Friday, 27 November 2015

पर्याय २०१४: मनोरुग्णांचे ‘चैतन्य’ जागवताना...


( 'पर्याय' चा २०१४ चा मन हा विषय होता. या अंकातला हा माझा लेख )
मनोविकाराच्या पेशंटना काही वेळा त्यांची लक्षणे तीव्र झाल्यामुळे इस्पितळात ठेवावे लागते. काही वेळा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे पेशंटची घरी राहून देखभाल होऊ शकत नाही. सरकारी इस्पितळांव्यतिरिक्त खासगी संस्थांद्वारे देखील अशा पेशंटच्या राहण्याची, उपचारांची आणि शक्य  होईल अशा पेशंटसाठी पुनर्वसनाची व्यवस्था केली जाऊ लागली आहे. ‘चैतन्य मनोविकार सेवा केंद्र’ हे यापैकी एक! ते बघायला ‘बीकन फाऊंडेशन’ची आमची टीम गेली होती.
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर जैनांच्या सुप्रसिद्ध शत्रुंजय मंदिरासमोर 5 मजली दोन इमारतींमध्ये हे केंद्र आहे. मनोविकाराचे पेशंट इथे राहत असल्यामुळे अर्थातच प्रवेशद्वाराला कुलूप होतं. ते उघडून देणारी व्यक्ती कुठल्याही गणवेशात नव्हती. इथून आत शिरल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन इमारती अशी केंद्राची विभागणी होती. 

आम्ही येणार हे बहुधा तेथे माहित असावं. आम्हाला डाव्या बाजूच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. उजव्या बाजूच्या इमारतीच्या खालच्या भागात बर्‍यापैकी वर्दळ होती. नर्स, कर्मचारी वर्ग यांच्यात चर्चा सुरू होती. डाव्या बाजूच्या इमारतीत खाली सुसज्ज जिम्नॅशियम होतं. जिन्याने वर आल्यावर आम्ही ऑफिसमध्ये पोचलो. प्रशस्त जागेत स्वागत कक्ष, कार्यालयीन कामाकाजासाठी एक खोली तसेच इतर दोन मोठ्या खोल्या अशी एकूण रचना होती.

‘चैतन्य’चे संचालक श्री. रॉनी जॉर्ज यांच्याशी आमची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या खोलीत आम्ही ‘चैतन्य’विषयीची माहिती जाणून घेतली. या कक्षात टेबलावर ‘चैतन्य’ला विविध उपक्रमांत मिळालेली सन्मानचिन्हं ठेवण्यात आली होती. आमच्या चर्चेच्या सुरुवातीलाच श्री. जॉर्ज यांच्या पत्नी श्रीमती सुशुप्ती रॉनीही आम्हांला भेटल्या. परंतु त्यांना एका पेशंटच्या नातेवाईकांशी बोलायचे असल्यामुळे त्या थांबू शकल्या नाहीत.
अतिशय उत्साहाने श्री. जॉर्ज यांनी ‘चैतन्य’चा आजपर्यंतचा प्रवास आमच्यासमोर मांडला. अशा प्रकारचे पुनर्वसन केंद्र सुरू करण्यामागची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
श्री. जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी दोघेही MSW आहेत. दोघांचा विषय Psychiatry! शिकत असतानाच श्री. जॉर्ज यांच्या मनात अशा प्रकारचे केंद्र सुरू करावे अशी कल्पना होती. त्यानंतर दोघांनी बंगलोरच्या NIMHANS(National Institute of Mental Health And Neuro Sciences) या सुप्रसिद्ध संस्थेत जाऊन अभ्यास केला. सुशुप्ती रॉनी यांनी तिथे M.Phil  केलं. कोलकातामधील पुनर्वसन केंद्र पाहून झालं. तेव्हा असं लक्षात आलं की पश्‍चिम भारतात अशी सुविधा कुठेही नाही. त्यामुळे हे केंद्र सुरू करण्याच्या कल्पनेला पाठबळच मिळालं. मनोविकाराच्या पेशंटना जेव्हा तीव्र स्वरूपाचा त्रास होतो किंवा जेव्हा त्यांच्या आजाराचे निदान होते, तेव्हा त्यांना त्या-त्या आजाराबरहुकूम औषधे दिली जातात. ‘परंतु त्यानंतर काय?’ हा प्रश्‍न त्यांच्या नातेवाईकांना भेडसावत असतो. पेशंट आणि नातेवाईकांची हीच गरज ओळखून पुण्यात धनकवडी येथे सुरुवातीला एका छोट्या बंगल्यात 1999 साली ‘चैतन्य’ची स्थापना करण्यात आली.

याच अनुषंगाने श्री. जॉर्ज यांनी पुनर्वसन या संकल्पनेवर सविस्तर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सर्वसामान्यत: पुनर्वसनाचा खूपच मर्यादित अर्थ घेतला जातो. मनोविकाराच्या पेशंटचे लग्न झाले किंवा त्याला नोकरी मिळाली म्हणजे त्याचे पुनर्वसन झाले इतकाच अर्थ पुनर्वसन या शब्दाला नाही. ही पुनर्वसनाची प्रक्रिया पेशंटच्या आजाराचे निदान होऊन त्यावर औषधोपचार चालू केल्यापासून सुरू होते आणि ती शेवटपर्यंत अविरत चालूच राहते. याचे मुख्य कारण म्हणजे मनोविकार हे सहसा पूर्णपणे बरे (Cure) होत नाहीत.
मनोविकार झाल्यानंतर पेशंटची जीवनशैली बदलते. त्याच्या दिनक्रमात एकप्रकारे शिथिलता येते, त्याला काहीही करावेसे वाटत नाही किंवा काही वेळा त्याला त्याचे भान राहत नाही. त्याच्या आधीच्या सवयी बदलतात. म्हणूनच पेशंटला समाजात मिसळता यावे यादृष्टीने योग्य अशा सवयी लावाव्या लागतात. यासाठी प्रशिक्षण द्यावे लागते. असे प्रशिक्षण हाही पेशंटच्या पुनर्वसनाचा एक अविभाज्य भागच आहे. ‘चैतन्य’मध्ये पेशंटच्या मनोसामाजिक (Psycho-social) पुनर्वसनावर भर दिला जातो.
‘‘चैतन्य’मध्ये राहणार्‍या पेशंटसाठी एक ठराविक आखीव-रेखीव असा दिनक्रम असतो’’, असं श्री. जॉर्ज म्हणाले. यात सकाळी उठल्यावर वैयक्तिक स्वच्छता या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. याबाबतीत सर्वसाधारणत: पेशंट अतिशय उदासीन असतात. यानंतर व्यायाम आणि मग नाश्ता. नाश्ता आणि भोजन पेशंट आणि सर्व कर्मचारी, डॉक्टर्स एकाच ठिकाणी एकत्रपणे घेतात. इथे कुठलाही दुजाभाव नसतो.
नंतर थोडा वेळ वाचन, टी.व्ही. पाहणे यासाठी राखीव असतो. त्यानंतर थोडा वेळ समूह-चर्चा (Group -discussion ) होतं. पेशंटला आपल्या मनातले विचार मांडण्याचं प्रोत्साहन याद्वारे मिळतं. त्यानंतरही विविध उपक्रम असतात. उदाहरणार्थ, Group therapy, करमणूक, योगासनं आणि इतर व्यायाम इत्यादी. जे निरोगी असतात किंवा ज्यांना शारीरिक आजार नसतात त्यांनी संध्याकाळी स्वत:चे कपडे स्वत: धुणे अपेक्षित असतं. यातूनच स्वावलंबन रूजवले जाते. संध्याकाळी प्रार्थना होते. त्यानंतर रात्रीचे जेवण आणि रात्री 10 वाजता झोपणे अनिवार्य असते.
इथे प्रत्येक सण साजरा  केला जातो. मग तो गणेशोत्सव असो वा ईद, ख्रिसमस असो की दिवाळी! सगळेच सण उत्साहाने साजरे केले जातात आणि पेशंटही त्याचा आनंद घेतात. घराबाहेरचे असले तरी एक प्रकारे घरासारखेच वातावरण ‘चैतन्य’मध्ये असते, असे श्री. जॉर्ज यांनी नमूद केले.
इथल्या दिनक्रमाशी जुळवून घ्यायला सुरुवातीला पेशंटना जड जातं. त्यांच्या आजारामुळे त्यांची काही करायची तयारी नसते. त्यांच्या मागे लागावे लागते. त्यांना push द्यावा लागतो. हे काम इथला स्टाफ करतो. इथे जवळ-जवळ 100 कर्मचारी आहेत. बहुतांश स्टाफ निवासी आहे. त्यापैकी बरेचसे MSW, शिवाय नर्सेस आणि इतर कामगारही आहेत. नामवंत Psychiatrists इथे दिवसभर उपलब्ध असतात. तातडीच्या प्रसंगांसाठी इथे चार ambulance गाड्या सतत उपलब्ध असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे Schizophrenia, Bipolar mood disorders, नैराश्य यासारख्या आजारांचे पेशंट तर इथे आहेतच शिवाय इथे Dementia आणि Alzheimer's च्या पेशंटसाठी स्वतंत्र कक्ष आहे, ज्याची क्षमता 30 पेशंटची आहे. व्यसनाधीनतेच्या पेशंटसाठीही वेगळा कक्ष आहे. ज्यात दारू तसेच इतर मादक द्रव्यांमुळे व्यसनाधीन झालेल्या पेशंटवर उपचार केले जातात.
श्री. जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, इथे दाखल होणार्‍या पेशंटपैकी सुमारे 30 टक्के  पेशंट जवळजवळ नॉर्मल आयुष्य जगू शकतात. स्वत:चीच नाही तर कुटुंबाचीही जबाबदारी घेऊ शकतात. 30 टक्के  पेशंट अंशत: बरे होतात. मात्र 40 टक्के  पेशंटमध्ये काहीही सुधारणा होऊ शकत नाही. एकूणच मनोविकाराच्या पेशंटना सांभाळावे लागते. बर्‍याचदा छोट्या कुटुंबांना दीर्घकाळ हे शक्य  नसते वा त्यांची तयारी नसते. म्हणूनच अशा पेशंटना ‘चैतन्य’ सांभाळते.
1999 मध्ये ‘चैतन्य’ सुरू केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांत कोणीच पेशंट आले नाहीत. मात्र त्यानंतरच्या 6 महिन्यांत 32 पेशंट दाखल झाले. ‘चैतन्य’ची पुण्यात 3 तसेच गोवा, कोची आणि दिल्ली इथे केंद्र आहेत. सर्व मिळून एकूण 520 पेशंटची काळजी घेतली जाते. सुरुवातीला मात्र पेशंटला उपचारांची गरज आहे हे पटवून द्यावे लागायचं. याबाबतीत श्री. जॉर्ज यांनी काही उदाहरणं दिली. मुंबईच्या एका बड्या कंपनीचे प्रमुख मनोविकाराने आजारी होते. त्यांच्या नातेवाईकाने श्री. जॉर्ज यांना पेशंटच्या घरी बोलावले होते. पेशंट उपचार घ्यायला तयार नव्हता. श्री. जॉर्ज त्यांच्याशी बोलत असताना अचानक पेशंटने त्यांच्या छातीवर जोरात लाथ मारली. त्यामुळे श्री. जॉर्ज अक्षरश: फेकले गेले आणि त्यांचं डोकं भिंतीवर आपटलं. तरीही श्री. जॉर्ज यांनी पेशंटला ताब्यात घेतलं. आधी मुंबई येथे काही काळ उपचार झाले. त्यानंतर 3 महिने पेशंट पुण्यात ‘चैतन्य’मध्ये राहिला. त्यानंतर तो बरा होऊन आता पूर्ववत काम करू लागला आहे. ‘त्या’ दिवशी केलेल्या मारहाणीविषयी जे त्यांनी अनेक वेळा दिलगिरीही व्यक्त केली आहे. आता-आतापर्यंत ते श्री. जॉर्ज यांच्या नियमित संपर्कात होते.

दुसरं उदाहरण सोलापूर मधल्या एका कुटुंबाचं! या एकाच कुटुंबात तब्बल चार पेशंट! मात्र श्री. जॉर्ज यांना त्यांच्या घरी प्रवेश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आईला paranoid schizophrenia होता. ती तिच्या मुलीला घरी कोंडून ठेवत असे. घरात कोणी डोकावू नये म्हणून काचांना कागद लावलेले होते. शिवाय घरी कुत्राही होता. मुलगी स्वत:ही मनोरुग्ण होती. तिला उपचार मिळणे गरजेचे होते. यासाठी मुलीच्या वडिलांची मदत घेण्यात आली. ‘फ्रीज दुरुस्त करायला मेकॅनिक आला आहे’ असे निमित्त करून श्री. जॉर्ज कसे तरी त्यांच्या घरी गेले. मुलीला तिथून बाहेर काढले. तिच्यावर उपचार झाले. ती आता बरी झाली असून, इंजिनियर झाली आहे. तिचे लग्नही झाले आहे. मग आई आणि तिच्या दोन मुलांवर उपचार झाले. त्यापैकी एक मुलगा बरा झाला असून, दुसर्‍या मुलाचे आजाराचे चढ-उतार चालू असतात.

‘चैतन्य’मध्ये दाखल होण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पेशंटला प्रवेश देण्याचे हक्क  संस्थेच्या आधीन आहेत. या प्रकारची संस्था चालवताना अनेक परवाने, सरकारी परवानग्या हे सोपस्कार आलेच! त्यांची पूर्तता वेळोवेळी केली जाते.

‘चैतन्य’चा सर्व खर्च पेशंटकडून मिळणार्‍या फी मधूनच भागवला जातो. ‘चैतन्य’ला कोणीही देणगी देण्यास पुढे येत नाही, अशी खंतही श्री. जॉर्ज यांनी व्यक्त केली. दहा वर्षांपूर्वीच कामशेत येथे जागा घेऊनही, त्यावर बांधकाम करण्याइतका पैसा जमा होऊ न शकल्याचंही श्री. जॉर्ज यांनी बोलून दाखवलं. देणगीअभावी गरीब आणि गरजू पेशंट ‘चैतन्य’मध्ये राहू शकत नाहीत कारण इथला खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे असेही ते म्हणाले.
श्री. जॉर्ज यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही ‘चैतन्य’ बघायला गेलो. ऑफिसच्या वरचे 2 मजले स्त्री पेशंटसाठी राखीव होते. समोरची संपूर्ण इमारत पुरुष पेशंटसाठी होती. प्रत्येक मजल्यावर बर्‍यापैकी संख्येने कर्मचारी दिसत होते. पेशंटही इकडे-तिकडे फिरत होते. पेशंटना कुठलाही गणवेश नव्हता. प्रत्येक खोलीत 3 पेशंट अशी व्यवस्था होती. श्री. जॉर्ज म्हणाले होते तसंही इमारत जनरल वॉर्डसारखी होती. कात्रज येथील दुसर्‍या केंद्रात तसेच वारजे येथे स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. इथल्या खोल्यांमध्ये स्वच्छता, हवेशीरपणा आणि उजेड जाणवला. व्यसनमुतीच्या स्वतंत्र कक्षात भिंतींवर वेगवेगळे फलक तसेच Serenity Prayer लावण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यावर टी.व्ही. आणि काही ठिकाणी जेवणासाठीची टेबलं मांडली होती. एकूण व्यवस्थेत एक प्रकारची शिस्त जाणवत होती.

संस्थेतून बाहेर पडताना लक्षात राहिला  कर्मचारी वर्गाचा अदबशीरपणा, दिसून आली त्यांची कामातील गुंतवणूक आणि 520 पेशंटना सेवा देणारे, ही संस्था स्थापन करून त्यात कालानुरूप सुधारणा करून ती वाढवणारे जॉर्ज दांपत्य!


(या लेखासाठी डॉ. सदानंद चावरे, डॉ. विवेक गोवंडे, डॉ. प्रसाद जोशी आणि डॉ. राजेश पुसाळकर यांनी ‘चैतन्य’ला व्हिजिट दिली.)

पर्याय २०१३ : सामाजिक बांधिलकी जोपासताना...


('पर्याय' च्या २०१३ च्या वृद्धत्व विशेषांकातला हा माझा तिसरा लेख)


सांसारिक जबाबदार्‍या पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे स्वत:च्या आधी पूर्ण न होऊ शकलेल्या इच्छा पूर्ण करण्याकडे माणसाचा कल असतो. काहीजण एखादा छंद जोपासतात, कुणीतरी परदेश वार्‍या करतात, काहीजण मुलं, नातवंडं यांच्यात रमतात तर काही ज्येष्ठ नागरिक संघात सहभागी होऊन त्यातील वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतात. परंतु यापलिकडे विचार करून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने प्रेरित होऊन एक समाजोपयोगी संस्था शून्यातून उभी करणारे तसे विरळाच! अशाच एका ध्यासाचा, लीना देवस्थळी यांनी जांभूळपाडा येथे उभ्या केलेल्या ‘चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास’ चा हा वेध!

सध्याच्या सामाजिक परिस्थितीतच वृद्धाश्रम का काढावा याची कारणे सामावलेली आहेत. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गात आर्थिक स्थैर्य आलेले आहे. बहुतेक नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधाही आहे. परंतु याचबरोबर कुटुंबाचा आकार लहान होत आहे. तसेच जागतिकीकरणामुळे मुलांना नोकरीच्या संधी जगभरांत कुठेही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कित्येक घरांत मुलगा-सून परदेशात, आणि आई-वडील भारतात असे चित्र दिसते. काही कुटुंबांत  आई-वडील, मुलं एकत्र राहातात, पण मुलं-सुना एकमेकांना सुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. वैद्यकीय सुविधा-सोयी यामुळे आयुर्मान वाढू लागले आहे. साहजिकच वृद्धांची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच जोडीदाराचा मृत्यू झाल्यास आणखीनच एकटेपणा जाणवतो. आर्थिक सुबत्ता आहे, पण काळजी घेण्यास कोणी नाही, विरंगुळा वाटेल असे घरात टी.व्ही.शिवाय काही नाही, बोलायला कोणी नाही, असे काहीसे निराशाजनक चित्रही बर्‍याचदा दिसते. काहीवेळा, विशेषतः आजारी लोकांसाठी, नर्सिंग ब्युरोमधून कामासाठी स्टाफ ठेवण्यात येतो. परंतु मदतीला येणार्‍या व्यक्तीच्या हजेरीत सातत्य राहतेच असे नाही. घरी एक-एकटेच वृद्ध किंवा दांपत्य राहात असल्यास सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. वृद्धाश्रम ही सध्याची गरज आहे असं जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात वृद्धाश्रमांचे चित्र फारसे समाधानकारक नाही. जिथे चांगल्या सोई आहेत, तिथे खूप पैसे द्यावे लागतात तर काही ठिकाणी पैसे देऊनही हालाखीच्या परिस्थितीत वृद्धांना राहावे लागते. सर्वच क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. वृद्धांना स्वतंत्रपणे, सन्मानाने राहता यावे, तसेच समवयस्कांच्या संगतीत राहून आयुष्याच्या संध्याकाळचा काळ शांततेत आणि समाधानात घालवता यावा, आवश्यक त्या सोई-सुविधा असाव्यात आणि  तरीही हे सगळे बर्‍याच अंशी परवडू शकेल अशा दरात असावे, या उद्देशाने लीना देवस्थळी यांनी वृद्धाश्रम काढायचे ठरवले.


लीना देवस्थळी 
अर्थात हा विचार आल्यानंतर तो कृतीत येईपर्यंतचा प्रवास निश्‍चितच खडतर आणि असंख्य अडचणींच्या शर्यतींचा होता. वृद्धाश्रम शहरात चालविणे तसे सोपे गेले असते. पण विशेषत: मुंबईसारख्या ठिकाणी जागांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना हा विचारही आवाक्याबाहेरचा होता. म्हणून पुण्या-मुंबईपासून जाण्यासाठी सोयीची असेल अशा जागेचा शोध सुरू झाला. 2007 मध्ये लीना देवस्थळींनी जागा शोधायला सुरुवात केली. बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, टिटवाळा या पट्ट्यांत अनेक जागा पाहिल्या. पण काही ठिकाणी जागा वस्तीपासून दूर होत्या तर काही ठिकाणी रस्ते खराब होते, तर काही ठिकाणी clear title नव्हते. अशा प्रकारे प्लॉटची जागा शोधण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव! आणि गाठ पडे ती स्थानिक, इतर काही रोजगार नसल्यामुळे जागा खरेदी-विक्रीचा चलनी व्यवसाय करणार्‍या तरुणांशी! काही वेळा ते त्या जागेच्या मालकांबाबत, टायटल, सातबाराचा उतारा याबाबत काहीच बोलत नसत. केवळ लीना देवस्थळींकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असत. ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळं व्यवस्थित करून देऊ’’ असे नुसते म्हणत. जागेचा व्यवहार पुरुष व्यक्ती बरोबर असल्याशिवाय, बायका करतील असे त्या लोकांना वाटतच नसे. एकाने तर सरळच विचारले देखील- ‘‘तुमच्याशी बोलणं झालं, ठीक आहे. पण व्यवहार कोणाशी करायचा? तुमच्याबरोबर पुरुष माणूस कधी येईल?’’
जागेचा शोध एकीकडे चालू असताना दुसरीकडे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली. मथुरा फाउंडेशन हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. विविध वृद्धाश्रमांना भेटी देऊन, तिथली कार्यप्रणाली समजून घेऊन ‘चैतन्य’ची नियमावली ठरविण्यात आली.
2009 मध्ये, म्हणजेच सुमारे 2 वर्षांनंतर जांभुळपाडा (खोपोली-पाली रस्त्यावरील एक गाव) गावठाणात असलेली एक जागा पसंत पडली. 



पुण्या-मुंबईपासून एस.टी.ने जोडलेलं, (दोन्हीकडून सुमारे 100 कि.मी.वर असलेलं ) नदीकाठचं शांत गाव, गावात असलेली अनेक मंदिरं, तसेच जागेजवळ असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एस. टी.चा थांबा या सर्व बाबींचा विचार करून ही सुमारे पाऊण एकर जागा वृद्धाश्रमासाठी निश्‍चित करण्यात आली. जवळपास म्हणजे खुद्द जांभुळपाडयातच ‘आनंदधाम’ आणि तीन किलोमीटरवर कानसळ येथे ‘स्नेहबंधन’ असे आणखी दोन वृद्धाश्रम अनेक वर्षे आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि सहकार्याचा ‘चैतन्य’च्या उभारणीपासून आतापर्यंत वेळोवेळी खूपच फायदा झाल्याचे लीना देवस्थळी आवर्जून नमूद करतात.

जागा निश्‍चित झाल्यावर ‘चैतन्य’च्या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू झाला. जागेची मोजणी होऊन स्थानिक सरपंचाची परवानगी मिळवणं, टेंडर मागवणं व आडगावात चांगलं काम करू शकेल असा contractor शोधणे हे तसं जिकिरीचं  होतं . सर्व गोष्टीत खूप वेळ गेल्यामुळे जागेच्या किंमतीसकट तिथे इमारत बांधण्याच्या खर्चातही प्रचंड वाढ झाली. मुंबंईपासून लांब असल्यामुळे सर्व बाबतीत वाहतुकीचा खर्च वाढला. मजुरीसाठी स्थानिक मजूर उपलब्ध न झाल्यामुळे तोही खर्च वाढला. सर्व समस्यांवर मात करत हळूहळू ‘चैतन्य’चे मूर्त रूप दिसू लागले. आडारकर असोसिएटचे भागीदार आर्किटेट श्री. काळे व नीरा आडारकर यांनी पाऊण एकर जागेचा पुरेपूर वापर करत इमारतीची संकल्पना अशा प्रकारे केली की ज्यायोगे तिथे एखाद्या बैठ्या वाड्यासारखा अनुभव यावा. 
प्रवेश करताच खूप उंच लॉबी, मध्यभागी चाफ्याची झाडं असलेली मोकळी जागा आणि त्याभोवती निवासींसाठी 15 खोल्या अतिथींसाठी खोल्या, विश्‍वस्तांच्या खोल्या, मनोरंजन कक्ष, ग्रंथालय, भोजनगृह, स्वयंपाकगृह, अटेंडंट व सुपरवायझर यांच्या खोल्या, ऑफीस एवढं सगळं असूनही इमारतीला एक मोकळा सुटसुटीतपणा आहे. निवासींना आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे ही सुरक्षिततेची भावना वाटावी, पण तरीही त्यांचे स्वातंत्र्य जपले जावे अशी एकूण रचना आहे. तसेच इमारतीच्या मधोमध landscape gardening  केल्यामुळे एक छान प्रसन्नता वाटते.

निवासींच्या खोल्यांमध्ये आणि एकूणच इमारतीत वृद्ध लोकांचा विचार करून अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इथे कुठेही उंबरठा नाही. सगळे passages आच्छादित आहेत; जेणेकरून चालता-फिरताना उन्हा-पावसाचा त्रास होत नाही. प्रत्येक खोलीत दोन माणसांची राहण्याची सोय आहे. 

प्रत्येक खोलीला जोडून संडास-बाथरूम आहेत शिवाय वेगळे बेसिन आहे. प्रत्येक खोलीत 2 कॉट, 2 कपाटं, 1 टेबल, 2 खुर्च्या असे फर्निचर आहे. खोल्यांच्या बाहेर छोटा व्हरांडा आहे जिथे बसण्यासाठी कट्टाही आहे. संडास-बाथरूमच्या दारांना कुलुपंही वैशिष्ट्यपूर्ण आहेत- ज्यामुळे माणूस आत अडकला तरीही दार न तोडता बाहेरून दार उघडता येऊ शकते. काही खोल्यांमध्ये संडास-बाथरूममध्ये ramp आहे; ज्यायोगे तिथे wheel chair नेता येऊ शकते. इथे विरंगुळ्यासाठी पुस्तकांची सुसज्ज लायब्ररी आहे. मनोरंजन कक्षात टी.व्ही. आहे, कॅरम, पत्ते, बुद्धिबळ खेळण्याची सोय आहे. भोजनकक्षात 30-35 जण एकत्र जेवू शकतील एवढी जागा आहे.

2009 साली बांधकामाला सुरुवात केल्यानंतर 2012 च्या गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर ‘चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास’चे उद्घाटन करण्यात आले. एका विशिष्ट ध्येयाने चालू केलेले काम पूर्ण झाल्याचे आणि तेही अपेक्षा होती तशाच प्रकारे झाल्याचे समाधान लीना देवस्थळींना मिळाले.
‘चैतन्य’बद्दलची माहिती काही वृत्तपत्रात आली तसेच mouth publicity द्वारे अनेकांना ‘चैतन्य’बद्दल माहिती मिळू लागली व तिथली घडी बसू लागली. इथे कायमस्वरूपी राहू इच्छिणार्‍यांची लीना देवस्थळी आधी मुलाखत घेतात. त्यानंतर एक महिना temporary बेसिसवर विशिष्ट रक्कम भरून राहू शकतात. जर दोन्ही बाजूंनी कोणाला काही अडचण वाटली नाही तरच निवासी पुढे राहू शकतात. यासाठी काही रक्कम बिनव्याजी deposit म्हणून घेण्यात येते. त्यानंतर प्रत्येक महिन्याची फी निवासींना भरावी लागते. यामध्ये दोन वेळा चहा, एक वेळ दूध, दोन वेळेचा नाश्ता (संध्याकाळचा कोरडा नाश्ता, सकाळचा गरम नाश्ता), दोन वेळचं जेवण (दही-ताकासह) तसेच रविवारी मिष्टान्न याचा समावेश आहे. ज्याप्रमाणात सोई-सुविधा इथे उपलब्ध आहेत, त्यामानाने इथला खर्च वाजवी आणि परवडण्या एवढा आहे. तसेच ज्यांना काही दिवसांसाठी राहायचे आहे किंवा दिवाळीच्या काळांत फटाक्यांच्या आवाजापासून लांब राहायचे आहे किंवा एक बदल म्हणून इथे यायचे आहे त्यांना दिवसाच्या भाड्याप्रमाणे इथे राहाणे शक्य  आहे. इथे राहण्यासाठी वयाची अट तशी नाही. वय-वर्षे 55च्या पुढचे कोणीही, जे हिंडते-फिरते आहेत ते इथे राहू शकतात. ज्यांना स्वत:साठी मदतीची गरज लागते अशांची सोय इथे होऊ शकत नाही कारण तशा प्रकारची इथली रचनाही नाही. तसेच हे hospice नाही. म्हणजेच ज्यांना असाध्य आजार आहे किंवा जे अंथरुणाला खिळलेले आहेत अशा लोकांची इथे सोय होऊ शकत नाही. मात्र इथे राहणार्‍या लोकांसाठी मासिक वैद्यकीय तपासणीची व्यवस्था आहे. तसेच दवाखान्यात/इस्पितळात दाखल करण्याची वेळ आल्यास ambulance ची सोय आहे.

गेलं दीड वर्ष ‘चैतन्य’ चालविताना माणसांच्या स्वभावाचे आणि वयोमानामुळे व्यक्तीवर झालेल्या परिणामांचे अनुभव लीना देवस्थळींना आले. एखादी व्यक्ती जरी ‘चैतन्य’मध्ये राहायला आली तरी ती तिचा मूळ स्वभाव बरोबर घेऊनच येत असते.  त्यामुळे निवासींना काही वेळा इथेही इतरांशी जुळवून घेतांना समस्या येतात. काही वेळा मात्र असेही झाले की परिस्थितीच इतकी विचित्र होती की त्यात अपरिहार्यपणे कटू निर्णय घेणे भाग पडले. एक 80 वर्षांच्या आजी काही काळापासून राहत होत्या. इथल्या सगळ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या आजींनी त्यांच्या इथल्या राहण्याबद्दल एक छान कविताही केली होती. परंतु त्या आजारी पडल्या आणि त्यामुळे त्या स्वतंत्रपणे काही करू शकत नव्हत्या. त्यांना मदतीची गरज होती. ‘चैतन्य’च्या नियमांप्रमाणे अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या घरी पाठवणे हाच मार्ग होता. परंतु अशा अवस्थेत त्यांना 'इथून जा' असं सांगणं सुद्धा अवघड होतं. असं सांगून आपण काही क्रूरपणे तर वागत नाही ना असंही लीना देवस्थळींना वाटून गेलं. खरं तर आजींच्या दृष्टीने अशा वेळीच त्यांना आधाराची गरज होती. त्यातच त्यांचा मुलगा त्यांना परत नेण्यास तयार होईना. कसं तरी मुलाला पटवून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. तिथे उपचार घेतल्यानंतर 8-10 दिवसांत मुलाने त्यांना पुन्हा इथे आणून सोडलं . त्यांची प्रकृती फार काही सुधारली नव्हती. दारापासून ते खोलीपर्यंत त्या चालूही शकत नव्हत्या. मग इथल्या नियमांना अपवाद करत त्यांच्यासाठी एका नर्सची व्यवस्था करण्यात आली. यातील पुढची विशेष गोष्ट म्हणजे आपल्यामुळे आपल्या मुलावर जास्तीच्या खर्चाचा बोजा पडतोय या भावनेने त्या संकोचून गेल्या आणि त्या नर्सला काढून टाका असे म्हणू लागल्या. पण त्यांची प्रकृती सुधारत नसल्यामुळे नाइलाजास्तव त्यांना पुन्हा घरी पाठवणे भाग पडले.

‘चैतन्य’मधील एकूणच वातावरण खेळीमेळीचे आहे. एकमेकांना मदत करण्यास सगळे तत्पर असतात. होळी, पाडवा, गणपती, नवरात्र, कोजागिरी असे सगळे छोटे-मोठे सण आणि प्रत्येक निवासी व सेवकांचे वाढदिवस इथे उत्साहात साजरे केले जातात. 2012 मध्ये इथली पहिलीच दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. निवासींनी आपले अगदी ठेवणीतले नवे कपडे घातले होते. रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील यामुळे दिवाळीचा प्रसन्न माहोल होता. यावर कडी म्हणजे दिवाळीचा फराळ! इथलं वातावरण इतकं छान ठेवण्यात महत्त्वाचा  वाटा सेवक-सेविकांचा आहे, असे लीना देवस्थळी सांगतात. नेहमी हसतमुखाने, प्रेमाने आणि अगदी घरच्या आपुलकीने इथला स्टाफ काम करतो. एक निवासी महिला काही कामानिमित्त त्यांच्या घरी जायला निघाल्या होत्या तेव्हा त्यांच्या हातातून त्यांची bag  घेऊन, एक सेविका आस्थेने एस.टी.पर्यंत सोडायला गेल्या तर बाकीचे सगळे  निरोप द्यायला दारापर्यंत आले होते. त्या निवासी स्त्रीला अगदी भरून आले. त्या निवासी म्हणाल्या, ‘‘आजपर्यंत असं मला निरोप द्यायला कोणीच आलं नव्हतं.’’ हा अनुभव इथल्या वातावरणबद्दल बरंच कांही सांगून जातो!
आपला वृद्धाश्रम म्हणजे असंच ‘आनंदाचं बेट’ राहावं अशी इच्छा लीना देवस्थळी व्यक्त करतात!

(चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास बद्दल अधिक माहितीसाठी त्यांच्या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी) -
(www.chaitanyasahniwas.com)













































































































































































Wednesday, 25 November 2015

पर्याय २०१३: चरित्र अभिनेता: वृद्धत्वाचा ‘फिल्मी’ रंग

('पर्याय ' च्या २०१३ च्या वृद्धत्व विशेषांकातला हा माझा दुसरा लेख ! हिंदी सिनेमातल्या काही चरित्र अभिनेत्यांच्या काही भूमिकांचा धावता आढावा घेणारा !) 

तसं पाहिलं तर प्रत्येक हिंदी सिनेमात कुठले ना कुठले वृद्ध character असतेच. त्यामुळे ‘हिंदी सिनेमा आणि वृद्ध’ हा एक न संपणारा विषय आहे! शिवाय त्यात प्रत्येकाची आवड-निवडही वेगवेगळी असणार! एखाद्या सिनेमाचा इथे उल्लेख झाला नाही तर कोणाला वाटू शकतं - ‘‘अरे? तो सिनेमा का नाही? किंवा तसाच आणखी एक होता... त्याचा समावेश करायला हरकत नव्हती.’’ या विषयाचा एवढा मोठा आवाका आणि त्यात व्यक्तिसापेक्षता म्हणून या विषयाची मांडणी करताना एक मधला मार्ग काढलाय. त्याला पळवाटच म्हणा ना! हिंदी सिनेमांचा विचार करण्याऐवजी वृद्ध भूमिका साकारणार्‍या काही कलावंतांविषयी बोलून आपण त्याद्वारे या विषयावर थोडा फार प्रकाश टाकूया ! अर्थात या लेखाचा उद्देश केवळ ते सिनेमे आठवून त्या सिनेमांशी निगडीत आपल्या चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा देऊन एक स्मरणरंजन करता यावे एवढा माफकच आहे. हा काही कोणा अभ्यासू सिने-पत्रकाराचा शोध-निबंध नव्हे किंवा सिनेमाबद्दल मांडलेला समीक्षात्मक  विचारही नव्हे! हिंदी सिनेमांची आवड एवढंच काय ते या लेखाचे भांडवल!

हिंदी सिनेमात बहुतांशी वृद्ध characters हे कथानकाचे हिरो म्हणून नव्हे तर कथा पुढे नेण्यास सहायक अशा स्वरूपाचेच असतात. पण यातही खूप विविधता आढळून येते. म्हणजेच अशा चरित्र भूमिकांमध्येही गंभीर, विनोदी, खल/कपटी अशा अनेक छटा दिसून येतात. काही काही अभिनेते हे खरं तर कसलेले असूनही त्यांच्यावर एकाच प्रकारच्या भूमिकांचा शिक्का बसला. उदाहरणार्थ - कन्हैय्यालाल! उत्तर भारतातील ग्रामीण पार्श्‍वभूमीची कथा, त्यात सावकार किंवा मुन्शीची कपटी, बेरकी भूमिका म्हटली की कन्हैय्यालालच आठवतात. त्यांचा तो खास आवाज, ग्रामीण बाज आणि डोळ्यांतील रंगेलपणा! नायिकेच्या वाईटावर टपलेला हा इसम अगदी वात आणे. 
कन्हैय्यालाल -मदर इंडिया 
या प्रकारच्या भूमिकेचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी ‘मदर इंडिया’ सिनेमात साकारलेला सुखीलाला! राधा (नर्गिस)च्या आयुष्यात आलेल्या संकटांच्या मालिकांचं आणि त्यांनी दिलेल्या सामन्याचं चित्रण असलेल्या या सिनेमात कन्हैय्यालालने छळ कपटाने अडाणी/अशिक्षित शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या सावकाराची भूमिका अप्रतिमपणे केली होती. ‘मदर इंडिया’ अशी larger than life उपाधि मिळण्यासाठी राधाने वाईटाशी केलेला संघर्ष दाखविणे गरजेचे होते. हा वाईटपणा या सिनेमात कन्हैय्यालालने पुरेपूर वठविला.

काही कलावंत तसे भाग्यवान! त्यांच्यावर एकाच प्रकारच्या भूमिका करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे त्यांनी चरित्र भूमिकेच्या चौकटीत राहूनही वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्यापैकीच काहींचा हा धावता आढावा -
१) पृथ्वीराज कपूर -
मुलगा राजकपूर बरोबर ‘आवारा’ चित्रपटात वडिलांची भूमिका तर सुप्रसिद्ध ‘मुगल-ए-आझम’ मध्ये अकबर बादशाहची! 1971 मध्ये प्रदर्शित ‘कल-आज-कल’ सिनेमात मुलगा राज व नातू रणधीर कपूर बरोबर विनोदी अंगाची भूमिका केली होती. बलदंड शरीरयष्टी, धारदार नाक, पल्लेदार आवाज या वैशिष्ट्यांसह त्यांनी साकारलेला अकबर अजरामर होता.

२) डेव्हिड -

गुटगुटीत शरीरयष्टी, डोक्याला  टक्कल, गोल चेहरा, गुबगुबीत गाल, छान, निर्व्याज, मिष्किल, प्रसन्न हसू या शारीरिक गुणधर्मांमुळे कोणालाही आपले लाडके काका/मामा वाटणार्‍या डेव्हिड यांनी कित्येक सिनेमात तशाच प्रकारच्या निर्मळ, फ्रेंडली भूमिका केल्या. हृषिकेश मुखर्जींच्या अनेक सिनेमांत त्यांनी चांगली छाप पाडली उदा. - अनुपमा, सत्यकाम, अभिमान, चुपके-चुपके, खूबसूरत, इत्यादी. तसेच बासू चटर्जींच्या ‘बातों बातों में’मध्ये व ‘खट्टा-मीठा’मध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. रोजच्या जगण्यांतल्या हलक्या -फुलक्या  प्रसंगांत मार्ग दाखविण्याची, विसंगतीत संगत लावण्याची त्यांची सहज भूमिका कथेला सफळ-संपूर्ण करण्यास मदतच करे. 
आठवा - ‘चुपके-चुुपके’मध्ये जिज्जाजींना हरविण्यासाठीच्या परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र)च्या ‘कटात’ हिरिरीने भाग घेणारे हरिपतभैय्या उर्फ डेव्हिड!

३) मनमोहनकृष्ण -
मनमोहनकृष्ण 
कित्येक सिनेमात नायिकेच्या गरीब, असहाय्य बापाची करुण भूमिका करणारे मनमोहनकृष्ण ‘धूल का फूल’मध्ये मात्र अब्दुल रशीद ह्या नंदा-राजेंद्रकुमार यांच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचा सांभाळ करणार्‍या ठसठशीत भूमिकेत दिसले. शिवाय ‘बीस साल बाद’मध्ये तर ते चक्क नकारात्मक भूमिकेतही होते.




४) बलराज सहानी -
‘वक्त’ सिनेमात अचला सचदेवला उद्देशून ‘ए मेरी जोहराजबीं’ असे रोमँटिक गाणे म्हणणारा बलराज साहनी, नंतर काळाच्या आघातामुळे विखुरलेल्या आपल्या परिवारासाठी झुरतो. ही स्थित्यंतरं बलराज सहानीच्या सहजसुंदर अभिनयाने जिवंत झाली होती.





५) धुमाळ -
पूर्वीच्या सिनेमांचा एक ठरलेला साचा होता. मुख्य कथेला उपकथानक जोडलं जाई. यामुळे सिनेमात गंभीर प्रसंगानंतर एक comic relief प्राप्त होई. मेहमूद-शुभा खोटे किंवा जॉनी वॉकर अशा उपकथानकांत हमखास असायचे. यांच्याच जोडीला असायचे धुमाळ! लौकिक अर्थाने शरीरयष्टी, चेहरेपट्टी सर्वसाधारण असली तरी विनोदाचे अंग आणि टायमिंग जबरदस्त होते. त्यामुळे छोट्याशा भूमिकांतूनही ते आपली छाप पाडून जात.

6) प्राण -

नायकाला अगदी जेरीस आणणार्‍या खलनायकी भूमिका करणारे, आपला आवाजच दरारा निर्माण करण्यासाठी पुरेसा असणारे प्राण केवळ नकारात्मक भूमिकांसाठीच नाही तर काही उत्कृष्ट चरित्र भूमिकांसाठीही लक्षात राहतात. त्यातील प्रमुख म्हणजे ‘उपकार’ सिनेमातील त्यांची ‘मलंग चाचा’ ही भूमिका! या भूमिकेमुळे त्यांच्या कारकीर्दीला एक वेगळे वळण मिळाले. ‘परिचय’ सिनेमात त्यांनी मिलिटरी शिस्तीच्या आजोबांची छान भूमिका केली होती. यात त्यांच्या मुलाची भूमिका संजीवकुमार यांनी केली होती. या मुलाबरोबर न पटल्यामुळे त्याच्याबद्दलच नव्हे, तर त्यामुळेच नातवंडांबद्दलही मनात अढी बाळगणारा वरून कठोर पण आतून नरम असा विविध छटा असलेला आजोबा प्राण यांनी साकारला. प्राण आणि अशोक कुमार या जोडीने मिळून 27 सिनेमे केले. यात ‘व्हिटोरिया नं. 203’ यात या दोघांचं विनोदाचं ट्युनिंग चांगलं आहे. ‘दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे’ हे दोघांवर चित्रीत झालेले गाणे खूप गाजले होते.

7) अशोक कुमार -
                                     
खरं तर अशोक कुमार यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय चरित्र भूमिका केल्या. पण वृद्ध character आणि ज्यामुळे कथेला महत्त्वपूर्ण वळण मिळाले, अशा प्रकारची भूमिका त्यांनी बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘छोटी सी बात’ या सिनेमात केली होती. यात त्यांनी कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग हे अजब नाव असलेली व्यक्तिरेखा साकारली. नायक अरुण (अमोल पालेकर) नायिका प्रभा (विद्या सिन्हा)च्या प्रेमात तर आहे पण तिला थेट विचारण्याचं धाडस त्याच्यात नाही. त्यातच नागेश (असरानी) हा प्रभाचा मित्र त्याच्या वेगवेगळ्या (आणि काही बाह्य) गुणांमुळे तिच्यावर impression मारतो. अरुणचा नागेशपुढे निभाव लागत नाही. आता अशा पराभूत मनस्थितीत अरुण कर्नलकडे जातो. लष्करच्या शिस्तीचे धडे गिरवलेले कर्नल मग अरुणला उभं राहणं/चालणं/बोलणं इथपासून ते नागेशवर डाव उलटविण्याचे धडे देतात. अरुण त्यात यशस्वी होतो हे वेगळे सांगायला नकोच! कर्नलच्या वेगळ्या मिशा, हातात सिगार, बोलण्यात जरब, रंगीबेरंगी शर्ट आणि मार्मिक बोलणं अशा नेहमीपेक्षा वेगळ्याच get-up मधून अशोक कुमार यात मजा आणतात.
याच बासू चॅटर्जींच्या ‘खट्टा-मीठा’ या सिनेमात अशोक कुमार यांनी एका पारशी विधुराची भूमिका केली होती. निवृत्तीनंतरच्या काळात साथ-संगत करणारी जोडीदार हवी म्हणून स्वत:ची तीन मुलं असतानाही हा विधुर पर्ल पद्मसी (जिलाही आधीच्या लग्नापासूनची मुलं आहेतच)शी लग्न करायचं ठरवतो. दोघांच्या या निर्णयाला त्यांच्या मुलांकडून विरोध होतो. पण तरीही या निर्णयानंतर दोन्ही घरं एकमेकांशी कशाप्रकारे जुळवून घेतात याची ‘खट्टा-मीठा’ ही नर्म विनोदी शैलीतली कहाणी!
‘खूबसूरत’मध्येही अशोक कुमार यांची भूमिका संस्मरणीय होती.

8) उत्पल दत्त -
हृषिकेश मुखर्जींच्या काही सिनेमांचा विषय एखादा पूर्वग्रह बाळगून तो अगदी जिवापाड जपणार्‍या काही व्यक्तींभोवती फिरतो. हे पूर्वग्रह अगदी काही मोठे किंवा आध्यात्मिक तत्त्वं वगैरे नसतात. तर या व्यक्ती एखाद्या छोट्याशा गोष्टीतून जगाकडे बघतात आणि सगळ्यांनीही तसंच वागावं अशी अपेक्षा करतात. उत्पल दत्त या हरहुन्नरी बंगाली कलाकाराने मुखर्जींच्या दोन सिनेमांत अशाप्रकारची भूमिका केली होती. ते दोन सिनेमे म्हणजे ‘गोलमाल’ आणि ‘नरम-गरम’. मिशा बाळगणारा माणूसच खरा आणि बिनमिशांची माणसं ही खोटारडी असतात असा पूर्वग्रह ठामपणाने बाळगणार्‍या भवानीशंकर प्रसादची भूमिका ‘गोलमाल’मध्ये उत्पल दत्त यांनी केली होती. यात होणारे गोंधळ आणि त्यातून वाट काढणारा हिरो अमोल पालेकर हा सगळाच प्रवास हसून हसून पुरेवाट आणणारा होता. उत्पल दत्त यांची ‘इ...श्’ म्हणण्याची लकब, अमोल पालेकरचं बिंग (खरं तर मिशी) गळून पडल्यानंतर दत्त यांनी अमोल पालेकरचा केलेला पाठलाग, त्यानंतर ओमप्रकाश बरोबर पोलीस चौकीतला प्रसंग हा सगळा climax लाजवाबच! कितीही वेळा पाहिला तरी हा सिनेमा तेवढाच ताजा आणि मनोरंजक वाटतो हेच या सिनेमाचं यश आहे.

9) ए.के. हंगल -
या विषयावरचा लेख ए.के. हंगल यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुणीतरी मागे म्हटलं होतं - हंगल सारखी माणसं वृद्ध होऊनच जन्मली की काय?! आपल्या दिसण्यातल्या मर्यादा अभिनयाने भरून काढण्याची किमया साधलेले हंगल कितीतरी भूमिका जगले. काही सिनेमांत जर ते एक-दोन सीनमध्येच दिसत. उदा. ‘दीवार’ मधला एक प्रसंग, ज्यात रवी (शशीकपूर) एक पाव चोरणार्‍या मुलाच्या पायात गोळी घालतो आणि नंतर त्याच्या घरी जातो. त्याचे वडील- ए.के. हंगल हे तत्त्वनिष्ठ शिक्षक असतात. नोकरी नसते. गरिबीमुळे अन्नाची भ्रांत असते तरी ते आपली तत्त्वं सोडत नाहीत. आपला स्मग्लर भाऊ विजय (अमिताभ बच्चन) याला पकडण्याच्या लढ्याला पाठबळ देणारा हा बोलका प्रसंग! 
https://www.google.co.in/url?sa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj1g4Dy7qvJAhVCGY4KHWHfAqYQjhwIBQ&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DBXSZdAp0aMM&psig=AFQjCNHtIdOqr3u6IJ4GMFfiBrG6u6mnjg&ust=1448550613198892
किंवा हंगल यांची ‘शोले’मधली अंध रहीम चाचा ही भूमिका अजरामर आहे. ‘शोले’मध्ये जसे अजूनही गब्बर, ठाकूर, जय-वीरू लक्षात राहतात, तशीच ही छोटी पात्रेही! आपला मुलगा गमावला असला तरी चाचा जय-वीरूने रामगढमध्येच रहावं असंच म्हणतात आणि अल्लाकडे प्रार्थना करताना विचारणार की अशाप्रकारे गावावर कुर्बान होण्यासाठी अजून काही मुलं का नाही दिली? असं म्हणतात. या छोट्या प्रसंगातूनही चाचांचा ताठ कणा हंगल यांनी सुंदरप्रकारे दाखविला आहे.
अभिमान, आँधी, चितचोर, नमकहराम इत्यादी कितीतरी चित्रपटांतून हंगल यांनी केलेल्या लक्षणीय भूमिका गाजल्या.
शौकीन 

बासू चॅटर्जी यांच्या ‘शौकीन’ या चित्रपटात अशोक कुमार, उत्पल दत्त आणि हंगल या तीन दिग्गजांनी एकत्र काम केले होते. म्हटले तर कास्टिंगमध्येच सिनेमाने बाजी मारली होती. त्यात गोव्याची पार्श्‍वभूमी, आर.डी. बर्मन यांचे संगीत आणि मिथुन चक्रवर्ती-रती अग्निहोत्री यांची तरुण जोडी! आपल्या नेहमीच्याच boring आयुष्यात थोडासा बदल घडविण्यासाठी हे तिघे म्हातारे गोव्याला जातात आणि रती अग्निहोत्रीवर प्रत्येकजण आपल्या परीने impression मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांना माहित नसते की ती म्हणजे त्यांना गोव्याला मुद्दाम आलेल्या ड्रायव्हर (मिथुन)ची प्रेमिका आहे. वृद्धांचे हे flirting चे प्रयत्न हास्याचे फवारे निर्माण करतात. वृद्धत्व म्हणजे फक्त निराशा, आजार किंवा इतर करुण भावना नाही, तर वृद्धत्व चक्क enjoy ही करता येऊ शकते हे अधोरेखित करणारा हा चित्रपट! या तीन मित्रांमधील camaraderie ही खूप छान!

10) ओमप्रकाश -
यांच्याही उल्लेखाशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही. ओमप्रकाश यांनीही विविध छटा असलेल्या अनेक भूमिकांतून आपला ठसा उमटविला आहे. ‘आँधी’ सिनेमातले ते अस्सल, राजकारणात मुरलेले फिसर होते तर ‘चुपके-चुपके’मध्ये माणसाला वासाने ओळखण्याचा दावा करणारे जिज्जाजी! ‘शराबी’ या तशा अलिकडच्या सिनेमात अमिताभचा सांभाळ करणार्‍या मुन्शीजींची भूमिकाही सरस होती. ‘पडोसन’मध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून उभा राहिलेला राजपूत मामा सिनेमातील इतर विनोदी नटांच्या भाऊगर्दीत आपली ओळख राखतो. ‘बुढ्ढा मिल गया’ हा सिनेमा तर त्यांच्याभोवती फिरणारा एक रहस्यपट होता.

एवढ्या चरित्र नायकांबद्दल लिहिलं तर अशा भूमिका नायिकांच्या वाट्याला आल्याच असतील असा विचार येणं साहजिक आहे. परंतु तो खरंच एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. जाता-जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की दुर्गा खोटे (अभिमान, बॉबी, बावर्ची, बिदाई), ललिता पवार (अनाडी, जंगली, प्रोफेसर), निरुपा रॉय (दीवार, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर), अचला सचदेव (वक्त), कामिनी कौशल (उपकार), दीना पाठक (गोलमाल, खूबसूरत) यांनी महत्त्वपूर्ण व वैविध्यपूर्ण भूमिका केल्या.

प्रतिथयशी नटांमध्ये मला वाटतं संजीवकुमार हा एक असा कलाकार होता, ज्याने खूप तरुण वयात वृद्ध characters साकारले. विचित्र विरोधाभास हा की जरी त्यांनी अनेक वृद्धांच्या भूमिका केल्या तरी त्यांचे मृत्युसमयी वय होते फक्त 47!
संजीवकुमार-मौसम 

 ‘कोशिश’मधील मूक-बधिर पिता, ‘मौसम’मधला डॉक्टर, ‘परिचय’मधला प्राणचा मुलगा, ‘आँधी’मधील सुचित्रा सेनचा नवरा असे गुलजार दिग्दर्शित चार सिनेमांत त्यांनी वृद्ध व्यक्तिरेखा केल्या. त्याचबरोबर त्रिशूल, शोले, आलाप, जानी दुश्मन, बीवी ओ बीवी या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

हिंदी सिनेमात वृद्धत्वाच्या समस्यांचं काही वेळा सरधोपटपणे सादरीकरण झाले आहे. हिंदी चित्रपटांचे काही ठराविक ठोकताळे असतात. मुलं (आणि अर्थातच सुना) आई-वडिलांकडे नीट लक्ष देत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांना उतारवयात अनेक दु:ख झेलावी लागतात. कित्येकदा त्या दोघांची फारकत मुलांच्या स्वार्थापोटी केली जाते. त्यांना नीट जेवायलाही दिलं जात नाही. त्यांचे अगदी हाल हाल होतात. असे मेलोड्रामाटिक प्रसंग काही सिनेमांत असतात. ‘बागबान’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण! पोटची मुलं नीट सांभाळत नाहीत पण बाहेरचा/कुठलंही नातं नसलेला मुलगा मात्र आदरपूर्वक त्या आई-वडिलांची काळजी घेतो, हा आणखी एक cliché !
वृद्धाश्रम आणि तिथली माणसं हा विषय घेऊन अलिकडच्या काळात दोन सिनेमे आले होते. एक होता- 2002 चा ‘शरारत’ (अभिषेक बच्चन, अमरीश पुरी व इतर) आणि दुसरा ‘लगे रहो मुन्नाभाई’! परंतु ‘लगे रहो’मध्ये सिनेमा नंतर गांधीगिरीच्या ट्रॅकवर जातो. त्यामुळे वृद्धाश्रम हा विषय एवढा मध्यवर्ती राहत नाही. तर ‘शरारत’ची मूळ कल्पना चांगली असूनही सदोष हाताळणीमुळे तो एवढा प्रभावी ठरला नाही.

या पार्श्‍वभूमीवर वृद्धापकाळातील मन:स्थिती, त्या काळात निर्माण होणार्‍या समस्या, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, आणि या समस्यांवरचे उत्तर या सर्वांवर प्रकाशझोत टाकणारा, बर्‍यापैकी वास्तववादी चित्र उभं करणारा - ‘सारांश’ हा महेश भट दिग्दर्शित चित्रपट उठून दिसतो. महेश भटच्या कारकीर्दीतल्या सुरुवातीच्या काळाचा हा सिनेमा तसेच अनुपम खेरचा तर हा पदार्पणाचा सिनेमा! कुठेही अतिरंजित हाताळणी नाही आणि अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी आणि नकारात्मक भूमिकेतल्या निळू फुले यांचा संयत अभिनय यामुळे हा चित्रपट एक वेगळी उंची गाठतो. तत्त्वनिष्ठ हेडमास्तर आणि त्यांनी देवभोळी बायको या प्रधान दांपत्याभोवती हा सिनेमा फिरतो. अमेरिकेला शिकायला गेलेल्या त्यांच्या मुलाचा खून होऊन तीन महिने होऊन गेलेले असले तरी दोघांना अजूनही हे वास्तव स्वीकारणे जड जाते. पार्वती (रोहिणी हट्टंगडी) या श्रद्धेवर जगत असते की त्या मुलाचा पुन्हा जन्म होऊन तो त्यांच्याकडेच येणार आहे. तर तो अजूनही आहे असंच समजून प्रधान (अनुपम खेर) त्याला पत्र लिहितात आणि मग त्यांच्या लक्षात येतं. मुलाच्या अस्थी अमेरिकेहून भारतात आल्यावर त्या कस्टम विभागातून ताब्यात घेण्यासाठी भ्रष्ट व्यवस्थेचा सामना करावा लागल्यांनतर त्या अस्थी विसर्जनाची पूजा पार्वती करते (हेडमास्तर नास्तिक असतात). मुलगा हा म्हातारपणाची काठी म्हणण्याच्या वयात मुलाच्या वियोगाचा दु:खाचा डोंगर दोघांवर हा असा पुन्हा कोसळतो. त्याच्या राखेचा काही अंश हातात घेऊन प्रधान भकासपणे एकटेच बागेत खेळणार्‍या मुलांकडे बघतात आणि ती राख तिथल्या मातीत मिसळते.
https://www.youtube.com/watch?v=z1yH5aCu_L8

मुलाच्या पश्‍चात महागाईच्या काळात गुजराण व्हावी म्हणून निवृत्तीनंतरही प्रधान यांना नोकरी करणे क्रमप्राप्त ठरते. शिवाय स्वत:च्या घरी ते एक पेइंग गेस्ट सुजाता (सोनी राझदान) ही ठेवतात. मात्र नोकरीच्या ठिकाणी भेटलेल्या आपल्या मुलाच्या मित्रासाठी प्रधान त्या नोकरीवर पाणी सोडतात. तिथून घरी परत येताना दंगलीत सापडून त्यांना गुंडांकडून मारहाण होते, त्यांचे पैसे चोरले जातात. परिस्थितीपुढे हतबल झाल्यामुळे जगण्याची इच्छा संपून जाते आणि म्हणून दोघेही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. आणि अचानक अशावेळी दोघांनाही जगण्याचा एक उद्देश सापडतो. पेइंग गेस्ट सुजाताच्या पोटी विवाहबाह्य संबंधातून जन्माला येणार्‍या मुलाच्या रूपाने! आणि या उद्देशासाठी दोघेही स्वत:ला आपापल्या परीने झोकून देतात. अगदी राजकीय शक्तीच्या दबावालाही न झुकता! यातून पार्वतीला वाटतं की आपल्याच घरात आपलाच मुलगा पुन्हा जन्माला येणार आहे. पण नंतर प्रधान सुजाताला पुण्याला पाठवून देतात आणि पार्वतीला आपल्या मुलाच्या निधनाचं खर्‍या अर्थाने closure मिळवून देतात. एकमेकांच्या साथीतच जीवनाचा सारांश सामावला आहे असं म्हणून दोघेही नव्याने आयुष्याची सुरुवात करतात. बागेत फिरायला जातात. तिथे मुलाची राख विखुरलेल्या ठिकाणी नाजूक फुलांचा ताटवा बहरलेला असतो. आत्महत्या करण्यासाठी धाडस लागतं असं म्हणणारे प्रधान जगण्यासाठी, आयुष्याशी लढण्यासाठी धाडस लागतं इथपर्यंतचा प्रवास जगतात. जीवन प्रवाही आहे असा सकारात्मक संदेश देऊन सिनेमा संपतो. व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत राहूनही एक उत्कट, नितांतसुंदर अनुभव देणारा हा ‘सारांश’! आपली देहबोली, अभिनय आणि आवाज याद्वारे वृद्ध characters (वयाने तेवढे वृद्ध नसताना) साकारणारे अनुपम खेर आणि रोहिणी हट्टंगडी! आणि परिस्थितीशी यथाशक्ती लढण्यातच जगण्याचे सार्थक आहेे हा एक positive message यामुळे हा चित्रपट मनाला स्पर्शून जातो. एक हुरहूर निर्माण करतो!