Monday 21 November 2022

पुस्तक परीक्षण : 'चिद्गगनाचे भुवनदिवे'


अलीकडच्या काळात  'चिद्गगनाचे भुवनदिवे' हे पुस्तक वाचलं. यातील काही लेख मी याआधी 'मौज'  वा 'दीपावली' च्या दिवाळी अंकांमध्ये  वाचलेही होते. काही मात्र प्रथमच वाचले. पुस्तकात डॉ बोकीलांनी त्यांच्या आयुष्यातल्या आठ व्यक्तींच्या सहवासातून जुळलेल्या ऋणानुबंधाविषयी लिहिलं आहे. जितकं ते त्या आठ व्यक्तींबद्दल सांगतात तेवढंच त्यातून त्यांच्याविषयीही कळत जातं आणि या प्रांजळ लिखाणामुळे त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो. त्या आठ लेखांपैकी काही लेखांचा मी इथे सविस्तरपणे उल्लेख करेन -


१) श्री. पु. भागवतांवरील 'साहित्याचा भूमिपुत्र' हा लेख अतिशय उत्कृष्ट आहे. लेखक आणि प्रकाशक यांच्यातील पुस्तकांविषयी होणारा संवाद यातून वाचकांसमोर लेखकाने छान मांडला आहे. यातून त्यांनी श्री. पुं चे चित्र उभे केले आहे ते विलोभनीय आहे. त्यांची आमच्या मनात जी प्रतिमा होती (म्हणजे ते शिस्तप्रिय आहेत, त्यांची उच्च अभिरुची वगैरे) या पलीकडे जाऊन लेखक आणि प्रकाशक या पुस्तक निर्मितीमधल्या दोन घटकांमधील चर्चा, वाद -संवाद यामधून त्यांची पुस्तक प्रकाशन या व्यवसायावरची निष्ठा आणि चांगल्या साहित्याचा दर्जा राखण्यासाठी वेळ लागला तरी चालेल, पण त्याबाबत कोणतीही तडजोड करायची नाही या गोष्टीदेखील प्रकर्षाने कळल्या. श्री पुंची चांगल्या साहित्यकृतीच्या निर्मितीबद्दलची तळमळ या लेखातून पुन्हा अधोरेखित झाली. कोणत्याही लेखकाने पुस्तकाची हस्तलिखित(वा टंकलिखित ) प्रत प्रकाशकाकडे सोपवल्यानंतर ते पुस्तक प्रकाशित होईपर्यंतचा प्रवास याविषयी इतक्या सविस्तरपणे लिहिलेलं माझ्या वाचनात तरी आलेला नाही. हा प्रवास म्हणूनच वाचकांना समृद्ध करणारा आहे. मुळात चांगले साहित्य कशाला म्हणायचे याबाबत या दोघांमध्ये विस्तृत चर्चा झालेल्या दिसतात. 'आठवणीतले मर्ढेकर' या लेखातील श्री पुंचं  वाक्य खरं तर प्रत्येक लेखकानेच नव्हे तर आपण वाचकांनी सुद्धा कायम स्मरणात ठेवावं असं आहे-'अनुभवाच्या संमिश्रतेची प्रगल्भ जाणीव आणि त्याच्या वर्णनापेक्षा चित्रणाची कलात्मक दृष्टी' यात केवढा गहन- गंभीर अर्थ सामावलेला आहे ! हा एकच मापदंड वाचकाने प्रत्येक पुस्तकाला लावला तरी त्याच्यात नीर क्षीर विवेकबुद्धीचा विकास होईल असं मला वाटतं. पण अर्थात हे वाक्य पूर्णपणे आत्मसात करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. पण वाचकाला चांगल्या साहित्याचे निकष कळले तर त्याचा प्रवास निश्चितच त्या दिशेने होईल यात शंका नाही. आणि हाच मापदंड डॉ मिलिंद बोकीलांच्या सर्व साहित्यकृतींना लावला तर त्या कसोट्यांवर ते साहित्य पूर्णपणे उतरतं हेही तितकंच खरं !

डॉ बोकील आणि श्री पु भागवत यांच्यामधील प्रगल्भ नातं आणि ते नातं घडत जाताना निर्माण होणारे  समज-गैरसमज, आणि मतभेद याबद्दल लेखकाने अतिशय मोकळेपणाने आणि वस्तुनिष्ठपणे लिहिलं आहे. यातून हेही लक्षात येतं की लेखक म्हणून कलाकृतीनिर्मितीच्या मागे असलेली भूमिका किंवा अगदी कादंबरी लेखन असली तरी, त्या कथानक वा त्यातील व्यक्तिरेखांबद्दल असलेली त्यांची भूमिका ठाम होती आणि प्रसंगी वाद झाला तरी चालेल पण त्या भूमिकेपासून ते मागे हटले नाहीत हे विशेष! एक व्यक्ती म्हणूनही श्री पुंच्या स्वभावाचे कंगोरे छान रंगवले आहेत.यावर्षीच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात मोनिका गजेंद्रगडकर यांनी श्री पु भागवत यांच्यावर एक भावस्पर्शी लेख लिहिला आहे. त्यांच्या आणि डॉ बोकीलांच्या श्री पुं विषयीच्या अनुभवांत विलक्षण सातत्य आहे. 

पुस्तकातील बाकी व्यक्तिचित्रं पण सुरेख आणि हृद्य देखील आहेत. उदाहरणार्थ -कमल रणदिवे यांच्यावरील 'सायंटिस्ट आजी' हा लेख किंवा 'समाजकार्याचे अशोकवन' हा अशोक सासवडकर यांच्यावरील लेख!
पुस्तकात अशा लोकांची व्यक्तिचित्रे आहेत ज्यांना मी कधीच भेटलेलो नाही. पण तरीही यातील काही लेख हे मला माझ्या अनुभवांच्या खूप जवळ जाणारे वाटले आणि म्हणून ते जास्त आवडले. त्या लेखांविषयी थोडंसं -

२) 'समाजअर्थाचा 'सह'योग'- हा साहित्यिक, उजव्या विचारसरणीचे विचारवंत श्री स हे देशपांडे यांच्या वरील लेख आहे. स ह देशपांडे हे महाराष्ट्राच्या स्वयंसेवी चळवळींचे ज्येष्ठ अभ्यासक होते. तसंच अर्थशास्त्राचे देखील अभ्यासक होते.  बोकीलांनी समाजशास्त्र विषयात पी.एच डी केली त्यावेळी त्यांना श्री. स ह देशपांडे यांची मदत झाली. व्यावसायिक कारणांनी सुरु झालेलं दोघांचं नातं हळूहळू घरगुती स्वरूपाचं झालं. श्री. स ह देशपांडे हे हिंदुत्वविचाराचे पुरस्कर्ते तर डॉ बोकील हे डाव्या विचारसरणीकडे झुकणारे! परंतु या वैचारिक मतभेदांमुळे दोघांच्या नात्यात काहीही फरक पडला नाही. उलट ते उत्तरोत्तर प्रगल्भच होत गेले. 
गेली आठ वर्षे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाचे देशावर राज्य आहे. मी या धर्माधिष्ठित राजकारणाचा अजिबात समर्थक नाही. व्हाट्सअँप, फेसबुक  या सारख्या समाजमाध्यमांवर मी माझे विचार मांडत असतो. विशेषतः व्हाट्सअँप समूहांमध्ये आणि तेही शाळा कॉलेज मधील समूहांमधला माझा याबाबतीतला अनुभव मात्र फारसा चांगला नाही. समूहांमध्ये वेगवेगळ्या वेळी राजकीय विषयांवरील चर्चेत मी माझी मतं हिरिरीने मांडायचा प्रयत्न करत होतो. पण माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासारखी मतं असणारे फार थोडे लोक आहेत आणि त्यातसुद्धा स्वत:ची  मतं मांडणारे आणखीनच कमी ! यामुळे मी एकटा विरुद्ध उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते अशा चर्चा/वाद समूहांमध्ये झाले. काहीवेळा ते इतक्या टोकाला गेले की ते वैयक्तिक पातळीवर जाऊन त्याला  टिंगलटवाळी/ शेरेबाजी असं स्वरूप आलं. आणि मग मी अशा समूहांमधून बाहेरही पडलो.(कॉलेजच्या एका समूहाने मात्र मला मी कितीही वेळा बाहेर पडलो तरी तितक्या वेळा प्रेमाने मला परत घेतले!) 
स ह देशपांडेंवरील  लेख वाचल्यावर जेव्हा मी माझ्या या अनुभवांचा विचार करू लागलो तेव्हा मला वाटलं की यात माझीही चूक झाली असली पाहिजे. त्या त्या व्यक्तीचे राजकीय विचार कुठल्याही बाजूचे असले तरीही केवळ त्यावरूनच आपण त्या व्यक्तीची परीक्षा करू नये, जी मी करत होतो. अर्थात इथे मला हे मान्यच आहे की माझे शालेय मित्र काही स ह देशपांडे यांच्या इतके उदारमतवादी,विवेकी, व्यासंगी, ज्ञानी नव्हेत आणि मी देखील  लेखक डॉ मिलिंद बोकीलां इतका  वस्तुनिष्ठ आणि व्यक्तीचा तिच्या राजकीय विचारांपलीकडे जाऊन विचार करणारा नव्हे ! पण जर मी तसं केलं असतं तर काही नाती मला निश्चितच सांधता आली असती असं आता मला वाटतं. 

डॉ मिलिंद बोकील 


३) 'वाघिणीचे दूध' आणि 'स्थितप्रज्ञस्य का भाषा..' हे लेखकाच्या आई वडिलांविषयीचे लेखही खूप भिडले. एकाच वेळी ते भावनिक ओलावा असलेलेही आहेत, पारदर्शी आहेत आणि वस्तुनिष्ठही! आपल्या आई-वडिलांविषयी लिहिताना समतोल राखून लिहिणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. पण डॉ बोकीलांनी तो समतोल राखला आहे. मला हे लेख विशेष आवडले कारण मी देखील अलीकडेच आई-वडीलांच्या वियोगाच्या दु:खातून गेलो आहे. त्यातही आई नसण्याच्या दु:खातून दोन-अडीच वर्षे झाली तरी पूर्णपणे सावरू शकलेलो नाही. पण हे दोन्ही  लेख वाचून मला खूप उभारी आली. आईबद्दल एक प्रकारच्या टोचणीच्या भावनेपलीकडे जाऊन मी तिच्याबद्दल तितकासा विचार करू शकत नव्हतो जो मी हे लेख वाचल्यावर करू लागलो. काही एक काळ लोटल्यानंतर आपण आपल्या पालकांकडे तटस्थपणे बघितलं पाहिजे हे या लेखांमधून जाणवलं. डॉ बोकीलांच्या  आई वडिलांवरील लेखात मला आणखी एक गोष्ट आवडली म्हणजे त्या लेखांमध्ये त्यांनी त्यांची लेखक ही भूमिका आणि प्रतिमा यांचा विचार न करता खुलेपणाने त्यांच्याविषयी लिहिले आहे. 
विचारांच्या कक्षा रूंदावणारं आणि प्रत्येकाला आपापल्या अनुभवांकडे घेऊन जाणारं हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावं.

1 comment:

Dr Ketki Ranade said...

पुस्तकं वाचणारे ,खूप वेगवेगळी पुस्तकं वाचणारे खूप जण असतात.पण पुस्तक वाचून आत्मशोध घेणं ,स्वतःकडे त्रयस्थ बुद्धीने बघणं आणि स्वतः मध्ये त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच खूप खूप कमी असतात!स्वतः बद्दलच्या काही गोष्टी स्वतःशी मान्य करणं देखील कठीण आहे,बुद्धिनिष्ठ होऊन त्याकडे पाहणं नि त्यानुसार बदल करणं ही तर दूरची बात! तुला ते जमतंय हे कमालीचं छान आहे. तू ज्ञान मिळवणं ह्यात अडकून न राहता ते आत्मसात करण्याच्या प्रकियेत आहेस ही फार मोठी गोष्ट आहे!
प्रांजळ,वस्तुनिष्ठ लेखकाला तितकीच प्रांजळ नि वस्तुनिष्ठ शब्दांजली आहे ही!
एकदम आवडलं👍🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻