Sunday, 27 December 2020
हरिणीचे पाडस..
Thursday, 24 December 2020
उचलली जीभ...
कुठल्याही आजारी व्यक्तीला पेशंट म्हटलं जातं यामागे ती व्यक्ती त्या आजाराच्या (किंवा काहीवेळा उपचारांच्या देखील!) वेदना भोगत असते हे कारण तर आहेच, पण माझ्या मते याबरोबरच ती व्यक्ती आजारपणामुळे भेटीला आलेल्या स्वघोषित हितचिंतकांचा अतिशय धीराने आणि संयमाने सामना करत असते हे सुद्धा आहे ! कित्येकदा तर पेशंटला असंही वाटून जात असावं की एकवेळ हे आजारपण परवडलं पण भेटायला येणारे तऱ्हेवाईक लोक नकोत ! इतकं नको नको करून सोडतात हे लोक! आजारपणात सगळ्यात कुठली गरज असते तर ती विश्रांती आणि मन:शांतीची ! पण भेटायला येणाऱ्या लोकांना नेमक्या याच गोष्टींचा विसर पडतो आणि ते भेटायला येऊन पेशंटचं हित कितपत साध्य करू शकतात असा विचार मनात येऊन जातो.
सर्वसाधारणपणे अशा लोकांचे काही प्रकार असतात. माझ्या निरीक्षणात पुढील प्रकार दिसून आले आहेत. आणखीही काही नक्कीच असतील-
१) सर्वज्ञ - या प्रकारच्या लोकांना सगळ्या विषयांमधलं सगळंच कळतं आणि आपल्याला किती कळतं हे इतरांना दाखवून देण्यात यांची बरीच शक्ती खर्च होत असते. बहुतांशी गुगल वरून वा व्हॉट्सअँप विद्यापीठातून प्राप्त झालेले ज्ञानकण उधळायची यांना खुमखुमी फार ! बद्धकोष्ठता असो की त्यामुळे उद्भवणारं अवघड जागेचं दुखणं, हृदयविकार असो वा संधिवात ! सर्व आजारांचं निदान आणि त्यावरील उपचार यांच्याकडे उपलब्ध असतात !
२) फिरतं मोफत सल्ला केंद्र - प्रकार क्रमांक १ ची ही पुढची पायरी ! कोणी यांचं मत/सल्ला मागो अथवा न मागो, हे सल्ला दिल्याशिवाय राहणारच नाहीत ! आणि हा सल्लाही इतका आत्मविश्वासपूर्वक देतात की एखादा पेशंट गांगरून जायचा - 'मी उगाच हॉस्पिटलमध्ये येऊन पडलो की काय! यांनाच आधी भेटायला हवं होतं! ' कारण हे अगदी छातीठोकपणे सांगत असतात - "तुम्ही फक्त माझं ऐका ! बाकी काही करू नका - रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस घ्या! बस्स !सगळे आजार पळून जातील की नाही बघाच!"
३) प्रश्नांचा भडीमार करणारे वार्ताहर/उलट तपासणी करणारे पोलीस - या प्रकारच्या लोकांना अगदी सगळ्या गोष्टी 'क्रोनॉलॉजी' ने समजल्याच पाहिजेत असं वाटत असतं. जणू काही या लोकांना या पेशंटच्या आजाराची एखाद्या ऐतिहासिक बखरीत नोंद करायची जबाबदारी देण्यात आली आहे अशा थाटात प्रश्न एकामागोमाग विचारून ते अगदी पेशंटला भंडावून सोडतात- "नेमकं काय झालं? कसं झालं?किती वाजता? म्हणजे तुमचा अपघात तुम्ही मार्केटला जाताना झाला की येताना? कुठल्या गाडीची धडक बसली? ज्युपिटर होती की ऍक्टिवा?" वगैरे वगैरे... काही वेळाने हेच लोक टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टर प्रमाणे असंही विचारतील असं वाटतं - "अपघात झाला त्यावेळी तुम्हांला नेमकं काय वाटलं होतं ?" यावरून मला आमच्या कॉलेजच्या काळातला एक किस्सा आठवला. माझ्या एका सिनिअरचा अपघात होऊन त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता आणि त्याला कॉलेजच्याच आवारातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तो सिनिअर कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय होता त्यामुळे त्याला भेटायला येणाऱ्यांची (आणि येणारींची !) संख्या खूपच होती आणि आलेला प्रत्येक जण त्याला 'काय झालं? कसं झालं' हेच विचारत होता. या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन वैतागलेल्या त्या सिनिअरने शेवटी फ्रॅक्चर झालेल्या हाताच्या प्लास्टरवर मार्कर पेनाने त्याच्या अपघाताचा इतिहास मुद्देसूद लिहून काढला. त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला तो फक्त डावा हात पुढे करून दाखवे !
४) पेशंटची शाळा घेणारे - प्रकार क्रमांक २ आणि या प्रकारच्या लोकांमध्ये थोडा फरक आहे. या प्रकारचे लोक पेशंट म्हणजे किती निष्काळजी, बावळट, वेंधळा, अज्ञानी इ आहे हे दाखवून देतात ! "त्रास होतोय हे तुम्हांला आधी कळलं कसं नाही? एवढं दुर्लक्ष कसं केलं तुम्ही? आधी कुठे दाखवलं का नाही? इतके दिवस अंगावर काढलं ना दुखणं म्हणून आता इतका त्रास होतोय !" आधीच बिचारा पेशंट दुखण्यामुळे त्रस्त असतो. आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याची त्याला जाणीव होऊन तो संकोचलेलाही असतो. त्यात अशा बोलण्याने पेशंटला आपण आजारी पडून कुठलातरी मोठा गुन्हाच केला आहे की काय असं वाटू शकतं.
५) निराशावादी/ नको ते बोलणारे - याबाबतीतले माझे दोन वैयक्तिक अनुभव सांगतो आणि योगायोगाने दोन्ही अनुभव भेटायला आलेल्या दोन डॉक्टरांचे आहेत. माझ्या बाबांना १९९७ साली हार्ट अटॅक आला होता. त्याकाळच्या प्रोटोकॉलप्रमाणे आधी काही दिवस आयसीयू त्यानंतर अँजिओग्राफी आणि मग अँजिओप्लास्टी असं सगळं महिनाभराच्या काळात करण्यात आलं. सुरुवातीला आयसीयूमध्ये असतानाच बाबांना भेटायला आमचे एक परिचित डॉक्टर गेले होते. बाबांचं हार्ट डॅमेज बऱ्यापैकी होतं. त्या डॉक्टरांनी बाबांच्या देखत फाईल बघितली आणि मान हलवत एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाले - "अवघड आहे !"
अँजिओप्लास्टी करायच्या आधी बाबा घरी असताना आणखी एक परिचित डॉक्टर आले होते. त्यांनी वेगळ्या प्रकारे बाबांना घाबरवलं. ते म्हणाले -"अहो तुम्ही एक टाइम बॉम्ब घेऊन जगत आहात. कधी काय होईल सांगता येणार नाही. तेव्हा तुम्ही सतत तुमच्या जवळ सॉर्बिट्रेटची गोळी ठेवा. अगदी संडासला जाल तिथेसुद्धा गोळी बरोबर ठेवा !" दोघा डॉक्टरांचं म्हणणं कदाचित बरोबरही होतं पण ते सांगण्याची पद्धत जरा विचित्रच होती !
६) थोर(!) समीक्षक - यांच्यासारख्या सिनिकल लोकांना चांगलं काही दिसतच नाही. म्हणून मग ते संधी मिळेल तशी हॉस्पिटल, डॉक्टर, हॉस्पिटल-स्टाफ, बिलिंगला लागणारा वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटल बिल आणि सध्या सगळीकडे कशी लूट चालू आहे हे सांगतात.
७) अवाजवी अपेक्षा बाळगणारे - हे अनुभव एक डॉक्टर म्हणून मला काही वेळा आले आहेत. पेशंटबरोबर असे स्वघोषित हितचिंतक /नातेवाईक भेटायला येतात आणि ते आपल्याशी जे बोलतात त्यावरून वाटतं - पेशंट यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्यावर गोळीबार तर करत नाही ना? एखाद्या लहानपणापासून दमा असलेल्या पेशंटला औषध घेऊन महिनाही झालेला नसतो. तरी बरोबर आलेली व्यक्ती तुम्हांला प्रश्न विचारते - ह्यांचा त्रास अजून कमी कसा होत नाही ? अजून किती दिवस लागतील बरे व्हायला? किंवा एखादा त्रास कमी झाला तर दुसरा कमी का नाही झाला असाही प्रश्न विचारतात. अशावेळी मग त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली की त्यांना ते पटतं देखील आणि मग तेच बाजू पालटतात आणि म्हणतात-मीही याला हेच म्हणत होतो!
इथपर्यंत वाचून कोणालाही प्रश्न पडेल की या माणसाला चांगलं कधी काही दिसतच नाही का? कोणी चांगली माणसं याच्या नजरेस दिसून आलीच नाहीत का? तर तसं काही नाही. काही चांगले अनुभव देखील आले.
८ ) आश्वासक बोलणारे - पुन्हा एकदा बाबांच्या आजारपणाचा संदर्भ देतो. बाबांच्या त्या आजारपणाच्या काळात त्यांना खास भेटायला मुंबईहून माझ्या मावशीचे मिस्टर (म्हणजे बाबांचे साडू) आले होते. त्यांनी बाबांना खूप धीर दिला होता. कारण ते स्वत:सुद्धा या अनुभवातून गेले होते आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांची तब्येत चांगली झाली होती. तसंच माझ्या एका मानलेल्या बहिणीचे मामा सुद्धा आले होते ज्यांची सुद्धा अँजिओप्लास्टी झाली होती. या आजाराचा आणि त्यावरील उपचारांचा अनुभव घेतलेल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे बाबांच्या शंका दूर झाल्या आणि त्यांचं टेन्शनही कमी झालं होतं.
एकूण विचार करता असं का होत असावं की पेशंटला भेटायला आलेले लोक आवश्यक ते आणि तेवढंच म्हणजेच प्रसंगानुरूप बोलू शकत नाहीत? म्हणजे तसं पाहता मुद्दाम कोणी असं वागत असेल असं नाही. लोकांचा हेतू चांगलाच असतो पण प्रत्यक्ष घडतं वेगळंच असं का होत असावं? मला असं वाटतं की पेशंटला भेटायला जाणं बऱ्याचदा एक केवळ सामाजिक जबाबदारी समजून त्यात एक केवळ औपचारिकता पाळली जाते. जिथे फक्त कर्तव्य भावनेने गोष्टी केल्या जातात तिथे असे प्रकार घडायची शक्यता जास्त! दुसरं म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपला 'मी' घेऊन वावरत असतो. 'मला कसं सगळं माहित ! मी कसे उपचार घेतो! (आणि जर कोणाच्या आजारपणाबद्दल कळलं नाही तर-) मला कसं सांगितलं नाही ?' खरी गरज असते अशावेळी हा 'मी' सोडून समोरच्या माणसाच्या (म्हणजेच पेशंटच्या) बाजूने विचार करण्याची ! हे खूप काही अवघड आहे असं नाही. त्यासाठी हवी थोडी संवेदनशीलता आणि सहृदयता ! कधीकधी काय बोलावं हे जर सुचत नसेल तर कमी बोलावं/ प्रसंगी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन द्वारे पेशंटला त्याच्या या कठीण काळात आपण त्याच्याबरोबर आहोत हे फक्त जाणवून द्यावं. तसंच आपला या सगळ्यात कितपत उपयोग आहे किंवा होणार आहे याचंही भान असणं आवश्यक आहे.आणि उपयोग होणार नसेल तर आपला निदान उपद्रव तरी होऊ नये याची मात्र काळजी घ्यावी.
Tuesday, 1 December 2020
नूरी: रणथंबोरची देखणी वाघीण !
ही नूरी ! २०१९ च्या मे महिन्यात आम्हांला रणथंबोरच्या जंगलात ही दिसली होती. आपल्याला जसा आधार नंबर असतो तसा वन खात्याच्या सरकार दरबारी हिची नोंद फक्त एका आकड्याने झालेली आहे !तो आकडा आहे T-105! हे किती रुक्ष वाटतं. पण आपल्याकडील बऱ्याच जंगलांत वाघांचं बारसं करण्याची पद्धत आहे. जंगलांमधले गाईड किंवा वाहनचालक तो वाघ ओळखण्यासाठी ती नावं देतात. बहुदा नूर या वाघिणीपासून जन्मलेली म्हणून नूरी असं या वाघिणीच्या नावामागचं कारण असावं. नूरी हे नाव ऐकल्यावर नितीन मुकेशच्या आवाजातलं 'ओ नू..... री!' हेच गाणं आठवतं. पण हिला प्रत्यक्ष बघितल्यावर हे नाव अगदी चपखल वाटतं.
Friday, 21 August 2020
ती. बाबा...
(आज तिथीप्रमाणे आमच्या बाबांना जाऊन २ वर्षे झाली.(हरतालिका २०१८) तारखेनुसार १२.९.२०१८..
परवा सहज खण आवरत असताना बाबांच्या पंचाहत्तरीनिमित्त मी लिहिलेलं टिपण सापडलं. आजचा ब्लॉग म्हणजे हेच टिपण ! आज परत सगळं वाचताना बऱ्याच आठवणी मनात गोळा झाल्या. पण एक समाधानही वाटलं. आपल्या मनातल्या भावना बाबांपर्यंत पोचवता आल्या याचं ! अर्थात सगळंच काही फक्त शब्दांत ( आणि शब्दानेच) व्यक्त करता येत नाही हेही तितकंच खरं !)
१४.०२. २००९
कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावाचं नेमक्या शब्दांत वर्णन करणं हे सोपं काम नाही. त्यातही आपल्या वडिलांबद्दल बोलायचं तर अजूनच अवघड ! कारण आपल्याला त्यांचा खूप वर्षांचा सहवास असतो, असंख्य घटना घडून गेलेल्या असतात. त्यामध्ये कळत-नकळत,प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपलाही सहभाग असतो. म्हणून वस्तुनिष्ठपणे बघणं थोडं अवघडच जातं. तरीही आज आमच्या बाबांच्याविषयी काही ठळक गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात-
आमच्या बाबांच्या दिवसभरात करायच्या प्रत्येक गोष्टींमध्ये, कृतींमध्ये एक प्रकारचा क्रम आहे, ठराविकता आहे, सातत्य आहे , नियमितता आहे. अमुक एक गोष्ट झाली की त्यानंतर पुढची करायची गोष्ट ठरलेली! एक प्रकारच्या rhythm आणि पॅटर्नप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करतात. अगदी सकाळी दात घासताना होणाऱ्या आवाजापासून ते एकामागोमाग करत जाणाऱ्या प्रत्येक कामांमधून हे दिसून येतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि टापटीप आहे. घरी घालायच्या कपड्यांनासुद्धा ते स्वतः इस्त्री करतात आणि मगच घालतात. आणि या सर्व गोष्टी करायचा त्यांना आळस अजिबात नाही. अतिशय meticulously ते या गोष्टी करत असतात. "Everything in its proper place" हे त्यांचं आवडतं वाक्य आहे. आणि ते तसं व्हावं यासाठी ते स्वतः खूप झटतात. पण इतरांनीही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागावं असा मात्र त्यांचा आग्रह नसतो. त्यांचं अक्षरही इतकं छान ठसठशीत आणि स्पष्ट आहे की अगदी बघत राहावं! संपूर्ण कागदावर कुठंही खाडाखोड नाही. कुठलंही काम करण्याची त्यांची एक पद्धत आहे, त्यांनी त्यासाठी एक व्यवस्था तयार केली आहे. (आमच्याकडे अगदी वर्तमानपत्राच्या बिलांसाठी फाईल केलेली आहे आणि अजूनही वर्षानुवर्षांची बिलं त्यात सहज सापडतील !)
या सगळ्यातून एक शिस्तबद्ध आयुष्य त्यांनी घडवलं आहे. अशा कामांचा त्यांना कधी कंटाळा आलेला मी तरी पाहिलेला नाही. या disciplined आयुष्याचा त्यांना डायबेटिसशी लढा देताना खूप उपयोग झाला आहे असं मला वाटतं. १९६० च्या दशकात त्यांच्या या आजाराचं निदान झालं. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं-"Consider Diabetes as your friend!It is going to stay with you for a lifetime!" त्यानंतर आमचे बाबा डायबेटिसशी कधी झगडले नाहीत, त्याला कधी deny केलं नाही, इतर कुठल्या पावडरी-चूर्ण-अर्क यांच्या आहारी कधी ते गेले नाहीत. तेव्हापासून निमूटपणे, विनातक्रार न चुकता दररोज दोनदा इन्शुलिन घेत आहेत. आणि इन्शुलिनच्या वेळा काटेकोरपणे सांभाळत प्रमाणबद्ध आहार घेत आहेत. यालाही आता ४०-४५ वर्षं होऊन गेली ! या शिस्तीमुळेच डायबेटिसला त्यांनी बऱ्यापैकी आटोक्यात ठेवलं आहे. मधूनमधून त्याने डोकं वर काढलेलं आहे पण त्यावरही बाबांनी यशस्वी मात केली आहे.
आमच्या बाबांना त्यांच्या लहानपणापासूनच खूपच स्ट्रगल करावा लागला आहे. त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षीच त्यांची आई गेली. त्यानंतर ते आणि इतर भावंडे देखील त्यांच्या आत्यांकडे राहून शिकली. बाबांना तिथे शारीरिक कष्टाची बरीच कामं करावी लागली. तिथंही परिवार मोठा त्यामुळे खाण्यापिण्याची तशी आबाळच झाली ! या सर्व परिस्थितीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा परिणाम झाला आहे. ते तसे अबोल आणि संकोची स्वभावाचे आहेत. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील त्यांना सन्मानाची/बरोबरीची वागणूक मिळाली नाही तरीही ते तिथे निष्ठेने काम करत राहिले. त्यांच्या या खासगी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आता कुठे ते थोडेसे निवांत झाले आहेत.
आजच्यासारखे 'सुजाण पालकत्व' किंवा 'Parenting' हे शब्दही ज्यावेळी फारसे प्रचलित नव्हते त्या काळापासून आम्ही त्याप्रकारच्या Parenting मुळे समृद्ध झालो. नोकरीच्या किंवा इतर कुठलाही ताणाचा बाबांनी आमच्यासमोर कधीही उल्लेख केला नाही किंवा कधीही चिडचिड केली नाही. आम्हांला कधीही (आई-बाबा दोघांनीही) मारलं नाही. माझे कमी मार्क पाहून कधी माझी शाळा घेतली नाही! आम्हांला जे शिक्षण घेण्याची आवड होती ते त्यांनी आम्हांला घेऊ दिलं. करिअर बद्दलच्या त्यांच्या इच्छा-अपेक्षा आमच्यावर लादल्या नाहीत. शिक्षणाव्यतिरिक्त इतर छंद जोपासण्यासाठीही प्रोत्साहन दिलं.
याच अनुषंगाने असं सांगता येईल की आई-बाबांना मी कधीही तार स्वरात एकमेकांशी बोलताना ऐकलेलं नाही. मतभेद असले तरी ते आमच्यादेखत कधी त्यांनी व्यक्त केले नाहीत. तसंच त्यांनी त्यांची मतं (राजकीय/सामाजिक इ ) आमच्यावर कधीच लादली नाहीत. म्हणूनच बाबा जरी सश्रद्ध असले तरी मी माझी नास्तिकता जपू शकलो. माझ्या या मतांबद्दल त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही किंवा मला माझी मतं जबरदस्तीने, वादविवादाने बदलायला लावली नाहीत. घरातल्या या स्वातंत्र्याचा, मोकळ्या वातावरणाचा आम्हांला खूपच फायदा झाला. आमची मतं स्वतंत्रपणे बनवण्याची सवय यातून आम्हांला लागली.
या आणि अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. खरं तर आपल्या आई-वडिलांबद्दलच्या या गोष्टी इतक्या औपचारिकपणे लिहाव्या का? काही गोष्टी न बोलता/न लिहिता समजून घेण्याच्या/फील करण्याच्या असतात असं मलाही वाटत होतं. पण बाबांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचं निमित्त साधून एका बैठकीत जे मनात आलं ते लिहून काढलं इतकंच !
Wednesday, 12 August 2020
आठवण आईची !
Wednesday, 22 July 2020
कोरोना डायरी २ (अर्थात) : लॉक डाऊन काळातील आवाज !
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत सर्वप्रथम आसमंतात 'थाली बजाओ'चा आवाज घुमला.आजही मला तो दिवस आठवत आहे .. लोकांमध्ये किती उत्साह होता! अगदी उत्सवाचे रूप आले होते त्या दिवसाला!लोक जोरजोरात थाळ्या वाजवत होते ..आणि टाळ्या देखील! अर्थात मी यात भाग घेतला नाही. फक्त हे सर्व कोण करत आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो तेव्हा मला आमच्या शेजारच्यांनी पाहिले. आधी मला वाटलं की माझी बायको आणि मी, आम्ही दोघेही आरोग्य सेवेत आहोत म्हणून आमच्या आदरार्थ ते आमच्याकडे पहात टाळ्या वाजवत होते! पण तसे नव्हते. आम्ही या महान राष्ट्रीय कार्यात सहभागी का झालो नाही आणि त्यांच्यासाठी तरी आम्ही सहभागी व्हावे म्हणून ते जोरात टाळ्यांचा कडकडाट करीत होते! कोणीतरी माझ्या राजकीय विचारांबद्दल मला छेडले देखील आणि त्याने मी बधतो की काय हे पहाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दुर्दैवाने त्याचा काही उपयोग झाला नाही. 'थाली बजाओ' किंवा 'दिया जलाओ' असो, हे उपक्रम सोशल मीडियावर लगेचच्या लगेच त्याचे फोटो/ व्हिडिओ टाकून साजरे करण्यासाठीच होते असं आपलं माझं झालं.या उपक्रमांचं कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठीचे यशापयश सर्वांसमोर आहेच!
लॉक डाऊनच्या नव्या नवलाईचे पहिले काही दिवस होते,त्यात बाबा लोक्स घरी होते. म्हणून त्यांना घरातील कामात मदत करावी लागली. आमच्या वरच्या घरात अशा एका प्रेमळ वडिलांवर त्यांच्या गोड लहान मुलासाठी नाश्ता देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असावी. ते दररोज प्रेमाने आर्जवं करतानाचा आवाज ऐकू येई -"लाडू फिनिश कर ...". मला आश्चर्य वाटायचं की त्यांचा मुलगा इतका आज्ञाधारक कसा की तो नाश्त्याला दररोज गपगुमान फक्त लाडूच खातो ?! नंतर मला कळलं की लाडू हा नाश्त्याचा प्रकार नसून ते आपल्या मुलाला लाडाने लाडू म्हणत असे! कारण एकदा ते म्हणाल्याचं ऐकू आलं - "ए लाडू .... असं नको करू... ती मॅगी संपव ना बाळा!"
या पहिल्या काही दिवसांतच घराघरातून भांडी पडण्याचा आवाज आला. म्हणजे असं नाही की कोणी वाद घालत होतं. घरी कामवाल्या बायका येऊ न शकल्यामुळे नवऱ्यांना भांडी घासण्याचं काम पडल्यामुळे हे आवाज येत होते. आता त्यांना हे काम करण्याची सवय नव्हती की काम अनिच्छेने केले जात होते म्हणून भांडी पडण्याचाआवाज खूप जास्त येत होता हे कळायला मार्ग नव्हता!
लॉक डाऊन च्या काळात घरी बसून काय करायचे हा प्रश्न आमच्या शेजार्यांनी आमच्यासाठी सोडवून टाकला - ते टीव्हीवर सतत मोठ्या आवाजात बातम्यांचे चॅनेल लावून त्यांच्या घराचं दार उघडं ठेऊन महान सामाजिक कार्य करीत होते! बातम्यांमध्ये तरी नावीन्य असावे ना! त्याच त्या बातमी वेगवेगळ्या वाहिन्यांवर (कधीकधी फक्त भाषा बदलून)ऐकू येत होत्या."अमक्या शहरात कोरोनाचा कहर" "अमक्या ठिकाणी अनेक संशयास्पद रुग्ण सापडले"(जणू काही ते रुग्ण गुन्हेगारच आहेत!)
लोकांना लॉक डाऊनची थोडीशी सवय होताच भांड्याला भांडं लागण्याचेही आवाज ऐकू येऊ लागले! छोट्या छोट्या कारणांमुळेही धुसफूस वाढून त्याचे पर्यावसन भांडणात होऊ लागलं.आता हेच बघा ना! आमच्या पुण्यासह इतर शहरांमध्येही बहुतेक घरांमध्ये रविवारी(विशेषतः संध्याकाळी) चूल पेटत नाही! हा एक अलिखित नियमच आहे म्हणा ना ! आमचे एक शेजारी देखील पिढ्यानपिढ्या दर रविवारी पाव भाजी खायला हॉटेलात जातात. लॉकडाऊन दरम्यान हॉटेल्स पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या शेजाऱ्यांसारख्या अनेक लोकांची पूर्णपणे गळचेपीच झाली ना ! करावं तरी काय!नंतर सरकारने घरी पार्सलने बाहेरचे खाणे आणण्याची मुभा देण्याचे एक चांगले काम केलं. पण जर असं पार्सल मागवण्यातून कोरोनाचा धोका निर्माण झाला तर? ज्याने तो आणला त्याला कोरोना असेल तर? एकीकडे हॉटेलमध्ये जाऊ न शकल्याने गंभीर पेच आणि दुसरीकडे हा धोका! आमच्या या शेजाऱ्याने हा धोका पत्करला.त्याची आई मात्र तार सप्तकात त्याला सतत सूचना देऊन त्याला बाहेर जाऊ नको असं सांगत होती.आईच्या त्या सूचनांना अव्हेरून मुलाने पावभाजीच्या पार्सलची ऑर्डर दिलीच. मुलगा गाडीवरून पावभाजी आणायला निघेपर्यंत आईचे प्रयत्न चालूच होते. मुलगा एक इंच मागे हटायला तयार नव्हता. कारण त्याला सबळ पाठिंबा त्याच्या बायकोचा होता. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुनेचा थोडासुद्धा आवाज येत नव्हता. ती फक्त गॅलरीत येऊन उभी राहिली होती. प्रतिष्ठेचा प्रश्न मुलाच्या आईसाठी होता. शेवटी गाडीला किक मारून तो मुलगा पाव भाजी आणायला गेला की नाही is anybody's guess!
या लॉक डाऊनच्या काळात बीएसएनएल आणि इतर खासगी कंपन्या तसेच महावितरणचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ! इंटरनेट आणि विजेची मागणी अफाट वाढून देखील त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी समाधानकारक सेवा दिली आहे. लोक फक्त WFH च करत आहेत म्हणून ही मागणी वाढली आहे असं नाही. मध्यंतरी अचानक सगळीकडे एक वेबीनारचं पेव फुटलं. वेगवेगळ्या विषयांवर हे वेबिनार झाले. मी सुद्धा असे काही अटेंड केले. ऐन दुपारच्या वेळी एखाद्या कंटाळवाण्या विषयावर एखादा वक्ता जीव तोडून बोलत असला तर झोप टाळणे ही एक कसरतच असते. वेबिनार बरोबरच आणखी एक प्रकार सध्या दिसून येतो- Google Duo, Zoom किंवा Whatsapp कॉल द्वारे मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी! सध्या प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे या आधुनिक टेक्नॉलॉजी च्या आधारे ती कसर भरून निघत आहे! मग "हा........ य ...... हॅ...... .... लो ... किती दिवसांनी भेटतोय ना आपण ..... हा हा हि ही ....." हे आवाज येऊ लागले! या भेटींतून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताची सामरिक व्यूहरचना, देशाची आर्थिक परिस्थिती इथपासून ते अगदी नुकताच केलेल्या आणि सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या एखाद्या नावीन्यपूर्ण पदार्थाची पाककृती अशा अनेक विषयांवर चर्चा रंगल्या! सध्या मात्र शाळा चालू झाल्यापासून आमच्या समोरच्या घरी ऑनलाईन शाळा चालू आहे. हा मुलगा त्याच्या शिक्षिकेचं लक्ष वेधून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे - "मॅम... मॅम .... which colour book? yellow colour?" हे एकच वाक्य निदान १५-२० वेळा त्याने म्हटलं असेल...
जसे जसे दिवस सरकू लागले तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की हा कोरोना काही मागे हटत नाही. दिवस-रात्र, वेळी-अवेळी ऍम्ब्युलन्सचे आवाज मात्र वाढू लागले. ठिकठिकाणी पेशंटची संख्या वाढू लागली. बाहेर काहीही झालं तरी इथे आपण सुरक्षित आहोत ही भावना हळू हळू लोप पावत चालली. दबक्या पावलांनी कोरोनाने आमच्या सोसायटीत प्रवेश केला आणि दबक्या आवाजात लोकांचं बोलणं सुरु झालं - "तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतो ना तो ... तो पॉझिटिव्ह निघाला! (जसं काही यांनी रिपोर्ट पाहिलाच आहे !)तुला कळलं नाही? जपून राहा जरा !" आणि मग घरोघरी देवाची गाणी ऐकू येऊ लागली. बायका स्वयंपाक करताना देखील मोबाईल समोर ठेवून त्यावर देवाचे स्तोत्र -मंत्र ऐकू लागल्या. सध्या देवळं बंद असल्यामुळे आमच्या समोरच्यांनी (जे देवळाचे विश्वस्त आहेत) देवाची छोटी मूर्ती घरी आणली. मग सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेला साग्रसंगीत(आणि अर्थातच मोठ्या आवाजात)आरती सुरु झाली. हळूहळू आता त्या आरतीच्या वेळी त्यांच्याकडे गर्दी वाढू लागली आहे.
या सगळ्या कोलाहलात मला काही चांगले आवाज ऐकू आले हे आवर्जून सांगितलं पाहिजे. शिक्रा, Fantail Flycatcher, Tickel's blue Flycatcher, Spotted Owlet या सारख्या कितीतरी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज मला ऐकायला मिळाले. दयाळ (Magpie Robin), खंड्या (White throated Kingfisher) आणि कोकीळ यांचे तर कॉल ऐकून मीच कंटाळून गेलो! कितीतरी पक्षी जे या आधी मी आमच्या भागात बघितले नव्हते ते बघायला मिळाले(उदा - Scaly breasted Munia).
मी संध्याकाळी फिरायला जात असताना नेहमी मला एक चौकोनी कुटुंब दिसतं. आई-वडील आणि त्यांची शाळकरी मुलं असे चौघेजण मिळून बॅडमिंटन खेळतात. बॅडमिंटन खेळापेक्षा त्यांचं हसणं-खिदळणं, दंगा -मस्ती, रुसवे-फुगवे हे बघायला मजा येते. हे family bonding खूप छान वाटतं.
असाच फिरत असताना आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका घरातून कोणीतरी गिटार वाजवत असल्याचा आवाज ऐकून मी थबकलोच! गिटारबरोबरच एक तरुण मुलगा गातही होता. त्याला मी आवाजावरून ओळखलं. हा तर एक टग्या मुलगा होता. पण तोच आता गिटार वाजवतो आणि गातोसुद्धा? नंतर लक्षात आलं की तो नवविवाहित होता आणि त्याची बायको गिटार वाजवत होती. सध्याच्या या अनिश्चित काळात या नवपरिणीत जोडप्याचं स्थळ काळाचं भान विसरून Live as if there is no tomorrow अशा प्रकारे गाणं बजावणं मला मनापासून आवडलं !
Thursday, 9 April 2020
कोरोना डायरी १
कोरोनाची पार्श्वभूमि :
कोरोना विषाणू |
२००९ साली समाजमाध्यमं आजच्या तुलनेत एवढ्या प्रमाणात नव्हती. तेव्हा माहितीचा स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स हेच होते . आता मात्र जगभरातील स्थिती वेगवेगळ्या माध्यमांमधून अक्षरश: लाईव्ह कळते. तशाच प्रकारे CoVid-19 चा जगभरात जाणवणारा परिणाम अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू लागला आहे हे विविध बातम्या, लेख आणि जगभरातील लोकांचे आजाराचे अनुभव यातून दिसू लागलं आणि खडबडून जाग आल्यासारखं झालं. चीनमधून साथीचं वास्तविक चित्र समोर येत नव्हतं पण हळूहळू इटली, इराण इथले या आजाराच्या रुग्णांचे आकडे आणि आजारामुळे दगावलेल्या पेशंटची संख्या भयावह वाटू लागली. ट्विटर वर लंडन स्थित अली नावाच्या मूळच्या इराणी माणसाने तिथले काही व्हिडिओ देखील टाकले. त्यातून रस्त्यात चालता चालता अचानक कोसळणारी माणसं, तिथल्या हॉस्पिटल्स मधले गंभीर पेशंट आणि त्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या पेशंटच्या संख्येला तुटपुंजी ठरणारी तिथली आरोग्य व्यवस्था हे तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करत होतं. त्याही परिस्थितीमध्ये तिथले डॉक्टर्स, नर्सेस पेशंटना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत होते आणि त्यात काही डॉक्टरांना प्राणही गमवावे लागले. अशा नकारात्मक वातावरणाबरोबरच आय सी यू मधील नर्सेस आपला ताण हलका करण्यासाठी PPE घालून चक्क नाचत आहेत असाही व्हिडिओ पाहण्यात आला.
मात्र तरीही चीन, इटली-स्पेन सारखे युरोपिअन देश किंवा अमेरिका हे भारतापासून लांब आहेत आणि तिथे हा आजार वेगाने पसरला असला तरीही भारतात तो इतका धुमाकूळ घालणार नाही अशी एक भाबडी आशा मनात होती. स्वत: बद्दलची माझी अशी समजूत होती की माझी मतं शक्यतो काही वाचन, त्यातून मिळणारे संदर्भ, पुरावे यावर आधारित असतात. या साथीच्या अनुषंगाने नेमका त्याचवेळी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा २००९ च्या स्वाईन फ्लूच्या साठी मागच्या खऱ्या कारणांचा वेध घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला. तसंच अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध हे देखील या साथी मागे आहे की काय अशी वाचनात आलं. अशाप्रकारच्या Conspiracy theories मुळेही या साथीचं गांभीर्य कमी वाटू लागलं.
जानेवारी-फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या एक-दोन आठवड्यांपर्यंत रोजचे सर्व व्यवहार सुरळित चालू होते. ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराची जागतिक साथ(pandemic) असल्याची घोषणा केली आणि महाराष्ट्र सरकारने शाळा कॉलेज १६ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसंच गर्दी न करणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, सिनेमा थिएटर- नाट्यगृहं बंद असे जेव्हा आदेश आले तेव्हा लक्षात आलं की संकट अगदी दाराशी येऊन ठेपलं आहे. हे म्हणजे अगदी ऑफ गार्ड पकडल्यासारखं झालं. एखादा चेंडू फ्लिक करायला जावं आणि तो इन-स्विनगिंग यॉर्कर ठरून दांडी गुल करेल की काय असं वाटू लागलं.
२
कोरोनाबद्दलची शास्त्रीय माहिती, त्या आजाराची लक्षणं, त्याचे निदान आणि उपलब्ध उपचार, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय हे सगळं सांगायचा या ब्लॉगचा हेतू नाही. आणि तशीही या सर्व बाबतीत माहिती सर्व माध्यमांवर उपलब्ध आहेच (अगदी प्रत्येक फोनवरच्या त्या कंटाळवाण्या रिंगटोन सह!) पण तरीही कोणाला ही माहिती हवी असल्यास या व्हिडिओ मधून ती मिळू शकेल -
https://www.youtube.com/watch?v=AFLTC842qY4
३
कोरोनाची साथ आणि माझं क्लिनिक -
वर उल्लेख केल्याप्रमाणे मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. पेशंट WhatsApp वर फिरत असलेल्या कोरोना साथीच्या तथाकथित प्रतिबंधासाठी होमिओपॅथीच्या एका औषधाविषयी (आर्सेनिक अल्बम) विचारत होते. त्यांना त्याबद्दलचे सत्य सांगणे आणि आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे हे सांगणे असं चालू होतं.मी हून कोणालाही असं जेनेरिक औषध दिलं नाही. पण एका पेशंटकडून कळलं की पुण्याजवळील एका गावात एका होमिओपॅथिक डॉक्टरने असे प्रतिबंधात्मक औषध देण्यासाठी एक शिबिर घेऊन त्यातून बक्कळ पैसा कमावला. होमिओपँथीच्या दुकानांमध्ये या औषधाचा तुटवडा निर्माण झाला.
२२ मार्चला केंद्र सरकारने एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' लागू केला आणि महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत वाढवल्यानंतर मात्र अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. २३ मार्च पासून क्लिनिकला जायचं की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे जरी आम्ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असलो तरीही कित्येक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवायला सुरुवात केली. संपूर्णपणे केवळ होमिओपॅथीचीच उपचारपद्धती वापरणारा माझ्यासारखा डॉक्टर त्यामुळे थोडा संभ्रमित झाला. अशा साथीच्या आजाराच्या काळात होमिओपॅथीचे नेमके स्थान काय? या प्रश्नाचे उत्तर कितीही नाही म्हटलं तरी -फारसे काही नाही !- हेच होतं. मी स्वतः ला कुठल्याहीप्रकारे कोरोनाच्या युद्धभूमीवरील एक योद्धा म्हणून बघू शकत नव्हतो (आणि अजूनही त्यात काही बदल झालेला नाही) मग अशा स्थितीत क्लिनिक चालू ठेवावं का? पण मग इतर जुनाट आजारांच्या पेशंटचं काय? त्यांच्या मनांतील शंकांचं निरसन करणारा, त्यांना आश्वस्त करणारा किंवा दिलासा देणारा डॉक्टर म्हणून माझी भूमिका असू शकते की नाही? या सगळ्या पलिकडे जाऊन क्लिनिक बंद ठेऊन माझ्या व्यवसायाकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्या प्रति माझी निष्ठा कमी पडते की काय ? असे काही तात्विक/नैतिक प्रश्न उपस्थित झाले. अशा प्रश्नांना आपल्याला कधी सामोरं जावं लागेल असं वाटलंही नाही. पण ही परिस्थितीच इतकी विचित्र होती कि तुम्ही कुठलीही बाजू बघा ती योग्यच वाटेल. म्हणजे दवाखाने चालू ठेवले तर डॉक्टर त्याच्याकडून अपेक्षित सर्व जबाबदारी पाडत आहे आणि समजा दवाखाने बंद ठेवले तरीही त्यात गैर काहीच नाही - कारण दवाखाने हा देखील आजार पसरण्याचा एक स्रोत होऊ शकतो. एकमेकांच्या संपर्कात आलेले पेशंट, क्लिनिकमध्ये जिथे पेशंट बसतात त्या खुर्च्या, दरवाज्याच्या कड्या इ सगळ्यामुळे आजार पसरू शकतो. आणि (माझ्या) क्लिनिकमध्ये बसल्यामुळे पेशंटला हा आजार झाला हे guilt घेणं मला जड गेलं असतं. शिवाय सगळीकडे Social Distancing हा परवलीचा शब्द झाला होता. त्यामुळे दवाखाना बंद ठेऊन एक प्रकारे आपण या सामाजिक अंतर राखण्याला मदतच करत नाही का ?
या सगळ्याचा सुवर्णमध्य म्हणून मी २३ मार्च पासून माझं क्लिनिक फक्त थोडा वेळ चालू ठेवू लागलो. म्हणजे पेशंटनी आदल्या दिवशी फोनवर त्यांची लक्षणं सांगायची आणि घरीच त्यांची औषधं मी करून त्यांना क्लिनिकमधून ती फक्त घेऊन जायला सांगायचो. काही पेशंट घरी येऊन औषध घेऊन जात होते. अशाप्रकारे सेवा देऊन (आत्मप्रौढीचा धोका पत्करून )कुठल्याही पेशंटला मी नाकारले नाही. फोनवर तर मी संपर्कात होतोच. पण या साथीमुळे एक झालं की येणारा प्रत्येक पेशंट हा 'त्याच' आजाराचा आहे की काय अशी शंका डोक्यात यायची. मग त्यातूनच Hand sanitizer वापर, तोंडाला मास्क लाव, वेटिंग एरिया सारखा पुसून काढ असे पॅरानॉईड उपाय करायला लागलो. शिवाय पेशंटला तपासण्यासाठी हात लावताना देखील विचार करावा लागला. पूर्वी माझा मामा एकदा मुंबई येथील एका नामांकित डॉक्टरांकडे गेला होता. तिथून आल्यावर तो म्हणाला -"आज डॉक्टरांनी माझे काही लाड पुरवले नाहीत. त्यांनी मला हातसुद्धा लावला नाही!" तसं मी देखील पेशंटना लांबूनच तपासत होतो.
या साथीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याच्याशी जोडला गेलेला social stigma ! या आजाराचे पेशंट म्हणजे कोणी गुन्हेगारच आहेत आणि ते इतरांना मुद्दामच हा आजार 'देत' आहेत असं वातावरण निर्माण झालं. एका डॉक्टरला हा आजार झाला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व पेशंटचा नंतर माग घेण्यात आला आणि त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले. या उदाहरणावरून असं वाटलं की असा प्रकार आपल्याकडे झाला असता तर? सरकारी यंत्रणा कामाला लागून त्यांनी contact tracing केलं असतं आणि मीडियामध्ये या सगळ्याची बातमी येऊन आपलं नाव त्यात खराब झालं असतं. त्यापेक्षा क्लिनिक कमी वेळ चालू ठेवणंच श्रेयस्कर असा विचार मी केला.
विचार करता करता मी या प्रश्नाकडे येऊन थांबलो की मला नेमकी भीती कशाची वाटते? आजाराची की या सर्वव्यापी/ सर्वाधिकार असणाऱ्या सरकारी यंत्रणेची ? की आणखी काही?....
(क्रमश:)
Wednesday, 4 March 2020
परीक्षा दहावीची...
(हे मी माझ्या '(जर्मन) भाषा पाहावी शिकून' या ब्लॉग मध्ये लिहिलं आहेच!
https://draft.blogger.com/blogger.g?tab=mj1&blogID=2409820389244950539#editor/target=post;postID=3228604851072649879;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=43;src=postname )
हे जरी खरं असलं तरी मला अजूनही कधीकधी दहावीच्या परीक्षेची आणि त्यातही गणिताच्या पेपरची स्वप्नं पडतात. उद्या पेपर आहे आणि आज माझा काहीही अभ्यास झालेला नाही किंवा आज मी गणिताचं पुस्तक आणायला जातोय अशा प्रकारची स्वप्नं पडतात. स्वप्न आणि वास्तव यांचा खरंच फारसा संबंध नसतो हेच खरं!