Wednesday 17 May 2017

बांधवगढचा 'भीम' !


                                                                     
                                                                              १

आम्ही बांधवगढला जाणार म्हटल्यावर काही जणांच्या भुवया उंचावल्या-'इतक्या उन्हाळ्यात? एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जा ना..' इथपासून ते 'बांधवगढमध्ये वाघ वगैरे काही दिसत नाहीत. कशाला जाताय?त्यापेक्षा रणथंबोर बरं!' पर्यंत अनेक अनाहूत सल्लेही मिळाले. अर्थात आमचं सगळं बुकिंग झालेलं होतं. त्यामुळे आमचा निर्णय बदलणार नव्हताच ! जंगलांमध्ये जाऊन फक्त वाघ बघणे ही एक गोष्ट आहे (आणि त्यात गैर काहीच नाही !) पण सगळं जंगल अनुभवणं- तिथले इतर प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, त्या आवाजांची वैशिष्ट्यं समजणं, एवढंच नाही तर तिथली झाडं,फळं, पानं-फुलं बघणं, जंगलांत येणारा मातीचा, पानांचा वेगळा वास घेणं, होता होईल तेवढं जंगल वाचणं- हे ही आम्ही आमच्या परीनं करत आलोय आणि ते आम्हांला खूप आवडतं. या सगळ्याच्या जोडीला मित्रपरिवाराची साथसंगत असेल तर हा आनंद आणखी द्विगुणित होतो हे ही आम्ही अनुभवलं होतं. त्यामुळे वाघ दिसणं न दिसणं हे काही जीवनमरणाच्या प्रश्नाइतकं महत्त्वाचं नव्हतं. असं म्हणतात की तुमच्या अपेक्षा माफक असतील तर तुम्हांला अपेक्षाभंगाचं दु:ख कमी होतं आणि जर अपेक्षांपेक्षा खूप काही मिळालं तर त्याचा आनंदही जास्त होतो. त्यामुळे आम्ही कमीत कमी अपेक्षा ठेऊन बांधवगढला निघालो.

                                                                                 २
आमची ट्रिप अरेंज करून देणारे श्री नितीन पवार यांनी आमची पहिली सफारी बांधवगढच्या खितौली गेटची दिली होती. त्याचबरोबर त्यांनी हे ही सांगितलं होतं- खितौलीला अलिकडे वाघ कमी दिसतायत. पण तुम्ही जंगलाचा आनंद घ्या. तुम्हांला ते नक्की आवडेल. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, तिथल्या मॅनेजरने तर आणखी एक नकारात्मक गोष्ट सांगितली- खितौलीच्या जंगलात नुकताच वणवा पेटला होता. त्यामुळे तिथून सगळे प्राणी दुसरीकडे गेले आहेत असं ते म्हणाले. ते ही म्हणाले -'You just enjoy the jungle!' हे अर्थातच आमची थोडीशी (अगोदरच) समजूत काढल्यासारखं झालं. सफारीला आमच्याबरोबर माझा शाळेतला मित्र श्रीधर अय्यर, त्याची बायको आणि मुलगी असणार होते. तो मात्र अतिशय उत्साही होता. त्याची मुलगी श्रीयाही जंगलात जायला उत्सुक होती. त्यामुळे निघताना आम्ही छान मूडमध्ये निघालो.

                                                                                  ३
सफारीची वेळ संध्याकाळी ४ ते ७ अशी होती आणि बरोबर ४ वाजता तिथल्या वन खात्याच्या लोकांनी गेट उघडलं. आत शिरल्यावर लगेचच वेगवेगळे पक्षी दिसू लागले..
Greater racket tailed drongo
















Asian paradise flycatcher (स्वर्गीय नर्तक)-












(फोटो- सौजन्य इंटरनेट) 


Golden Oriole (हळद्या)














(फोटो- सौजन्य इंटरनेट) 

एवढंच नाही तर एका झाडावर चढून बसलेला Lesser Adjutant stork (लहान क्षत्र बलाक) ही दिसला. 














तसंच उडताना सुंदर निळे पंख दाखवणारा Indian Roller(नीलपंख) ही दिसला.

Common Hawk Cuckoo(पावशा) पक्षीही अगदी जवळून दिसला-

Magpie Robin( दयाळ) पक्ष्याची मंजूळ शीळ, Greater racket tailed drongo चे वेगवेगळे आवाज, Rufous Tree pie(टकाचोर) चा कॉल, Plum headed Parakeet (पंचरंगी पोपट) चं सुंदर दर्शन आणि कॉल! कुठे बघू, काय बघू आणि किती बघू, काय काय ऐकू  असं होऊ लागलं. या शिवाय जंगलात नेहमी दिसणारे प्राणी होतेच- सांबर, चितळ (spotted deer), लंगूर इ . हे असं एकटं रानडुक्कर (Wild boar)ही दिसलं-
 


एकंदरीत सुरुवात तर छान झाली होती. साल, तेंदू, मोहाची झाडं, बऱ्याच झाडांना आलेली नवी पालवी, अध्येमध्ये दिसणारी पाणवठ्याची ठिकाणं आणि त्याभोवती अर्जुन, जांभळाची झाडं असं हिरवंगार जंगल होतं. 


                                                                                          ४ 
आमच्या सर्वसाधारण सफारींचा अनुभव असा आहे की गाडीचा ड्रायव्हर आणि गाईड दोघेही उत्साहाने माहिती देत असतात. खितौलीच्या सफारीला आमच्याबरोबर ड्रायव्हर होते यादव आणि गाईड होते पांडेजी! विशेषतः पांडेजी आमच्या (माझ्यापासून ते लहानात लहान श्रीया पर्यंत) सगळ्यांच्या प्रश्नांना न कंटाळता, न चिडता, प्रत्येकवेळी तेवढयाच अदबीनं उत्तरं देत होते. चालत्या गाडीला मध्येच थांबवून आम्हांला त्यांनी झाडावर वाघाने केलेल्या नखांची निशाणी दाखवली-

आमच्याशी बोलत असताना त्यांचं लक्ष जमिनीकडे होतं आणि कान कुठून चितळच्या alarm calls कडे होतं. आणि अचानक त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. जमिनीवरील रेतीत आदल्या दिवशी झालेल्या पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे ओलसरपणा दिसत होता आणि त्यावर त्यांना वाघाच्या पंज्याचं निशाण दिसलं. निशाण ताजं होतं आणि मोठं होतं. त्यावरून त्यांनी ते नर वाघाचं असल्याचं ओळखलं-
 

म्हणजेच इथून पुढे नुकताच वाघ गेला असण्याची शक्यता होती. त्या निशाणाचा पाठलाग करत आम्ही पुढे जाऊ लागलो. 

                                                                                       ५
आता सगळ्यांचा उत्साह आणखी वाढला. उत्कंठा वाढली. म्हणजे आपल्याला वाघ दिसणार तर!पाठलाग करताना असं दिसलं की (कदाचित) आमच्या आधी गेलेल्या गाडीच्या चाकाच्या निशाणावर वाघाच्या पंज्याचं निशाण होतं. शिवाय एका विशिष्ट ठिकाणानंतर पंज्याचं निशाण दिसेनासं झालं. पांडेजींनी अंदाज बांधला की जिथून निशाण दिसेनासं झालं होतं तिथून वाघ वळला असणार. आमच्या डावीकडे एक छोटीशी टेकडी होती आणि तिच्या पलीकडे एक पाणवठा होता. वाघ शॉर्टकटने तिथे गेला असेल असं पांडेजींना वाटलं. मग आम्ही मार्ग बदलून त्या पाणवठ्यापाशी गेलो. तिथे एक दोन जीप आधीच थांबलेल्या होत्या. समोरासमोरच्या दोन बाजूंना टेकड्या आणि मध्ये पाण्याचा झरा असं तिथलं 'नेपथ्य' होतं. समोरच्या टेकडीवरून चितळाचा alarm call येत होता असं दुसऱ्या गाडीतले गाईड सांगत होते. त्यावरून तिथे बिबट्या असण्याची शक्यता त्यांना वाटत होती. संध्याकाळची वेळ...थोडंसं मळभ... तशी दाट झाडी... त्यामुळे तिथे थोडा अंधार होता... वाघ किंवा बिबट्या कोणीतरी तिथे येणार हे नक्की होतं. म्हणून आम्ही तिथे थांबून राहिलो. एक अस्वस्थ, उत्कंठावर्धक शांतता!

                                                                                        ६ 

ही शांतता भंग झाली कारण आमच्या डावीकडे साधारण ३०-४० फूटांवर आम्हांला दिसला एक भला मोठा वाघ !

तो आमच्या समोर हळू हळू येऊ लागला-

त्याने आमची दखल घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच!तो त्याच्या त्याच्या जगात धुंद होता. साहेब चालत चालत पाण्याकडे पोचले. आम्ही त्याच्या देखण्या रुपाकडे बघत राहिलो. तो चक्क पाण्यात बसला. हाच होता बांधवगढचा सगळ्यांत मोठा वाघ -भीम !
 

थोडावेळ पाण्यात बसून, जांभया देऊन झाल्यावर साहेब उठले आणि आमच्या उजवीकडच्या दिशेने चालू लागले. 
आम्ही त्याच्यापासून २०-३० फुटांवर होतो. पण या फोटोत तुम्ही बघा- आम्हांला त्याने अनुल्लेखाने पूर्णपणे मारले होते! Royal ignore म्हणतात ते हेच ! सगळ्या गोष्टी इतक्या अफाट आणि इतक्या पटपट घडत होत्या की कॅमेरा, त्याचे सेटिंग त्याबद्दलचं माझं तोडकं-मोडकं ज्ञान सगळं अगदी गळून पडलं. 
भीम जसा पुढे जाऊ लागला तशी आम्हांला आमची गाडी मागे घेऊन त्याच्या बरोबरीने जाणे भाग होतं . थोडं  अंतर गेल्यानंतर आम्हांला तो पुन्हा दिसला आणि आता तर आम्ही त्याच्या अगदी टप्प्यात होतो- ८-१० फुटांवर ! Paparazzi जसे एखाद्या सेलिब्रिटींचा पिच्छा पुरवतात तसा आम्ही त्याच्या मागे होतो . पुरेसा प्रकाश नसल्यामुळे काही जणांच्या कॅमेऱ्याचे फ्लॅशही पडत होते. हे २-३ क्षण मात्र जराशी धडकी भरवणारे होते ! फ्लॅश त्याच्या डोळ्यावर चमकल्यामुळे हा चिडला आणि अंगावर धावून आला तर ?! तर आमचं काही खरं नव्हतं !त्याचं सगळ्यांत पहिलं सावज मी आणि श्रीधरच झालो असतो. त्याने आमच्याकडे पाहिलं. किंबहुना त्याने आमच्या through पाहिलं आणि तो थोडासा वळला आणि एक छोटासा पूल होता. तो त्याने उडी मारून ओलांडला आणि पलीकडे चालत गेला. तिथे त्याने हा सगळा त्याचा इलाखा आहे हे झाडावर लघवी करून आम्हांला त्याची जाणीव करून दिल्यासारखं केलं. आणि तो आमच्याकडे पाठ करून बसला. मग मात्र तिथून आम्ही  निघालो...  

                                                                              ७
 तर अशा तऱ्हेने वाघ दिसण्याची शक्यता नसताना आम्हांला भीम दिसला- ते ही इतक्या जवळून आणि सुमारे अर्धा तास ! खितौली मध्ये खूप दिवसांनी भीमने दर्शन दिलं होतं. आणि त्यावेळी नेमके तिथे आम्ही होतो. सफारीनंतर तिथल्या लोकांना  आम्ही भीमची ही सुरस कथा सांगितल्यावर सगळ्यांना आम्ही नशीबवान होतो असं वाटलं. चला... एकूण काय ट्रिपची सुरुवात छान झाली होती... 

4 comments:

Dr.sadanand Chavare said...

प्रवास वर्णन खूपच अर्थवाही शब्दांत अतिशय प्रत्यकारी झाले आहे .

लीना देवस्थळी said...

राजेश, तुझ्या बरोबर माझी बांधवगढची सहल झाली. इतक सुंदर चित्र उभे राहिलय् की बस्स. तुझ्या लेखांच एक चांगल वाचनीय पुस्तक होईल. विचार करुयात? - लीना मामी

amitmoghewrites said...

मस्त । अतिशय प्रवाही सचित्र चित्रवर्णन।आणि नेहमीप्रमाणे उत्तम मराठी सुद्धा । पुढच्या भागाची वाट बघत आहे

मनीषा said...

राजेश,बांधवगढचा भीम अतीशय सुंदर वर्णन. राजेश, पुस्तक नक्कीच काढायचं.तुझं सुंदर लेखन आणि अप्रतिम वर्णन सगळ्यांना वाचायला मिळायलाच हवं.
मनीषा