Monday, 17 August 2026

आमची इंग्लंडवारी : भाग ३: लेमिंग्टन स्पा च्या आसपास !

  १


लेमिंग्टन स्पा मध्ये राहून आम्ही एक- एक दिवसाच्या काही सहली केल्या. त्यापैकी दोन ठिकाणांच्या भेटीवर आधारित हा ब्लॉग आहे. आमच्या भाच्याने त्याच्या गाडीतून आम्हांला या थोड्या off beat ठिकाणी  नेलं. 

वॉरिकशायर लॅव्हेंडर फार्म :

हे लेमिंग्टन स्पा च्या उत्तरेकडे साधारण ७-८ किलोमीटर अंतरावर आहे. इथे लॅव्हेंडर (शास्त्रीय नाव: Lavandula) या फुलाची शेती आहे. जून -जुलै मध्ये या फुलांचा बहर असतो. या काळात आपण इथे जाऊन हा बहर बघू शकतो. तसंच इथे लॅव्हेंडर आईस्क्रिम आणि लॅव्हेंडर फुलांपासून बनवलेली विविध उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सगळीकडे फुललेली जांभळ्या रंगांची फुलं आणि त्या फुलांचा आसमंतात दरवळणारा एक मंदसा सुगंध हा एक पंचेंद्रियांना प्रफुल्लित करणारा अनुभव आहे. आपण या शेतामधून फिरू शकतो, फुलं हाताळू शकतो.(तोडायला मात्र परवानगी नाही) 

 

 


 
लॅव्हेंडरची फुलं मी पहिल्यांदाच बघितली. या फुलाच्या कमीत कमी ३० प्रजाती आहेत आणि त्या प्रत्येक फुलाचा नमुना तिथे एका छोट्या जागेत लावण्यात आला आहे. मात्र इथे यापैकी फक्त Lavandula angustifolia Folgate, Lavandula angustifolia Maillette आणि  Lavandula intermedia Grosso या तीन प्रकारच्या लॅव्हेंडर फुलांची लागवड केलेली आहे. या फुलाच्या रंगावरूनच लॅव्हेंडर रंग ओळखला जातो. आपल्याकडे त्याला लव्हेंडर म्हणूनही संबोधले जाते. 
 

अशी फुलांची दूरवर पसरलेली आणि तरीही त्यातही शिस्त असलेली रांग बघणं खूपच नेत्रसुखद होतं. 
 
 
 
                                                पुढे फुलांची रंग आणि मागे असं हे देखणं घर !

 



 
या फुलांकडे मधमाश्या आणि फुलपाखरं आकर्षित झाली नाहीत तर ते नवलच म्हणावे लागेल! 
फुलांचा हंगाम संपत आल्यामुळे ही शेती बघायला खूप गर्दी झाली होती. समूहाने येणाऱ्या लोकांसाठी इथे छोटेसे तंबू ठेवण्यात आले होते ज्यात छोटे बाक होते. त्यावर बसून लोक खाण्या पिण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. ही बाग पार्श्वभूमीला ठेऊन फोटो काढण्याची पण सोया होती. तिथे अर्थातच जास्त गर्दी होती. मला वाटलं होतं की मीच अभ्यास करून सगळीकडे जातो. पण इथे माझा सपशेल पराभव झाला. इथे आपल्या 'शेजारी देशातील' एक तरुण  कुटुंब  आलं होतं. कदाचित ते इथेच राहणारे असतील. त्यातल्या बाईने अगदी ठरवून इथल्या वातावरणाला साजेसे लॅव्हेंडर रंगाचेच कपडे घातले होते. ते कपडेही चित्रविचित्र होते- म्हणजे फुलाच्या कार्टून सारखा त्या कपड्यांचा आकार होता. तिला वर्ष-दोन वर्षांचं बाळ होतं. पण त्या बाईचा उत्साह त्या लहान मुलाला लाजवेल असा होता. ती त्या पेहरावात आणि त्या सेल्फी पॉईंट वर जाऊन फोटो काढण्यासाठी फारच उत्सुक होती. कदाचित या मंत्रमुग्ध करणाऱ्या या वातावरणाचाच हा परिणाम असावा! 

द कॉट्सवल्ड्स  : 

इंग्लंडच्या नैऋत्य आणि दक्षिण मध्य भागातील हा भाग आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण चुनखडी आहे आणि तिच्या आजूबाजूला गवताळ प्रदेश आहे. इथूनच सोनेरी रंगाच्या कॉट्सवल्ड दगडाचे उत्खनन करण्यात येते. हा एक विस्तीर्ण प्रदेश असून जवळपास पाच-सहा कौंटीमध्ये तो विखुरला गेला आहे. याच दगडाचा वापर करून या भागात सगळी गावाच्या गावं वा छोटी शहरं वसवण्यात आली आहेत. इंग्लंडमधल्या इतर गावांमधल्या घरांपेक्षा ही घरं जास्त सुंदर आणि वेगळी आहेत हे लगेच लक्षात येतं. ती अगदी उठून दिसतात. 

 



आम्ही ग्लूस्टरशायर  कौंटीमध्ये असलेल्या कॉट्सवल्ड्सच्या  Bourton-on-the-water आणि Upper and Lower Slaughter या गावांना भेट दिली. लेमिंग्टन स्पा पासून ही गावं साधारण ५०-५५ किलोमीटर अंतरावर आहेत. Bourton-on-the-water ची गंमत म्हणजे या गावाची हुबेहूब प्रतिकृती एका छोट्या जागेत साकारण्यात आली आहे. उदाहरणार्थ- ही मूळ इमारत -

आणि ही तिची प्रतिकृती-
 

अशाचप्रकारे पोस्टऑफिस, चर्च वगैरे सगळ्या इमारती मिनिएचर पद्धतीने मात्र मूळ कॉट्सवल्डच्याच दगडाचा वापर करून बांधण्यात आल्या आहेत. त्याचीच ही झलक-














विशेषतः हे घर बघून मला पुण्यातील ग्राहक पेठेच्या गणेशोत्सवाच्या सजावटीची आठवण झाली. ते दरवर्षी बिस्किटांचा वापर करून अशीच प्रतिकुर्ती करत असतात. इथे मात्र खरा दगड वापरण्यात आला आहे. 
















 

Bourton-on-the-water हे गाव विंडरश या नदीवर वसलेलं आहे. आम्ही गेलो त्यादिवशी तिथे बऱ्यापैकी उकडत होतं. नदी गावाच्या मधोमधून वाहते. पाणी अगदीच उथळ होतं. सध्या इथे शाळांना सुट्ट्यांचा हंगाम असल्याने लहान मुलं आणि त्यांचे पालक अशी मोठीच गर्दी उसळली होती. माझ्या संपूर्ण पंधरा दिवसांच्या ट्रिपच्या काळात फक्त इथेच मी थोडीफार बेशिस्त अनुभवली. म्हणजे उघडी-वागडी लहान मुलं बेभान होऊन या पाण्यात उतरून खेळत होती. कोणी या पाण्यातील शेवाळं उपटून काढत होतं. काही मुलं पाण्यात एकमेकांशी झटापट करत होती तर काही मुलं आम्ही आमच्या लहानपणी करायचो तसंच पाण्यात दगड टाकून त्या दगडाचे टप्पे टाकत होते(आम्ही त्याला भाकऱ्या करणे म्हणायचो ) एका लहान मुलीची आई व्हेपिंग मध्ये दंग  असताना ती मुलगी अगदी पाण्यात पडायच्या बेतात होती तेवढ्यात त्या आईचंच लक्ष गेलं आणि तिने अगदी त्या मुलीचा  फ्रॉक ओढून पाण्यात पडण्यापासून तिला वाचवलं. थोडं अलिकडे एक माणूस मोठया आवाजात आपल्या पाळीव कुत्र्याशी पाण्यात खेळत होता. तो माणूस लांबवर बॉल टाकायचा आणि कुत्रा पाण्यात उड्या मारत जाऊन  तो बॉल तोंडात घालून आपल्या मालकाकडे आणून द्यायचा. मग हाच खेळ पुन्हा पुन्हा! हे असं उधळलेलं वातावरण इंग्रजांच्या एरवीच्या कडक शिस्तीच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळणं दुर्मिळच असावं. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेत असतात. पण इथे सगळं वेगळं होतं.  कदाचित तो यावर्षीच्या कडक उन्हाळ्याचा परिणाम असावा. किंवा कदाचित सुट्ट्यांमुळे लहान मुलांबरोबर त्यांचे पालक देखील पुन्हा एकदा लहान झाले असावेत. हे त्यांचं lowering of guard बघणं खूप वेगळं आणि गंमतशीर वाटलं.

                                                                                                                                                        (क्रमश:)

No comments: