Thursday, 2 May 2024

हिमाचल डायरी ७- खानपान आणि सुकून !

१ 

आमच्या हिमाचल ट्रीपला आम्ही धरमशाला मध्ये अमितकुमार यांच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो याविषयी हिमाचल डायरी २ मध्ये लिहिले आहेच.  तिथल्या वास्तव्यादरम्यान आम्हांला हिमाचल प्रदेशमधील  काही खास पदार्थ खायला मिळाले. आपण जिथे जातो तिथलं स्थानिक खावं असं मला वाटतं आणि म्हणून मी अमितकुमारांना तसं सांगितलंही होतं. मात्र पहिल्या दिवशी आम्हांला टिपिकल मिक्स कुर्मा, चिकन करी असं जेवण होतं. ते मला म्हणाले की ते दुसऱ्या दिवशी हिमाचली पदार्थ करतील. दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा त्यांनी आणून दिला आणि तिथपासूनच वेगळ्या चवीला सुरुवात झाली. वरवर पाहता आपला नेहमीचाच दुधाचा चहा दिसत होता. पण चव घेतल्याघेतल्या काहीतरी वेगळं जाणवत होतं. मला आधी वाटलं की चहात बडीशेप आहे की काय. पण त्यांना विचारल्यावर आणखी धक्का बसला - ते म्हणाले चहात चक्क ओवा आहे! एवढंच नाही तर त्यांच्याकडे चहा करताना पाणी घातल्यावर त्यात मीठ घालायची पण पद्धत आहे. पण मीठ घालूनही दूध नासत नाही असंही ते म्हणाले. तिथे दोन दिवस वेगळी चव म्हणून मला तरी तो चहा आवडला. पण रोज असा चहा प्यायला आवडेल का माहित नाही. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाला आम्हांला अमितकुमारांनी हिमाचल प्रदेशचे चार खास पदार्थ खिलवले. एवढंच नाही तर ते पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईला मुद्दाम बोलावून घेतलं.(त्या आम्ही राहात होतो त्या हॉटेलपासून ११ किमी अंतरावर राहतात.) अमितकुमार जर पस्तीस- चाळिशीचे असतील तर त्यांची आई साठीच्या आगे मागे असाव्यात. हे सगळे पदार्थ त्यांनी एकटीने केले होते. आणि ते करणं नक्कीच मेहनतीचं काम आहे. त्या म्हणाल्या की हिमाचल प्रदेश मधील लग्नांमध्ये हे आणि असे एकूण १२ पदार्थ करतात ज्यांना धाम असं म्हटलं जातं. हे पदार्थ आधुनिक भांड्यांमध्ये न करता पारंपरिक लोखंडी/पितळ्याच्या भांड्यांमध्ये करतात ज्यामुळे पदार्थांना एक वेगळाच स्वाद येतो.

तर आम्ही खाल्लेले हे हिमाचली पदार्थ- 

 

डावीकडून-
तेलिया माह , नंतर साध्या भाताच्या उजवीकडे चना खट्टा आणि त्याच्या खाली रोंगी मद्रा. हे तिन्ही पदार्थ कडधान्यांपासून बनवले आहेत. तेलिया माह (जिला माहनी असंही म्हणतात) ही भाजी काळ्या मसुरापासून, चना खट्टा ही काळ्या हरभऱ्यापासून तर रोंगी मद्रा  चवळीसारख्या कडधान्यापासून बनवतात. तिन्ही पदार्थ मोहरीच्या तेलात केले जातात. हवेचा आणि वातावरणाचा खाण्यापिण्यावर कसा परिणाम होतो याबद्दल अमितकुमारांनी अगदी सहज जाता जाता सांगितलं. ते म्हणाले की इथे भाज्या मिळत नाहीत म्हणून बरेच प्रकार 
कडधान्यांपासून करतात तर तिथल्या हवेत फारसा घाम येत नसल्याने तिथले पदार्थ जास्त मसालेदार असतात. 
आणि चौथा पदार्थ म्हणजे-
 

हा आहे कडा सूजी . आपल्या शिऱ्यासारखाच. पण रवा जास्त खरपूस भाजत असावेत की काय माहित नाही. म्हणून कदाचित त्याचा रंग असा चॉकलेटी होता. असाच कडा प्रशाद आम्हांला गुरुद्वारांमध्ये देखील मिळाला होता. सगळे पदार्थ चविष्ट होते. हिमाचली पदार्थांनी आमच्या ट्रीपची लज्जत नक्कीच वाढवली. माझा करंटेपणा असा की मी पदार्थांचे फोटो काढले पण ज्या माऊलीने हे केले तिचा फोटो काढायचा राहूनच गेला. म्हणजे खरं तर त्यांचा फोटो कसा काढायचा असं मला संकोचल्यासारखंच झालं. 

कसोलला आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज असं थुक्पा नूडल सूप देखील घेतलं. मला जास्त चिकन सूप आवडलं. यात आल्याचा मुबलक वापर केला होता -म्हणजे पुन्हा थंड हवेसाठी उपयुक्त असा हा पदार्थ आहे. 
 

२ 

हिमाचल विषयी ब्लॉग लिहीन असं वाटलं होतं. दोन चार ब्लॉग लिहीन असं वाटलं होतं पण तब्बल सात ब्लॉग लिहीन असा विचारही मनात आला नव्हता. हिमाचल ट्रीपच्या अनेक फलितांपैकी एक मुख्य फलित हेच म्हणता येईल- या ट्रीपने मला पुन्हा लिहिते केले ! लिखाणाच्या बाबतीत एक प्रकारे मरगळ आली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. आम्ही खूप प्रवास केला, अमृतसर ते धरमशाला, धरमशाला मधली ठिकाणं, डलहौसी, खज्जियार, परत धरमशाला ते कसोल आणि शेवटी कसोल ते दिल्ली- एवढा प्रवास कार  किंवा बसने केला. चिकार दमणूक झाली. झोप अर्धवट झाली. वेळी अवेळी खाण्यामुळे थोडाफार पोटावर देखील परिणाम झाला. पण तरीही शेवटी कसोलला असताना एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळाली आणि सगळा शीण निघून गेला. आम्ही राहत होतो तिथे बाजूलाच पार्वती नदी वाहत होती....

 

नदीच्या पाण्याची गाज सतत आम्हांला साथ करत होती. या शांततेत हा नाद आणखी गहिरा वाटत होता. शहरातील तऱ्हेतऱ्हेचे आवाज ऐकण्याची सवय झालेल्या कानांना हा नाद ऐकणं ही एक पर्वणीच होती! कसोलच्या एका बागेत वा आमच्या हॉटेल बाहेर कितीतरी वेळ आम्ही काहीही न करता नुसतेच बसून हा आवाज ऐकून कानात साठवून ठेवत होतो. या नादावर इतर कुठलाही आवाज हावी होत नव्हता. त्यामुळे त्याची एक लय तयार झाली होती जी आपोआपच लक्ष वेधून घेत होती. तो नाद...ती लय मनात अजूनही गुंजत राहिली आहे. हा निवांतपणा..ही शांतता अगदी meditative होती... या सहलीत आलेल्या अनुभवांचा कळसाध्याय कसोल मधील या काहीही न करता खूप काही करण्यात होता..
हिमाचल प्रदेशात परत कधी जाईन माहित नाही...गेलो तरी असेच अनुभव येतील का हेही माहित नाही पण मनाच्या एका कोपऱ्यात  हिमाचल प्रदेश साठी राखीव जागा कायमच राहील यात काही शंका नाही.

                                 (समाप्त)






No comments: