Tuesday 12 December 2017

सिनेमा आणि आठवणी ३

सिनेमा आणि आठवणी ३
(या विषयावर बहुदा हे शेवटचंच लिखाण!)
१. आजपर्यंत फक्त एकदाच असं झालंय की एकट्याने एखादा सिनेमा पाहिला आहे. एक फुकट पास मिळाला म्हणून मला एकट्यालाच मंगला थिएटरला जाऊन पाहावा लागला. सिनेमा कुठला? तर 'खुदागवाह' ! फुकट पासमध्ये २-२ श्रीदेवी ! मग का नाही बघणार ! पण खरंच सांगतो खूप कंटाळा आला. सिनेमा भीषणच होता. पण बरोबर कोणी असतं तर कॉमेंट्स टाकून मजा आली असती. जे सिने पत्रकार एकट्याने जाऊन सिनेमे बघतात त्यांच्याबद्दल मला म्हणूनच सहानुभूती वाटते . फक्त एकट्याने कोणताही सिनेमा बघायचा एवढंच नाही तर पुढे त्यावर लिहायचं सुद्धा ! हे सोपं काम मुळीच नाही.

२. काही सिनेमे परगावी पाहिले आहेत. पहिल्या लिखाणात नाशिकचा उल्लेख आहेच. एकदा आमच्या शाळेची ट्रिप औरंगाबादला गेली होती. मला वाटतं ८३-८४ साल असेल. त्यावेळी शाळेने आम्हांला एक नाही तर चक्क २ सिनेमे तिथल्या थिएटरमध्ये नेऊन दाखवले होते ! त्यामुळे अजंठा-वेरूळ बघून झाली नसेल इतकी या सिनेमे बघण्यामुळे ट्रिप संस्मरणीय झाली ! ते सिनेमे होते अमिताभ बच्चनचा 'नमकहलाल' आणि धर्मेंद्र-हेमामालिनी यांचा 'रझिया सुलतान' ! आता हेच सिनेमे का याला काही उत्तर नाही. त्यावेळी ते तिथे थिएटर मध्ये लागले होते हेच खरं कारण !

३. मी मुंबईला खूप सिनेमे पाहिलेले आहेत. माझा मोठा मामा डोंबिवलीला, मधला गिरगावात तर धाकटा मामा (तेव्हा) पार्ल्याला राहत होते. आणि तिथे सगळीकडेच मी सिनेमे पाहिले आहेत. खुद्द मुंबईत सिनेमे बघणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असायचा. गिरगाव आणि मुंबईचा तिथला परिसर मला खूप आवडतो. लहानपणी संध्याकाळच्या वेळी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंट असे आम्ही चालतसुद्धा फिरलेलो आहोत. तो क्वीन्स नेकलेस, व्हीटी स्टेशनचा भाग, ताजमहाल हॉटेल, गेट वे ऑफ इंडिया, मलबार हिल इथे फिरणं म्हणजे धमाल होती. आयुष्यातल्या छान काळापैकी तो काळ होता. ( २००५ साली माझ्या धाकट्या मामाने त्याच्या गाडीतून आम्हांला South Bombay ची सैर घडवली होती. सगळ्या हेरिटेज बिल्डींग दाखवल्या होत्या. येताना आम्ही पेडर रोड मार्गे आलो. तेवढ्यात ' प्रभूकुंज' दिसलं. मला आपली भाबडी आशा वाटत होती की तिथले सन्माननीय निवासी आम्हांला बघून आम्हांला हात दाखवतील. असं अर्थातच काही झालं नाही!) यात आयसिंग ऑन द केक होते सिनेमे ! 
कधी 'मेट्रो' ला A view to a kill किंवा Beautiful People, कधी 'रिगल' ला 'गांधी'!
हिंदीतला 'गांधी' डोंबिवलीतील रामचंद्र थिएटर ला पाहिला होता. 'रिगल' आता बंद झालं हे ऐकून खूप हळहळ वाटली. तसंच 'स्टर्लिंग'ला Home Alone (1) पाहिला होता. तेव्हा इंटरव्हलला मामाने घेऊन दिलेलं भलं मोठं चॉकलेट आईस्क्रीम माझ्या अजूनही लक्षात आहे ! अलीकडे 'न्यू एक्सेलसिअर'ला 'हम आपके है कौन' पाहिला होता तेव्हा आमची भाचे कंपनी प्रत्येक गाण्याला थिएटर मध्ये अक्षरश: नाचली होती ! 'मराठा मंदिर' ला सिनेमा पाहिला होता की नाही हे मला आता नक्की आठवत नाही.पण पाहिला असेल असं वाटतंय पण तो शोले किंवा DDLJ नक्कीच नव्हता हे मात्र पक्कं आठवतंय ! अलीकडे मुंबईला जाणं कमी झालंय. गेलो तरी काही प्रसंगानिमित्त जाणं होतं. म्हणूनच ते वडाळ्याच्या Imax ला काही जाणं झालेलं नाही.
माझ्या मनात एक ambitious प्लॅन आहे. पुण्याहून सकाळी निघायचं. Imax ला सिनेमा बघायचा आणि दादरला पोर्तुगीज चर्चजवळ असलेल्या 'जयहिंद लंच होम' जाऊन मस्तपैकी रावस तंदूर किंवा स्टफ बोंबील वगैरे खायचं आणि संध्याकाळी पुण्याला परत !
बघूया कधी जमतंय ते !

No comments: