Saturday, 28 May 2022

सायकलिंग करता करता ...(भाग २)


                                                                        १

गेली काही वर्षं जंगल पर्यटन खूपच वाढलं आहे. प्राणी-पक्षी  त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघायला मिळणं याची मजा काही औरच आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं लक्ष जंगलातील प्राणी-पक्षी  यांच्याकडे जास्त जातं. परंतु जंगलाचा तितकाच महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिलं जात नाही असं खेदाने म्हणावं लागतं. जंगलातल्या झाडांची ही गत तर शहरातल्या झाडांची काय कथा असणार! झाडं आपण फार गृहीत धरतो. कधी वादळी पावसाने झाडं पडली तर आपल्या लक्षात ती झाडं तिथे होती . अन्यथा आपण झाडांना अक्षरश: अनुल्लेखाने मारतो ! सायकलिंग करता करता झाडं बघत गेल्याने माझं झाडांकडे जाणीवपूर्वक लक्ष गेलं आणि झाडांची शहरातल्या दूषित वातावरणात, काँक्रीटच्या जंगलातही ( जिथे आता पूर्वीसारखं जमिनीत पाणी मुरत नाही तर रस्त्यांवरून ते वाहून जातं) तग धरून राहण्याची असोशी मला अचंबित करून गेली .

आता उदाहरणार्थ हे झाड बघा-

५) Australian Chestnut ( Castanospermum australe)-

अगदी ऐन सदाशिव पेठेत, न्यू इंग्लिश स्कूल च्या समोरील बोळात (पंतांचा गोट ) हे दुर्मिळ झाड दिमाखात उभं आहे. नावावरून लक्षात येतं की हे काही देशी झाड नाही. परंतु शहराच्या मध्यवस्तीत , जिथे आजूबाजूला हळूहळू जुने वाडे पाडून मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, तिथे हे झाड संरक्षित राहिलं आहे. गंमत म्हणजे या गल्लीतून मी कितीतरी वेळा गेलो असेन . माझा मित्र डॉ विवेक गोवंडे याच गल्लीत राहतो. पण तरीही या झाडाकडे तितकंसं लक्ष गेलं नाही. त्याला या झाडाविषयी सांगितल्यावर तो म्हणाला की  ही झाडं त्याच्या आजोबांनी(कै. विष्णू गोवंडे ) फार पूर्वी म्हणजे साधारण १९४७-४८ साली लावली होती. म्हणजेच जवळपास ७५ वर्षं ही झाडं ऐन मध्यवस्तीत टिकून आहेत! पण हीच झाडं का लावली असावीत? त्याचं कारणही माझ्या  मित्राने सांगितलं. त्याच्या आजोबांचे नातेवाईक पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथे सुपरिंटेंडंट होते. त्यांनी आजोबांना ही झाडं सुचवली कारण ती सदाहरित आहेत. हेही  मला माहीत नव्हतं. खरं तर आमच्या इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा  होतात पण हा विषय कधी झालाच  नव्हता ! 

 
 


 

Australian Chestnut Tree बद्दल अधिक माहिती -


६) पिचकारी (African Tulip Tree) Spathodea campanulata

हे ही विदेशी झाड! पण आपल्या वातावरणात चांगलं रुळलं , रुजलं ! पुण्यात मला २-३ ठिकाणी ही झाडं दिसली. एक झाड  स्वारगेटजवळील गणेश कलाक्रीडामंचच्या प्रांगणात आहे. दुसरं राजाराम पुलाकडून डीपी रोडने गेल्यावर दीनानाथ हॉस्पिटलकडे जाताना आपण डावीकडे वळतो तिथेच वळणावर  उजव्या बाजूला आहे. हे त्यामानाने छोटं झाड आहे. सगळ्यात मोठं झाड मला नगर रोडला  येरवड्याच्या शास्त्रीनगर सिग्नलला डावीकडे दिसलं. Whatsapp वर status update ला हे झाड ठेवल्यावर काही जणांनी मला या फुलांना/(आणि म्हणूनच झाडाला)  पिचकारी म्हणतात असं सांगितलं. फुलांचा रंग आणि आकार छान आहे आणि लांबूनही ती लक्षात येतात आणि म्हणून हे झाडही लक्षात राहतं !

   
 
 
या झाडाविषयी अधिक माहिती -
२ 

कहाणी स्थलांतरित झाडांची ! 

प्राणी आणि पक्षी स्थलांतर करतात हे आपल्याला माहीत आहे. पण झाडं सुद्धा स्थलांतर करतात? हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हांला पडेल. पण माणसाला काय अशक्य आहे! पुढील दोन झाडांच्याबाबतीत माणसांनी घडवून आणलेलं स्थलांतर उपकारकच ठरलं. मुळापासून उपटून दुसरेकडे लावलेली ही झाडं नव्या ठिकाणी देखील वाढली हे विशेष! 

७) शिंदी (Phoenix sylvesteris)
असं म्हणतात की फिनिक्स पक्षी त्याच्या पूर्वजांच्याच राखेतून नव्याने जन्म घेतो. फिनिक्स पक्ष्याला  अमरत्वाचं  प्रतीक मानलं जातं. पुण्यात स्थलांतर झालेली शिंदीची झाडं सुद्धा त्या फिनिक्स पक्ष्यासारखीच 'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी' प्रमाणे नव्या ठिकाणी जगली आणि वाढली. म्हणूनच या झाडाला ज्या कोणा व्यक्तीने  त्याचे शास्त्रीय नाव Phoenix असं दिलं असेल ती व्यक्ती नक्कीच दूरदृष्टी असलेली आहे असं म्हणायला हरकत नाही ! 
नगर रोडला येरवड्याच्या पुढे सिग्नल संपल्यावर ते शास्त्रीनगरचा सिग्नल येईपर्यंत रस्ता दुभाजकावर कमीत कमी ७०-८० शिंदीची झाडं दिसतात. विशेष म्हणजे ही साधारणपाने प्रत्येकी  तीन झाडं जवळजवळ आणि मग थोडं अंतर ठेऊन पुन्हा तीन झाडं अशा रचनेत लावण्यात आली आहेत. ही झाडं मूळची या  जागेतली  नाहीत.  कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही (मलाही आधी ते खरं वाटलं नव्हतं !) पण ही झाडं सिंहगड रोडवरून इथे आणण्यात आली आहेत. श्री. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या लेखातील माहितीप्रमाणे आता जिथे पु ल देशपांडे उद्यान आहे त्या जागेत पूर्वी  ही सगळी झाडं होती. पण पु ल देशपांडे उद्यान हे एका वेगळ्या संकल्पनेवर साकारलेलं उद्यान आहे. त्यामुळे त्यात ही झाडं बसत नव्हती. म्हणून पुणे महापालिकेने ही झाडं नगर रोड  इथे हलवली आणि त्या रस्त्याचं सुशोभीकरण केलं ! याबद्दल पुणे महापालिकेचे आभार मानावे तितके कमीच आहेत! यात झाडांचे प्राण तर वाचलेच, रस्त्याचं सुशोभीकरण झालंच, शिवाय एवढी झाडं नव्याने घेतली असती तर त्यासाठी मोजावे लागणारे पैसेही वाचले ! म्हणजे आहे की नाही - आम तो आम और गुठलीयों के दाम ! 
आता माल खात्री आहे कि जेव्हा केव्हा तुम्ही नगर रोडने जाल तेव्हा न विसरता तुम्ही या झाडांकडे बघाल !किंवा या फोटोंकडे  बघून तुम्हांला ही झाडं पाहिल्याचं आठवेल !


 


 

शिंदी झाडाविषयी अधिक माहिती-


८) मॅग्नोलिया ( Magnolia grandiflora) -
या झाडाच्या कथेत एक उपकथानकही आहे ! मुख्य कथा अर्थातच हे झाड पुण्यात कसं आलं  याविषयी तर उपकथानक म्हणजे हे झाड मला कसं सापडलं याबद्दल ! श्री. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या लेखमालेत पुण्यात हे झाड कसं आलं आणि त्याचं स्थलांतर होऊन देखील ते बहरलं याबद्दल रोचक माहिती आहे. फर्ग्युसन कॉलेज मधील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख श्री. तुळपुळे एकदा अमेरिकेला गेले होते. तिथे मिसिसिप्पी राज्यात जागोजागी त्यांना मॅग्नोलियाची झाडं दिसली. (मॅग्नोलिया हे मिसिसिप्पीचं राज्यफूल आहे) ती फुलं आवडल्यामुळे श्री. तुळपुळे यांनी त्या झाडाच्या बिया पुण्यात आणल्या. मॅग्नोलिया उष्ण हवामानात वाढणारं झाड असल्यामुळे इथे ते वाढलं-अगदी मजलाभर उंचीचं  झालं. त्याला फुलंही आली. त्यावेळी श्री. तुळपुळे फर्ग्युसन रोड येथे राहत होते. नंतर ते कर्वेनगर येथे राहायला गेले. एवढ्या प्रेमाने आणलेलं झाड त्यांना तिथेच सोडवेना. म्हणून ते झाड त्यांनी तिथून कर्वेनगर येथे त्यांच्या नव्या जागेत नेलं. विशेष म्हणजे तिथेही ते जगलं आणि त्याला फुलं येऊ लागली. पाळीव पक्षी-प्राणी यांच्यावर अतोनात प्रेम करणारे आपण बघतो परंतु तसंच प्रेम झाडांवरही करणारे खूप कमी वेळा दिसतात. श्री तुळपुळे यापैकीच ! 
आता उपकथानकाकडे -
मॅग्नोलियाची माहिती वाचल्यावर मला ते झाड आणि फूल बघायची उत्सुकता खूपच वाढली. लेखात कर्वेनगर मधला सविस्तर पत्ता दिल्यामुळे माझं काम सोपं झालं. सायकल मारत तिथपर्यंत गेलो. तर ती बंगल्यांची सोसायटी असल्याचं दिसलं. एका बंगल्यावर तुळपुळे अशी पाटीसुद्धा दिसली. आणि मग चक्क ते झाड आणि त्यावरचं फूलही दिसलं. मला अगदी हर्षवायूच व्हायचा बाकी होता! इतक्या वर्षांनंतरही ते झाड दिमाखात उभं होतं याचा मला अत्यानंद झाला. पण झाडाचा फोटो काढणार कसा? कारण झाड बंगल्याच्या आतमध्ये होतं. बाहेरून कॅमेऱ्याने परवानगी न घेता फोटो काढणं मला  तितकंसं प्रशस्त वाटलं नाही. थोडावेळ कोणी बंगल्यातून बाहेर येतंय का याची वाट बघितली. पण कोणीच आलं आंही. शेवटी मनाचा हिय्या केला- 'जास्तीत जास्त काय होईल? ते लोक फोटो काढायला परवानगी देणार नाहीत.' हा विचार केला आणि बंगल्यात शिरून घराची बेल वाजवली. एका तरुण स्त्रीने दार उघडलं. "मी डॉ पुसाळकर !" अशी माझी ओळख त्यांना करून दिली. (अशावेळी/अशा ठिकाणी  मी डॉ असल्याचा फायदा होतो हे नक्की !) मला मॅग्नोलियाचे फोटो काढायचे आहेत तर तुमची काही हरकत नाही ना? असं विचारताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सहजपणे सांगितलं - "हो. काढा की फोटो! फक्त तुम्ही फोटो काढताय त्या नादात तुमचं लक्ष जाणार नाही...पण आमचा इथे कुत्रा आहे तो कदाचित भुंकेल. तेव्हा घाबरू नका. तो बांधलेला आहे. तो काही करणार नाही." हे त्यांनी इतक्या हसतमुखाने आणि छान सांगितलं की मला धक्काच बसला ! मग कॅमेरा काढून फोटो काढायला सुरुवात केली तर आणखी एक मध्यमवयीन महिला तिथे आल्या. त्यांनी मला झाडावर फुलं कुठे आहेत हे दाखवलं. मी श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच्या लेखाचा उल्लेख केला. त्या त्यांना ओळखत होत्या. ज्यांनी हे मॅग्नोलिया इथे आणलं ते श्री. तुळपुळे या बाईंचे चुलत सासरे! झाड आणि फुलाचे फोटो काढताना लक्षात आलं की  फूल थोडं वरच्या बाजूला होतं आणि आत लपलेलं होतं. खरं तर त्यांच्या  बंगल्याच्या गच्चीवर गेलो असतो तर जास्त चांगले फोटो मिळाले असते. पण हा विचारसुद्धा माझ्या मनात आला याची मलाच लाज वाटली! म्हणजे मऊ दिसलं तर कोपराने खणण्यासारखंच ते झालं असतं ! त्यामुळे मिळतील ते फोटो काढले, झाड आणि फूल अगदी मनभरून पाहिलं.. तुळपुळे कुटुंबाचे आभार मानले आणि एक वेगळंच  समाधान घेऊन बाहेर पडलो!

 
 
 

मॅग्नोलिया विषयी अधिक माहिती- 

                                                                                                                                                    (क्रमश:)






Friday, 27 May 2022

सायकलिंग करता करता ...(भाग १)

                  

                                                                      १

सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे की या ब्लॉग मालिकेचं शीर्षक मला  मच्छिन्द्र कांबळी आणि संजीवनी जाधव यांच्या 'तांदूळ निवडता निवडता' या नाटकाच्या नावावरून सुचलं आहे. माझ्या या मालिकेसाठी हे शीर्षक अगदी चपखल आहे. गेले काही महिने मी नियमितपणे सायकलिंग करत आहे. तो सध्याचा माझा आवडीचा  छंदच आहे ! गिअरची सायकल असूनदेखील गिअर न वापरता मी सायकल चालवतो. त्यामुळे मला २२-२५ किमी इतक्या थोड्या अंतरासाठी तास-दीड तासापेक्षा जास्त वेळ सहज लागतो. सायकलिंग कितीही 'मनाशी संवाद' करणारा व्यायाम असला तरी रोज रोज तोच मार्ग वगैरेचा कंटाळा येतो. काहीवेळा वाटतं -"आज जाऊच नये, दांडी मारावी!" मूळचा आळशी स्वभाव झटकून सायकलिंग सातत्याने करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग  स्वतः लाच आमिषं दाखवावी लागतात काहीवेळा नव्या मार्गाने जाण्याचं आमिष असतं. काहीवेळा लांब अंतर गाठण्याचं आमिष असतं. काहीवेळा मोठा चढ चढून जाण्याचं आमिष असतं. तर काहीवेळा सायकल चालवताना निरीक्षणं करण्याचं असतं -मग ती माणसं  असो वा पुण्यातील पुतळे/म्युरल्स !- यातूनच माझे आधीचे 'सायकलवरून दिसलेले पुणे' हे चार ब्लॉग लिहून झाले. या सगळ्या गोष्टींमुळे सायकल चालवायला एक उद्देश मिळत राहतो आणि मग सातत्य टिकून राहतं.

                                                                            २

असंच एक नवं आमिष मला अनपेक्षितपणे मिळालं ! फार पूर्वी 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये वनस्पतिशास्त्राचे सुप्रसिद्ध अभ्यासक  श्री. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी पुण्यातील झाडांबद्दल एक लेखमाला लिहिली होती. झाडांची माहिती, त्यांचे फोटो आणि पुण्यात ही झाडे कुठे पाहायला मिळतात असं त्या लेखमालेचं स्वरूप होतं. या लेखमालेची कात्रणं मी जपून ठेवली होती पण नंतर नेहमीप्रमाणेच मी याबद्दल विसरूनही गेलो होतो. नुकतीच आवराआवरी करत असताना ही कात्रणं माझ्या बायकोला सापडली. कात्रणं  ठेवायची की टाकून द्यायची असं मला बायको विचारायला आली आणि ती कात्रणं बघून मला अगदी खजिना गवसल्याचा आनंद झाला ! सायकलिंग करण्याचं मला एक नवं प्रयोजनच सापडलं ! १२-१५ वर्षांपूर्वीची त्या लेखमालेतली झाडं अजूनही आहेत का हे सायकलने जाऊन बघायचं, त्यांचा फोटो काढायचा आणि त्यांची माहिती शोधायची हे ते प्रयोजन !  माझ्या पुढील काही ब्लॉग मध्ये अशा झाडांचे फोटो आणि माहिती मी देणार आहे. मला अगदी योग्य वेळी ती कात्रणं सापडली- ऐन वसंत ऋतूमध्ये -म्हणजेच साधारण पणे मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात मी हे फोटो काढले आहेत. अर्थात सगळीच झाडं काही त्या लेखमालेतली आहेत असं नाही. सहज बघता आणखीही काही झाडं दिसली. मग अशा झाडांची ओळख कशी पटवायची? यासाठी मला वनस्पतिशास्त्राच्या दोन प्राध्यापकांची खूपच मदत झाली. त्या म्हणजे खारघर येथील धनश्री बर्वे आणि पुण्यातील सौ. पूनम नगरकर! मी काही झाडांचे अथवा फुलांचे फोटो काढून त्यांना पाठवायचो आणि त्या लगेचच झाडाचं नाव आणि शास्त्रीय नाव कळवत. या दोघींमुळे ही मालिकां पूर्ण करणं शक्य झालं. त्याबद्दल दोघींचेही मनापासून आभार ! 

तर आता ही सायकलिंग करता करता दिसलेल्या झाडांच्या फोटोंची मालिका सादर करत आहे-

(रोज एक या प्रमाणे हीच मालिका मी माझ्या Whatsapp status वरही पोस्ट केली होती, ज्याला चांगला प्रतिसादही मिळाला. त्याविषयी लिहीनच!) 


१) विलायती शिरीष (Samanea saman or Rain tree or Monkey pod tree)

 

 

मार्च एप्रिलच्या काळात जागोजागी ही झाडं अशी बहरलेली बघायला मिळाली. म्हणजे तुमच्या नजरेतून ही झाडं निसटण्याची शक्यता कमीच ! पहिला फोटो सरसबागेच्या बाहेरून काढला आहे तर दुसरा सिंहगड रोडच्या सुरवातीला( दांडेकर पुलापासून पुढे आल्यावर) असलेल्या झाडाचा आहे . 
या झाडाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास - 

सिंहगड रोडच्याच सुरवातीला असच अचानक मला उंबराचं झाड दिसलं. खरं म्हणजे आधी उंबराची फळ दिसली आणि मग ते झाड दिसलं -
२) उंबर ( Ficus glomerata/racemosa) उंबर हे अंजीर प्रवर्गातलं झाड आहे. 
या झाडाची अधिक माहिती -



 

 

मराठीमध्ये बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे ) यांची औदुंबर ही कविता सुप्रसिद्ध आहे-
 

वसंत ऋतूमध्ये बऱ्याच झाडांना नवीन पाने येतात आणि ही ताजी रसरशीत पाने आपलं लक्ष वेधून घेतात. आणि मग एरवी कुठेही दिसणारं ( काहीवेळा नको त्या ठिकाणी उगवून धोकादायक ठरू शकणारं ) पिंपळाचं झाडसुद्धा आकर्षक दिसू लागतं. एखाद्या नववधूच्या हिरव्या शालू आणि चुड्याप्रमाणे झाड वसंत ऋतूच्या स्वागतासाठी तयार वाटू लागतं -
३) पिंपळ ( Ficus religiosa) 
 



पिंपळाविषयी अधिक माहिती -


४) वड (Ficus benghalensis) 
एवीतेवी आपण अंजीर (Ficus) प्रवर्गातील झाडांविषयी बोलतच आहोत तर वडाच्या झाडाचा उल्लेख करावाच लागेल. वडाच्या झाडाविषयी मी माझ्या सायकलिंगच्या आधीच्या ब्लॉगमध्येही बोललो होतोच. वड असं एक व्रतस्थ झाड वाटतं. या झाडाकडे नेहमीच बघत राहावंसं वाटतं. जगाची सगळी रहस्यं या विशालकाय झाडाच्या उदरात दडली आहेत असं मला नेहमीच वाटत आलं आहे. वडाचं झाड म्हटलं की मला एकच शब्द सुचतो-तो म्हणजे ऐसपैस ! इतकं तब्येतीत वाढणारं झाड तसं विरळाच !
वडाच्या झाडाविषयी अधिक माहिती-

 
ताथवडे उद्यानासमोरचं हे लक्षवेधक वडाचं झाड !

आणखी काही झाडांचे फोटो आणि त्यांच्या माहितीसाठी  पुढील ब्लॉगमध्ये भेटूच ! 
                                                                                                                                                 (क्रमश:) 





Wednesday, 5 January 2022

सायकलवरून दिसलेले पुणे !(भाग ४)

                                                                                 १ 

सायकलिंगसाठी मी सकाळी तसा उशीरा जातो. म्हणजे जेव्हा पूर्णपणे उजाडलेले असते तेव्हा ! बरेच लोक अगदी पहाटेच्या वेळी सायकलिंगसाठी बाहेर पडतात. मला अजून तरी ते जमलेलं नाही. इथे दिवसाढवळ्यासुद्धा सायकल  चालवताना जीव मुठीत घालून जावं लागतं तर पहाटेच्या अंधाराची काय कथा! 

सकाळच्या वेळी पुण्याचं एक संमिश्र चित्र बघायला मिळतं. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे एकीकडे धुक्याची चादर लपेटून बसलेलं(की झोपलेलं ?) पुणं दिसतं ते इथल्या बंद दुकानांमधून किंवा पुणेकरांच्या स्वेटर-शाल-कानटोपी-मफलर-स्कार्फ या कडेकोट बंदोबस्ताच्या पेहरावातून किंवा तुलनेनं सकाळच्या वेळच्या कमी असलेल्या गर्दीतून ! क्वचित कुठेतरी शेकोटी पेटलेली दिसते तर काही ठिकाणी भर रस्त्यावर आंघोळीचं पाणी पातेल्यात ठेवून ते लाकडावर गरम करायला ठेवलेलंही बघायला मिळतं.  तर दुसरीकडे पेपरवाले, दूधवाले, हातगाड्यांवरून भाज्या विकणारे भाजीवाले, हातगाडीवर  स्नॅक्स सेंटर चालवणारे आणि त्यांच्या अवतीभोवती गर्दी करून नाश्त्याचा आस्वाद घेणारे (बहुतांशी पुण्याबाहेरचे, पुण्यात शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी!) अशांची लगबग दिसते. यामुळे सकाळीसकाळी सुद्धा पुणे कामाला लागलेलं बघायला मिळतं. 

 या सगळ्यांबरोबर आणखी एक श्रमिक वर्ग बघायला मिळतो तो म्हणजे स्वच्छता कर्मचारी! वाढत्या शहराबरोबर सगळ्यात जास्त वाढ कशाची होत असेल तर ती कचऱ्याची ! 

 

 

 

विशेषतः सकाळी जागोजागी ही अशीच चित्रं दिसतात. तरी पुणे महापालिकेच्या स्वच्छ शहर अभियाना अंतर्गत या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खूप सारे कर्मचारी बऱ्यापैकी मनापासून काम करताना दिसतात. इतकं की पुण्याला देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत बक्षिसं सुद्धा मिळाली आहेत. पण कचऱ्याचा प्रश्नच इतका मोठा आहे की महापालिकेच्या प्रयत्नांना जोड म्हणून काही व्यक्ती/ सामाजिक संस्था देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या आहेत आणि त्यांच्या गाड्यादेखील सकाळी कचरा वेचण्यासाठी फिरत असतात
 
पण कचऱ्याचा  प्रश्न  कधीतरी उग्र स्वरूप धारण करणार असं राहून राहून वाटतं. 


२ 

सध्याच्या पुण्याचे कोणी ड्रोनद्वारे फोटो घेतले तर मोठ्या झाडांची हिरवळ कितपत दिसेल माहित नाही पण हे असं चित्र मात्र हमखास दिसेल-
 

प्रचंड वेगाने एका महानगराच्या दिशेने झेपावणाऱ्या शहराचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे स्कायलाईनवर दिसणाऱ्या या बांधकामांच्या खुणा! अहो शेवटी विकास विकास म्हणजे तरी काय हो! हा असाच असायचा ना! रेडिओवरील सुप्रसिद्ध समालोचक सुशील दोशी  यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य होतं -"आसमान में बादल और नीचे कपिलदेव ! " तसंच काहीसं म्हणता येईल- आसमान में बिल्डिंग कन्स्ट्रक्शन और नीचे सब जगह खड्डे ! सध्या पुणे म्हणजे एक work  in progress चं उत्तम उदाहरण झालं आहे- 
 

 

गेली काही वर्षं पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे मेट्रो ! यामुळे पुण्याचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. मी मेट्रोच्या विरोधात आहे असं नाही पण मेट्रो आली म्हणजे सार्वजनिक आणि एकंदरीतच पुण्याचे वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहेत असं चित्र उभं केलं जातं ते मला पटत नाही. पुण्यात मध्यंतरी बस वाहतूक सुधारण्यासाठी बीआरटीचा प्रयोग करण्यात आला पण तो सपशेल फसला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असावी हे तत्वतः कोणीही मान्य करेल पण प्रॅक्टिकली ते अंमलात आणणं हे अतिशय अवघड आहे. पुणेकरांना स्वतः च्या वाहनांनी प्रवास करायची सवय आहे ती अचानक बदलून सार्वजनिक वाहतूक वापरणं याला वेळ तर नक्कीच लागणार आहे. मेट्रोच्या बाबतीत अर्थात हा प्रश्न आत्ता गैरलागू आहे कारण आत्ता कुठे ती येऊ घातली आहे. पण तिने त्याआधीच पुण्याच्या रस्त्यांचा, प्रसिद्ध लॅन्डमार्क्सचा  ताबा घेतला आहे. आता हेच पहा ना -पुणे महापालिकेची इमारत मेट्रोच्या बांधकामामागे कशी झाकली जात आहे-
 
 
 
हा फोटो गरवारे महाविद्यालयाजवळचा आहे. महाविद्यालयाच्या इतक्या जवळून मेट्रो जाणार आहे की विद्यार्थ्यांचा एक पाय मेट्रोत आणि एक वर्गात असंही करता येऊ शकेल!

मेट्रोच्या कामासाठी पुण्यात ही राक्षसी मशिन्स बघणं हे नित्याचं झालं आहे-
 

सगळीकडची बांधकामं म्हणजेच काँक्रीटचं जंगल, त्यामुळे कमी झालेली झाडं, वाढतं वायू प्रदूषण या व अशा गोष्टींमुळे पुण्याची हवा निश्चितच बदलली आहे. २०२१ मध्येच पुण्यात तब्बल ११ महिने पावसाचे होते, यावरूनच काय ते समजावे ! 

३ 

मला वडाची झाडं खूप आवडतात. त्यांचा तो ऐसपैस घेर, जमिनीत खोलपर्यंत रुजलेली मुळं त्यामुळे मजबूत झालेला पाया, इतस्ततः पसरलेल्या पारंब्या आणि त्या पारंब्यांचं  देखील जमिनीत पुन्हा रुजणं हे सगळंच आवडतं. या झाडाची ऊन वारा पाऊस झेलून ही खंबीरपणे उभं राहण्याची चिकाटी मला आवडते. पुण्यात अजून तरी बऱ्याच ठिकाणी वडाची झाडं दिसतात. देशी विदेशी झाडांच्या स्पर्धेत वडाचं झाड दिमाखात टिकून आहे . 
 

 


आधीच्या ब्लॉग मध्ये मी फोटो काढले आहेत ती ठिकाणंही दिली होती. पण या झाडांचा पत्ता देऊ नये असंच मला वाटतं. न जाणो हा ब्लॉग वाचून एखाद्या कार्यसम्राट विकासकाची नजर त्या झाडांवर पडायची आणि त्या झाडांच्या जागेचा कधी एकदा विकास करतो असं व्हायचं! 

ही झाडं मला स्थितप्रज्ञ, ध्यानस्थ ऋषींसारखी वाटतात. लहानपणी अशा अनेक वर्षे तपश्चर्या करणाऱ्या मुनींच्या गोष्टी वाचल्या आहेत. ही झाडं मला तशीच वाटतात आणि त्यांच्या पारंब्या म्हणजे या ऋषींचा केशसंभार वाटतो. 


ही अनेक पावसाळे पाहिलेली झाडं म्हणजे पुण्यातील बदलांचे, इथल्या स्थित्यंतराचे खरे साक्षीदार! अलिकडच्या काळातील पुण्याचा संपूर्ण इतिहास यांच्या समोरच घडला असणार! कितीतरी रहस्यं या झाडांच्या उदरात दडलेली असतील याची काही गणतीच नाही. शिवाय ही झाडं म्हणजे एक स्वतंत्र परिसंस्था आहे. संख्येने जेवढी ही झाडं जास्त तेवढं शहराचा वैभव ही जास्त असं म्हणायला हरकत नाही! 


पण तरीही विकासाच्या अपरिहार्य रेट्यामुळे या आणि अशा अनेक झाडांवर संक्रांत येते. बऱ्याचवेळा बेसुमार कत्तल तर काही वेळा नको इतकी काटछाट या झाडांच्या वाट्याला येते.


हे झाड पाहून मनात खूप कालवाकालव झाली. केवळ मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून हे झाड असं निर्घृणपणे  तोडण्यात आलं असावं. पण इतका मोठा घाव झेलून देखील झाडांची जगण्याची आणि उमलून येण्याची असोशी पाहून खूप छान वाटलं! एक नवी आशा देणारं हे झाड मला प्रेरणादायी वाटतं.
                                        (समाप्त)
तळटीप:
(सायकलिंगसाठी घराबाहेर पडताना एक रस्ता डोक्यात असतो पण ऐनवेळी दुसरीच वाट खुणावते आणि मग तो नवीन रस्ता धरला जातो. सायकलवरून दिसलेले पुणे या ब्लॉग सीरिज बाबतीत माझं असंच काहीसं झालं आहे. सुरुवातीचे दोन ब्लॉग लिहिल्यावर वाटलं की आपल्याला याहून वेगळं काहीतरी सांगायचं आहे. त्यासाठी पूरक फोटोही नव्हते. मग फोटोंइतकंच लिखाणही आलं. या सीरिज मधल्या तीन ब्लॉगना माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार! सध्या इथेच थांबतो आणि पुन्हा सायकलिंग करायला लागतो!)




Saturday, 25 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे !(भाग ३)

 

पुण्यात क्रीडा संस्कृती चांगली रुळली आहे. क्रिकेट सोडून बाकीच्या खेळांसाठी देखील सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पुण्याची हवा अजून तरी तशी बरी असल्यामुळे सर्वसाधारण पुणेकर सकाळच्या वेळी व्यायामासाठी टेकड्या, बागा, जिम गाठतो. उत्साही लोक मॅरेथॉन सारख्या क्रीडाप्रकारात सहभागी होतात. पुण्यापासून सिंहगड जवळच असल्यामुळे तिथे नियमितपणे जाणारे हजारो लोक आहेत. पुण्यात २०१० साली कॉमनवेल्थ युथ गेम्स भरवण्यात आल्या. त्या नंतर वेगळ्याच कारणाने गाजल्या. परंतु पुण्यात या आणि आधीदेखील  स्पर्धा झाल्यामुळे खेळांसाठीचे इन्फ्रास्टक्चर चांगलं उभं राहिलं आहे. आता यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे किती खेळाडू निर्माण झाले हा एक वेगळा विषय आहे. पण पुणेकरांना खेळात रुची आहे एवढं नक्की! म्हणूनच जागोजागी खेळांविषयक भित्तीचित्रं. बोर्ड्स, पुतळे दिसून येतात. उदाहरणार्थ हे नेहरू स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ आहे-

 
यातला संदेश विचार करायला लावणारा आहे हे नक्की!
 

 
वरील भित्तीचित्रं अप्सरा टॉकीज ते मार्केटयार्ड या नव्याने बांधलेल्या फ्लायओव्हर खाली बघायला मिळतात. 



 

तर हे आणि असेच लक्षवेधक बोर्ड राजाराम पुलावर पाहायला मिळतात. सॅलिसबरी पार्क येथील गुल पूनावाला उद्यानाबाहेर तर सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांचे पुतळे नुकतेच बसवण्यात आले आहेत. तसंच त्या पुतळ्यांखाली त्या त्या आसनाची माहितीही देण्यात आली आहे-


 

 


आपण सायकलिंग करत असताना एक रस्ता पकडतो पण ऐनवेळी आपल्याला दुसराच कुठलातरी रस्ता खुणावतो आणि आपण आपली ठरवलेली वाट सोडून देतो. मात्र हा नवीन रस्ताही तेवढाच इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग असतो. असंच काहीसं माझं या सध्याच्या ब्लॉग्स विषयी झालं आहे. आत्तापर्यंत जे काही फोटो पोस्ट करून झाले आहेत त्यापेक्षा आता  काहीतरी वेगळं सुचतंय. आणि जे सुचतंय ते सगळं फोटोंमधून व्यक्त होईल का नाही याबद्दल मला थोडीशी शंका आहे. त्यामुळे यापुढे  कदाचित थोडे कमी फोटो आणि जास्त लिखाण असं होईल असं दिसतंय ! 
कारण मला पुण्यातील फक्त सुशोभित चौक किंवा जागोजागीचे म्युरल यांचे फोटो दाखवून थांबायचं नाही. 
आपण असं म्हणू शकतो की यापुढे मला सायकलिंग करताना पुण्याबद्दल आलेले विचार शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणार आहे. 
 

ही आमच्या पुण्याची सुप्रसिद्ध मुठा नदी ! हा फोटो मी भिडे पुलावरून काढला आहे. कोणाला हे डबकं वाटेल म्हणून मी म्हात्रे पुलावरून आणखी एक फोटो काढला आहे ज्यात नदीचं खळाळतं(!) पाणी दिसतंय-
 

खरं तर कुठलीही नदी ही निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण घटक असते जिच्यात एक स्वतंत्र परिसंस्था सामावलेली असते आणि तिचा प्रवाहही नैसर्गिक असतो. पण अलीकडच्या अनेक नद्यांप्रमाणे आमच्या या नदीला स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्यात पाणी कधी आणि किती 'सोडायचं' हे वरून ठरतं. वरून म्हणजे खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाण्याच्या साठ्यावरून ! म्हणजे पर्यायाने तिचं नियंत्रण वा तिची सूत्रं पाटबंधारे विभागाकडे असतात. पुण्यात नदी अशीच असायची हे आता पुणेकरांनी नाईलाजाने का असेना पण स्वीकारलं आहे. पुणेकरांसाठी या नदीचे महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे -
१) सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन ( तेही पाटबंधारे खात्याने पाणी सोडल्यावर !) 
२) जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा - राजापूरची गंगा हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो आणि म्हणून ती जेव्हा अवतरते तेव्हा तिचं लोकांना काय ते अप्रूप असतं ! आम्हां पुणेकरांसाठी तितकाच कौतुकाचा भाग म्हणजे वर्षातले ३-४ दिवस जेव्हा आमच्या या नदीला पूर येतो ! सगळ्यात आधी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि या पुराच्या अलौकिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि हे विहंगम दृश्य कॅमेराबंद करण्यासाठी उत्साही पुणेकर लकडी पुलावर गर्दी करतात !
३) वरील दोन्ही फायदे हे सीझनल झाले. पण बारमाही फायदा एकच - नदीत  निर्माल्य टाकणे ! पुणेकर बहुदा क्राईम पॅट्रोल कार्यक्रम जास्त बघत नसावेत. नाहीतर हेच बघाना -
 

 

-हे असे पुरावे मागे ठेवले असते का पुणेकरांनी? की  आपण असं म्हणू या - पुणेकर किती पर्यावरणप्रेमी आहेत ! निर्माल्य (bio degradable!) नदीत टाकतात पण चुकूनसुद्धा प्लास्टिक नदीत टाकत नाहीत ! 

आमच्या या नदीमुळेच पुण्याचं एक unsaid विभाजन झालं आहे-  नदीच्या अलीकडंच आणि नदीच्या पलीकडचं पुणे ! या दोन पुण्यांना जोडणारे अनेक पूल आहेत- लकडी, म्हात्रे, संगम, गाडगीळ, भिडे, झेड ब्रिज इ. पण आम्हां नदीच्या अलीकडे राहणाऱ्यांना उगीचच वाटतं की पलीकडच्यांना नदी ओलांडून इथे यायला फारसं आवडत नाही. अर्थात याला अपवाद आहेत- सणासुदीच्या काळात, विशेषतः गौरी-गणपती, नवरात्र-दसरा आणि दिवाळीत  मात्र सगळं पुणं, ज्याला आम्ही गावात म्हणतो, तिथे खरेदीसाठी लोटतं. आणि हे नदीच्या पलीकडचं पुणं म्हणजे तरी काय- बहुतांश शनिवार, बुधवार,  नारायण, सदाशिव, नवी  या पेठांमधल्या लोकांनी स्थानिक स्थलांतर करून कोथरूड नावाचं उपनगर वसवलं ते! पूर्वी नदीकाठालगत मनुष्य वस्ती होते आणि त्यातूनच संस्कृती उगम पावते असं म्हटलं जायचं. पुण्यात औद्योगिकरणानंतर टाटा- बजाज आणि अम्युनिशन फॅक्टरीमुले एक श्रमिक संस्कृती निर्माण झाली. नंतर आय टी क्षेत्रातही पुण्याने आघाडी घेतल्यावर नदीच्या पलीकडे हिंजवडी आणि या बाजूला खराडी -मगरपट्टा सिटी हे भाग विकसित झाले आणि त्यांच्या आजूबाजूला पुणे विकसित होत गेले आणि शहराचा चौफेर विस्तार झाला. आता पुण्याच्या सीमा इतक्या दूरवर गेल्या आहेत की पुणे आणि मुंबई मिळून एक शहर होईल की काय असं वाटतंय ! पेठांमधून स्थानिक स्थलांतर केलेल्यांच्या पुढच्या पिढीने तर देशाच्या सीमा ओलांडल्या आणि बहुतांश उच्चभ्रू घरांमधली मुलं अमेरिका-कॅनडा, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंग्लंड, मध्य-पूर्वेतील देश इत्यादी ठिकाणी  greener pasture साठी गेली. आणि इथे मागे राहिले आधीच्या पिढीतले ! पुणे पुन्हा एकदा पेन्शनरांचे शहर ओळखले जाऊ लागले असं म्हणत असतानाच दुसरीकडे विदर्भ-मराठवाडा आणि परराज्यांतून मोठ्या संख्येने तरुण पिढी शिक्षण आणि नॊकरीच्या शोधार्थ इथे आली. पुणेकरांच्या हेकेखोर स्वभावाबद्दल खूपदा बोललं जातं. पण पुण्यात आलेल्या या सर्वांना  पुणेकरांनी संपूर्णपणे सामावून घेतलं आहे. इतकं की हे सगळेच पुण्यात चांगलेच मिसळून गेले आहेत. त्यामुळे पुणे एक तरुण, उत्साही शहर बनले आहे. तसंच चांगल्या संधीसाठी जे  पुण्याबाहेर गेले आहेत त्यांनादेखील पुणे मनातल्या कप्प्यातून आपल्याबरोबर त्या त्या ठिकाणी नेलं आहे. अशाप्रकारेदेखील पुण्याचा विस्तारच झाला आहे असं म्हणता येईल! 
                                                                                                                                                    (क्रमश:)