Thursday 27 June 2024

आर डी बर्मन : एक चिरतरूण संगीतकार!


१ 

आर डी बर्मन यांच्यावर याआधी मी तीन ब्लॉग लिहिले आहेत. त्यांची लिंक इथे पोस्ट करत आहे. ज्यांनी हे ब्लॉग वाचले नसतील त्यांनी ते जरूर वाचावेत-

1) R D Burman: one song different moods- 

२) आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि मेलडी -

३) आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि गाण्यातले भाव-

आर डी बद्दल त्याच्या मृत्यूनंतर तीस वर्षे होऊन गेली तरी अजूनही लिहिलं जातं, बोललं जातं, त्याच्या गाण्यांवर आधारित ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम अजूनही हाऊसफुल्ल होतात. त्याचं संगीत रिमिक्स करून आजही ऐकलं जातं...त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत, ब्रम्हानंद सिंग यांनी तर आरडी वर एक डॉक्युमेंटरी देखील काढली आहे. त्याची गाणी त्याच्या जयंती/पुण्यतिथीला एफ एम रेडिओ वर दिवसभर ऐकवली जातात... आरडीचे शेकडो हजारो फॅन त्याचे भक्त आहेत.आरडी जवळजवळ एक कल्ट बनला आहे...आरडीच्या संगीताची, त्याच्या शैलीची चिकित्सा केली, कोणी टीका केली तर त्या व्यक्तीच्या विरोधात भांडणारे अनेक जण मैदानात उतरतील इतकं या कल्टने टोक गाठलं आहे. आणि म्हणूनच कदाचित बाकीच्या संगीतकारांच्या फॅन्सना ही खटकणारी गोष्ट झाली आहे. असं असताना मी पुन्हा आर डी वर का लिहितो आहे? 
माझा पण आरडी एक अत्यंत आवडता संगीतकार आहे पण केवळ तो एकमेव आवडता संगीतकार नाही (माझे आजवरचे  ब्लॉग बघितले तर मी ३ ब्लॉग ओ. पी. नय्यर यांच्यावर लिहिले आहेत, २ मदनमोहन यांच्यावर, प्रत्येकी एक सलील चौधरी आणि रोशन यांच्या वर, एक ब्लॉग पं रविशंकर यांच्या 'अनुराधा'  या चित्रपटाच्या संगीतावर, तर एक-एक ब्लॉग पं ह्रदयनाथ मंगेशकर आणि वसंत प्रभू यांच्यावर लिहिले आहेत) 
आर डीचा प्रभाव, त्याचं गारूड मनावर आहे. त्याचं संगीत हे माझ्या तरुणपणाच्या काळातलं संगीत आहे. त्यामुळे आजही मी ते ऐकल्यावर माझ्या त्या काळाशी जोडला जातो. म्हणून त्याच्यावर पुन्हापुन्हा लिहावंसं वाटतं. 
आर डी काय वा इतर कुठलाही संगीतकार काय..तो आपल्याला का आवडतो याबद्दल सोदाहरण आणि काही तथ्यांच्या आधारे लिहिलं तर ती नुसतीच भक्ती न होता ते बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ लिखाण होऊ शकतं आणि हा  ब्लॉग लिहिण्यामागे माझा हाच हेतू आणि प्रयत्न आहे.

२ 

 
१) तीसरी मंझिल (६)
२) पडोसन (८)
३) अमर प्रेम (६)
४) कटी पतंग (७) 
५) आप की कसम (६)
६) दि ट्रेन (६)
७) कारवाँ (८) 
८) हरे रामा हरे कृष्णा (७)
९) सागर (७) 
१०) मेरे जीवन साथी  (८)
केवळ वानगी दाखल दहाच सिनेमांची यादी(कंसात प्रत्येक सिनेमात किती गाणी आहेत हे दिलं आहे) इथे दिली आहे. यापेक्षा आणखीही कितीतरी सिनेमे असतील- पण वरील सर्व सिनेमांमधील जवळपास सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय आहेत. अशी किमया सातत्याने साधणं ही अवघड गोष्ट आहे. माझ्यामते सी रामचंद्र, एस डी बर्मन, ओ पी नय्यर आणि शंकर जयकिशन यांनाच इतक्या सातत्याने हे जमलं आहे. आर डी चं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच सिनेमांतील लोकप्रिय गाण्यांमध्ये देखील वैविध्य आहे. उदाहरणार्थ 'हम किसीसे कम नहीं'(एकूण गाणी १०)  मध्ये - रोमँटिक गाणी आहेत, एक प्रेमातील विश्वासघातावरचं गाणं आहे (क्या हुआ तेरा वादा ), कॉम्पिटिशनची सलग ४ गाणी आहेत आणि या शिवाय एक कव्वाली देखील आहे. 

३ 

आर डी चं  हिंदी सिनेसंगीत क्षेत्रात स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण  साठच्या दशकात झालं . सुरवातीला आलेल्या  'छोटे नवाब' सारख्या सिनेमातील त्याचं संगीत आणि नंतरचं संगीत यात बराच फरक आहे. आणि हा बदल झाला त्यामागे काही गोष्टी आहेत असं मला वाटतं. -
१) आपलं  वेगळं स्थान निर्माण करायचं तर इतर संगीतकारांसारखंच संगीत देऊन ते होणं शक्य नाही. त्यापेक्षा वेगळा विचार केला पाहिजे हा विचार आर डी ने केला असणार. (एस डी बर्मन यांनीही त्याला हे सांगितलं होतंच )
२) साधारण साठच्या दशकातील उत्तरार्धात जगभरात आणि भारतात संक्रमणाचं  वातावरण होतं.  तरुण पिढीमध्ये एक अस्वस्थता होती. सर्वसाधारणपणे डाव्या चळवळींनी प्रामुख्याने युरोपमध्ये जोर धरला होता. अमेरिकी वर्चस्ववाद, भांडवलशाही, युद्धखोरी या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात तरुण पिढीने बंड पुकारलं होतं कारण या व्यवस्थेमध्ये त्यांच्या आशा- आकांक्षा- स्वप्नं पूर्ण करणारं काही नव्हतं किंवा जे होतं त्याने त्यांचं समाधान होत नव्हतं. ही बंडखोरी केवळ आंदोलनं, संप इत्यादी मार्गांमधूनच व्यक्त होत नव्हती तर कला क्षेत्रात देखील यामुळे प्रचंड उलथापालथ झाली होती. वेशभूषा , केशभूषा इथपासून ते चित्रकला, संगीत या सर्व क्षेत्रांत या बंडखोरीने आपला ठसा उमटवला होता.  भारताला स्वातंत्र्य मिळून २०-२५ वर्षे झाली होती. सुरवातीचा आशावाद आणि आदर्शवाद (जो सिनेमांमधून ही प्रकट झाला) लोप पावू लागला होता आणि इथेही प्रस्थापित व्यवस्थेला आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. समाजात ज्या गोष्टी घडतात त्यांचं प्रतिबिंब सिनेमांमध्ये दिसतं तसंच आपल्या कडे होऊ लागलं होतं.  जगापेक्षा कदाचित दहा पाच वर्षे उशिरा झालं असेल पण झालं एवढं नक्की!
३)  आपल्याकडेही सिनेमा बदलू लागला होता. प्रस्थापित  राज-दिलीप-देव-शम्मी हे नायक हळूहळू मागे पडायला लागले होते आणि त्यांची जागा राजेश खन्ना -अमिताभ बच्चन - धर्मेंद्र - ऋषी कपूर - रणधीर कपूर या सारख्यांनी घेतली. एक पिढी बदलून तिची जागा सळसळत्या तरूण रक्ताने घेतली.  नायकांची पिढी बदलल्यामुळे सिनेमांच्या कथानकात बदल झाले आणि या कथानकांना अनुसरून सिनेसंगीतात बदल होणं अपरिहार्य होतं. जुनं संगीत म्हणूनच हळूहळू मागे पडू लागलं. 
४) योगायोगाने याच काळात( प्रामुख्याने सत्तरच्या दशकात)  सिनेसंगीताच्या सुवर्ण काळाचे मानकरी असलेले एक एक संगीतकार अस्तंगत होऊ लागले - अनिल विश्वास पासून सी रामचंद्र ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, नौशाद यांच्या सांगीतिक प्रतिभेला ओहोटी लागली. एस डी बर्मन रेलेव्हंट राहिले पण १९७५ साली निर्वतले. मदनमोहन, रोशन यांनी तर अकाली एक्झिट घेतली. सलील चौधरी आणि हेमंतकुमार यांनी हिंदीतील काम कमी केले. 
अशा पार्श्वभूमीवर  आर डी चा उदय झाला आणि तो इथे जम बसवू लागला. त्याच्याकडे एक जमेची बाजू होती ती म्हणजे त्याला कुठल्याही संगीताचं वावडं नव्हतं. पाश्चात्य संगीताचा तो मोठा चाहता होता आणि नवनवीन संगीताच्या तो शोधात राही आणि त्या संगीताला आपल्या सिने संगीतात कसे वापरता येईल याचा विचार करत राही. त्यामुळे वर उल्लेखलेले पाश्चात्य संगीताचे बदलते प्रवाह ( त्यातील द्रुत आणि वैशिष्ट्यपूर्ण लयीसह) त्याला इथे आणता आले. यापूर्वीही संगीतकार पाश्चात्य संगीताने प्रभावित (इन्स्पायर ) झालेले आहेत. कोणीही त्याला अपवाद नाही. आर डी ने हे मोठ्या प्रमाणावर केलं इतकंच. 
याचंच एक उदाहरण - आर डी च्या  'जवानी दिवानी ' मधलं हे गाणं  म्हणजे  पाश्चात्य संगीत(यात स्केल चेन्जही आहे)  आणि तरुण पिढीला आवडेल अशा वेगवान लयीचा अनोखा मिलाफ असलेलं आहे.. 
तरुण पिढीला आवडेल असं संगीत देणारा संगीतकार हे नाव कमावल्यामुळे कदाचित जेव्हा नव्या हिरोचा पदार्पणाचा  सिनेमा यायचा तेव्हा त्याच संगीत आर डी ने द्यावं हीच मागणी असायची. उदाहरणार्थ- कुमार गौरव (लव्ह स्टोरी ) संजय दत्त ( रॉकी ) सनी देओल ( बेताब) आणि याही सिनेमांमधली जवळपास सगळीच गाणी लोकप्रिय झाली. https://youtu.be/9z6EEprP4rA?si=lYLeJVesbCHJZM71 

४ 
आर  डी बर्मन हा रिदम आणि आवाजाचा चाहता होता. वेगवेगळे रिदम आणि अनोखे आवाज त्याने त्याच्या गाण्यात आणि पार्श्वसंगीतात वापरले. ('सत्ते पे सत्ता'  मधला दुसऱ्या अमिताभच्या एंट्रीच्या वेळचा गायिका ऍनेट ने gargling मधून काढलेला  आवाज सुप्रसिद्ध आहे ) पॉलिश पेपर घासून काढलेला ट्रेनचा आवाज ( होगा तुमसे प्यारा कौन-जमाने को दिखाना है ) गडगडाटासाठी मेटल शीटचा वापर ( भीगी भीगी रातो में- अजनबी ) ही उदाहरणं ज्यांनी 'पंचम मॅजिक' या संस्थेने आयोजित केलेले कार्यक्रम बघितले असतील त्यांना नक्कीच माहित असतील.  पाश्चात्य (लॅटिन अमेरिकेतील) एक रिदम पॅटर्न बोसानोवा आर डी बर्मन पहिल्यांदाच हिंदी सिनेमात वापरला- 
रिदमचा  आणखी एक प्रयोग म्हणजे- मादलतरंगचा अप्रतिम वापर-

आर डी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या बाबतीतही वेगळ्या विचारांचा होता आणि त्यातही त्याने प्रयोग केले ( ज्याबद्दल मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये  'क्या जानू  सजन' या गाण्याबद्दल लिहिलं होतं) 

५ 
पण आर डी बर्मन म्हणजे केवळ उडत्या आणि वेगवान ठेक्यांची, पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी देणारा संगीतकार इतकी त्याची मर्यादित ओळख नाही. वर उल्लेख केलेले सगळे चित्रपट करत असतानाच दुसरीकडे त्याने हृषीकेश मुखर्जींबरोबर -'नमकहराम', 'गोलमाल',' खूबसूरत', 'बेमिसाल', 'जुर्माना', 'रंगबिरंगी', 'किसीसे ना कहना' यासारखे सिनेमे, बासू चॅटर्जी यांच्याबरोबर 'मंझिल', 'शौकीन' यासारखे चित्रपट तर गुलझार यांच्याबरोबर 'परिचय' पासून ते 'लिबास' पर्यंत असे वेगळ्या धाटणीचे सिनेमेही केले. जणू काही ही दोन वेगवेगळी माणसं असावीत अशा प्रकारचं संगीत त्याने अशा सिनेमांमधून दिलं ! अशा सिनेमांमधून त्याच्या सर्जनशीलतेला आव्हान मिळालं आणि त्याने ते पेललंही ! गुलझार आर डी काय किंवा हृषीकेश मुखर्जी आर डी काय- हे स्वतंत्र ब्लॉगचे विषय आहेत. त्यावर लिहीन की नाही माहीत नाही पण या ब्लॉगचा शेवट मात्र माझ्या या आवडत्या गाण्याने करत आहे- 




4 comments:

Mugdha said...

खूप भरभरून लिहिलं आहे.... RD च्या सर्व fans चं हेच मत असेल....ते तू शब्दात छान पणे मांडलं आहेस....आणि आधिच्या ब्लॉग्स पेक्षा वेगळं!

Sunil said...

खूपच छान लिहिलेला आहे आणखीन एक सांगावसं वाटतं म्हणजे आरडी ची गाणी बऱ्याच जाहिरातींमध्ये अजूनही वापरली जातात.

Dr Ketki Ranade said...

तू म्हणालास अगदी तसच लिखाण झाल आहे.सोदाहरण आणि तथ्यांवर आधारीत असल्याने वस्तुनिष्ठ! तुझा प्रत्येक आवड जपताना त्याचा केलेला सखोल अभ्यास मला नेहेमीच अचंबित करत आलाय.आमच्यासाठी आवड/ छंद हा निव्वळ time pass असतो रे!
लिखाण माहितीपूर्ण असलं तरीही RD बद्दलची आत्मीयता अगदी पदोपदी जाणवते! मस्तच!!

Unknown said...

व्वा.
खरंच.
परत परत त्याच्या गाण्यांची चर्चा, विश्लेषण आजतागायत होत रहात आहे. किती बॉलिवूड संगीतकारांच्या भाग्यात हा लाभ आला? फार फार कमी.
हल्लीचे बरेच संगीतकार मी यंव प्रयोग केला...मी त्यंव प्रयोग केला...इथे हे वापरलं...तिथे ते वापरलं वगैरे स्पष्टीकरण देत माहिती देतात. पण गाणी मात्र फारशी टिकाव धरत नाहीत. इथे कोणालाही कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नाही. पण असं घडताना दिसतं. याउलट पंचमने कधी मी हे इथे मुद्दाम वापरलं, ते केलं वगैरे माहिती अगदी क्वचित जरूरीपुरतीच वाचायला मिळते.
त्याच्या संगीत प्रयोगांची चर्चा बाकीचेच आजपर्यंत अजूनही जास्त करतात यांतच त्याच्या परफेक्शनचं रहस्य आहे.
तुझ्या वरच्या ब्रम्हानंदसिंग वगैरे बद्दलच्या उल्लेखात अजून एक भर टाकतो.
मुंबईचा पंचमप्रेमी माधव आजगावकर (Maddy) हा पंचमसंगीतातलं व्यवस्थापनशास्त्र (management lessons) या विषयावर सोदाहरण कार्यक्रम Zoom वर करत असतो आणि ते अगदी हाऊसफुल्ल असतात.
पंचमची चंदेरीतली मुलाखत आठवते. तो म्हणतो "मुळात संगीत देणं हे एका व्यक्तीचं काम नाहीच मुळी. ते एक टीमवर्क असतं. सगळ्यांचा हातभार लागल्यावर काहीतरी भरीव निर्माण होतं..."
.
टाळ्या...शिट्ट्या...
.
हे जर खरं मानलं तर तो त्याच्या वादकांना केवढा motivated ठेवत असेल? त्याच्याकडचे कितीतरी वादक इतर संगीतकारांकडेही काम करायचे पण त्यांचं पंचमकडचं वादन का बरं आपल्या जास्त लक्षांत रहातं?
He was a born leader without doubt.
असो.
.
"_संगीतांत भारतीय, पाश्चात्य असं काही नसतं. फक्त good music आणि bad music एवढे दोनच प्रकार असतात. जे टिकतं ते जास्त चांगलं. जे टिकत नाही ते कमी चांगलं... ~ *पं. जितेंद्र अभिषेकी*_
.
या कसोटीवर उतरणारा बॉलीवूडचा एक संगीत मानदंड म्हणजे "आपला लाडका आर डी"...
आता पंचमच्या कारकीर्दीची आपल्याला संपूर्ण माहिती झाली असं जरा वाटायला लागलं की कोणीतरी त्याचं अप्रकाशित काम यूट्यूबवर टाकतं. मग ती गाजलेल्या गाण्यांची मूळ music sittings असतील किंवा आणखी असंच काही. आणि हा काही तरी AI वापरून केलेला भ्रष्ट content नाही तर धनंजय मान्याच्या भाषेत एकदम 'व्हर्जिनल' मटेरियल असतो याची ऐकल्यावर खात्री पटते. त्यामुळे "मला सगळं माहिती आहे" अशा कुठल्याही भ्रमात न राहता असलं काही आलं की त्याचा आनंदाने आस्वाद घेत रहाणे एवढंच शिकलो आहे.
🥹🌹
.
सगळी गाणी सुंदर असलेल्या तू उल्लेख केलेल्या सिनेमामादीत "यादों की बारात" सहज सामावून गेला असता. अर्थात असे आणखी कितीतरी सिनेमे सापडतील...असो.
मस्त लेखन राजेश !!
.
श्रीपाद सा. मे. गांधी