१
आम्ही The Lake District ला जाणार आहोत हे समजल्यावर माझा मित्र प्रशांत लेले आग्रहाने म्हणाला की तू तिथे गाडी भाड्याने घे आणि स्वतः चालवत जा. एक तर तिथे गाडी चालवणं सोपं आहे. आपल्यासारखंच तिथे right hand drive आहे. शिवाय स्वतःची गाडी असली म्हणजे आपल्याला पाहिजे तिथे, हवा तेवढा वेळ थांबता येईल आणि फोटो काढता येतील. त्याचं म्हणणं बरोबर होतं. शिवाय हेही कळलं की आपलं भारतीय लायसन्स तिथे चालतं. वेगळं आंतरराष्ट्रीय लायसन्स काढायची गरज नसते. सगळेच मुद्दे पटण्यासारखे असले तरी माझी द्विधा मनःस्थिती झाली होती. एक तर मला गाडी चालवण्याचा भयंकर आळस! ऑटो गाडी चालवण्याची सवय नाही. नवख्या देशात हायवेवर गाडी चालवण्याचा धोका घ्यायचा का? शेवटी आपण हे धाडस करू नये या निर्णयाला आलो आणि आम्ही The Lake District ची एक दिवसाची गाईडेड टूर इथूनच बुक केली. आणि या टूरचा देखील एक वेगळाच आनंद मिळाला.
२
या टूर बद्दल सांगण्याआधी थोडं विषयांतर करतो. विंडरमिअरला आणि एकूणच इंग्लंड मधील आमच्या वास्तव्यात आम्ही खूप वेळा बसने प्रवास केला आणि बहुतेक वेळा बस ड्रायव्हर लोकांचा चांगलाच अनुभव आला. इथे आपलं कार्ड टॅप करून बस तिकीट काढायची पद्धत आहे हे मी मागे लिहिलं आहेच. पण प्रत्येक प्रवासी तिकीट काढल्यावर आणि बस मधून उतरताना न विसरता ड्रायव्हरला थँक यू म्हणतोच म्हणतो! ती सवय आम्हीही लावून घेतली. ड्रायव्हर काही वेळा स्मित हास्य करून, काही वेळा नुसती मन डोलावून तर काही वेळा चीअर्स/ अंगठा दाखवून प्रतिसाद द्यायचे. बस स्टॉपवर जर अपंग व्यक्ती असेल आणि व्हीलचेअरने बसमध्ये चढणार असेल तर ड्रायव्हर स्टॉपवर बसमधून उतरून बस ला रॅम्प लावायचे आणि मग तो प्रवासी आत शिरायचा. तो स्थिरस्थावर झाल्यावर मगच गाडी सुरू करायचे. आणि हे सगळं करत असताना चेहऱ्यावर कुठेही -"काय त्रास आहे आपल्याला" असे भाव नाहीत. एकही बस ड्रायव्हरने एकदाही सिग्नल तोडला नाही. कोणीही साधा हॉर्न देखील वाजवला नाही. एकदा चालत्या बसमध्ये मी ड्रायव्हरशी मी बोलायला गेलो तर आपली नजर समोर आणि स्थिर ठेवत मला तो मोठ्या आणि ठाम आवाजात म्हणाला - "I am not supposed to talk to you while driving, Sir!" हा माझ्यासाठी एक मोठा धक्काच होता! एकाच वेळी प्रवाश्यांशी बोलणं, समोर मोबाईल फोन बघणं, जाता जाता दुचाकीस्वाराला शिव्या हासडणं, मध्येच तंबाखू/पानाची पिंक बाहेर टाकणं आणि या सगळ्यात बस देखील चालवणं! एवढं multi tasking करणारे ड्रायव्हर बघायची आम्हांला सवय ! इथे हे काहीतरी अद्भुतच होतं ! वेळेच्या बाबतीतही इंग्लंडमधले ड्रायव्हर लोक एकदम काटेकोर! ठरलेल्या वेळी बस स्थानकावरून सुटणार म्हणजे सुटणार. एकदा बस मध्ये चढल्यावर- "दोन मिनिटांत जाऊन येतो.मी परत येईपर्यंत बसला थांबवा !" असं त्यांना म्हणायची काही सोय नाही. "आलात तर तुमच्यासह... नाहीतर तुमच्याविना!" असा यांचा बाणा!
३
तर आता मूळ विषयाकडे! आम्ही २६ जुलैला सकाळी बरोबर ९ वाजता The Lake District च्या टूर साठी Mountain Goat च्या ऑफिसबाहेर पोचलो. आमची टूर आठ तासांची होती. हा आमचा बस ड्रायव्हर कम टूर गाईड -बॉब ! खरं तर हा फोटो आमची टूर संपल्यावर संध्याकाळी काढला आहे. पण बॉब दिसतो कसा हे समजण्यासाठी हा फोटो आधीच पोस्ट केला आहे. या फोटोत लक्षात येत नाही पण बॉबच्या केसांना पोनी टेल आहे!
आमच्या मागे असलेल्या १६ सीटर मर्सिडिस बसने आम्ही ही टूर केली. आम्ही सोडून या प्रवासात आणखी ६ भारतीय होते, एक अमेरिकन वयस्कर जोडपं, एक ब्रिटिश जोडपं आणि एक पूर्व आशियायी देशातली सोलो ट्रॅव्हलर मुलगी होती. आम्हां प्रवाशांचा एकमेकांशी बोलण्याचा फारसा संबंध आला नाही. पण संपूर्ण ट्रीपमध्ये या बॉबने जी मजा आणली त्याला काही तोडच नाही! सर्वांशी नम्रपणे बोलणं, कोणाच्याही फालतू प्रश्नांनाही न कंटाळता उत्तरं देणं, कौशल्याने गाडी चालवणं, सर्व लोक गाडीत परत बसत आहेत ना याची खात्री करणं, जे उशीर करत होते त्यांना विनोदी पद्धतीने समज देणं असं सगळं तो करत होता. गाडी चालवता चालवता बोलायचं नाही हा नियम बॉबही पाळत होता. पण आजूबाजूला जे काही दिसत होतं ते रंजकपणे सांगण्यासाठी बॉबीच्याच आवाजात रेकॉर्ड केलेली माहिती ऐकवण्यात येत होती. म्हणजे एक प्रकारे बॉबचा डबल रोलच! गंमत म्हणजे रेकॉर्डिंग सुद्धा इतकं प्रवाही आणि जिवंत होतं की अशा प्रकारे ऐकू यायचं - "Now the real Bob will tell you if he is tired and needs to take a break" बॉब ला या सर्व परिसराच्या इतिहास,भूगोल, भूविज्ञान (geology), प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, व्यापार-उदीम, वास्तुरचनाशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्य या आणि अशा अनेक विषयांची व्यवस्थित माहिती होती. मान्य आहे की गाईड म्हणून हे त्याचं कामच आहे पण तो ज्याप्रकारे बोलत होता त्यावरून वाटलं की ते काही उथळ नव्हतं. त्याचा या सगळ्याचा बऱ्यापैकी अभ्यास असावा. यावर कडी म्हणजे त्याचा self deprecating humour! टिपिकल ब्रिटिश विनोदाची जातकुळी! त्याचं ड्रायव्हिंग उत्तमच होतं तरी त्याने याबाबत स्वत:ला कमी लेखत एक कोटी केली. विशेष म्हणजे संध्याकाळी टूर संपल्यावर सगळे प्रवासी उतरल्यावर आमच्या विनंतीला मान देऊन बॉब ने आम्हांला विंडरमिअर पासून लांब बोट क्रूझच्या ठिकाणी सोडलं. तो दमलेला दिसत होता तरी त्याने आमच्यासाठी हे केलं.
बॉब कडून दिवसभर एवढी माहिती मिळत होती की 'किती घेशील दो कराने !' अशी आमची अवस्था झाली होती. पण याचा कंटाळा आला नाही कारण ती माहिती पोचवण्याची रंजक पद्धत!
४
आमच्या या प्रवासात आम्ही एकूण १० तलाव पाहिले- Windermere, Buttermere, Bassenthwaite Lake (या एकाच तलावाच्या नावात Lake हा शब्द आहे!), Brothers Water ( त्याचं हे नाव आहे कारण इथे दोघा भावांनी आत्महत्त्या केली होती म्हणे!हा सगळ्यात छोट्या तलावांपैकी एक आहे. ), Crummock Water, Derwent Water, Grasmere, Rydal Water, Thirlmere (याच तलावाचे पाणी वापरून मँचेस्टरला पाणीपुरवठा केला जातो) आणि Ullswater. शिवाय आम्ही Keswick (उच्चार केसिक) ला जेवायला थांबलो होतो तिथेही एक तलाव आहे. यापैकी काहीच तलावांचे फोटो काढता आले कारण चालत्या बसमधून ते काढणं शक्य नव्हतं( प्रवाशांनी कायम सीट बेल्ट लावणं बंधनकारक होतं त्यामुळे आपली जागा सोडता येत नव्हती.शिवाय बसची काच मध्ये येत असल्याने फोटो नीट येत नव्हते. तरीही जे काही फोटो काढले आहेत ते याप्रमाणे-
विंडरमिअर तलावात ही ट्रिप संपल्यानंतर आम्ही क्रूझ राईड केली. तेव्हाचे हे काही फोटो- हा इंग्लंडमधील लांबी, क्षेत्रफळ आणि खोलीच्या दृष्टीने सगळ्यात मोठा तलाव आहे.
तलावाच्या मागे सूचीपर्णी जंगल(Coniferous forest) दिसत आहे.
Ullswater -
Ullswater वरून दिसणारी Langdale Valley
वाटेत वेगवेगळे घाट (Pass ) लागत होते.
Hardknott Pass.
हा इंग्लंडमधील सगळ्यात अवघड रस्ता आहे म्हणे! पण मला तरी तो काही एवढा भीतीदायक वाटला नाही. यापेक्षा कितीतरी अवघड घाट आपल्या सह्याद्रीत आहेत!
Kirkstone pass चे विहंगम दृश्य!
Kirkstone Pass मधून दिसणारा Brothers Water हा तलाव!
Brothers Water
Honister Pass-
इथे २०१५ साली इंग्लंड मध्ये २४ तासातील सर्वाधिक पाऊस पडला होता. (३४१ मिमी). इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. इथे खूपच थंड होतं आणि बोचरा वारा देखील.
Whinlatter Pass road वरून दिसणाऱ्या Ullock Pike चे मोहक दृश्य !
Bassenthwaite Lake-
Dodd Fell and Bassenthwaite Lake (उत्तर इंग्लंड मधील भाषेत Fell म्हणजे डोंगर)
या तलावावरून जाताना AI बॉब ने 'thwaite' या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. याचा भाषिक संदर्भ थेट दहाव्या शतकात इंग्लंडवर झालेल्या व्हायकिंग आक्रमणाशी आहे.
वाटेत अशा दगडी भिंतीदेखील दिसत होत्या -
या एकावर एक स्थानिक दगड(local slate and glacial rocks) रचून तयार केलेल्या भिंती आहेत. त्यामागे गुरुत्त्वाकर्षण आणि घर्षण या दोन संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे. यात कुठेही सिमेंटचा वापर नाही तरीही त्या भक्कम आहेत आणि शतकानुशतके तशाच उभ्या आहेत.
सूचिपर्णी जंगल असलेला आणखी एक डोंगर. बॉबच्या म्हणण्याप्रमाणे काही ठिकाणी लोकांनी वृक्षारोपण करून ही जंगलं राखण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यात तो आणि त्याची बायको देखील सहभागी झालेले आहेत. तो म्हणाला- आज नाही तरी २०० वर्षात या डोंगराचं घनदाट जंगलात रूपांतर झालं असेल. तेव्हा आम्ही नसू पण आमच्या रूपाने आम्ही लावलेली ही झाडं नक्कीच असतील. इथल्या मातीवर आणि एकूण The Lake District वर त्याच निस्सीम प्रेम होतं हे अगदी ठायी ठायी जाणवत होतं.
इथे छोटी छोटी गावं आणि शेतंही दिसत होती. शेतात या Limousin जातीच्या गाई दिसत होत्या.
तर इथे जागोजागी या मेंढ्या (Herdwick Sheep) ही दिसल्या. या इथल्या स्थानिक मेंढ्या असून आता त्या या प्रांताची एक ओळख बनून राहिल्या आहेत. पूर्वी इथे शेती उद्योग मोठ्या प्रमाणात होता तेव्हा यांच्यापासून लोकर/सूत बनवण्याचा पूरक व्यवसाय होता. आता इथे शेती ऐवजी पर्यटन हा मुख्य उद्योग आहे.
या लोकर/सूत बनवण्याच्या उद्योगात पूर्वी अविवाहित वा विधवा महिला यांचा सहभाग जास्त असे. त्यांच्यासाठी घराची एक खोली राखून ठेवली जात असे. हे करण्याच्या प्रक्रियेत spinning ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. यावरून या महिलांना Spinsters असं म्हटलं जाऊ लागलं आणि नंतर नंतर दुर्दैवाने हाच शब्द त्या महिलांची वैवाहिक स्थिती दर्शवणारा शब्द बनून गेला. (ही सर्व माहिती अर्थातच बॉब कडून समजली)
जेवण्यासाठी आम्ही केसिकला थांबलो होतो. इथे आमच्या इंग्लंड ट्रिप मध्ये पुढे सगळीकडेच आलेला अनुभव मिळाला- तीच आनंदी,उत्साही गर्दी! तोच सुट्ट्यांचा माहोल! कुटुंबंच्या कुटुंबं आपल्या पाळीव कुत्र्यांसह सहलीची मजा लुटताना बघायला मिळाली.
नंतर आम्ही ग्रास्मिअरलाही गेलो होतो. आदल्या दिवशी वर्डस्वर्थच्या घराची टूर केली होती तिथेच. पण बॉब ने आम्हांला फक्त ते घर बाहेरून दाखवलं. त्यामुळे आम्ही तिथे वेगळी टूर केली ते बरंच झालं. ग्रास्मिअरला बॉब ने दुसऱ्या ठिकाणी गाडी थांबवली. ते ठिकाण म्हणजे-

इथे लोक रांगा लावून हा सुप्रसिद्ध ब्रेड खरेदी करत होते. आम्हांला बऱ्याच जणांकडून कळलं होतं की तो खूप overrated आहे त्यामुळे आम्ही काही या रांगेत थांबलो नाही. बेकरीपासून अक्षरश: पन्नास पावलांवर आणि बेकरीच्याच आवारात आम्हांला हे दिसलं -
ही वर्डस्वर्थची दफनभूमी होती. २३ एप्रिल १८५० ला त्याचा मृत्यू झाला.
आम्ही The Lake District मध्ये दोन दिवस होतो पण इथला क्षण अन् क्षण आनंददायी होता. सर्वार्थाने समृद्ध करणारा आणि मनाला आंतरिक समाधान देणारा अनुभव गाठीशी बांधून आम्ही २७ जुलैला तिथून परतलो.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment