Wednesday, 11 June 2014

काश्मीर डायरी ५


भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . . 


उडीच्या सैनिकी पोस्टची जागा तशी वैशिष्टयपूर्ण, खरं तर आपल्या दृष्टीने तोट्याची आहे. म्हणजे असं की तीन बाजूंनी डोंगर आणि तेही  शत्रू पक्षाच्या ताब्यातले आणि खाली एका बाऊलसारखी ही पोस्ट ! पोस्टकडे जाताना झेलम नदीच्या पलीकडे पाक व्याप्त काश्मीरच्या डोंगरांवर त्यांचे बंकरही दिसतात. म्हणजे त्यांना उंचीचा फायदा मिळत असणार गोळीबार करायला ! 

पोस्ट म्हणजे तरी काय - एका रांगेत असलेली बैठी घरं !  तिथे गेल्या गेल्या आम्हांला ही पाटी दिसली. 


तिथे पोचल्यावर आमची भेट सुभेदार महेंद्रसिंह यांच्याशी झाली. इथून पुढचा अर्धा -पाउण तास ते आमच्याबरोबर होते. टिपिकल सैनिकी पोशाख परंतु आवाज अगदी मृदू, मुलायम ! सैन्यातल्या माणसाला न शोभणारा ! काहीवेळा तर त्यांचं बोलणं आमच्यापर्यंत पोचतही नव्हतं. पावसाळी, ढगाळ वातावरण, गार वारा, पोस्टच्या आजूबाजूला असलेली झाडी आणि या सगळ्यावर कडी करणारं  एक अनामिक थ्रील आणि गूढ तणावही  ! कदाचित मला माझीच मनाची अवस्था नीट शब्दांत पकडता येत नसेल. . . पण त्यातल्या त्यात जवळचा शब्द हाच असू शकेल. समोर सगळीकडे शत्रूने बळकावलेला प्रदेश . . . नजरेच्या इतक्या जवळच्या टप्प्यात शत्रूचे दर्शन पहिल्यांदाच होत होते. जरी आपले सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक असा लौकिक असलेले आणि पाहुण्यांची पुरेपूर काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडणारे असे असले तरी समोरचे सैनिक त्याउलट कुरापती काढणारे किंवा माथेफिरू असा लौकिक असलेले! यातून काही घडले तर ? हा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात  विचार चालू होता. याला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा! 
पोस्टच्या बाहेर एक बस थांबली होती. मुझफ्फराबाद-श्रीनगर या मार्गाची ती बस! बस रिकामी होती. तिकडून आलेले प्रवासी सामानाची तपासणी, कागदपत्रांची औपचारिकता या गोष्टी आपल्या पोस्टच्या एका इमारतीत करत होते. दोन्ही बाजूच्या काश्मीर मध्ये विखुरल्या गेलेल्या नातेवाईकांना एकमेकांना भेटण्याचा हा एक उत्तम मार्ग! दोन्ही देशातील तणाव निवळण्याच्या  दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाउल ! भारतीय पोस्ट आणि पलिकडची पाक व्याप्त काश्मीरची पोस्ट, मध्ये वाहणारी झेलम नदी आणि त्यावरील हा पूल ! दोन देशांना तसं म्हटलं जोडणारा, संवाद साधण्याची शक्यता निर्माण करणारा हा पूल ! मैत्रीचा पूल म्हणणं फारच रोमांटिक होईल. पण निदान शांतता आणि सौहार्द राखण्यास मदत करणारा, व्यापार आणि मानवी व्यवहार यांना चालना देणारा असा पूल ! म्हणून याचं नाव आहे- कमान अमन सेतू ! 

अमन सेतू हे समजलं, पण हे कमान का? हे नाव आधीही आमच्या मेजर बरोबरच्या गप्पांमध्ये आलं होतं. तेव्हा मी त्याचा अर्थ कमांड असा घेतला होता. पण सुभेदार महेंद्रसिंह यांच्याकडून कमान या नावाचा उलगडा झाला-
हा मार्ग तसा जुना आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वापरातला ! १९४७ नंतर पाकिस्तानने या मार्गावरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता तेव्हा गढवाल रायफल्सच्या  लेफ्टनंट कर्नल कमानसिंह यांनी त्यांच्याजवळ कमी सैन्य असूनही अजोड शौर्य आणि साहसी नेतृत्वाच्या जोरावर शत्रूला नामोहराम केले होते. त्यांच्या या पराक्रमाच्या सन्मानार्थ त्यांना महावीरचक्र देण्यात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ या पोस्टला हे नाव देण्यात आले. 
त्या बैठया घरांच्या थोडंसं पुढे चालत गेल्यावर तो पूल दिसला. पुलावर आपल्याबाजूने एक सैनिकी ट्रक आणि त्यांच्या बाजूने एक ट्रक असं दृश्य होतं. पुलाच्या दुरुस्तीचं काम आपल्या सैन्यातर्फे चालू होतं. आणि म्हणूनच या पुलावरून जड वाहतूक होत नव्हती.आम्हांला वाटेत दिसलेली ट्रकची रांग आणि ते ओस पडलेले सलामाबाद गाव याचे हे कारण होते. आपल्याकडच्या पुलाच्या डावीकडे भारतीय सैनिक सतत पोझिशन घेउन उभे होते, तर उजव्याबाजूला शांततेचं प्रतीक म्हणून पांढरा झेंडा लावला होता.पलीकडेही तसाच झेंडा होता. पोशाखावरून पुलावर काम करणारे सर्व भारतीय सैनिकच दिसत होते. एक सैनिक तर पुलाच्या खाली असलेल्या दगडी खांबावर उतरून बाहेरच्या बाजूने पुलाला रंग देण्याचे काम करत होता. 

महेंद्रसिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा पूल आपणच बांधलाय, त्याची डागडुजीही आपणच करतो. पुलाला आपण बाहेरून तिरंग्याचा रंग दिला होता. यावर पाकिस्तानने आक्षेप घेतल्यामुळे आता तिथे पांढरा रंग देण्याचे काम चालू होते. 
 भारतीय सीमांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली जी निदान मला तरी नवीन होती. शेजारी राष्ट्रांबरोबर आपल्या  ४ प्रकारच्या सीमा आहेत-
१) आंतरराष्ट्रीय सीमा (International  Borders)- या सीमांबद्दल फारसा तंटा-बखेडा नाही. उदा- पंजाब-राजस्थान लगतची सीमा.  
२) LoC - Line of Control - जम्मू आणि काश्मीर लगतची सीमा.  
३) L A C -Line of Actual Control - चीन-भारत सीमा.  
४) AGPL-Actual Ground Position Level -सियाचीन भागातील सीमा. 
यात फक्त LoC वर छोटया-मोठया चकमकी होतात. बाकीच्या ठिकाणी असं झालं तर ते एक प्रकारे युद्धच समजलं जाईल. 
समोरच पाकिस्तानी सैनिक दिसत होता. त्याचं बहुदा मोबाईल वर बोलणं चालू होतं. 

तसं म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावर हे सैनिक आमने सामने असणार. त्यांच्यात कधी बोलणं होतं ? यावर महेंद्रसिंह यांनी दिलेलं  उत्तर मार्मिक होतं- "वो कुछ बात नही करते. कोई भी काम की बात हो तो हमें ही बोलना  पडता है. वो  सहमे सहमे से रहते है !" असं हसत हसत म्हणाले. "हम उनपर  भारी पडते है ना ! Ratio के हिसाब से वो अगर एक है तो हम बारह है. इसलिये उनको चुप रहना पडता है." आमच्या सारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी ते असं बोलले की खरोखरच परिस्थिती अशी आहे हे सांगता येत नाही. कारण वृत्तपत्रात तर बातम्या अशा येत असतात की ज्यावरून वाटावं की पाकिस्तान आपल्याला काही ना काही प्रकारे डिवचत असतो. 

पुलाजवळ फोटो काढून झाल्यावर आम्ही त्या बैठया इमारतीत गेलो. २५ जुलै २०११ ला इथे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराच्या खुणा दिसत होत्या. वातानुकूलन यंत्रणेमधून हा गोळीबार झाल्याचे महेंद्रसिंह यांनी सांगितले. 


















या खुणा बघताना अंगावर काटाच  आला! असा गोळीबार झाल्यास सैनिक ताबडतोब प्रत्त्युत्तर देउ शकतात, त्यासाठी दिल्लीच्या परवानगी ची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. असाच गोळीबार एकदा काही पर्यटकांवर  झाल्याचे ही त्यांनी सांगितले. अर्थात तेव्हा ते परवानगी नसताना तो पूल ओलांडायचा प्रयत्न करत होते म्हणून झाला असेही ते म्हणाले. 
बाहेर मस्त पावसाळी वातावरण असताना तिथे आम्ही गरमागरम कॉफी आणि पकोडे असा त्या वातावरणाला साजेसा पाहुणचार घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो. 


हे सगळं जरी असलं तरी या सैन्याकडे सामान्य जनता कशाप्रकारे बघते? आम्ही वाटेत बऱ्याच वेळा पाहिलं. सैनिक रस्त्यात उभे असले तरी त्यांच्याकडे रस्त्यावरची माणसं ढुंकूनसुद्धा बघत नाहीत. रस्त्यावरच्या एखाद्या पुतळ्याच्या अस्तित्वाची आपण दखलसुद्धा घेत नाही. तो रोजचाच असल्यामुळेही असेल असे. तसेच आम्हांला सर्वसामान्य माणसाचे या सैन्याच्या बाबतीत वाटले. ड्रायव्हर शब्बीर ला या सैन्याबद्दल विचारले असता त्याने एका वाक्यात सांगितले- "ये बहोत ज्यादा है. यहा इतनी फौज की जरूरत नही है. " त्याच्या म्हणण्याप्रमाणे या सैन्याचा होणारा खर्च हा सर्वसामान्य लोकांकडूनच वसूल केला जातो. तसेच त्याच्या म्हणण्याप्रमाणे  आजतागायत सैन्याकडे सुमारे २ कोटी एकर जमीन ताब्यात आहे. सर्व मोक्याची ठिकाणे सैन्याने बळकावली आहेत. जिथे पर्यटनाचा विकास होऊ शकतो तिथे सैन्य असल्यामुळे तिथे काहीच होणं शक्य नाही. एकूणच स्थानिक सरकार, पोलिस, भारत सरकार, सैन्य या सगळ्यांबद्दल त्याच्या मनात खदखदता असंतोष होता . रागच म्हणा ना ! "ये गवर्मेंट चोर है ." "पुलिस काम कुछ  करती नही सिर्फ पैसा खाती है " " ये इलेक्शन के  दौरान  बम ब्लास्ट मंत्री लोग ही करते है " अशी काहीशी पूर्वग्रहदूषित आणि generalization केलेली वाक्ये तो छातीठोकपणे टाकायचा. प्रत्येक घटनेकडे बघायचे त्याचे एक वेगळे व्हर्जन होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना राज्यपाल जगमोहन यांनीच काश्मीर सोडून जायला सांगितलं कारण त्यांच्या जीवाला त्यावेळी धोका होता.पूर्वी एकूण लोकसंख्येच्या १०% असणारे पंडित आता जेमतेम १ % आहेत हे ही त्यानेच सांगितले होते. आता ते का परत येत नाहीत. यावरही त्याचे उत्तर होते-वो क्यू यहा आयेंगे? उनको सब जगह सरकारी  नौकरी मिलती  है." 
एकूणच नकळतपणे त्याच्यात आणि आमच्यात एक अंतर होते आणि ते आम्ही समजू शकत नव्हतो. त्याच्या मते एक संपूर्ण तरूण  पिढी या militancy च्या नावाखाली बरबाद झाली. अतिरेकींच्या नावाखाली कित्येक निर्दोष लोकांना उचलून नेण्यात आलं. कित्येकांचा अजून पत्ता नाही. कित्येक मारले गेले. "गलतिया तो सब लोग करते है लेकिन उसकी इतनी बडी सजा तो नही होती ना !" त्याच्या मनातल्या रागाचं तो कारणच मांडत होता. म्हणूनच जेव्हा त्याला -तुम्हांला कोणी निवड करायला सांगितली तर काय निवडाल असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला- "हमे १०० % आजादी चाहिये. ना इंडिया से जुडे रहेंगे ना पाकिस्तानसे ! यहा सब लोग यही चाहते है" पुढे मी त्याला माझ्या भौगोलिक, आर्थिक, राजकीय इ .ज्ञानाचा वापर करून सांगायचा प्रयत्न करत होतो की त्याचं कसं चुकतंय. पण तो बधला नाही. काश्मीर समस्या आणि त्याचे वेगवेगळे पैलू न समजताच काहीतरी बरळत राहणं हे काही राजकीय नेते करतात आणि सध्या Whatsapp वर अनेक असे संदेश फिरतात त्यांच्यात आणि माझ्यात फारसा फरक नव्हता हेच खरं ! 

(To be continued...)

No comments: