भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . .
२
आम्ही उडीला ५ मे ला जाणार होतो. त्याच दिवशी स्मृतीचा (माझ्या मुलीचा ) वाढदिवस असतो. वाढदिवस मग तो पुण्यात असो की काश्मीरमध्ये, तो नेहमी केक कापूनच साजरा करायचा असा आमचा नियम ! ४ तारखेला दिवसभर सोनमर्गची ट्रीप आणि नंतर श्रीनगरमध्ये खरेदीत गेल्यामुळे केक आणणे काही जमले नाही. शिवाय तिच्या नकळत हे काम करायचे असल्यामुळे आम्हांला ते आधी करता आले नाही. शेवटी रात्री ८.३० वाजता आम्ही (मी आणि माझा मेहुणा सुनील ) ATM मधून पैसे काढायचे आहेत असं निमित्त सांगून बाहेर पडलो. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर समोरच दल लेक, ८.३० वाजता सुद्धा भरपूर गर्दी !
( फोटो सौजन्य -अक्षय आपटे)
हॉटेलच्या आजूबाजूला सगळीकडे इतर हॉटेल्स आणि नथूज स्वीट्स हे मिठाई आणि चाट पदार्थांचं दुकान होतं. इथे बेकरी कुठेच दिसत नव्हती. कुणाला विचारावं असं वाटत असताना समोरच एक सैनिक उभा होता. त्यालाच बेकरीबद्दल विचारलं. तो सैनिक इथे जणू काही युद्धच चालू असल्याच्या पूर्ण वेशात होता. हातात मशीनगन आणि दल लेक कडे तोंड करून खडा पहारा देत होता. चेहरा मात्र काहीसा कंटाळलेला आणि निर्विकार होता. जाड मिशी आणि सावळा रंग . तो उत्तरेकडचा वाटत नव्हता. आम्ही (हिंदीत) विचारल्यावर त्याने अगदी मनापासून उत्तर दिले. बेकरी इथून चालत गेलं तर १/२ तासाच्या अंतरावर होती. या वेळी एवढं लांब चालण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. नथूज स्वीटसमध्ये मिळेल का असं त्या सैनिकाला विचारणं बरोबर नव्हतं. पण चालण्याचा कंटाळा वरचढ ठरला. तो म्हणाला कदाचित मिळेलही पण खूप महाग असेल. मग त्यानेच विचारले, "आप कहा से आये है?" "हम पूना से है " आमच्या मराठी लहजा असलेल्या हिंदीवरून त्याने ते आधीच ओळखले होते की काय माहित नाही. त्याची एकदम कळी खुलली. "ओह पूना से! पूना एक बढिया शहर है . मेरा ट्रेनिंग वही पर हुआ था . मै वही से हू -नगर जिलेसे !" मग मी एकदम मराठीतच बोललो , "अहो म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे की !" तो ही आनंदून म्हणाला,"हो. . .माझं नाव संदीप शिंदे !" वा !काय मजा होती ! एवढा वेळ उगाचच आम्ही हिंदीत बोलत होतो. भारताच्या उत्तरेकडच्या टोकाला, अनोळखी ठिकाणी आम्ही असे तिघे मराठी भेटलो होतो ! आणि मराठी माणसांबद्दल अशी तक्रार असते की सैन्यात त्यांची संख्या कमी असते .पण या आधी भेटलेले मेजर मराठी, हा सैनिक मराठी आणि पुढे उडीलाही याच मेजरच्या बदलीनंतर नवीन आलेलाही मराठीच ! खूप छान वाटलं ! संदीप शिंदे म्हणाले की ते इथे २००७ पासून आहेत. कुटुंब-मुलं गावी ! शिवाय सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणामुळे सुट्टीही मिळणं दुरापास्त होतं. डिसेंबर शिवाय घरी जात येणार नाही असं म्हणाले. तेव्हा केक घेण्याच्या 'गडबडीत ' असल्यामुळे कदाचित माझ्या ते लक्षातही आलं नाही. पण आता विचार करता माझी मलाच लाज वाटते. मुलीच्या वाढदिवसाच्या एका केकसाठी मी केव्हढा obsessed होतो आणि इथे हा माणूस महिनो न महिने घरीही जाउ शकलेला नव्हता !
संदीप शिंदेंनी आम्हांला चालत जायचं नसेल तर रिक्षाने जा असं सुचवलं. समोरच रिक्षा उभी होती. पूर्णपणे बंदिस्त ! एक क्षण वाटलं एवढ्या रात्री अशा रिक्षेतून जाणं ठीक राहील ना ? आम्ही त्यांना तसं विचारलंही. "हो. . . हो ! बिनधास्त जा . काही प्रॉब्लेम नाही. एकदम सेफ आहे." आम्ही रिक्षात बसल्यावर त्यांनी रिक्षावाल्याला आम्हांला कुठे सोडायचं याचा पत्ताही सांगितला !
इतकं सगळं करून केक कुठे मिळालाच नाही. शेवटी त्याच रिक्षाने नथूज स्वीटस पाशी परत आलो. तिथूनच पेस्ट्री घेतल्या. दुकानातून बाहेर पडताना शिंदे कुठे दिसले नाहीत.रस्त्यावरच मिलिट्रीचे एक वाहन उभे होते. त्यात शिंदेना बसताना पाहिले. बहुदा आजची त्यांची ड्युटी संपली असावी !
(क्रमश:)
No comments:
Post a Comment