Friday 6 June 2014

काश्मीर डायरी ४


भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . . 


मला उडीला नेमकं का जायचं होतं ? खरं म्हणजे मी प्रकृतीने प्रखर, जहाल किंवा कडवा राष्ट्रभक्त वगैरे नाही. माझ्यात असा जाज्वल्य राष्ट्राभिमान सुद्धा नाही. तशा प्रकारच्या राष्ट्राभिमानात आवश्यक ठरणारं qualification माझ्यात नाही -पाकिस्तानला सतत शत्रू मानणाऱ्यातला मी नाही. माझ्यात काहींमध्ये असते तशी खुमखुमीही नाही. आमच्या ओळखीचे मध्यंतरी वाघा बॉर्डरला गेले होते. तिथे म्हणे त्यांनी राणा भीमदेवी थाटात जोरजोरात 'जय भवानी जय शिवाजी' 'भारत माता की जय' आणि 'तुम अगर हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे' अशा घोषणा दिल्या. सात जन्मात मी कधी असं करू शकेन असं मला वाटत नाही. माझ्या प्रकृतीतच नाही ते ! पण एक आहे. . . कधीही आपले राष्ट्रगीत लागले की मला, का कोण जाणे, पण भरून येतं. आपल्या सीमेवर नेमकं काय असतं, तिथे काय काय होतं, कुठल्या  वातावरणात तिथे सैनिक सतत डोळ्यात तेल घालून उभे असतात हे मला पहायचं होतं आणि स्मृतीलाही दाखवायचं होतं. काश्मीरला जाण्याचा योग आला, आमच्या ओळखीचे मेजर अनायसे तिथे होते. सगळं काही आपसूक जुळून आलं आणि एक संस्मरणीय अनुभव घ्यायला मिळाला. 

वाघा बॉर्डर सारखं उडीला काहीच असणार नाही हे आम्हांला त्या मेजरने आधीच सांगितलं होतं. वाघा बोर्डर चा सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारचं glamour आहे, त्यात एक नाट्यात्मकता असते असं ते म्हणाले. सैनिकांचं संचलन, ध्वज संध्याकाळच्या वेळी खाली उतरवणे वगैरे प्रकार असतात पण त्या मेजरना असं सुचवायचं होतं की हे सगळं playing to the gallery सारखं होतं. त्यांनी आम्हांला पूर्वसूचना देऊन ठेवली होती की उडीला असं काहीही पाहायला मिळणार नाही. पण तरीही एक थ्रिल असेल, ते  तुम्ही अनुभवा असं ते म्हणाले. यामुळे एकीकडे तिथे काय असेल याची उत्सुकता आणि दुसरीकडे काय नसणार याची माहिती अशा संमिश्र भावना घेऊन आम्ही उडीला जायला निघालो. 

उडीला जाण्याचा रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे. पण त्या मानाने तो खूप छोटा आणि खडबडीत होता. 
सकाळची वेळ, हवेतला गारवा आणि काही ठिकाणी दुतर्फा झाडं असल्यामुळे छान, प्रसन्न वाटत होतं. 



सफरचंदाची झाडंही फुलांनी बहरली होती. याच फुलांच्या जागी फळं लगडल्यावरचं दृश्य किती सुंदर असेल याची आम्ही कल्पनाच करू शकत होतो  ! 


१०० कि. मी. अंतर असल्यामुळे वाटेत गप्पा चालूच होत्या. आमचा ड्रायव्हर शब्बीर आपणहूनही काही माहिती देत होता. त्यातल्या एका गोष्टीने अस्वस्थ व्हायला झालं. वाटेत एक गाव लागलं पलहलन नावाचं. एखाद्या गावाचं वैशिष्टय सांगावं अशाप्रकारे त्याने सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या गावातील एकाही माणसाने एकदाही मतदान केलेले नाही. शब्बीरशी  या विषयावर फारसं काही बोलता आलं नाही पण या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. अजूनही होतो. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षं होऊनही इथे लोकशाही पोचू शकली नाही, मुख्य प्रवाहात माणसं सामील होऊ शकली नाहीत  हे अपयश कोणाचं? केंद्र सरकार की राज्य सरकार? की हे ' यश' तथाकथित फुटीरतावादाचं ?

बारामुल्लाच्या पुढे गेल्यावर रस्ता हळू हळू वळणावळणांचा  होऊ लागला होता. रस्त्याच्या एका बाजूला भुसभुशीत मातीचे  डोंगर होते. 

हलकासा पाउस  पडून गेला होता. काही ठिकाणी दरड कोसळली होती. तिथे सैनिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करून देण्यात येत होता. तर दुसऱ्या बाजूला  झेलम नदी सतत मूक साथ करत होती. उडीच्या साधारण ७-८ कि. मी. अलीकडे एका बाजूने ट्रकची रांगच रांग दिसत होती. हे बहुदा त्या भारत-पाक व्यापाराचे असावेत. पुढे सलामाबाद(हो. . .  हेच नाव होते त्या गावाचे !) नावाचे गाव लागले. इथे सीमेपलीकडून येणाऱ्या ट्रकमधील मालाचे अनलोडिंग आणि पुढचे सगळे सोपस्कार होतात. पण आज अगदी व्यवहार पूर्ण ठप्प होते. एक चिटपाखरू ही नव्हते. त्याचे कारण पुढे उडीला गेल्यावर कळले. 

आणखी थोडं पुढे गेल्यावर अचानक उजवीकडे एक फलक दिसला- आम्ही चक्क LoC च्या बाजूने जात होतो ! म्हणजे या बाजूला भारताची हद्द, मधे  झेलम नदी आणि पलीकडे पाक व्याप्त काश्मीर ! 


(सर्व फोटो सौजन्य -अक्षय आपटे)

(क्रमश:) 

1 comment:

Dr.sadanand Chavare said...

माहिती व फोटो छान आहेत.