Saturday 13 April 2013

वेदनेच्या महालाचा राजा !




कवी ग्रेस (१०.०५.१९३७- २६.०३.२०१२)


















आज
एका कवीचे वेगळे रूप उमगले 
प्रत्यक्ष आणि प्रतिमांचे अद्वैत (मी) अनुभवले 

त्याचे शब्द म्हणजे...
निबिड अरण्यातली वाट 
अथांग सागराची व्याकुळ खोली 
हातून निसटणारा पारा 
की रानभूल...चकवा?

चंद्र-सूर्य-तारा 
पाऊस-वारा 
आकाश-क्षितीज 
अंधार-प्रकाश-संधिप्रकाश...
प्रतिमा त्याच.. रूपके तीच.
पण याच्या कवितेतून भेटतात 
एक नवा घनगंभीर अर्थ घेऊन.


कवितेच्या निर्मिती-क्षणांचा मागोवा घ्यावा का ?
शब्दांमागच्या उर्जेची उगमस्थानं शोधावी का?

पण याची शोधली तर 
सगळे रस्ते दुःखाच्या भूलभुलैय्यात 
पुन्हा पुन्हा जाताना दिसतील.
भय, असुरक्षा ,एकटेपण, वियोग, मृत्यू, 
अजाण वयातील आघातांच्या खांबांनी बांधलेल्या 
वेदनेच्या महालाचा हा राजा !

दु:खापुढे नाही हा हतबल 
पचवेल त्याचे कितीही हलाहल 
भौतिक,ऐहिक,लौकिकापलीकडचा हा 
तरीही हा ना कोणी फकीर ना वैरागी 
कारण..
वेदनेमध्येच हा आहे आत्ममग्न...आसक्त !

-डॉ.राजेश पुसाळकर
(दि. २३/०२/२०११)
( कवी ग्रेस यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्यानंतर उमटलेले हे विचारतरंग! या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध ' ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या कवितेचा एक वेगळाच भावार्थ उलगडून दाखवला. मला असं वाटायचं की कवितेत आई कायमची गेली आहे म्हणजे तिचा मृत्यू झाला आहे. पण ते तसं नसून आई थोड्या काळासाठी तिचं नातं असलेल्या एका  संन्याशाच्या घरी राहायला गेली आहे. मृत्यू झालेल्या आई बद्दल वाटणारं  दु:ख मोठं की असं नकळत्या अबोध वयाच्या मुलाला सोडून दुसरीकडे राहायला गेलेल्या आईबद्दल वाटणारं दु:ख मोठं हे मला ठरवणं अवघड गेलं. या कवितेचा एक वेगळाच आयाम सापडला.)

 




No comments: