलटलं. मी  हे  सगळं विसरूनही गेलो होतो आणि एके दिवशी अचानक मला  श्री. तळेगांवकर यांची त्याच ब्लॉग वर पुन्हा एक कॉमेंट आली-
"राजेशजी, तुमचा पत्ता खालील क्रमांकावर पाठवा.
मी तुम्हाला (पुस्तक) कुरीअर करतो." आणि पुढे त्यांचा मोबाईल नंबर दिला होता. त्या नंबरवर मी माझा पत्ता  पाठवल्यावर दोन तीन दिवसांत एक पुस्तक मला कुरिअर द्वारे आलं सुध्दा ! -

 

 

आतल्या पहिल्याच पानावर हे लिहिलं  होतं -  

 


हा सगळाच अद्भुत प्रकार होता . मग मी  त्यांना फोन  करून त्यांचे आभार मानले. मी पण इतका असंवेदनशील ! त्यांनी पुस्तक 'सप्रेम भेट' असं लिहून पाठवलं तरी मी त्यांना पुस्तकाची किंमत विचारली! ती अर्थातच ते घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलंच शिवाय कुरिअरचे पैसेसुद्धा घेणार नाही असं म्हणाले! ते म्हणाले- "तुमच्याकडून संत अमृतराय यांची सेवा घडली आहे. त्यामुळे तुमच्याकडून पैसे कुठले घ्यायचे !" माझ्या एका साध्या फुटकळ ब्लॉग लिहिण्याला सेवा करणे हे नाव देऊन त्यांनी त्या ब्लॉगला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीला नेऊन ठेवलं जे मला ब्लॉग लिहिताना अजिबात अभिप्रेत नव्हतं आणि म्हणूनच मला ते अनपेक्षित वाटलं. 
पुस्तकात  संत अमृतराय यांचं जीवनचरित्र, त्यांच्या त्या काळच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेतल्या वैविध्यपूर्ण रचना देण्यात आल्या आहेत. कटाव वृत्ताव्यतिरिक्त इतर अनेक छंद त्यांनी  हाताळले आहेत. इतकंच काय पुस्तकात त्यांना आद्य गझलकार असं संबोधण्यात आलं आहे. श्रीकृष्णाच्या राजप्रासादात सुदामा जेवायला गेला त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना संत अमृतराय यांची शब्दसंपदा आपल्याला अचंबित करते! 
पुस्तक असंच पुढे वाचत गेलो तर त्यात संत अमृतराय यांची वंशावळ मांडलेली दिसली. आणि अहो आश्चर्य! त्यात सर्वात खाली श्री राहुल तळेगांवकर यांचं नाव होतं! म्हणजे माझा ब्लॉग संत अमृतराय यांच्या वंशजांनी वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली होती! शिवाय ब्लॉग लिहिल्याबद्दल संत अमृतराय यांच्या रचनांचं पुस्तकही भेट दिलं! कुठलीही गोष्ट न ठरवता करून देखील असे विलक्षण अनुभव आल्यामुळे मला एक वेगळंच आंतरिक समाधान मिळालं! 

                        २

जेव्हा नवीन ब्लॉग लिहिले जात नाहीत तेव्हा मध्ये मध्ये जुनेच ब्लॉग मी विविध समाज माध्यमांवर पुन्हा पुन्हा पोस्ट करत असतो. अर्थात हे काही भूषणावह आहे असं नाही पण काही वेळा नवीन सुचत नाही हे तितकंच खरं! असाच यंदाच्या (२०२२) गणेश चतुर्थीला मी हा माझा ब्लॉग फेसबुकवर पुन्हा एकदा पोस्ट केला. तो किती लोकांपर्यंत पोचला हे माहित नाही परंतु एके दिवशी मला दस्तुरखुद्द डॉ चैतन्य कुंटे यांचा फेसबुक मेसेंजर वर मेसेज आला. त्यांनी केवळ माझा ब्लॉगच नाही तर त्याखाली आलेल्या सर्व कॉमेंटही वाचल्या होत्या. डॉ. कुंटे ज्या डॉ अशोक रानडे मेमोरियल ट्रस्टचे संचालक आहेत तिथेच आधी मी  कटाववृत्ताचे शब्द मिळवायला गेलो होतो. तिथेच 'कला गणेश' या सीडीचा उल्लेख झाला होता. मी हे सगळं लिहिलेलं डॉ कुंटे यांनी वाचलं होतं आणि त्यांनी आपणहून मला 'कला गणेश' या सीडीतील रचनांची युट्यूब लिंक मेसेज मध्ये पाठवली! काहीशा अनवट रागांवर आधारित या रचनांमागे किती खोल विचार केला आहे हे दिसतं.
जगात माणसं किती चांगली असतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. तीच लिंक मी आता इथे देत आहे- - https://www.youtube.com/watch?v=j0gqdZ5IfG4&list=PLzzpU2Nok7Zd2-OGn3pjcHA5SndVb3pJ- 

इतकंच नव्हे तर माझ्या ब्लॉगवरील एका कॉमेंट मध्ये डॉ अशोक रानडे यांच्या बैठकीची लावणी या कार्यक्रमाविषयी श्री दीपक इरप यांनी विचारलं होतं. तर त्या दोन कार्यक्रमांची युट्यूब लिंक देखील डॉ कुंटे यांनी मला पाठवली. ती देखील मी इथे शेअर करत आहे - 
१) 

२) 

अशा प्रकारे एक मोठा खजिनाच या ब्लॉगच्या निमित्ताने माझ्या हाती लागला आहे. या ब्लॉगने मला सर्वाधिक आनंद दिला आहे. खरं तर मी एक छोटासा हौशी ब्लॉगर.. माझं लिखाण हे अशाप्रकारे वाचलं काय जातं आणि त्यातून असे उत्कट अनुभव काय मिळतात.. सगळंच अकल्पित आहे!  आणि  तुमच्यापुढे हे सगळं मांडून माझा आनंद द्विगुणितच काय...शतगुणित झाला आहे यात शंकाच नाही!
 








2 comments:

Mugdha said...

सगळेच अनुभव रोमांचकारी आहेत... खूप मोठी माणसं खूप down-to-earth असतात ह्याचा प्रत्यय आला असेल.... आणि एवढ्या मोठ्या माणसांकडून प्रतिक्रिया हा विलक्षण अनुभव!
वरील कार्यक्रमाच्या लिंक्स बघितल्या नाहीत अजून मी पण अंदाज करू शकते की सुंदरच असणार ते!
आम्हालाही तुझ्या बरोबर वाचक म्हणुन असे अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद

Unknown said...

अरे...खरंच हे सगळं भन्नाट आहे. अतुलने टाकलेली रचना जेव्हा ग्रुपवर वाचली त्यानंतर मी सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून तिचे शब्द लिहायला सुरवात केली होती म्हणजे असं की माझ्याकडे काही सॉफ्टवेअर आहेत ज्यांत गाण्याचा वेग कमी करून स्लो मोशनमध्ये ऐकत मी लिहीत होतो...काही ओळी लिहून पण झाल्या होत्या ... दरम्यान तू चार ठिकाणी हिंडून ते शब्द मिळवून सगळ्यांसमोर मांडल्यामुळे पुढे मी हा उद्योग सोडून दिला. कारण त्याचे काही प्रयोजन मग राहिले नव्हते...
पण वरचं सगळं हे वाचून खूप आनंद झाला की प्रत्यक्ष एका वंशजाने संपर्क करून तुझा परिचय करून घ्यावा हे खरंच उत्साहात भर घालणारं आहे. सध्या मनमुराद या अनुभवाच्या समाधानाचा आनंद घे
.
श्रीपाद मेघ:श्याम गांधी