Saturday 3 June 2023

'प्रिय भाई...एक कविता हवी आहे'- समृद्ध करणारा एक तरल अनुभव!



'प्रिय भाई...' बद्दल याआधी मला फारशी काही माहिती नव्हती. त्यामुळे माझी पाटी कोरी होती. म्हणूनच कदाचित मी या अभिवाचनाचं स्वरूप असलेल्या नाटकाचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकलो. 
मला यातलं सगळ्यात काय आवडलं असेल तर सर्व कलाकारांनी केलेली वातावरण निर्मिती! मग ते भित्तीपत्रकाबाबतची संपादक मंडळाची बैठक असो वा पुलं -सुनीताबाईंचं 'मालती माधव' मधील घर! गुरूदेव टागोर यांच्या कवितेचा शोध इतका जिवंत झाला की मला वाटलं की आपणही धनश्रीच्या मागे उभे राहून पुलं आणि सुनीताबाईंची कविता शोधायची लगबग अनुभवतोय! कवितांच्या पुस्तकांनी श्रीमंत असलेल्या या घरात खरं तर मला त्या मदतनीस गोविंदा होऊन राहायलाही आवडले असते! त्यात हे घर म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पुलंचे! या वातावरण निर्मिती मध्ये दिग्दर्शकाचा attention to detail लक्षात येतो जेव्हा पुलंचे आवडते मल्लिकार्जुन मन्सूर यांचा (?भूप ) जयदीप वैद्य ऐकवतात! एक अद्भुत माहोल निर्माण होतो आणि आपणही ती एक कविता शोधता शोधता इतर अनेक कवितांची सौंदर्य लेणी अनुभवत जातो. 
पुलंना केवळ एक विनोदी लेखक म्हणणं हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा खरं तर अपमान करण्यासारखेच आहे! पुलं आणि सुनीताबाईंचं कवितेवरचं प्रेम हाही दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आणि दोघांनाही बांधणारा एक समान धागा! दोघांनीही या कविता प्रेमापोटी कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम केले. दुर्दैवाने मला ते बघायला मिळाले नाहीत. पण आमच्याकडे त्यांच्या अशाच एका कार्यक्रमाची कॅसेट आहे त्याचीही काल आठवण झाली. आणि ही कॅसेट आमच्या आईने आणली होती कारण तिने हा कविता वाचनाचा कार्यक्रम बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम ऐकलं होता. कविता सादर करण्याची दोघांचीही शैली इतकी विलक्षण आहे की त्यातून या कविता आपल्या अगदी  आत पर्यंत पोचतात! पुलं आणि सुनीताबाईंच्या गुणग्राहकतेमुळे महाराष्ट्राला केवळ कुमार गंधर्व - भीमसेन जोशी -वसंतराव देशपांडे - मल्लिकार्जुन मन्सूर - हे गायकच कळले असं नव्हे तर बा भ बोरकर, मर्ढेकर, खानोलकर (आरती प्रभू), संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांसारखे कवी देखील जास्त चांगल्याप्रकारे समजले! पुलं आणि सुनीताबाईंना या कवींच्या कवितांंनी जो आनंद दिला असेल तो त्यांनी अशा कार्यक्रमांद्वारे लोकांपर्यंत त्यांच्या सहजसुंदर अनौपचारिक शैलीत पोचवला हे त्यांचं महाराष्ट्रावरचं ऋणच आहे खरंतर! 
या दोघांचं कवितेवर फक्त प्रेम होतं असं नाही तर त्यांची कवितेच्या प्रति असलेली निष्ठा आणि बांधिलकी देखील त्या दोघांना एक कविता शोधण्यासाठी आणि ती मिळेपर्यंत यात भाग घ्यायला प्रवृत्त करते. आणि म्हणूनच सुनीताबाई जरी त्याबाबतीत थोड्या साशंक होत्या तरी पुलं म्हणतात-पुढील काळात कविता टिकेल!
टागोरांची  ती कविता शोधता शोधता अनेक कवितांशी जोडल्या गेलेल्या आठवणींची, कवींशी जुळलेल्या ऋणानुबंधाची एक लडीच उलगडत जाते आणि आपण प्रेक्षक म्हणून या प्रवासाचा भाग होतो आणि आपल्याला वाटतं की काय समृद्ध आयुष्य जगले हे लोक! 
लेखक(डॉ समीर कुलकर्णी ) -दिग्दर्शक(अमित वझे ) यांची आणखी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे पुलं या सर्व घटनेत असले तरी त्यांची भूमिका कोणीही साकारलेली नाही. शिवाय पुलंनी संगीतबद्ध केलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या गाण्यांची प्रयोग भर असलेली पखरण! यातून पुलंचं लोभस अस्तित्व जाणवत राहतंच ! साधारणपणे ज्यांचं वय ५० किंवा त्यापेक्षा जास्त आहे  त्या  प्रत्येकाच्या मनात पुलंविषयी एक  हळवा कोपरा निश्चितच आहे. महाराष्ट्रातल्या २-३ पिढ्यांना समृद्ध करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर, प्रेम असलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांना नॉस्टॅलजिक वाटलं असणार. आणि म्हणूनच की काय  संपूर्ण सभागृह 'कौसल्येचा राम बाई',  'ही कुणी छेडिली तार' किंवा 'शब्दावाचून कळले सारे' गुणगुणत होते! हा अनुभव देखील रोमांचक!
अंजली मराठे आणि जयदीप वैद्य यांचे गायन अतिशय सुंदर! दोघांचे आवाज स्पष्ट, सुरेल आणि आवाजाची फिरतही छान! निनाद सोलापूरकर यांची केवळ की बोर्डच नव्हे तर गायनातील साथही तोलामोलाची!( हार्मोनियम वादनही कमाल!)
अमित वझे आणि मानसी वझे दोघांचाही वाचिक अभिनय नैसर्गिक आणि सुरेख! 
या प्रयोगाच्या स्टार परफॉर्मर मुक्ता बर्वे आहेत हे नि:संशय! त्या crowd puller आहेत पण तरीही त्यांनी कुठेही भूमिकेचं भान सोडलेले नाही हे विशेष! उलट त्यांनी सुनीताबाईंच्या प्रेमळ, स्नेहार्द्र स्वभावाचं सुरेख दर्शन घडवलं आहे. 'चाफ्याच्या झाडा' ही कविता सुनीताबाईंच्या आवाजात आपण ऐकलेली असते. पण मुक्ता बर्वे त्यापेक्षा थोड्या वेगळ्या शैलीत म्हणतात आणि तीही शैली आपल्याला आवडून जाते!तसंच ती कविता वाचताना केलेल्या डाव्या हाताच्या हालचालीतून देहबोली लक्षात राहण्यासारखी ! 


 






या नाटकात एक जिवंत पात्र असावे अशी महत्त्वाची भूमिका मिलिंद मुळीक यांच्या Illustrations ची आहे. केवळ अप्रतिम!


नाटकातील घटना खरोखरच घडली होती आणि ते १९९८ साल होतं . पुलं गेले २००० साली आणि त्याआधी काही काळ तसे आजारीही होते. या संपूर्ण नाट्यानुभवात देखील मृत्यू आणि आजारपण यांची एक कळत नकळत सावली जाणवते. पण अशा काळात देखील रसरशीतपणे कसं जगावं... केवळ आला दिवस ढकलत न राहता प्रत्येक दिवसाचं  आणि जगण्याचं सोनं कसं करावं याचा एक धडाच जणू पुलं आणि सुनीताबाईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे!  
प्रयोगाच्या शेवटाला सुनीताबाई लेखक डॉ समीर कुलकर्णी यांच्याशी फोनवर बोलतानाचा प्रसंग आहे. यात त्या आचार्य विनोबा भावे यांच्या 'गीता प्रवचने' मधील पहिल्या अध्यायाचा संदर्भ देतात. त्यात विनोबांनी कृष्णत्रयी असा उल्लेख केला आहे - जो भगवद गीता सांगतो तो एक कृष्ण...ती गीता जो ऐकतो तोच अर्जुनही कृष्णच ...आणि या देव-भक्तांचे हृद्गत प्रगत करणारे महर्षी व्यासही इतके विरघळून गेले की तेही कृष्णच झाले ! सुनीताबाई हाच संदर्भ कवी आणि कवितांच्या बाबतीत देतात. मला हाच संदर्भ 'प्रिय भाई एक कविता हवी आहे' या प्रयोगाच्या बाबतीतही द्यावासा वाटतो. हा अनुभव प्रत्यक्ष घेऊन तो लिहिणारे-डॉ समीर कुलकर्णी...हे एक कृष्ण... हा अनुभव स्वतः मध्ये पूर्णपणे रुजवून त्याचा प्रयोग सादर करणारे कलाकार.. तेही कृष्णच! आणि तो अनुभव आमच्यापर्यंत तेवढ्याच उत्कटतेने पोचल्यामुळे आम्ही प्रेक्षकदेखील कृष्णच! यामुळे एक अद्भुत  अद्वैत अनुभवायला मिळाले! 

No comments: