Saturday, 25 June 2022

हिंदी सिनेमांमधील डॉक्टर ! (भाग २)

  

आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे या ब्लॉगमध्ये हिंदी सिनेमातल्या काही सशक्त डॉक्टर व्यक्तिरेखांचा थोडा खोलवर विचार करत आहे....

हिंदी सिनेमात हिरो/हिरोईनचं दुर्धर आजारपण आणि त्याभोवती गुंफलेली कथा असेही काही प्रयोग झाले आहेत. त्यापैकी चिरपरिचित आणि अजरामर उदाहरण म्हणजे 'Lymphosarcoma of Intestine' हा आजार झालेला 'आनंद' (राजेश खन्ना) नावाप्रमाणेच आनंदी असणारा, इतरांच्या आयष्यात आनंद फुलवणारा, स्वतः चं आयुष्य आजारामुळे लवकरच संपणार आहे हे माहित असूनदेखील ते आयुष्य रसरशीतपणे जगणारा 'आनंद'! ("जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए" !) सिनेमात आनंदच्या आजाराचे चढ -उतार, त्यातील फेजेस आपल्याला डॉक्टर भास्करच्या  (ज्याला आनंद, बाबू मोशाय असेच संबोधतो) (अमिताभ बच्चन ) रोजनिशीतून उलगडत जातात आणि सर्वांना जीव लावणारा आनंद शेवटी आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतो. भास्कर मधला एक संवेदनशील माणूस आणि त्याचं डॉक्टरी ज्ञान यातील द्वंद्व दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांनी चांगल्याप्रकारे उभं केलं. राजेश खन्नाचा  author-backed रोल होता पण अमिताभ बच्चननेही भास्करच्या भूमिकेत चांगले रंग भरले ! याच आनंदची आधुनिक नक्कल म्हणता येईल असा सिनेमा येऊन गेला तो म्हणजे- शाहरुख खानचा 'कल हो ना हो'! पण त्याला मूळ सिनेमाची सर नक्कीच नव्हती ! 


भावना श्रेष्ठ की कर्तव्य अशा द्वंद्वात सापडलेला डॉक्टर असाही सिनेमा होता -'दिल एक मंदिर'! डॉक्टर राजेंद्रकुमार, मीनाकुमारी आणि राजकुमार असा प्रेमाचा त्रिकोण! मीनाकुमारीचं लग्न राजकुमारशी होतं. राजेंद्रकुमारचंही प्रेम अर्थातच मीनाकुमारीवर असतं. तो तिच्या आठवणीत झुरत राहतो. लग्नानंतर राजकुमाराला एक असाध्य आजार होतो. त्यावरील उपचारांसाठी योगायोगाने तो राजेंद्रकुमारच्याच दवाखान्यात दाखल होतो. तिथे राजेंद्रकुमार आणि मीनाकुमारी पुन्हा भेटतात. जुन्या स्मृतींना उजाळा मिळतो. मात्र तिला तिचा पूर्वीचा प्रियकर, तिच्या पतीला या आजारातून वाचवेल का याबाबत शंका निर्माण होते. त्यांचं बोलणं राजकुमार ऐकतो. आपण आता आजारातून वाचणार नाही म्हणून मीनाकुमारीने राजेंद्रकुमारशी लग्न करावं असं तो तिला सांगतो जे पतिव्रता दाखवलेल्या मीनाकुमारीला पटत नाही. इकडे मीनाकुमारीच्या शंका घेण्यामुळे डिवचला गेलेला डॉक्टर, कोणत्याही परिस्थितीत  राजकुमाराला वाचवायचंच असं आव्हान स्वीकारतो. यात अपयशाला थारा नाही म्हणून जीवतोड मेहनत घेतो, रात्रदिवस अभ्यास करतो आणि ऑपरेशन करतो, जे अर्थातच यशस्वी होतं. परंतु हा सगळा ताण असह्य झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने डॉक्टरच मारतो. प्रेम आणि कर्तव्य यात कर्तव्य श्रेष्ठ ठरतं का या कर्तव्यामागेही त्यागातून तळपणारं प्रेमाचं असतं? 
दिल एक मंदिर 

व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत राहूनसुद्धा डॉक्टर true healer असतो/असते हे दाखवण्याचे चांगले प्रयत्न झाले आहेत. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 'काला पत्थर'हा चित्रपट हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. अमिताभच्या जखमांचं ड्रेसिंग करणारी डॉक्टर राखी, त्याच्या मनात ठसठसणाऱ्या वेदनेवर हळुवार फुंकर घालते. मनाच्या सांदी कोपऱ्यात खोलवर दाबून ठेवलेलं त्याच्या आयुष्यातलं guilt त्याला व्यक्त करायला लावून, त्याच्यामधला अंगार बाहेर काढते आणि त्याला शांत करते. त्यानंतर अर्थातच दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर बहरतात. 
काला पत्थर 

काही सिनेमांमधून हळव्या, संवेदनशील, कवीमनाच्या डॉक्टरचंही दर्शन घडतं.. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव जोगळेकर दिग्दर्शित 'आज और कल' हा सिनेमा! यात संस्थान खालसा झालेल्या पण तरीही करारी, करडी शिस्तप्रियता असलेल्या राजा (अशोककुमार) आणि त्यामुळे दबलेल्या त्यांच्या मुलांची (नंदा, तनुजा, देवेन  वर्मा आणि रोहित ) कथा आहे. राजघराण्याची प्रतिष्ठा, शानो-शौकत यामुळे घुस्मटलेली ही मुलं कोमेजतात. पायाची शक्ती गमावलेल्या नंदाच्या उपचारार्थ डॉ संजय (सुनील दत्त ) यांना बोलावलं जातं. जगण्याची उमेद हरवून बसलेल्या , आयुष्याचा तिटकारा आलेल्या नंदाला हा डॉक्टर पुन्हा उभारी धरायला लावतो. तिच्यावर बेचव जेवण, कडू औषधं यांचा मारा करण्याऐवजी मानसिक आधार देऊन उपचार करतो. याचाच परिणाम म्हणून ती चालू लागते. दोघांचं प्रेम जमतं. मात्र राजाला वाटतं की डॉक्टर आपल्या मर्यादा ओलांडून वागत आहे. तो डॉक्टरला त्याची फी म्हणून तुच्छतेने पैसे देतो. इथे डॉक्टर राजाला धारेवर धरतो आणि त्याच्या प्रेमाची किंमत पैशाने केली जाऊ नये असं सुनावतो. राजा त्याला घराबाहेर काढतो. राजाच्या विरोधात त्याची मुलंही (नंदा सोडून ) घर सोडतात.घरच्यांप्रमाणेच राजाच्या प्रजेचं मतही त्याच्या बाजूने राहत नाही. शेवटी तो लोकसभा निवडणुकीत हरतो आणि त्याचा करारीपणा गळून पडतो व त्याच हृदयपरिवर्तन होतं. या सिनेमात राजा आणि डॉक्टर संजय या दोन प्रवृत्तींमधला संघर्ष चांगल्या प्रकारे दाखवण्यात आला आहे. 

आज और कल 


आपल्याकडे हे नेहमी सांगितलं जातं की शहाण्या माणसाने डॉक्टरची आणि कोर्टाची कधी चढू नये ! या दोन व्यवसायांना नेहमी एकाच तराजूत का तोललं जातं माहीत नाही. कारण प्रत्येकालाच डॉक्टर/वकिलांबद्दल वाईटच अनुभव आलेले असतात असं नाही. पण तरीही असं सरसकट विधान केलं जातं. हिंदी सिनेमांत मात्र 'कानून के हाथ, डॉक्टर के साथ' असं दोन्ही व्यवसायांमध्ये सौख्याचं आणि सौहार्दाचं नातं बघायला मिळतं. काही सिनेमात डॉक्टरला तज्ज्ञ साक्षीदार ( Expert witness) म्हणून बोलावलेलं बघायला मिळतं तर 'खाकी' सारख्या सिनेमात एक महत्त्वाचा साक्षीदाराला (अतुल कुलकर्णी) फक्त जिवंत ठेवणं इतकंच नाही तर तो कोर्टात जाऊन साक्ष देण्याइतपत बरा होईल हे करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर सोपवली जाते. तर 'मेरी जंग' या सिनेमात नायक अनिल कपूर आणि खलनायक अमरीश पुरी यांच्यातील जंगची सुरुवात  एका डॉक्टरच्या केसनेच होते. 
दिग्दर्शक गुलजार यांच्या 'अचानक' या सिनेमाची सुरुवात आणि शेवट डॉक्टर (ओम शिवपुरी) च्या हॉस्पिटल मध्येच होते. गुलजार यांच्या चिरपरिचित फ्लॅशबॅक तंत्राने उलगडत जाणारा हा सिनेमा एका पातळीवर नायक विनोद खन्नाचा तर दुसऱ्या पातळीवर डॉक्टरचाही ! आपल्या बायकोवर अतिशय प्रेम असणारा, सैन्यदलात काम करणारा हिरो ( विनोद खन्ना) जेव्हा युद्धात बहादुरी गाजवून घरी परततो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याच्या अनुपस्थितीत त्याची बायको आणि त्याचाच जिवलग मित्र यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले आहेत. हा विश्वासघात सहन न झाल्यामुळे तो थंड डोक्याने दोघांचाही खून करतो आणि नंतर स्वतःच पोलिसांना त्याची खबर देतो. त्यावर कोर्टकेस होऊन त्याला फाशी सुनावण्यात येते. त्याची शेवटची इच्छा म्हणून त्याला त्याच्या घरी आणण्यात येतं. तिथे त्याला पूर्वी कधीतरी हसत-खेळत त्याच्या बायकोने तिच्या निधनानंतर तिचे मंगळसूत्र गंगेत अर्पण करायला सांगितल्याची आठवण होते. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो पोलिसांचा पहारा चुकवून पळून जातो. पोलिसांचा पाठलाग सैन्यात प्रशिक्षण घेतलं असल्यामुळे तिथल्या युक्त्यांचा वापर करून) तो चुकवायचा प्रयत्न करतो. शेवटी अगदी गंगेजवळ येतानाच त्याला पोलिसांची गोळी छातीत लागल्यामुळे तो जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये येतो जिथे डॉक्टर (ओम शिवपुरी) त्याचं ऑपरेशन करून त्याचा जीव वाचवतात. युद्धात पराक्रम गाजवताना शत्रूचा सैनिक मारला तर या कामगिरीबद्दल गौरवपदक मिळतं पण हेच जर सर्वसामान्य आयुष्यात कोणी एखाद्याचा खून केला तर मात्र फाशीची शिक्षा  जाते. हे असे न्याय का? असा काहीसा तात्विक पण अतार्किक प्रश्न सिनेमात डॉक्टर विचारताना दिसतो. 
अचानक 

पण irony अशी की जरी डॉक्टरांनी त्याला वाचवलं असलं तरी पुढे त्याला फाशीची शिक्षा मिळतेच! 
शेवटी डॉक्टरने आपलं काम करावं आणि कायद्याने त्याचं, हेच खरं ! 
याच ओम शिवपुरी साहेबांनी 'खूबसूरत' (रेखाचा) मध्येही डॉक्टरचंच छान काम केलं होतं. आयुष्याचा पुरेपूर आनंद देणारी/घेणारी, बंडखोर, मनस्वी पण तरीही सर्वांना आपलंस करणारी नायिका मंजू (रेखा) आणि त्याउलट करारी, शिस्तप्रिय निर्मला गुप्ता (दीना पाठक ) या दोघींच्या स्वभावातला विरोधाभास सिनेमात ठळकपणे मांडलाय. मंजूच्या अशा 'उथळ' स्वभावामुळे ती घरातली कुठलीही जबाबदारी घेऊ शकणार नाही असं निर्मलादेवींचं ठाम मत ! मात्र  कोणीही नसताना निर्मला देवींचे पती (अशोककुमार) यांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी गोंधळून न जाता प्रसंगावधान राखून मंजू डॉक्टरांना फोन करून घरी येण्याची विनंती करते. पण ते घरी यायला नकार देतात. तेव्हा ती त्यांना खड्या आवाजात त्यांच्या पेशंटप्रतीच्या कर्तव्याची आठवण करून देते. डॉक्टर घरी येतात. पेशंटला बरं करतात. पण त्यांची फी घेत नाहीत. कारण मंजूने त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागवलेली असते. तणावाच्या काळात जबाबदारीने वागणाऱ्या मंजूबद्दल अर्थातच निर्मलादेवींचं मत बदलतं आणि शेवट गोड होतो. या सगळ्यात डॉक्टर म्हणून ओम शिवपुरी चांगली छाप पाडून जातात. 
खूबसूरत 


मनोरुग्णांच्या उपचारासाठी वेगळा प्रयोग ( पण प्रत्यक्षात असा प्रयोग करणे जवळपास अशक्य !) म्हणून 'खामोशी' (जुना, असित सेन दिग्दर्शित) या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. यात डॉक्टर (नाझीर हुसेन ) प्रेमिकेने फसवल्यामुळे मनोरुग्ण झालेल्या पेशंट अरुण (राजेश खन्ना ) साठी नर्स राधा (वहिदा रहमान ) ला आधी त्याचा विश्वास संपादून, त्याला प्रेमाने हळूहळू जिंकून(म्हणजे एक प्रकारे प्रेमाचा अभिनय करून)  त्याला त्या मनोअवस्थेतून बाहेर काढायचा मार्ग सुचवतात. याच नर्सने अशाच प्रकारे आणखी एका पेशंटला (धर्मेंद्र) यशस्वीरीत्या बर केलेलं असतं. यावेळी ती नाखुशीने अशा उपचारासाठी तयार होते आणि या काळात पेशंटमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत जाते. यथावकाश पेशंट बरा होतो आणि नंतर तिला ओळखतही नाही. मात्र पेशंटच्या खरोखरच प्रेमात पडलेली नर्स(ती म्हणते की तिने कधीच प्रेमात पडल्याचा अभिनय केला नव्हता!) हा धक्का सहन न होऊन स्वतःच मनोरुग्ण होतेही या सिनेमाची कथा! अशक्य कोटीतील गोष्ट वहिदा रहमानच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि तिच्यातील स्थित्यंतरे बघून प्रेक्षकही विस्मयचकित होतात. 


 

 

याच दिग्दर्शक असित सेन यांचा १९७० साली आलेला 'सफर' हा सिनेमा देखील एका सशक्त स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरतो. मात्र ती व्यक्तिरेखा, डॉ नीला (शर्मिला टागोर ) सशक्त आहे हे दाखवण्यासाठी तिच्यावर ओढवलेले अनेक समज-गैरसमजाचे प्रसंग, तिच्या पती, शेखरची(फिरोजखान) आत्महत्या परंतु तिच्यावर त्याच्या खुनाचा आळ येणं , तिला तुरुंगात टाकलं जाणं, त्यातून सुटका, मग तिच्या प्रियकर अविनाश (राजेश खन्ना) याचा कॅन्सरमुळे मृत्यू अशी दुर्दैवी प्रसंगांची  मालिकाच कथेमध्ये दिसते. अशा नैराश्य येण्यासारख्या परिस्थितीत तिला डॉ चंद्रा (अशोककुमार) उभारी देतात आणि जगण्याची एक नवी  दिशा सापडून ती एक चांगली सर्जन बनते आणि आपलं आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित करते. 

वैद्यकीय क्षेत्राचं व्यापारीकरण असा विषय हाताळणारे काही सिनेमे आले. मात्र शेवटी व्यावसायिक सिनेमांचे बंधन असल्यामुळे मूळ विषय बाजूला पडून त्या सिनेमात वेगळंच कथानक घडल्याचं दिसतं.. हृषिकेश  मुखर्जी दिग्दर्शित 'बेमिसाल'(१९८२) मध्ये अति महत्त्वाकांक्षेपायी डॉक्टर प्रशांत (विनोद मेहरा) कडून एक चूक होते आणि त्यात पेशंट दगावते. मात्र प्रशांतच्या वडिलांनी डॉ सुधीर (अमिताभ बच्चन) चं पालन पोषण करून त्याला डॉक्टर बनवलेलं असतं. या गोष्टीला जागून डॉ सुधीर प्रशांतने केलेली चूक स्वतः वर घेतो आणि त्यामुळे त्याला तुरुंगवास होतो. यातच एक उपकथानक म्हणजे प्रशांत आणि सुधीर दोघेही कविता (राखी) वर प्रेम करतात पण सुधीर इथेही त्याग करून कविताला प्रशांतशी लग्न करायला सांगतो. एकूण त्यागाचं अजोड (बेमिसाल) उदाहरण म्हणजे नायक सुधीर असा सिनेमाचा विषय होतो. तर 'तेरे मेरे सपने' (१९७१) या विजय आनंद दिग्दर्शित सिनेमाचा विषय शहरी आणि ग्रामीण वैद्यकीय सेवा असा असताना नंतर मात्र तो नायक देव आनंदच्या आयुष्यात आलेल्या दोन स्त्रिया-एक त्याची बायको (मुमताज) तर दुसरी अभिनेत्री (हेमामालिनी ) असा होतो. 

समांतर  सिनेमांच्या काळात १९८५ साली आलेला 'नासूर' हा सिनेमादेखील वैद्यकीय क्षेत्रातल्या बाजारीकरणावर बोट ठेवणारा होता.  या सिनेमाची लिंक-
तर १९९० आलेल्या 'एक डॉक्टर की मौत' या सिनेमात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन कार्याची पार्श्वभूमी  होती. अभिनेता पंकज कपूर ने यात डॉक्टरची भूमिका अगदी समरसून केली होती. 

२००३ साली आलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' ने आपला वेगळा ठसा उमटविला होता. वैद्यकीय क्षेत्रातील सद्य:स्थितीवर हसत-खेळात, चिमटे घेत, मार्मिक टिप्पणी  करणारा हा सिनेमा संस्मरणीय ठरतो. तऱ्हेतऱ्हेचे  फॉर्म भरण्याच्या सरकारी प्रक्रियेमध्ये अडकलेली हॉस्पटलची प्रशासकीय व्यवस्था, इथपासून ते आजकालचे डॉक्टर माणसाच्या शरीराच्या फक्त एक-एका अवयवाचे डॉक्टर होत आहेत पण ते holistic approachविसरत आहेत हे सांगणं, डॉक्टर त्यांची संवेदनशीलता विसरत आहेत का? यासारखे प्रश्न सिनेमा उपस्थित करतो. मुन्नाभाई( संजय दत्त ) आपल्या काहीशा उथळ पण तरीही परिणाम साधणाऱ्या पद्धतीने आनंदभाई, पारसी बावा, आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण यांना बरं करतो. तो फक्त त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करतो, त्यांना आवडेल अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतो-वागतो ! तसंच या सिनेमातून पुढे लोकप्रिय झालेली संकल्पना म्हणजे-'जादू की झप्पी' !यातून एक healing touch चं, ताण/राग विसरायला लावणाऱ्या आईच्या प्रेमाच्या जवळ जाणाऱ्या मिठीचं महत्त्व अधोरेखित होतं. सर्व आजारांवर हाच उपाय करणं हे फारच सुलभीकरण आहे हे अगदीच मान्य आहे. परंतु प्रेम, करुणा, पेशंटशी सन्मानाने वागणे, त्याच्या आदर राखणे  आणि स्पर्शाने पेशंटला बरं  वाटणे  या सगळ्यातही एक ताकद आहे हे नक्की! 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमा म्हटलं तर डॉक्टरांना आरसा दाखवणारा, त्यांच्या कर्तव्यांची त्यांना आठवण करून देणारा असा हलका-फुलका सिनेमा!

या सगळ्यांपेक्षा डॉक्टरची उल्लेखनीय व्यक्तिरेखा  एका सिनेमात होती. तो सिनेमा म्हणजे १९६० सालचा हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित-'अनुराधा'! सिनेमाच्या नावावरून हा नायिकाप्रधान सिनेमा आहे हे खरंच ! पण तरीही डॉक्टर निर्मलच्या भूमिकेत छाप पडून जातात ते नैसर्गिक अभिनय शैली असलेले बलराज साहनी ! अनुराधा सिनेमाचा नायक एक ध्येयवादी, खेड्यात राहून रुग्णसेवा करणारा डॉक्टर असतो. शहरात आलेला असताना त्याची सुप्रसिद्ध गायिका अनुराधाशी(लीला नायडू) शी पेशंट या नात्याने ओळख होते. अनुराधा श्रीमंत घरातली... दोघांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांचं लग्न होतं. लग्नानंतर पुढची दहा वर्षं शहरी आयुष्य सोडून अनुराधा डॉक्टर निर्मल बरोबर खेड्यात राहते. या काळात ती तिचं गाणं जवळपास विसरूनच जाते. खेडेगावातील रुग्णसेवा असल्यामुळे डॉक्टर निर्मलला पेशंटच्या उपचारार्थ वेळीअवेळी जावं लागतं. त्यामुळे त्याला घरी आणि विशेषतः अनुराधासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. 
एका योगायोगाने त्याच गावात एका गाडीला अपघात होतो आणि त्यात नेमका अनुराधाचा शहरातील मित्र दीपक (अभि भट्टाचार्य) आणि त्याची मैत्रीण असतात. हाच दीपक अनुराधाच्या गाण्याचा फॅन असतोच शिवाय त्याने तिला पूर्वी मागणीही घातलेली असते. गाडीच्या अपघातात मैत्रिणीच्या चेहऱ्याला मार बसतो आणि यावर डॉक्टर निर्मल तिथल्या उपलब्ध तुटपुंज्या सोईंमध्ये देखील यशस्वी प्लास्टिक सर्जरी करतो. मैत्रिणीचे वडील आणि त्यांचे डॉक्टर मित्र (नाझीर हुसेन ) तिला भेटायला तिथे येतात आणि डॉक्टरच्या कौशल्याने खूपच प्रभावित होतात. परंतु इकडे दीपकला दिसतं की अनुराधा या गावात राहून, आपलं गाणं विसरून गेली आहे आणि तिला अपेक्षित प्रेम मिळत नाही. कदाचित त्याच्या मनातील तिच्याविषयीच्या प्रेमाची भावना पुन्हा पल्लवित होते. म्हणूनच की काय तो तिला तिच्या हरवलेल्या संगीताची पुन्हा जाणीव करून देतो आणि तिने काय आणि किती गमावलं आहे हे सांगून तिला तिच्या वडिलांकडे परतायला सांगतो. अनुराधा तयार होते आणि तिचा निर्णय डॉक्टरला सांगते. त्याला तिचा निर्णय पटत नसला तरी तो समंजसपणे तो स्वीकारतो पण तिला आणखी एक दिवस थांबण्याची विनंती करतो. कारण त्याच रात्री त्यांच्या घरी नाझीर हुसेन त्यांची लॅब बघायला आणि जेवायला येणार असतात. लॅब बघण्याआधी नाझीर हुसेन आधी अनुराधाला भेटतात. तिथे धूळ खात पडलेली सतार  पाहून आणि अनुराधाच्या गाण्यातला  दर्द  जाणवून सारं काही त्यांच्या लक्षात येतं. कारण हे असंच पूर्वी त्यांच्याही आयुष्यात घडलेलं असतं. त्यांच्याकडून घडलेली चूक डॉक्टर निर्मल कडून घडू नये म्हणून  ते त्या दोघांमधला दुरावा मिटवतात आणि त्यांचं नातं सांधतात. डॉक्टरला ते याची जाणीव करून देतात की अनुराधा आपली आधीची स्वतंत्र ओळख विसरून केवळ एका डॉक्टरची पत्नी बनून राहिली आहे. 
 
 


तसं बघितलं तर अनुराधा आणि डॉक्टर निर्मल आपापल्या जागी दोघेही बरोबरच म्हटले पाहिजेत. पण डॉक्टर निर्मलला अनुराधाच्या समर्पणाच्या भावनेचा तितकासा अंदाज येत नाही कारण तो त्याच्या कामात पुरेपूर बुडून गेलेला असतो. डॉक्टरी व्यवसायामध्ये डॉक्टरच्या कुटुंबाला डॉक्टरकडूनच गृहीत धरले जाणे,व्यवसाय आणि कुटुंब यातील समतोल साधता न येणे (इच्छा असली तरी ) आणि यामुळे कुटुंबावर होणारा परिणाम यावर देखील सिनेमा प्रभावीपणे प्रकाश टाकतो. अशी गोष्ट तुमच्या-आमच्या आयुष्यात सहज घडू शकते आणि तिची मांडणी अगदी पटण्याजोगी करण्याचं श्रेय दिग्दर्शकाचं ! संपूर्ण सिनेमात एक साधेपणा आहे-कोणीही खलनायक नाही (अगदी अनुराधाचा मित्र दीपकसुद्धा!). डॉक्टरची भूमिका साकारणारे बालराज साहनी ती भूमिका अक्षरश: जगले आहेत. डॉक्टरचा आदर्शवाद आणि सच्चेपणा, त्याची कुटुंबाला वेळ देता न येण्याची अपरिहार्यता त्यांनी अतिशय समरसून व्यक्त केली आहे. सिनेमातली प्रसंगोचित आणि मधुर, श्रवणीय गाणी देखील सिनेमाची उंची अधिकच वाढवतात. 
(इथे मला माझ्याच अनुराधाच्या सांगीतिक प्रवासावर आधारित ब्लॉगची लिंक देण्याचा मोह आवरता येत नाही !- https://rajeshpusalkar.blogspot.com/2017/12/anuradha-is-movie-by-director.html ) 

हिंदी सिनेमांतील डॉक्टर या विषयाचा आवाका तसा मोठा आहे. ब्लॉग लिहिता लिहिता जाणवलं की आणखी काही लिहायला हवं होतं. माझा असा मुळीच दावा नाही की यात सगळ्याच सिनेमातील डॉक्टरच्या व्यक्तिरेखांवर मी लिहिलं आहे. माझ्याकडून काही सिनेमांचा उल्लेख करायचं राहून गेलं असेलच. शिवाय लिहिता लिहिता अशी जाणवलं की डॉक्टर आणि एकंदरीतच वैद्यकीय व्यवसाय याच्या वेगवेगळ्या पैलूंवर संवेदनशीलतेने आणखीही काही सिनेमे काढता येतील. गरज आहे ती 'अनुराधा' सारख्या चांगल्या कथेची आणि ती आपल्यासमोर मांडणाऱ्या चांगल्या दिग्दर्शकाचीही ! 
 











Friday, 24 June 2022

हिंदी सिनेमांमधील डॉक्टर ! (भाग १ )


('पर्याय' या बीकन फाऊंडेशन प्रकाशित होमिओपॅथीविषयक दिवाळी अंकात २०१० साली माझा हा लेख प्रसिद्ध झाला होता )


हिंदी सिनेमांचा ठराविक साचा असतो. म्हणजे पोलीस नेमके आणि नेहमी हिरोने हिरोगिरी केल्यावर सर्वात शेवटी येतात. आणि पोलीस सुद्धा ठराविकच असतात (किंवा असायचे) म्हणजे इफ्तेकार किंवा जगदीश राज वगैरे..वकिलांचे ही तेच.. 'तमाम गवाहों के मद्दे नजर' हे वाक्य म्हटल्याशिवाय सिनेमातला कुठलाही कोर्ट-सीन पूर्ण होत नाही. आणि पूर्वी जज साहेबांची भूमिका करणारे नट होते(सप्रू वगैरे) ते अगदी खर्जातल्या आवाजात केसचा निकाल द्यायचे. ..


तशाच प्रकारे डॉक्टरांच्या बाबतीतही हिंदी सिनेमात काही नियम आहेत-

१) डॉक्टर नेहमी पांढऱ्या एप्रन मध्ये दाखवले जातात. हल्ली कुठे हो कोणी असे एप्रन घालून असतात डॉक्टर?

२) पूर्वीच्या सिनेमात( मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे -पूर्वीच्या सिनेमात!) डॉक्टर चक्क होम-व्हिजीटला जायचे! हल्ली तसं होत नाही कारण सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. हल्ली डॉक्टरच फारसे व्हिजीटला जात नाहीत. म्हणून सिनेमातही तसं दाखवत नाहीत! असो. तर डॉक्टर घरी येऊन पेशंटला तपासतात आणि हे वाक्य हमखास म्हणतात- "घबराने की कोई बात नही ! वैसे मैने इंजेक्शन दे दिया है.. एक -दो दिन में बुखार ठीक हो जायेगा" वगैरे.

३) सिनेमाच्या कथेला एक निर्णायक वळण देण्यासाठीसुद्धा डॉक्टरांचा उपयोग होतो.म्हणजे डॉक्टर असं घोषित करतात की- 'ये अब कभी माँ नहीं  बन सकती!' आणि पुढचा संपूर्ण सिनेमा- मग हिरो कोणकोणते पर्याय निवडतो किंवा निवडत नाही, दोघांपैकी त्याग कोण करतं (खरं तर हे सांगायला पाहिजे का ? नायिका ही पतिव्रता आणि विशाल अंतःकरणाची असल्यामुळे नायकाने काहीही केलं तरी तिला चालतं !ती नायकाला उदार अंतःकरणाने माफच करते) -हे दाखवण्यात जातो.

४) असंच एक ठराविक वाक्य असतं- 'इनके दिल को कोई गहरी चोट पहुंची है/सदमा पहुंचा है' .. किंवा 'ये अपनी याददाश्त खो चुके है'..आणि मग पुढचा सिनेमा याच गोष्टींभोवती फिरतो.

५) कोणाचा तरी मृत्यू झाला आहे हे घोषित करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण केलं जातं ! खरं म्हणजे कित्येकदा डॉक्टर  हे घोषित करतही नाहीत. ते फक्त पेशंटचे डोळे बंद करतात आणि पेशंटवर पांढरी चादर घालतात. उदा- डॉन चित्रपटात अमिताभ बच्चन( विजय) DSP साहेबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो आणि तो डॉन नाही, तर विजय आहे असं परोपरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळचा माहोल अगदी बघण्यासारखा ! DSP साहेब (इफ्तेकार) असे बँडेज घालून बेडवर आडवे पडलेले, डोळे निर्विकार ! सलाईनच्या बाटल्या लावलेल्या. आजूबाजूला मात्र गावजत्रेसारखी गर्दी आणि यातच कुठेतरी मागे अंग आक्रसून डॉक्टर उभे! अमिताभ बोलतोय पण DSP साहेबांची नजर शून्यात आणि मग अचानक डॉक्टर पुढे येतात आणि DSP साहेबांचे डोळे बंद करतात आणि चादर टाकतात. म्हणजे ते आधीच गेले होते का? आणि नव्हते गेले तर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न वगैरे? काही नाही! 

६) आपल्याकडे भुता-खेतांचं कथानक असलेले काही सिनेमे निघाले आहेत. अशा सिनेमात डॉक्टरचं पात्र नेहमी विज्ञान-निष्ठ दाखवलं जातं. भूत वगैरे सगळं थोतांड आहे असं डॉक्टर सुरुवातीला म्हणतो पण नंतर मात्र अशा काही गोष्टी घडतात की त्यामुळे डॉक्टरची बोलतीच बंद होते आणि त्याला या अशा गोष्टी असतात यावर विश्वास ठेवावा लागतो. याला अलीकडच्या काळातला अपवाद म्हणजे भुलभुलैय्या हा सिनेमा! यात अक्षयकुमार (जो Psychiatrist असतो !) तो बाकी सर्व काही करतोच( म्हणजे नाच-गाणी, छेडछाड इ ) पण शेवटी विद्या बालन च्या psychic वागण्याची केस सोडवतो आणि भूत नाही हे सिद्ध करतो ! 


हिंदी सिनेमांत (वकील/पोलीस या भूमिकांप्रमाणे) डॉक्टरची भूमिका काही मोजक्या लोकांनीच केली असं मात्र नाही. किंबहुना ती खूप जणांनी करून पाहिली. उदा- बलराज साहनी (अनुराधा), देव आनंद (तेरे मेरे सपने), धर्मेंद्र ( बंदिनी) सुनील दत्त (आज और कल), राजेंद्रकुमार (दिल एक मंदिर ) यांच्यापासून अमिताभ बच्चन (आनंद),जितेंद्र(खुशबू) विनोद मेहरा(बेमिसाल),पंकज कपूर (एक डॉक्टर की मौत ) ... 
ते आजकालच्या काळात संजय दत्त (मुन्नाभाई एमबीबीएस) अक्षयकुमार (भुलभुलैय्या) ते अगदी रितेश देशमुख (हो.. हो .. मस्ती सिनेमात) पर्यंत नायकांनी तर शर्मिला टागोर( सफर), राखी(काला पत्थर) स्मिता पाटील (दर्द का रिश्ता) सोनाली बेंद्रे ( कल हो न हो ) राणी मुखर्जी (साथिया), प्रीती झिंटा (अरमान) ग्रेसी सिंह(मुन्नाभाई) करीना कपूर (3 Idiots) या सारख्या नायिकांनी डॉक्टरच्या भूमिका केल्या आहेत .

हिंदी सिनेमांनी वैद्यकशास्त्राला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आव्हानही दिलं. यापैकी आपल्या सगळ्यांनाच 'अमर अकबर अँथनी' चं उदाहरण चांगलंच  माहित आहे. पण अशाच प्रकारची आणखीही काही उदाहरणं आहेत..

१) ऋषी कपूर- पूनम धिल्लन -टीना मुनीम यांचा एक सिनेमा होता- 'ये वादा रहा'. त्यात पूनम धिल्लनचा अपघात होऊन तिचा चेहरा विद्रुप होतो. त्याची प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर शम्मी कपूर महानच  म्हटले पाहिजेत! 

कारण या सर्जरी नंतर पूनम धिल्लनचे रुपांतर टीना मुनीम मध्ये होते. सर्जरी चेहऱ्याची पण त्याचे परिणाम एवढ्यावरच थांबत नाहीत. टीना मुनीम दाखवायची होती तर तिला आवाज तरी पूनम धिल्लनचा द्यावा ना? पण ते नाही. तिला आवाज होता जया भादुरीचा ! एका शस्त्रक्रियेमुळे काय काय होऊ शकते !

२) राकेश रोशन दिग्दर्शित सिनेमा -'खून भरी मांग' ! यातही प्लास्टिक सर्जरी आहेच, व्हिलनने नायिकेला न ओळखणं आहेच.. पण इथे मुद्दा तो नाही. यात कादरखान आणि शुभा खोटे अशी जोडी दाखवली आहे. लहानपणी कुत्रा चावल्यामुळे म्हणे शुभा खोटे यांचा आवाज पुरुषी होतो ! कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं ते किती याचा कळस अजून पुढेच आहे. याच शुभा खोटेला कादरखान चावतो आणि मग तिचा आवाज तिला पुन्हा मिळतो! विनोदाची पातळी किती खाली जावी याला काही सुमारच नाही!


३) अशा न पटणाऱ्या गोष्टींची मालिका फक्त जुन्या सिनेमातच होती असं नाही. बहुचर्चित आणि बॉक्स ऑफिसचे बरेच रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या '3 Idiots' या सिनेमाचा एक महत्त्वाचा प्रसंग आठवून पहा... त्यात इंजिनिअर लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हिरॉईन (करिना कपूर, जी सिनेमात स्वतः डॉक्टर आहे !) च्या बहिणीची यशस्वीरीत्या प्रसूती करतात, तेही अस्वच्छ vacuum cleanerचा वापर करून ! धन्य ते इंजिनिअर ! त्यांना जगात असाध्य असं काहीच नाही! (नाहीतरी सध्या वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा इतका प्रभाव आहि की एक काळ असा येईल जेव्हा डॉक्टर असण्या-नसण्याने काहीच फरक पडणार नाही. तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलं की झालं !) ... का धान्य तो आमिर खान असं म्हणावं? रँचो चा आलेख मोठा करण्यासाठी केवढा तो खटाटोप? या संपूर्ण प्रसंगात दिग्दर्शकाचा gender bias दिसतो. सिनेमात हिरोईन डॉक्टर असली तरी या सगळ्या प्रसंगात तिची दुय्यम भूमिकाच आहे ! ती हिरोपेक्षा मोठी होऊन कसं चालेल ? 

पण हिंदी सिनेमात डॉक्टर एक सशक्त कॅरॅक्टर म्हणूही दिसून आले. प्रसंगी छोट्या भूमिकेतून देखील आपले ठळक अस्तित्व अधोरेखित करून गेले. अशा काही भूमिकांचा धावता आढावा पुढील ब्लॉग मध्ये... 
                                                                                                            (क्रमश:) 



Thursday, 2 June 2022

सायकलिंग करता करता... (भाग ४)

सायकलिंग करता करता झाडं बघण्याच्या या सिलसिल्यामध्ये काही अविस्मरणीय क्षण अनुभवले. मॅग्नोलिया चे वर्णन श्री. इंगळहळ्ळीकरांच्या लेखमालेत वाचणे, त्यानंतर ते झाड शोधून काढणे आणि त्याचा फोटो घेणे याविषयी आधीच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहेच.तो सगळाच अनुभव विलक्षण होता! असंच आणखी एक फूल अनपेक्षितपणे  बघायला  मिळालं आणि ज्याला सध्याच्या भाषेत WOW moment म्हणता येईल असा अपूर्व आनंद मिळाला ज्यावरून वाटलं की आपण ही सायकलिंग आणि झाडं बघण्याची सांगड घातली ती सार्थकी लागली ! 

१२) असाच आघारकर संस्थेवरून जात होतो. संस्थेच्या बरोबर समोरच्या बंगल्यात एक झाड फुलांनी लगडलेलं बघितलं. साधारण १०-१२ फूट उंचीचं झाड होतं. मोठ्या पांढऱ्या शुभ्र  पाकळ्या असलेली, मध्यभागी पिवळी असलेली  फुलं ! फुलांचा मनमोहक वास आणि त्यावर स्वर होऊन त्या फुलांवर जमलेल्या मधमाश्या! 

हे इतकं सुंदर दृश्य होतं पण आजूबाजूच्या कोणालाही ते बघण्यात फारसा रस नव्हता. फक्त मी तिथे का थांबलोय एवढं मात्र त्यांना बघायचं होतं !मला त्यांना सांगावंसं वाटत होतं - बघा हे नयनरम्य फूल आणि त्याचा सुवास अनुभव! एखाद्या मंद अत्तरासारखा तो वास त्या झाडाच्या आजुबाजूला भरून राहिलेला होता. मला तो वास काही पकडणं शक्य नव्हतंच !फुलांचे तेवढे फोटो काढले! झाड जरी बंगल्याच्या आत होतं तरी त्याच्या फांद्या बंगल्याबाहेर, फूटपाथवर  होत्या. त्यामुळे कोणाचीही परवानगी न घेता फोटो काढणं शक्य होतं ! म्हणून एका पाठोपाठ फोटो काढत सुटलो! 

 
 
 

                                              
                                                                                 
         
          

नंतर शोध घेतला असता कळलं की या झाडाचं/ फुलाचं नाव  Fried Egg Tree आहे. नाव देणाऱ्याने पण किती कल्पकतेने हे नाव ठेवलं आहे! मी हे मार्चमध्ये काढलेले फोटो आहेत. त्यानंतर तिकडे गेलो नाही. त्यामुळे आता झाडाला फुलं आहेत की नाही हे माहीत नाही. पण लोक जसे दरवर्षी भक्तिभावाने वारीला जातात तसा संकल्प मी या झाडाच्या बाबतीत सोडला आहे- दरवर्षी या झाडाला बघायला जायचंच! इतका या फुलांच्या मी प्रेमात पडलो आहे! 
 
 


Fried Egg Tree ( Oncoba spinosa) बद्दल अधिक माहिती -
 


१३) कैलासपती/Cannonball Tree( Couroupita guianensis)-
राजाराम पुलाकडून डीपी रोडने दीनानाथ हॉस्पिटल कडे जाताना त्या गल्लीच्या अलीकडेच लालबहादूर शास्त्री सोसायटी आहे. (सोसायटी जुनीच असावी पण मला मात्र ती आत्ताच लक्षात आली!) त्या सोसायटीच्या आवारात कैलासपतीचे दोन उंचच्या उंच  वृक्ष आहेत. त्या वृक्षांवर लांबून बघितलं  तर एखाद्या अजस्त्र सापाने विळखा घातल्यासारखी फुलं दिसत होती. पण जवळ गेलो तर एकदम वेगळंच दृश्य दिसलं ! आपल्याकडच्या मंदिरांमध्ये जशा मोठ्या दीपमाळा दिसतात तशाप्रकारे एकावर एक फुलं रचून हेवल्यासारखी दिसत होती. याही फुलांचा मंद दरवळ होता. 
 
 
 

पण एवढी सुंदर फुलं असलेल्या या झाडाला इंग्रजीत Cannonball tree का म्हणत असावेत? याचं उत्तर पुढेच असलेल्या ताथवडे उद्यानामध्ये असलेल्या कैलासपटीच्या झाडामध्ये सापडलं ! तिथल्या झाडाला तोफगोळ्यांसारखी फळं लागली होती !
 
 

फुलं सुगंधी असली तरी फळांना मात्र अतिशय उग्र वास असतो म्हणे!

कैलासपती विषयी अधिक माहिती-


१४) Sausage Tree (Kigelia pinnata)-
सायकलिंगसाठी डीपी रोड एकदम मस्त रस्ता आहे. सकाळच्या वेळी फारशी गर्दी नसते... दुतर्फ़ा झाडी आणि रस्त्यात काही खड्डे नाहीत, स्पीडब्रेकर नाहीत... त्यामुळे एका ठराविक वेगाने आपण सहज जाऊ शकतो.. याच रस्त्यावर दोन-तीन झाडांना चॉकलेटी रंगांच्या मोठमोठ्या काकड्या/ दुधी भोपळ्यासारखी फळं लागलेली दिसली. तज्ज्ञांना विचारल्यावर याचं नाव कळलं . झाडाला फुलं फारशी राहिली नव्हती. नाही म्हणायला एक फूल फूटपाथवर पडलं होतं . 
  

 

Sausage Tree बद्दल अधिक माहिती -
 
१५) उंदीरमारी ( Gliricidia) -
याच डीपी  रोडवर मला हे fencing साठी वापरलं जाणारं उंदीरमारीचं बहरलेलं झाड दिसलं- 

 
Gliricidia बद्दल अधिक माहिती-
 

१६) शमी (Prosopis cineraria) 
श्री. इंगळहळ्ळीकरांच्या लेखमालेत हे झाड नेने घाटाजवळ गुपचूप गणपतीच्या देवळात आहे असं म्हटलं होतं. पण तिथे गेलो तर कळलं की आता ते झाड तिथे नाही. ते झाड वठलं. लेखमालेत हाती त्यापैकी बरीचशी झाडं मला बघायला मिळाली. (एक झाड 'लकाकि' या किर्लोस्करांच्या बंगल्यात होतं त्यामुळे ते बघायला मिळण्याचा काही प्रश्न नव्हता !) पण शमीचं  असं एकच  झाड होतं  की ते सांगितलेल्या ठिकाणी नव्हतं. त्यामुळे माझा थोडा हिरमोडच झाला. परंतु माझ्या काही सुहृदांकडून माहिती मिळाली की शमीचं झाड तर नारायण पेठेतल्या मोदी गणपती मंदिरात पण आहे. तो ही माझा नेहमीचा जाण्या येण्याचा रस्ता आहे. मग एक दिवस गेलो तिथे आणि माझा शक्यतो सायकलवरूनच फोटो काढायचा शिरस्ता मोडून देवळात जाऊन फोटो काढले. यामध्ये मला शमीच्या फुलाचाही फोटो काढता आला-


 

शमी विषयी अधिक माहिती- 

१७) या झाडांचे फोटो Whatsapp status वर ठेवत होतो त्याचा चांगला परिणाम झाला. फोटो बघणाऱ्यांमध्ये झाडं बघण्याचं कुतूहल निर्माण झालं. काही जण मुद्दाम जाऊन झाडं बघून आले. काहींनी झाडांविषयीचे त्यांचे अनुभव, एखाद्या झाडाविषयी अधिक माहिती देणं हे देखील केलं. त्यामुळे एक प्रकारचा निकोप संवाद निर्माण झाला. अशाच प्रकारे माझे स्नेही श्री. अविनाश पाषाणकर यांनी मला एका झाडाचा फोटो काढून पाठवला. मग ते झाड बघायला मी फर्ग्युसन कॉलेजसम्रोरच्या गल्लीत गेलो(अर्थातच सायकलने!) आणि त्याचे फोटो काढले. नंतर तज्ज्ञाकडून माहिती घेतल्यावर  कळलं की ते करंजाचं झाड आहे (Pongamia/Millettia pinnata)-
  
 
 
करंज विषयी अधिक माहिती-
 

१८) इंग्रजीत म्हणतात -All good things have to come to an end! -तसं माझी ही मालिका जशी न ठरवता सुरू  झाली तशीच ती न ठरवता अपरिहार्यपणे बंदही करावी लागली! पण मला स्वतः ला ही मालिका खूप आनंद देऊन गेली. कितीतरी झाडं मला शोधता आली. त्याविषयी वाचता आलं. फोटो काढता आले. झाडांविषयी अनेकांशी बोलता आलं. एक सकारात्मक ऊर्जा यातून मिळाली. माझा असा मुळीच दावा नाही की पुण्यातील सगळी झाडं मला यातून नोंदता आली . पण तसा माझा उद्देशही नव्हता. मुख्य उद्देश सायकलिंग करणे हाच होता. यावर्षी ही झाडं बघितली. कदाचित पुढच्या वर्षी आणखी काही बघायला मिळतील ! पण सायकलिंग करता करता मला हा खजिना सापडला !आणखी काय पाहिजे! जिंदगी गुलजार है !
शेवटचं झाड टिळक रोडला बाजीराव रोडच्या सुरवातीला अभिनव कॉलेजच्या चौकात बघायला मिळालं. याला African Baobab किंवा गोरखचिंच म्हणतात. याच झाडाला Tree of life असंही म्हणतात . आफ्रिकेतील वाळवंटात हे झाड म्हणजे जगण्याचा आधारच कारण या झाडाच्या उदरात असतं जीवनामृत-पाणी! तेव्हा हे झाड बघून शुष्क वाळवंटात भटकणाऱ्या, पाण्यासाठी आसुसलेल्या थकल्या भागल्या जीवांची जीवनेच्छा बळावते !म्हणून हे झाड  जीवनदायी आणि आशादायी सुद्धा !

 
 
Flower of Baobab tree 



गोरखचिंच विषयी अधिक माहिती-
   
इंटरनेटवर African Baobab वर एक चांगली कविता मिळाली-

         

                                                                                                                                            (क्रमशः) 














Wednesday, 1 June 2022

सायकलिंग करता करता... (भाग ३)

आपल्याकडील प्रत्येक ऋतूचं एक वेगळं सौंदर्य आहे. पण तरीही सगळ्यात सुंदर ऋतू कुठला असं मला कोणी विचारलं तर मी वसंत ऋतूचंच नाव घेईन! निसर्ग या ऋतूमध्ये जेवढी मुक्त हस्ते रंगांची उधळण करतो तेवढी इतर ऋतूंमध्ये बघायला मिळत नाही. पूर्वीच्या काळचे सिनेमे ब्लॅक अँड व्हाईट होते. कालांतराने त्यात रंगांचा शिरकाव झाला. काही सिनेमे असेही होते की त्यात एखादंच गाणं रंगीत असे तर बाकीचा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट असायचा. त्या एका रंगीत गाण्याने तो संपूर्ण सिनेमा एक सौंदर्याचं लेणं होऊन जायचा इतकं ते गाणं सिनेमात उठून दिसायचं ! निसर्ग जर क्षणभरापुरता आपण ब्लॅक अँड व्हाईट धरला ( तितकाही तो मोनोक्रोमॅटिक नसतो हे मला मान्यच आहे. पण फरक समजण्यासाठी आपण क्षणभर तसं गृहीत धरू) तर वसंत ऋतू 'मुघल ए आजम' मधल्या त्या 'जब प्यार किया तो डरना क्या' या गाण्यासारखा आहे! फाल्गुन-चैत्र-वैशाख या उन्हाच्या वाढत्या दाहकतेचे चटके बसू लागत असताना निसर्गाची ही  रंगांची किमया डोळ्यांना सुखावणारी असते. 

खरं तर या  झाडं/फुलांचा या ब्लॉगमध्ये समावेश करावा  की नाही याबाबत माझी द्विधा मनस्थिती झाली होती. कारण या झाडांचे फोटो समाजमाध्यमांवर आणि वर्तमानपत्रांत सगळीकडेच दिसत होते.  पण या झाडांचा समावेश न करणं हे माझ्या अरसिकतेचं लक्षण मानलं गेलं असतं ! म्हणून मग एक छोटा ब्लॉग यासाठी केला आहे-

९) बहावा /अमलताश (Golden Shower tree, Laburnum ) Cassia fistula-


कुठल्याही सणावाराला, विशेषतः दिवाळीला आपल्याकडे इमारती कात टाकतात. त्यांचं रंग-रूप बदलतं. कित्येक इमारतींवर दिव्यांची रोषणाई केली जाते. वसंतऋतू हा बहावासाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतोच! त्यामुळे हे झाड या दिवसांमध्ये नटून-थटून खुलून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभं राहतं. इतकं की या दिवसांत या झाडांना पानं कमी पण सगळीकडे नुसती फुलंच दिसतात. बहाव्याचे सोनेरी  पिवळ्या रंगाचे घोस बघून असं वाटत की एकाच झाडावर अनेक आकाशकंदील लटकले आहेत वा फुलांची झुंबरं टांगली आहेत.( आम्ही कान्हाच्या जंगलात ही फुलं पाहिली होती तेव्हा तिथल्या गाईडने या फुलांचं -'अमलताश के झूमर'  असं सुरेख  वर्णन केलं होतं !) पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा झुंबरांचा महोत्सव भरला होता. मी तो मेहेंदळे गॅरेज ते नळ स्टॉप या दोन चौकांमधल्या रस्ता दुभाजकावर लावलेल्या बहाव्याच्या झाडांवर मनभरून पाहिला. कित्येकदा तो माझा सायकलिंगचा नेहमीचा  रस्ता नसला तरीसुद्धा मुद्दाम झाडांची ही दिलखेचक अदा बघायला मी वाकडी वाट करून तिकडे जात असे. असं म्हणतात की बहावा फुलल्यानंतर साधारण पुढील दोन महिन्यांत पावसाचे आगमन होते. मार्चमध्येच फुलून बहावाने हवामान खात्याच्या आधीच पावसाचे शुभ वर्तमान कळवले आणि  थोडासा उन्हाळा सुसह्य केला म्हणायचे!


 

 या फुलांकडे बघून एकच इंग्रजी शब्द सुचतो -flamboyance !याला तितकस समर्पक शब्द मराठीत मला तरी माहीत नाही. 

बहावाविषयी अधिक माहिती-


१०) नीलमोहर ( Jacaranda mimosifolia) -  हे ही झाड पूर्णतः फुलांनी बहरलेलं बघायला मिळतं. याचा निळसर जांभळा रंग वेगळा वाटतो पण तो बहावासारखा चित्तवेधक नाही. कदाचित इतर झाडांमध्ये हे झाड लपूनसुद्धा जाईल आणि त्यामुळे सहजासहजी लक्षात देखील येणार नाही. मला याची झाडं गोळीबार मैदान सिग्नलच्या अलीकडच्या चौकात (लुल्लानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर) तसंच कॅम्पमधून कौन्सिल हॉल कडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसली. 
 



नीलमोहर झाडावर कविवर्य वसंत बापट यांची एक सुंदर कविता आहे. त्या कवितेची यु ट्यूब लिंक देत आहे-

नीलमोहरविषयी अधिक माहिती -
 

११) टॅबेबुइया (Tabebuia) 
या वर्षी टॅबेबुइया या झाडांच्या फुलांनी बहावाच्या फुलांशी  स्पर्धा केली आणि दोघांमधली लढत अतिशय 'रंगतदार' झाली असं म्हटलं पाहिजे. पूर्वीही या झाडांचा बहर  होता पण या वर्षी का कोण जाणे ही झाडं डोळ्यांत भरली. अगदी show stopper जरी झाली नसली तरी ती eye catcher नक्कीच होती. Whatsapp  वर देखील या फुलांचे बरेच फोटो या वर्षी शेअर केले गेले. यातले बहुतांश फोटो Tabebuia rosea (गुलाबी रंगांची फुलं ) या झाडांचे होते. पण याच झाडांचे पुण्यात मी तीन प्रकार पाहिले. ( आणखीही असतील तर मला माहीत नाही ) 

Tabebuia aurea ( पिवळ्या रंगांची फुलं )- हे झाड मी बी जे मेडिकल कॉलेजच्या आवारात पाहिलं -

 


Tabebuia pallida (पांढऱ्या रंगाची फुलं )- 
हे झाड आघारकर संस्थेच्या अगदी दारातच आहे-
 
 

 आणि हे जागोजागी दिसलेलं गुलाबी फुलांचा गालिचा पांघरलेलं Tabebuia rosea- 

 

 



टॅबेबुइया विषयी अधिक माहिती-


                                                                                                                                                (क्रमश:)