Friday 12 April 2013

मैफल







कुणीतरी हळुवारपणे वाळ्याचा पंखा फिरवल्यासारखी 

वाऱ्याच्या लहरीने पहाटेच जाग आली...

संपूर्ण आसमंतात होतं एक भारलेपण

एका वेगळ्याच मंद दरवळाचे...

प्रत्येक श्वासात तो एहसास साठवताना
होती एक अधीरता..

वाऱ्याच्या त्या आमंत्रणाचा माग शोधण्याची..
एक.. दोन.. तीन.. चार..अ ब ब!!
एखाद्या लहान मुलाने नव्याने काहीतरी शोध लावल्यासारखा 

दिसला मला
चाफ्याच्या चार झाडांवर सुरू असलेला उत्सव !


रंग-रूप-वास या सर्व गुणांनिशी
ती झाडं केवळ व्यक्त होत होती.
अंगांगावर सोनं ल्यालेलं असूनही
त्यांच्यात होती.
एक विनयशील सहजता.एक सुसंस्कृतता..

आज पहाटे मला जागच आली नसती तर?
हा वारा नामक 'मीडिया' वाहिलाच नसता तर?
तर.. कदाचित
ही चाफ्याची मैफल माझ्या हातून निसटून गेली असती.
माझ्याकरता अव्यक्तच राहिली असती.

स्वतःचं असलेलं (आणि नसलेलंही) मिरवण्याच्या सध्याच्या काळात..
चाफ्याचं हे असं निव्वळ असणं
खूप काही सांगून गेलं..

No comments: