१
आपल्या दिनक्रमाचा एक अविभाज्य भाग असल्यासारखा दररोज उठून मी विठ्ठलवाडी मंदिराजवळील नदीकाठी जाऊ लागलो (अजूनही जात आहे) घरून निघून साधारण ३०-३५ मिनिटांत ७-८ किलोमीटर सायकल चालवायची... विठ्ठलवाडी देवळाजवळ वडाचं झाड आहे तिथे रेलिंगला सायकल लावायची आणि अर्धा तास पक्षीनिरीक्षण केल्यावर कितीही काही चांगलं दिसत असलं तरी तिथून काढता पाय घ्यायचा आणि परत साधारण ८-९ किलोमीटर सायकल चालवून घरी असा दीड तासाचा माझा रोजचा कार्यक्रम असतो. पक्षीनिरीक्षण करताना अर्थातच फक्त पक्षी बघितले जात नाहीत. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीही टिपल्या जातात. अशाच काही गोष्टींच्या या नोंदी -मला तर या अनुभवांनंतर मनोज बोरगावकर लिखित 'नदीष्ट' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली!
अ ) सकाळच्या वेळी शाळा-कॉलेजमधील बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी घोळक्याने दिसतात. कधी कधी घोळका मुलामुलींचा असतो तर कधी फक्त मुलांचा . जेव्हा फक्त मुलांचा असायचा तेव्हा ही मुलं स्मशानभूमीच्या खाली आडोसा आहे तिथे जायची आणि सिगारेट ओढायची. दहावी किंवा फारतर अकरावी बारावी च्या वयाची ही मुलं असतात. मुलामुलींच्या घोळक्यात नेहमीचे हसणं -खिदळणं, पोरीबाळींवर इम्प्रेशन मारणं प्रकार चालतात. मला या कशाबद्दलच काहीच म्हणायचं नाही. फक्त एवढं जाणवलं की हल्लीच्या मुलांची भाषा खूपच बदलली आहे. प्रत्येक वाक्याच्या सुरवातीला आणि अध्येमध्ये शिव्यांची मनमुराद पेरणी आणि यावर मुलींनाही फारसं काही वाटत नाही हे विशेष!
आ ) एक वयस्कर माणूस ... अर्धांगवायूच्या झटक्यामुळे डाव्या हात आणि पायावर परिणाम झालेला... तरीही नित्यनेमाने रोज सकाळी हे गृहस्थ फिरायला येतात. एका हातात काठी असली तरी झाडावरची फुलं वेचतात आणि वादाच्या झाडाखाली असलेल्या शंकराच्या पिंडीवर ती पद्धतशीरपणे वाहतात. स्वतः च्या आजारपणापलीकडे जाऊन त्यांचा उत्साह आणि त्यांचं सातत्य याचं मला फार नवल वाटतं.
इ) आणखी एक वयस्कर व्यक्ती... काळा सावळा वर्ण... पांढरा सदरा, पांढरा ढगळ पायजमा, पांढरी टोपी ...असा पेहराव ! स्मशानभूमी आणि मंदिर परिसर झाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांबरोबर यांच्या कायम गप्पा ...कधी हे पण तिथला कचरा जाळतात... चेहऱ्यावर कायम गंभीर भाव.. चेहऱ्यावरील सुरकुत्या जणू आयुष्यात खूप काही सोसल्याच्या खुणा असाव्यात ! कोणी बोलायला नसलं तर हे एकटेच नदीकाठी बसतात..विडी शिलगावतात आणि शून्यात बघत राहतात...बरेच वेळा या नदीच्या पात्रात ते आंघोळही करतात ! आम्ही एकमेकांना रोज बघत असल्यामुळे हळूहळू ते ओळख दाखवू लागले आणि कोणी माझा अवतार बघून (डोक्यावर हेल्मेट, गळ्यात कॅमेरा इ ) त्यांना माझ्याबद्दल विचारले तर -काही नाही हितं येऊन फोटो काढित्यात.. असं उत्तर द्यायचे. एक दिवस ते नदी पात्रात उतरलेले असताना मला हाक मारून त्यांनी बोलावले आणि काहीतरी दाखवतो असं म्हणाले. मी त्या पात्रात उतरणं शक्यच नव्हतं (याचं मुख्य कारण म्हणजे मला पोहता येत नाही !) मग जितक्या जवळ जात येईल तेवढ्या जवळ गेल्यावर त्यांनी मला हे दाखवलं-
River Turtle |
... हे चक्क जिवंत होतं.. माझी फोटोग्राफीची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला हे दाखवलं आणि नंतर त्याला पाण्यात सोडलं. दुसऱ्या दिवशी मला मुद्दाम भेटून त्यांनी सांगितलं की त्यांनी महापालिकेला या कासवांबद्दल कळवलं आणि ते लोक येऊन त्याला घेऊन गेले आणि आता ते कात्रजच्या प्राणी संग्रहालयात आहे. कासव पाळणं अथवा पकडून खाणं हा गुन्हा आहे ना ...म्हणून त्यांनी महापालिकेला कळवलं ! मला त्यांच्या या कृतीने खूप बरं वाटलं. यानंतर तर आम्ही नेहमीच एकमेकांना रामराम करू लागलो ... एकदा तर त्यांनी आपणहून मला सांगितलं -पायऱ्यांवरून हळू उतरा...लईच मुरूम हाय !
ई ) आणखी एक वृद्ध ...वय ७५ च्या आसपास असावे.. दररोज बजाज M 80 ने येतात. पायऱ्या उतरून शंकराच्या देवळाच्या मागच्या कठड्यावर बसतात आणि प्राणायाम वगैरे करतात...नंतर जोरजोरात टाळ्या वाजवतात. आधीच या परिसरात इतके आवाज- कुठे इथल्या कारखान्यांमधल्या मशीनचे...कुठे बिल्डिंगच्या बांधकामाचे तर कुठे रस्ता रुंदीकरणाचे ! यात भरीतभर यांच्या टाळ्यांचा आवाज ! मी मनोमन वैतागून जायचो... पण अर्थात ही जागा माझी नाहीच...इथे त्यांनाही येऊन व्यायाम करायचा हक्क आहेच. नंतर नंतर तेही बोलू लागले...कधी मला उशीर झाला तर -आज उशीर झाला असं विचारत.... व्यायाम करून परतताना पायऱ्या चढल्यावर त्यांना अक्षरश: धाप लागायची... मग म्हणायचे- आताशा त्रास होतो इथे यायचा... वय झालं आता... पण काय करणार ! या जागेसारखी दुसरी शांत जागा कुठे शोधूनही सापडणार नाही! इथलं निसर्गसौंदर्य अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही ! एवढ्या गोंगाटात आणि नदीपात्राच्या दुर्गंधीयुक्त डबक्यात देखील शांतता आणि निसर्गसौंदर्य ते अनुभवू शकत होते याचं मला खरंच कौतुक वाटलं. कारण या जागेत खरंच काहीतरी आहे जे आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे घेऊन येतं..
उ ) हे गृहस्थ पोशाखात... डाय केलेले केस... नेहमी फुल हाताचा शर्ट.. कडक इस्त्रीची पॅन्ट... पॅन्टच्या बेल्टच्या बकलला मोबाईल फोनची केस... जाड भिंगाचा चष्मा...कायम मंद अत्तराचा वास ही त्यांची ओळखच जणू.. साधारण ५५-६० वय असावं... यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक टायमिंग! दररोज सकाळी एका ठराविक वेळी एक माणूस शंकराचं देऊळ उघडून तिथे फुलं वाहतो... एरवी देवळाला कुलूप असतं. हे गृहस्थ बरोबर देवळाचा दरवाजा उघडताना वरूनच देवाचं दर्शन घेतात आणि लांबूनच नमस्कार करतात ! हे देखील हळूहळू ओळख देऊ लागले... यांनी मला एकदा एक निरागस प्रश्न विचारला- मी तुम्हाला रोज बघतो...तुम्ही इथे रोज येता ..मी बघतो तुम्हाला... मला एक प्रश्न विचारायचा आहे- तुम्ही एवढे फोटो काढता...पण त्याचं पुढे काय करता? म्हणजे याचा उपयोग काय ? ! आता याला काय उत्तर देणार ?
Spotted Owlet |
(क्रमश:)
No comments:
Post a Comment