Friday, 2 June 2023

सायकलिंग करता करता पक्षीनिरीक्षण ... (भाग ४)

 एखाद्या ठिकाणी जात राहिल्यावर आपल्याला त्या जागेची  सवय होऊन जाते. तशी मला या विठ्ठलवाडी मंदिर परिसराची सवय झाली. एखाद्या रविवारी तिथे सायकलने गेलो नाही तरी टू व्हीलर ने जाऊन  घुबडांचे का असेना फोटो काढावे असं वाटू लागलं. जणू मला त्या जागेची ओढच निर्माण झाली. तिथला अर्ध्या तासाचा वेळ...उन्हात असो वा सावलीत..हवाहवासा वाटू लागला. पक्षी शोधणे, त्यांना बघून फोटो काढणे  हा एक सरावाचा भाग झाला आणि दोन्हीमध्ये गुणात्मक(!) फरक दिसून येऊ लागला...  रोजरोज तीच ती माणसं दिसायची... त्यांचेही तेच ठराविक रुटीन! सगळं कसं अगदी तसाच्या तसं ! थोडंही इकडे तिकडे नाही ! शिवाय मला वेगवेगळे पक्षीही दिसत होते...अगदी महाराष्ट्राचा राज्य पक्षी- हरियाल (Yellow footed green pigeon) ही दिसला. त्यामुळे एकंदरीत सगळं काही सुखाने चाललं होतं..... 

मग एकदम काय झालं काय माहित !  इथले पक्षी अचानक कमी झाले . अवकाळी पावसामुळे नदीचं पाणी वाढून ते प्रवाही झाल्यामुळे की काय माहित नाही! पाण्यात जलपर्णी पण आहेच..त्यामुळे पाण्याची जागा जलपर्णीच्या व्यापली.. कदाचित या दोन्हीमुळे पक्ष्यांचं खाद्य कमी झालं की काय माहित नाही ..पण  पक्षी कमी झाले एवढं खरं. आता Ibises, Gray Heron, Black winged Stilts, Purple Heron, Open Stork, Golden oriole, Pied Bushchat, long tailed Shrike इ पक्षी गायब झाले आहेत. एवढंच काय जवळच्या वडाच्या झाडावर कित्येक दिवस न चुकता दर्शन देणारं पिंगळा ( Spotted Owlet) या पक्ष्याचं कुटुंबही दिसेनासं झालं. पक्ष्यांचं एक वेळ समजू शकतो पण जी नियमितपणे दिसणारी माणसं होती, तीही गायब झाली ! उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना असतात पण या इथल्या लोकांना कसल्या आल्यात सुट्ट्या! पक्षी नाहीत... ती माणसं नाहीत... त्यामुळे एरवी आवडीची जागा सुद्धा उदास, भकास वाटू लागली.. वाटू लागलं -आता इथे येणं आपण थांबवावं का ? पण मन मानायला तयार होईना... 

कारण दुसरीकडे  निसर्गचक्र अव्याहतपणे सुरूच होतं . घारी सारखा मुख्यतः scavenger पक्षी उडता उडता दोन पायात skillfully मासा पकडून झाडावर बसून तो खाताना दिसला .. 
Black Kite




या ओसाड जागेची का असेना पण निष्ठेने कोतवाल पक्षी( Drongo) कोतवाली करताना दिसला ...
Drongo 

आता पूर्ण वाढ झालेला ( mature adult) ढोकरी (Pond Heron) पक्षी  दिसला ... 
Pond Heron

तर दुसरीकडे टिटवीचं (Red Wattled Lapwing) पिल्लू त्याच्या पालकांच्या करड्या पहाऱ्यात 
Red Wattled Lapwing 

हळूहळू पण निश्चितपणे आश्वासक पावलं टाकत होतं ..
Chick of Red wattled Lapwing 


वेगवेगळे पक्षी येतील तेव्हा येतील... ही माणसं पुन्हा भेटतील तेव्हा भेटतील... पण आपण आपलं सातत्य टिकवून राहिलं पाहिजे... अमूकच गोष्टी पाहिजेत हा हट्ट धरून काय उपयोग? त्यामुळे जे समोर आहे त्याच्या सौंदर्याला कमी लेखलं जाण्याची शक्यता आहे... आपली पाटी कोरी ठेवून येणाऱ्या अनुभवांना सामोरं जावं हेच खरं !
                                                                                                                                        (समाप्त) 

No comments: