१
... तर आम्ही सोमवार, २३ जून २०१४ रोजी दुपारी एकच्या सुमारास सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या घराखाली येऊन थांबलो. माझ्या मनात वेगवेगळे विचार होते. एकीकडे माझं मन मला खात होतं की माझं काम सोडून मी हे सगळं करतोय. दुसरीकडे हा प्रवास कसा होईल याबद्दल माझ्या मनात प्रचंड उत्साह आणि कुतूहल होतं. हे सगळं मला खूप थ्रिलिंग वाटत होतं. आणि शिवाय दोन मोठ्या नामांकित कलाकारांबरोबर प्रवास करण्याचं नाही म्हटलं तरी थोडंसं दडपणही आलं होतं. आम्ही आलोय आणि खाली थांबलोय हे सांगायला आईने सुमित्राताईंना फोन केला. तर त्यांनी अतिशय आग्रहाने आम्हांला वर त्यांच्या घरी बोलावलं. या निमित्ताने घर बघणं होईल असं त्या म्हणाल्या. हे अगदीच अनपेक्षित होतं. खरं तर आम्ही बाहेरच्या बाहेरही जाऊ शकलो असतो. आणि त्यात काही गैरही नव्हतं. पण त्यांच्या या कृतीतून त्यांची आपुलकी दिसून आली.
दोन फ्लॅट्स जोडून एक फ्लॅट अशी त्यांच्या घराची रचना होती. प्रशस्त हॉल अगदी मनापासून सजवलेला होता. पण तरीही त्यात कुठे भपका नव्हता. सारखं वाटत होतं की हे सगळं आपण कुठेतरी पाहिलेलं आहे. मग एकदम लक्षात आलं - हे घर 'अस्तु' मध्ये दिसलं होतं! सुमित्राताईंनी व्यक्तीश: फिरून आम्हांला घर दाखवलं. त्यात एक छान टेरेस होतं- त्यात बसायला मेज होता आणि संपूर्ण टेरेसभर कुंड्यांमध्ये लावलेली हिरवीगार झाडं होती. एका खोलीत कॉम्प्युटरवर 'माझी शाळा' या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी चालू असलेल्या मालिकेच्या संकलनाचं काम सुरु होतं. त्या टीमची आमच्याशी ओळख करून देण्यात आली. नंतर सुनील सुकथनकरांनी आम्हांला चहा आणून दिला. त्यानंतर आम्ही निघालो. विशेष म्हणजे जाताना त्यांनी कोणीच घराचं दार बंद केलं नाही किंवा आत काम करत असलेल्या टीमला काही तशा सूचनाही दिल्या नाहीत. एकूणच सगळीकडे सहजता आणि मोकळेपणा होता. म्हणजे जेवढं ते घर त्यांचं होतं तेव्हढंच त्या टीमचंही होतं असं मला जाणवलं. हे खूपच अद्भुत होतं. सुमित्राताई म्हणाल्यादेखील- आमचं घर हे आमच्या टीमसाठी आणि मित्रमंडळींसाठी नेहमीच उघडं असतं.
२
सुनील सुकथनकर त्यांची टोयोटा क्वालीस गाडी घेऊन आले. ते स्वतः ड्राईव्ह करत होते. त्यांच्या शेजारी मी, मधल्या सीट्स वर माझी आई आणि सुमित्राताई असा आमचा प्रवास सुरु झाला. त्यांच्या घरच्या अनौपचारिक वातावरणामुळे असेल माझ्यावरचं दडपण खूपच कमी झालं आणि संपूर्ण प्रवासभर(मुंबईला जाताना आणि दुसऱ्या दिवशी तिथून परत येताना) आमच्या छान गप्पा झाल्या. खरं तर ते दोघेही हातचं राखून, जेवढ्यास तेवढं बोलू शकले असते. पण असं त्यांनी केलं नाही. आता विचार करता मला असं वाटतं आपण संपूर्ण प्रवासभर बोलत राहून आणि त्यांना बोलायला लावून त्यांना त्रासच दिला असणार. एकाच वेळी त्यांच्या मनात कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींवर विचार चालू असणार- 'माझी शाळा' ही मालिका (ज्याचं एका भागाचं शूटिंग नुकतंच संपवून संकलनाचं काम चालू होतं), त्या संध्याकाळी होणारं कथावाचन आणि त्या पुढच्या शक्यता वगैरे... अशावेळी थोडासा एकांत हवा असणं स्वाभाविक आहे. आणि त्यात माझी सततची बडबड ! पण दोघांनीही कुठल्याही प्रकारे आपण कंटाळलो आहोत, वैतागलो आहोत किंवा आता आपण बोलायचं थांबू या हे अजिबात दाखवलं नाही. आणि अतिशय शांतपणे, मनमोकळेपणाने, कुठलाही attitude न दाखवता ते आमच्याशी बोलत राहिले. अधूनमधून सुमित्राताई गाडी चालवत असलेल्या सुनील सुकथनकरांना काळजीयुक्त स्वरात विचारत-"सुनील, तू ठीक आहेस ना? तुला झोप तर येत नाही ना? झोप येत असेल तर आपण थांबू या का थोडा वेळ ?" मला या गोष्टीचं मात्र खूप गिल्ट आहे. जाताना आणि येतानाही संपूर्ण वेळ सुनील सुकथनकरच गाडी चालवत होते. माझं काही धाडस झालं नाही विचारायचं की मी गाडी चालवू का? कारण एक तर क्वालीस गाडी माझ्या सवयीची नव्हती. आणि दुसरं म्हणजे इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन एक्स्प्रेस वे वर सवयीची नसलेली गाडी चालवणं मला चांगलंच रिस्क वाटत होतं. पण यामुळे झालं असं की मी त्यांचा ड्रायव्हिंग ताण शेअर करू शकलो नाही.
३
प्रवासात झालेल्या आमच्या गप्पा हा माझ्यादृष्टीने एक अतिशय समृद्ध अनुभव होता. सिनेमा या दृक-श्राव्य माध्यमाचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या उद्दिष्टांप्रमाणे करत असतो. काही जणांना हे फक्त करमणुकीचं माध्यम वाटतं. काहींना तो फक्त पैसे कमावण्याचा एक उद्योग वाटतो. पण हे माध्यम असं आहे की जे एकाच वेळी खूप लोकांपर्यंत पोचतं. म्हणूनच सिनेमा या माध्यमाचा खुबीनं वापर करून वेगवेगळे सामाजिक प्रश्न आणि त्यांची उत्तरं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या दोघांनी अतिशय निष्ठेनं केलेलं आहे. म्हणूनच त्यांचा सिनेमा हा meaningful/purposeful आहे असं मला वाटतं.
नुकताच पुरस्कार मिळालेला नैराश्यावर आधारित चित्रपट 'कासव',
स्किझोफ्रेनियावर आधारित 'देवराई', अल्झायमरवर आधारित 'अस्तु', कोड या त्वचाविकारावर आधारित 'नितळ', तसंच माहितीचा अधिकार या कायद्याविषयी 'एक कप च्या', भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावर आधारित 'हा भारत माझा' ही त्यापैकीच काही ठळक उदाहरणं ! सुरुवातीला डॉक्युमेंटरी/शॉर्ट फिल्म्स आणि नंतर पूर्णवेळचे सिनेमे असा त्यांचा २५ वर्षांहून अधिक काळाचा प्रवास आहे. अर्थात यासाठी दोघांनी पद्धतशीररीत्या काम केलं. सुनील सुकथनकरांनी १९८९ साली FTII मध्ये रीतसर प्रशिक्षण घेतलं. अशा प्रकारच्या सिनेमांना नेहमीच भेडसावणारा प्रश्न म्हणजे आर्थिक पाठबळ ! आहे त्या बजेट मध्ये पण तरीही गुणवत्तेत तडजोड न करता ते सिनेमे करत राहिले. उदाहरणार्थ- सुमित्राताई म्हणाल्या- आमच्या सिनेमात मेकअप प्रकार फारसा नसतो. म्हणजे मेकअपमन नसतो. कलाकार स्वत;च मेकअप करतात किंवा काही वेळा काहीच मेकअप नसतो. दुसरं उदाहरण त्यांनी 'हा भारत माझा ' या सिनेमाचं दिलं. बजेटच्या मर्यादेमुळे त्यांनी हा सिनेमा पुण्यातल्याच एका घरात चित्रित केला तोही त्या घरातल्याच उपलब्ध प्रकाशयोजनेत!
अस्तु या त्यांच्या बहुचर्चित सिनेमाच्या ट्रेलरची लिंक इथे देत आहे-
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjxps3m1uDTAhXLL48KHRFWDQ0QtwIIJjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DNY3cNmtFmaA&usg=AFQjCNEhi4K36x9USGvGxPGAkVAaxMzpag&sig2=ER4lv5Yp73xGQmSR1ez9ww
तसंच सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या नावांची एक लिंक इथे देत आहे. त्यावरून असं लक्षात येईल की १९९५ च्या 'दोघी' पासून सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासात आजवर त्यांनी तब्बल १४ पूर्ण लांबीचे चित्रपट केलेले आहेत.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj4yNa-hOLTAhXFM48KHXjhChYQFggtMAE&url=http%3A%2F%2Fwww.imdb.com%2Fname%2Fnm0837788%2F&usg=AFQjCNFaxpOgzfiwVhFRDej5pUTEvh-wTg&sig2=-sS6fFeKjzBYx8ufwMzvaw
४
त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारांचं महत्त्व आहेच पण त्यापुढे जाऊन मला असं वाटतं की काहीशी अनवट वाट पत्करून सातत्याने चित्रपट निर्मिती करणाऱ्या या दिग्दर्शक द्वयी बद्दल फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर एकूण समाजातही आदराचं स्थान आहे. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे किंवा काम करण्याची इच्छा नि:संकोचपणे व्यक्त केलेली आहे. या दोघांनीही या क्षेत्रात अनेक माणसं जोडलेली आहेत. फक्त सिनेमापुरतं व्यावहारिक नातं न राहता ते एक जिव्हाळ्याचं, स्नेहाचं नातं बनलेलं आहे. आणि म्हणूनच जितेंद्र जोशीसारख्या संवेदनशील कलाकाराला जेव्हा कळलं की ज्या कथेवर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम तो करत होता त्याच कथेवर आधारित चित्रपट करण्याचा या दिग्दर्शक द्वयीचा मानस आहे, तेव्हा त्याने लगेचच ते अभिवाचनाचे प्रयोग बंद करायचं ठरवलं. त्याला वाटलं की सिनेमाची कथा लोकांना आधीच कळेल आणि सिनेमाबद्दलचं औत्सुक्य कमी होईल. सुमित्राताईंनी सांगूनही त्याने आपला निर्णय बदलला नाही. ('हा भारत माझा' च्या शूटिंगच्या दरम्यान सेटवर जितेंद्र जोशी इतर कलाकारांच्या उत्तम नकला करून खेळकर वातावरण ठेवत असे असंही सुमित्राताई म्हणाल्या)
'एक कप च्या'च्या शूटिंगच्या दरम्यान (आणि खरं तर त्यांच्या सर्वच चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळी) एक नियम होता. तो म्हणजे सेटवर स्पॉटबॉय पासून ते कलाकारांपर्यंत कोणीही पान-तंबाखू-सिगारेट इ घ्यायचं नाही. तसंच शाकाहारी जेवण घ्यायचं. 'एक कप च्या' च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र जेवणाच्याबाबतीत अपवाद करण्यात आला आणि सिनेमातले मुख्य कलाकार किशोर कदम यांनी स्वतः केलेल्या मांसाहारी पाककृतीचा आस्वाद सगळ्यांनी घेतला.
५
या दोघांच्या सिनेमांमधलं मला जाणवणारं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लौकिक अर्थाने अभिनेते नसलेले लोक यांच्या सिनेमांत उत्कृष्ट काम करून जातात. त्यांच्या तीन सिनेमांमध्ये तर तीन लेखकांनी काम केलेलं आहे. 'वास्तुपुरुष' (२००२) मध्ये महेश एलकुंचवार, 'नितळ' (२००६) मध्ये विजय तेंडुलकर आणि 'एक कप च्या' (२००९) मध्ये लेखिका कमल देसाई यांनी काम केलेलं आहे. आणि तिघांनीही नैसर्गिक अभिनय केलेला आहे. सुमित्राताई म्हणाल्या की त्या नेहमी एखादा कलाकार डोळ्यासमोर ठेऊन ती ती भूमिका लिहितात. म्हणूनच या गोष्टीचं आणखी आश्चर्य वाटतं की त्यांना ही दिग्गज लेखक मंडळी अभिनेते म्हणूनही दिसली. त्यांच्यातल्या अभिनयाचं potential त्यांना जाणवलं. अभिनयाचा अनुभव नाही म्हणून 'नितळ' सिनेमाच्या वेळी आधी विजय तेंडुलकर काम करायला तयार होत नव्हते. नंतर ते तयार झाले पण त्यांनी सांगितलं की ते संवाद वगैरे काही पाठ करणार नाहीत. त्यांचे ते संवाद प्रसंगानुरूप म्हणणार. मग त्यांना सांगण्यात आलं की सुमित्राताईंनी लिहिलेले संवाद एकदा बघा तरी ! संवाद बघितल्यावर मात्र ते मनापासून तयार झाले. विशेष म्हणजे त्यांचं पाठांतर आणि रिहर्सल अभिनेत्री दीपा श्रीराम यांनी घेतलं. हे दृश्य किती गोड असेल नाही ! अनेकदा 'मेकिंग ऑफ अ मूव्ही' हा कुठलाही चित्रपट तयार करतानाचा/त्या प्रोसेस चा चित्रपट काढण्यात येतो. तसा जर 'नितळ' या सिनेमाचा काढला असता तर मला वाटतं हे दृश्य त्यातलं highlight ठरलं असतं. स्वतः एक प्रथितयशी लेखक, नाटककार, अनेक यशस्वी चित्रपटांचे पटकथाकार-संवाद लेखक असलेले विजय तेंडुलकर आपली सगळी बिरुदं बाजूला ठेऊन, आपलं कुठलंही मत न लादता, दिलेले संवाद मनापासून पाठ करताहेत. अभिनेत्याच्या भूमिकेला न्याय देत आहेत !
या ब्लॉगला ज्या गाण्यावरून (थोडेफार वेगळे शब्द वापरून) नाव दिलं आहे ते मूळ गाणं इथे देत आहे. गाणं 'नितळ' चित्रपटातलं आहे आणि त्याचे गीतकार सुनील सुकथनकरच आहेत !
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=9&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjB98Sf2ODTAhWLuo8KHU6GDrkQtwIIRzAI&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DDDE6S4Qae9o&usg=AFQjCNFmDTzSR3L-rRIxlRdU9DLIyjEJ_g&sig2=21-F_JAYTZGHN88IIdXI2w
7 comments:
Both parts of this blog are really nice and engrossing, live experiences. Thanks Dr Rajesh
Tuzya barobar amhi pan jaun alo , etaka chaan lihile ahes
Very well written. Enjoyed reading about your interaction with them, and particularly your own emotions through the experience, and equally, the astute observations about their cinema.
राजेश, तुझं लेखन ईतकं अप्रतिम असतं की ते फक्त वाचलं जात नाही,तर त्यातला प्रत्येक क्षण अनुभवला जातो. सुमित्राताई भावे आणि सुनील सुखथनकर चित्रपटसृष्टीसाठी खुपच चांगलं काम करत आहेत. 'नितळ' चित्रपटातील सुनील सखथनकरांनी शब्दबध्द केलेलं, मनाचा ठाव घेणारं 'मेरा मन'हे गाणं ऐकलं. खुपच श्रवणीय.
तु लिहीलेल्या अजुन अशा सुंदर लिखाणाची आतुरतेनं वाट बघतेय.
मनीषा
उत्तम लेखन, लिहिते राहा
Refreshing article..
Very nice blog sir.. It feels like every reader can relate the journey you had with them.
Post a Comment