Sunday, 30 August 2026

आमची इंग्लंडवारी : भाग ८: लंडन नगरी बडी बाका !-१

१ 

या ब्लॉगचं शीर्षक मी शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या 'मुंबईची लावणी' या लावणीवरून उसनं घेतलं आहे हे सूज्ञांस सांगणे न लगे !  'मुंबई नगरी बडी  बाका जशी रावणाची दुसरी लंका' असे या लावणीचे सुरवातीचे शब्द आहेत. मूळ लावणी ३१ कडव्यांची आहे आणि मुंबईचं अतिशय सुरेख वर्णन यात आहे. ही लावणी 'पठ्ठे बापूराव' या सिनेमातली असून ती छोटा गंधर्व यांनी गायली आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाणं, इथले कारभार, व्यापार, इथली गर्दी, वाहतूक या सगळ्याचं चपखल आणि मार्मिक वर्णन ही लावणी करते. 

लंडनमध्ये आम्ही पाच राहिलो दिवस होतो. आम्हांला लंडन आणि मुंबईत खूप साम्यस्थळं दिसली. ती असणं स्वाभाविकच आहे म्हणा, कारण मुंबई /देशा वर बराच काळ इंग्रजांनी राज्य केलं होतं. लंडनच्या इमारती आणि काही भाग बघितले तर मुंबईच्या विशेषतः दक्षिण मुंबईतल्या इमारतींची आठवण येते. दोन्हीकडे  व्हिक्टोरियन गॉथिक वास्तुरचनेची खूप उदाहरणं आहेत. लंडन आणि मुंबईमधील आणखी एक साम्य म्हणजे इथलं वेगवान आयुष्य!   लंडन आणि मुंबई ही दोन्ही शहरं आपापल्या देशाच्या आर्थिक राजधान्या आहेत. त्यामुळे इथे वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक कामाच्या शोधात येतात. मुंबईत प्रामुख्याने देशातील विविध राज्यांतून लोक येतात तर लंडनमध्ये देश-विदेशातून स्थलांतर करून लोक येतात. लंडन आणि मुंबई म्हणूनच स्वप्ननगरी आहेत. स्वप्नं बघायची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची संधी ही दोन्ही शहरं देतात. दोन्ही शहरं कॉस्मोपॉलिटन आणि बहुभाषिक आहेत. लंडनमध्ये एका छोट्या जागेतसुद्धा विविध देशांतील लोक तुम्हांला दिसतील. 

मुंबई हे माझं अतिशय आवडतं शहर आहे. माझं आजोळ इथलं आणि इथे अजूनही बरेच नातेवाईक राहतात. लहानपणीच्या अनेक रम्य आठवणी मुंबई शहराशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे लंडनला आलो आणि मुंबईची आठवण झाल्यावर हे शहर आणखी आवडलं. इथल्या भव्य दिव्य वास्तू (grandeur हा योग्य शब्द!)आणि इतर अनेक गोष्टींनी दिपून गेलो  पण त्या अंगावर आल्या नाहीत. मुंबईप्रमाणेच लंडन मध्ये आणखी एक साम्य दिसलं. Both the cities just let you be! People don't judge who you are, from where have you come. अठरा वर्षं लंडनमध्ये राहिलेल्या प्रशांत लेलेचं देखील हेच मत आहे. तो तर गमतीने असंही म्हणाला की एका पायात हाफ पँट आणि दुसऱ्या पायात फूल पँट असं घालून जरी तुम्ही फिरलात तरी तुम्हांला कोणी काही म्हणणार नाही. कारण कोणाला काही फरकच पडत नाही आणि कोणाकडे इतका वेळही नसतो. हे स्वातंत्र्य खूपच विलक्षण आहे! 


इंग्लंडमध्ये दहाव्या शतकापासून राजेशाही आहे. तर १६८९ साली तिथे संसदीय लोकशाहीची स्थापना झाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये नामधारी राजेशाही उरली आणि संसद सार्वभौम झाली. म्हणजेच राजेशाहीपेक्षा संसद वरचढ झाली. मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्याकडे सर्व अधिकार आले आणि या चौकटीत राजेशाहीचा कारभार होऊ लागला. Reign but not rule असं त्याचं स्वरूप होतं आणि आहे देखील. आपल्याकडे  सर्वसाधारणपणे जे  कार्य राष्ट्र्पतींचं असतं तेच इंग्लंड मध्ये राजेशाही कडे असतं असं म्हणता येईल उदाहरणार्थ- संसदेच्या सत्राचं उदघाटन करणे, पंतप्रधानाची नियुक्ती करणे इत्यादी. मात्र इंग्लंडच्या जनमानसावर अजूनही राजेशाहीचा प्रभाव आहे. तसंच जगभरातही या राजघराण्याबद्दल आकर्षण आहे. विशेषतः लेडी डायना आणि तिचा कालखंड हा बऱ्यापैकी ग्लॅमरस होता. अलीकडेच The Crown या मालिकेमुळे तर राणी एलिझाबेथ पासूनच्या सर्व काळाला उजाळा मिळाला. लंडनला जाऊन तिथल्या  भव्य राजप्रासाद बकिंगहॅम पॅलेसला न बघणं शक्यच नव्हतं. अर्थात आम्ही हा बाहेरूनच बघितला. सुप्रसिद्ध Change of Guards हा सोहळा आमच्या वेळेत नव्हता. त्यामुळे तो काही बघता आला नाही. तर या बकिंगहॅम पॅलेस चे काही फोटो-

 
 

 

 
बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर असलेलं व्हिक्टोरिया मेमोरियल 
 
त्यापुढेच असलेला Peace हा पुतळा. (हातात olive branch म्हणजेच शांततेचं प्रतीक आहे ) 

इथे जागोजागी राजघराण्याचं अस्तित्व दिसून येतं. उदाहरणार्थ -

बकिंगहॅम पॅलेसपासून जवळच The Mall या परिसरात Queen Elizabeth Memorial ( Queen Mother ) आहे. 
Kensington Gardens च्या परिसरात  Prince Albert Memorial आहे . इथे  १७६ फुटी कमानीत अल्बर्ट चा पुतळा आहे. १८७२ साली याचं अनावरण राणी व्हिक्टोरिया ने केलं(अल्बर्ट हा राणी व्हिक्टोरियाचा पती. याचं १८६१ साली निधन झालं  )-
 
याच पुतळ्याच्या दक्षिणेला सुप्रसिद्ध Royal Albert Hall आहे. (याचं उदघाटन १८७१ साली झालं. आसनक्षमता -५२७२)
 

 
 
या सुरेख वास्तूमध्ये १९७४ साली पहिल्यांदाच  एका भारतीय कलाकाराचा कार्यक्रम झाला. तो म्हणजे लता मंगेशकर यांचा! लता मंगेशकर यांचा भारताबाहेरचा हा पहिलाच कार्यक्रम! या कार्यक्रमाची कॅसेट आमच्याकडे होती आणि तिचं मी अनेकदा पारायण केलं होतं. यात दिलीपकुमार यांनी अस्खलित उर्दूमध्ये लता मंगेशकरांचा परिचय करून दिला होता. हे सगळं तिथे गेल्यावर आठवलं! 
याच्याच समोर Royal College of Music ची ही भव्य इमारत दिसली. 
 
लंडनमध्ये अनेक बागा आहेत. अतिशय विस्तीर्ण, आखीव रेखीव आणि सुंदर! आम्ही यापैकी - St Jame's Park, Kensington Gardens, Hyde Park, Regent Park, Queen's Garden आणि Battersea Park एवढ्या बागा बघितल्या. मस्त, उत्साही आणि उत्फुल्ल वातावरण सगळीकडे बघायला मिळालं. जवळपास प्रत्येक बागेत तळी आहेत. संपूर्ण दिवसाच्या दिवस निवांत वेळ घालवला तरी कंटाळा येणार नाही अशी ही ठिकाणं आहेत. 
बकिंगहॅम पॅलेसच्या जवळ Guards Memorial आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ याची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक Foot Guard Regiment चं प्रतिनिधत्व करणारा एकेक असे ५ ब्रॉन्झचा पुतळे इथे आहेत. 

 


लंडनमधील आणखीही काही सुप्रसिद्ध ठिकाणं आम्ही बघितली- Clock Tower /Elizabeth Tower. यातच ती सुविख्यात Big Ben नावाची घंटा आहे. 
 
 
Westminster Abbey इथेच इंग्लंडची संसद आहे. तसंच इथे राजघराण्याचं चर्च आणि दफनभूमी देखील आहे. 


 
या ऐतिहासिक इमारतींबरोबरच लंडनमध्ये अनेक आधुनिक इमारती देखील आहेत. 
 
ग्रीनिच पार्कवरून काढलेला हा केनरी व्हार्फ परिसराचा फोटो. पुढच्या भागात Royal Naval College दिसत आहे. 

 
आम्ही केनरी व्हार्फ ला गेलोदेखील होतो. हा लंडनचा बिझनेस ऑफिस असलेला पॉश भाग-इथे टोलेजंग इमारती आहेत-
 
 
 

 


लंडन हे टेम्स नदीवर वसलेलं शहर आहे. या नदीवर अनेक पूल आहेत. पैकी सुप्रसिद्ध London Bridge -
 

तर १८९४ साली बांधलेला हा टॉवर ब्रिज!-
 
या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा electro hydraulically operated असून त्याच्याखालून उंच आणि मोठ्या बोटी जात असताना तो वरच्याबाजूने उघडतो. हे ठराविक वेळी होत असते आणि सुदैवाने आम्हांला ते बघायला मिळालं. त्याचे  काही फोटो आणि व्हिडिओ -
 

 
 


लंडनचे विहंगम दृश्य London Eye या पाळण्यातून बघायला मिळते. आम्ही त्यात बसलो होतो. त्याचे काही फोटो-
 

St Paul's Cathedral (नंतर आम्ही इथे गेलो देखील होतो)

 
London eye मधून दिसणारे Westminster Abbey 

लंडनमध्ये काही सुप्रसिद्ध चौक आहेत. त्यापैकी एक - Trafalgar Square -


 
खूपच मोठा परिसर आहे याचा. इथे स्ट्रीट म्युझिक चालू होतं आणि काही निदर्शनं देखील!-
 

तर दुसरा चौक- १८१९ साली स्थापित Piccadilly Circus! माझा मित्र प्रशांत लेले जो आता ऑस्ट्रेलिया मध्ये स्थायिक झाला आहे, तो योगायोगाने आम्ही लंडनमध्ये असताना तिथे आला होता. मी पुण्याचा, तो ऑस्ट्रेलियाचा आणि असे आम्ही दोघे लंडनला  भेटलो! तो एक अविस्मरणीय क्षण!


   
लंडन शहराची जीवनवाहिनी म्हणजे इथली ट्यूब(London Underground ) सेवा आहे. जगात प्रथमच ही भुयारी रेल्वे सेवा १८६३ साली सुरु झाली. आमच्यालंडनच्या वास्तव्यात आम्ही आम्ही तिचा बऱ्याच वेळा वापर केला. अतिशय उपयुक्त आणि सोयीस्कर सेवा आहे. केनरी व्हार्फ ला आम्ही तर विना चालक ट्यूबने प्रवास केला. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी City Mapper या अँप चा उल्लेख केला होता. लंडन फिरताना या अँपचा खूपच उपयोग झाला हे मी पुन्हा नमूद करू इच्छितो. हे आणि गूगल मॅप्स हे दोन्ही अँप्स आमचे मार्गदर्शक होते आणि आमची मुलगी (Gen Z ) हे दोन्ही वापरत होती आणि यामुळेच आम्हांला आमच्या इप्सित स्थळी पोचायला  खूपच उपयोग झाला. 
तर या ट्यूबचे आणि ट्यूब स्टेशनचे काही फोटो-



सगळ्यात प्रथम इंग्लंड आणि लंडन बद्दल वाचलं होतं ते पु ल देशपांडे यांच्या 'अपूर्वाई' या पुस्तकात! त्यांच्या नजरेतून इंग्लंड बघताना खूपच मजा आली होती. त्यांचं पुस्तक १९६० साली प्रकाशित झालं होतं. २०२६ साली मी इथे आलो होतो. तेव्हा असं वाटलं की आपण इथे पु लंची आठवण काढलीच पाहिजे. म्हणून मग 'अपूर्वाई' पुस्तकातील काही उतारे मी वाचले. 
पहिला उतारा मी केनरी व्हार्फच्या ट्यूब स्टेशन वर वाचला. 
 

तर दुसरा उतारा पिकॅडिली सर्कस वर वाचला. या ब्लॉगचा शेवट याच उताऱ्याने करत आहे -


                                                                                                                                                        (क्रमश:)















1 comment:

Unknown said...

आठवणीने लेखाची लिंक पाठवल्याबद्दल आभार.
आधीचेही लेख अधाशासारखे वाचले आहेत.
लंडनबद्दल बोलताना मुंबईची आठवण येणे मला वाटतं अगदी स्वाभाविक आहे. निदान मराठी माणसासाठी तरी. तू उल्लेख केलेली जवळजवळ सगळी ठिकाणं मे महिन्यात (२०२६) बघितली. तसं तर आंतरराष्ट्रीय शहराचा त्याला एक स्पर्श आहेच पण तू म्हणालास तसं तुम्ही इथे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून काही पण करा. कोणाला काही घेणं देणं नसतं. त्यामुळे आपोआप आपण एकप्रकारे निश्चिंत वावरतो. शहर बघायला येणाऱ्यांची इतकी भाऊगर्दी असूनही कुठल्याही स्थानिकाला तुम्ही काही विचारलं तर तो अजिबात न कं-टाळता किंवा न टाळता उत्साहाने तुमचं त्याच्या परीने समाधान करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो हा अनुभव मीना प्रभू यांच्या प्रमाणेच मलासुद्धा आला. त्यांचं "माझं लंडन" पुस्तक योगायोगाने प्रथम आवृत्ती प्रकाशित झाल्या झाल्या वाचनात आल्याची धन्यता मला आजही वाटते. आमच्याकडे लंडनसाठी एक रात्र दोन दिवस एवढाच अवधी होता. तो अर्थातच अगदी तुटपुंजा होता. मुक्कामासाठी एक स्वस्तातलं झोस्टेल शोधलं होतं. म्हणजे फक्त झोपण्यासाठी बंक बेड देतात अशा प्रकारचं. तिथे आम्हाला आपापसात मराठी बोलताना ऐकून रिसेप्शनिस्टने अस्खलित मराठीत आमच्या सोबत संवाद साधत धक्का दिला होता. ही मराठी बोलू शकेल असा तिचा अवतार बघून कोणालाही वाटलं नसतं. 😛
असो. ती पुण्यात पदवीसाठी दोन वर्षं कोथरूड मध्ये रहात होती. तिनेच मग आम्हाला काही ठिकाणांसाठी जवळचे रस्ते, बसची माहिती वगैरे पुरवली. आमच्या चौघांत एक कट्टर क्रिकेट प्रेमी होता. त्याने लॉर्ड्स बघण्यासाठी जायचा आग्रह धरला. मला त्यांत फारसा रस नव्हता. म्हणून मग मी जगप्रसिद्ध गिटारिस्ट आणि गिटारप्रेमींच्या गळ्यातला ताईत जिमी हेंड्रीक्स लंडनमुक्कामी रहायला होता ते हॉटेल बघायला गेलो. त्याची खोली जतन वगैरे केली आहे आणि काही जुनी गिटार छान पेटीत ठेवली आहेत.
असो. हे शहर बघण्यासाठी एक आठवडा तरी ठेवणे गरजेचे आहे. पण शेवटी आपल्याला जमेल तेवढी तरी पुरचुंडी प्रत्येकाला हे आणि मुंबई सारखी नगरे देतातच. तू म्हणतोस तसं मुंबई सारखं साम्य किंवा आठवण देणारं शहर म्हणजे ओस्लो सुध्दा वाटलं होतं. तशाच इमारती, गल्ल्या, विषमता, आधुनिकता सगळंच ठासून भरलेलं.
तुझी इंग्ल़ड वारी खूप मस्त वाचनानंद देत आहे.

Shreepad SM Gandhi