Tuesday 12 December 2017

सिनेमा आणि आठवणी-१

सिनेमा आणि आठवणी-१
कित्येकदा प्रत्यक्ष सिनेमा बघण्याइतक्याच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या प्रसंगांमुळे तो सिनेमा अधिक संस्मरणीय ठरतो. माझ्या बाबतीत हे असं अनेक वेळा घडलंय. त्याचीच ही काही उदाहरणं -
१. मी महाराष्ट्र मंडळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होतो(टिळक रोड). त्यावेळी ती शाळा चौथीपर्यंतच होती. पाचवीपासून पुढे गुलटेकडीजवळ तीच शाळा. चौथीचा शाळेचा शेवटचा दिवस होता. आम्हांला सेंड ऑफ होता. मी कागदाच्या छोट्या चिटोऱ्यावर भाषण लिहिलं होतं( मी कुठलं ? आई बाबांनीच ते लिहिलं असणार!) मला आता आपली शाळा बदलणार, इथे परत कधीच यायचं नाही त्यामुळे हुरहूर वगैरे असं काहीच नव्हतं. कधी एकदा ते भाषण संपवतो असं झालं होतं. वर्गाबाहेर आई-बाबा आणि बहीण आले होते. शाळेतूनच परस्पर जवळच्या अलका टॉकीजला जायचं होतं. आपण वेळेत पोचू ना याची चिंता जास्त ! तर अशा प्रकारे शाळेच्या खाकी गणवेशात मी 'त्रिशूल' पाहिला !

२. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत एक तर आम्ही आमच्या मामा-मावशांकडे किंवा काकांकडे जायचो किंवा आमची चुलत-मामे-मावस-आते भावंडं आमच्याकडे यायची. एकदा आम्ही नाशिकला आमच्या मावशीकडे गेलो होतो. लहान-मोठे सगळे मिळून सहज २०-२५ जण होते. मावशीचं घर रविवार कारंजाजवळ होतं. नदीपासून अगदी जवळ ! एवढ्या लोकांच्या अंघोळी वेळेत उरकण्याचा कदाचित प्रश्न होता. तेव्हा आमच्या बाबांनी शक्कल लढवली. ते म्हणाले जे कोणी नदीवर अंघोळीला येतील त्यांना संध्याकाळी सिनेमा दाखवीन. मग काय! सगळे जण पटापट तयार! आणि मग संध्याकाळी बाबांनी आम्हांला सगळ्यांना 'मि. नटवरलाल' दाखवला !

३. पुण्यात 'रॉकी' सिनेमा (संजय दत्तचा,सिल्वेस्टर स्टॅलनचा नव्हे !) आमच्या निगडीच्या काकांच्या फॅमिली बरोबर पाहिला. संपूर्ण चित्रपटभर मी मुसुमुसू रडत होतो. नाही, संजय दत्तच्या अभिनयामुळे मला रडू येत होतं असं नाही. तर त्यावेळी माझे डोळे आले होते. त्यावेळी एवढा अवेअरनेस नव्हता की डोळे आलेले असताना असं पब्लिक मध्ये जाऊ नये वगैरे !
४. आता विचार करताना असं वाटतं की आम्ही कुठलेही चित्रपट पाहिलेले आहेत ! ते ऐन पावसाळ्याचे दिवस होते. आमच्या घराजवळ त्यावेळी एकच थिएटर होतं- 'लक्ष्मीनारायण' ! धो धो पावसात तिथे(व्होल्गा चौकात) भरपूर पाणी साठायचं. अशावेळी एकदा आम्ही गुडघाभर पाण्यातून वाट काढून, चिंब भिजलेल्या अवस्थेत जाऊन कुठला पिक्चर पाहिला असेल? तर अमजद खानचा 'प्यारा दुश्मन'! (हो... तोच तो- 'हरी ओम हरी' वाला !)
५. कॉलेजच्या पहिल्या वर्षात योगायोगाने शुक्रवारी असं व्हायचं की दुपारच्या जेवणानंतर तब्बल ३ लेक्चर अशा विषयांची ( आणि अशा शिक्षकांची !) असायची की हमखास झोप यायचीच! बरं उघडपणे झोपायचीही सोय नव्हती ! मग सर्व मित्रांनी संपूर्ण विचारांती असा निर्णय घेतला की या लेक्चरना न बसता तो वेळ सिनेमा बघून सत्कारणी लावावा. मग आमचा दर शुक्रवारचा एक रिवाज बनून गेला. जेवणाच्या सुट्टीनंतर कर्वे रोड वरून सायकलने राहुल थिएटरला जायचं ! यातूनच स्टॅलन, ब्रूस ली पासून ते क्लिंट ईस्टवूड, बॉण्ड पटांपर्यंत प्रामुख्याने action movies बघितले. एकदा असाच 'डर्टी हॅरी' बघायला गेलो होतो. थोडा उशीर झाला होता. सिनेमा चालू झालेला होता. मिट्ट काळोखात माझी सीट कुठे आहे हे मी हाताने चाचपडत शोधत होतो. 
अचानक एका माणसाचा कळवळून आवाज आला- 'अहो इथे रिकामी सीट नाहीये हो !' नंतर लक्षात आलं की तिथे एक यंग कपल आलं होतं आणि अनवधानाने मी रिकामी खुर्ची शोधताना... चुकून... जाऊ दे !
तेव्हापासून मी निश्चय केलाय की सिनेमा अगदी पांढऱ्या पडद्यापासून बघायचा !
उशीरा कधीच जायचं नाही!                                                                                                       .... (क्रमश:)

No comments: