Tuesday, 12 December 2017

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुश्रुत आणि श्रीधर !

सुश्रुत बडवे
सुश्रुत: 'सह्याद्री'तून 'सह्याद्री'कडे जाणारा सुह्रद!(७ ऑगस्ट)
तशी मला शाळा फारशी कधीच आवडली नाही. इतरांना असतात तशा मला शाळेबद्दलच्या रम्य आठवणीही नाहीत. अलिकडे शाळेच्या एका whatsapp ग्रुपवर सलील(बर्वे)ने मला add केलं. आणि शाळेतल्या जुन्या मित्रांना ' भेटण्याची ' गंमत अनुभवायला मिळू लागली. अशाप्रकारे मला सुश्रुत बडवे  पुन्हा भेटला. एकदा तो तळजाईला प्रत्यक्षही भेटला. पक्षी निरीक्षण, जंगल या आमच्या समान आवडी! अशाच तळजाईच्या एका भेटीतून मग एकदम अचानक आमची ताडोबाची ट्रिप ठरली. त्यात संजीव(फडतरे)ही आला आणि मग अशा एकत्र ट्रिप्सचा एक सिलसिला सुरु राहिला. यातून सुश्रुतची आणखी ओळख होत गेली.
सुश्रुत एक चांगला आणि नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन आहे हे माहीत होतंच ! पण आपल्याला भेटणारा सुश्रुत आणि 'सह्याद्री' हॉस्पिटलमधला सुश्रुत ही संपूर्णपणे वेगळी व्यक्तिमत्वं आहेत. त्याचा दरारा, त्याच्याबद्दलचा भीतीयुक्त आदर याच्या आख्यायिका मी 'सह्याद्री'मध्ये काम करणाऱ्यांकडून बऱ्याच वेळा ऐकल्या आहेत. अर्थात त्याची शारीरिक ठेवण आणि देहबोलीही तशी त्या आख्यायिकांना साजेशीच आहे ! पण आपल्याला भेटतो तो एकदम मनमोकळा, हसरा, दिलखुलास आणि उत्कट सुश्रुत! तो तुमची चेष्टा-मस्करी करतो. एवढंच नाही तर तुम्हीही त्याची टिंगल टवाळी करू शकता ! याचं कारण सुश्रुत माणसांमध्ये(विशेषतः मित्रांमध्ये) रमणारा आहे.त्याची खूप जणांशी छान मैत्री आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधली किती माणसं त्याने जोडलेली आहेत हे त्याच्या क्लिनिकच्या उद्घाटनाच्या दिवशी अगदी सहज कळून येत होतं.
कित्येक लोकांचं असं होतं की आपलं काम आणि त्यातून मिळणारे पैसे याच्या रगाड्यात ते इतके अडकतात की त्यांना जगण्याच्या बाकी काही गोष्टी असतात हे एक तर माहित नसतं किंवा ते विसरून गेलेले असतात. सुश्रुतचं तसं नाही. पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य आहे - 'पोटापाण्याचा उद्योग तुम्ही जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, संगीत, नाट्य, खेळ या पैकी एखाद्या गोष्टीशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हांला जगवेल. पण या गोष्टींशी जडलेली मैत्री तुम्हांला का जगायचं हे सांगून जाईल.' मला वाटतं सुश्रुत हे अगदी तंतोतंत जगतो. त्याचं डोंगर-दऱ्या, ट्रेकिंग, प्राणी-पक्षी आणि या सगळ्याची फोटोग्राफी यांच्याशी एक अतूट नातं आहे. त्याला याची पॅशनच आहे म्हणा ना! या सगळ्याचं त्याचं knowledge ही जबरदस्त आहे. Given a choice, तो कायमच डोंगर दऱ्यांत झोकून देऊन राहील. पण सध्या ते कदाचित जमणार नाही. म्हणून त्याने त्याचं काम आणि त्याची ही आवड यांच्यात छान समतोल साधला आहे. याबाबतीत तो एकदम sorted आहे. त्याला जशी या गोष्टींची आवड आहे तशीच ती त्याने त्याच्या मित्रांमध्येही रुजवली आहे.म्हणून तो त्याच्या मित्रांना आग्रहाने या गोष्टींसाठी बोलावतो किंवा मित्रांनी त्याला बोलावल्यास कुठलीही खळखळ न करता त्यांना जॉईन होतो.
गिरीप्रेमी लोकांची एक जीवनशैली असते. तशी ती सुश्रुतचीसुद्धा आहे. त्याच्या गरजा अगदी minimum असतात. म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर तो कुठल्याच बाबतीत फारसा आग्रही नसतो. राहण्याची सोय, खाणं-पिणं याबाबतीत तो अजिबात fussy नाही. तो सगळीकडे वेळा पाळतो. एवढंच नाही तर त्याची बायको आणि मुलगीही त्याच्याबरोबर याबाबतीत अगदी तय्यार झालेल्या आहेत.
या वेळ पाळण्यावरून आठवलं. सुश्रुतबद्दलची ही गोष्ट सांगितल्याशिवाय त्याची ओळख पूर्ण होणार नाही. जर तुम्ही सुश्रुतबरोबर विमानप्रवास करणार असाल तर ही गोष्ट तुम्हांला नक्कीच माहित असणं गरजेचं आहे. कुठेही जाण्याच्या दृष्टीने विमान गाठायचं असतं तेव्हा सुश्रुतचं एक वेगळंच रूप तुम्हांला बघायला मिळतं .विमानतळावर पोचून सेक्युरिटी चेक अप होईपर्यंत तो इतका अस्वस्थ, चिडचिडा, बेचैन असतो की काही विचारता सोय नाही! उशीर झाल्यामुळे पूर्वी कधी त्याचं विमान चुकलं होतं की काय माहित नाही ! बरं तो एकटाच अस्वस्थ झाला असता तर गोष्ट वेगळी होती! त्याच्याबरोबर तुम्हांलाच काय, तो इतर सगळ्यांनाच प्रचंड घाई करतो विमानतळावर पोचण्यासाठी ! एकदा तिथे पोचला आणि सगळे सोपस्कार झाले की मग मात्र त्याला विमानात बसण्याची कसलीच घाई नसते ! अगदी त्याच्या नावाचा पुकारा होईपर्यंतही तो एकदम निवांत राहू शकतो !
तर सुश्रुतला आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! Hope येणाऱ्या काळांत त्याच्याबरोबर आम्हांला अनेक जंगल ट्रिप्स करता येतील आणि त्यांचा आणि त्याच्या company चा आनंद घेता येईल !



वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीधर अय्यर ! (२६ ऑक्टोबर)


श्रीधर अय्यर
शाळेतले मित्र मधल्या अनेक वर्षांच्या गॅप नंतर फेसबुकवर किंवा व्हॉटस अँप वर 'भेटतात'. या अलीकडच्या ट्रेंड प्रमाणे श्रीधरही मला त्याच्या ट्रेकिंगच्या फेसबुकवरील  सुंदर पोस्टमधून भेटत होता. नंतर एक दिवस अचानक तो आणि सुवर्णा आम्हांला मुंबई- पुणे- मुंबई (भाग २) या सिनेमाच्या वेळी सिटीप्राईड सातारा रोडला भेटले. तेव्हा पुन्हा शाळेच्या जुन्या आठवणी निघाल्या. पटवर्धन मॅडमनी शिकवलेल्या 'Psalm of Life' या कवितेची आठवणही आपसूकच निघाली. नंतर आम्ही(सुश्रुत आणि संजीवसह) बांधवगढला सहकुटुंब गेलो. त्याआधी एकदा श्रीधरच्या घरीही गेलो. बांधवगढला एकत्र प्रवास केला. येताना तर रेल्वे प्रवासात आम्ही आणि श्रीधर(त्याच्या कुटुंबासह) असा बराच काळ होतो. यातून श्रीधरची थोडी थोडी ओळख झाली. 

श्रीधरने मराठी सिनेमा पाहावा यात खरं तर विशेष असं काही नाही. तो फक्त आडनावापुरता अय्यर आहे. बाकी तो पक्का मराठीच आहे. तो अस्खलित मराठी बोलतो. त्याला कितीतरी मराठी/ हिंदी गाणी, कविता, उर्दू शेर, गझल तोंडपाठ आहेत. त्याने त्याच्या क्षेत्रात करिअर केलं नसतं तर भाषेच्या क्षेत्रात त्याने नक्कीच काहीतरी केलं असतं. त्यातही त्याचं जास्त प्रेम साहेबाच्या भाषेवर आहे. किंबहुना त्याच्यात आणि इंग्रजांमध्ये जे काही साम्य आहे त्यामध्ये इंग्रजी भाषा हा एक प्रमुख मुद्दा आहे. श्रीधरची फोटोग्राफिक स्मरणशक्ती आहे . तो कुठल्याही अनुभवाचे( विशेषतः ट्रेकचे) अगदी जिवंत वर्णन करतो. याचं मुख्य कारण हेच असावं की तो सगळे अनुभव अगदी समरसून घेतो.आणि म्हणूनच त्याच्या लिखाणामधून तो आपल्याला त्या ट्रेकची म्हणा किंवा एखाद्या अनुभवाची सफर घडवतो इतकं ते लिखाण vivid असतं. त्याची इंग्रजी भाषा फक्त समृद्धच नाही तर तिला एक नर्मविनोदी, खुसखुशीत satireची जोड आहे.(हा ही साहेबाचाच गुण !) त्यामुळे त्याचं लिखाण वाचनीय होतं. त्याच्या लिखाणावरून आणखी काही गोष्टी कळतात. एक म्हणजे श्रीधर हा एक जग पाहिलेला माणूस आहे आणि दुसरं म्हणजे He seems to be a well read person! त्याच्या लिखाणातून त्याच्याबद्दल समजलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची आयुष्याची philosophy ! 'वेगवेगळे अनुभव घेऊन स्वतःला समृद्ध करा, materialistic गोष्टींमधून नाही' हे त्याचं तत्त्व तो अगदी तंतोतंत पाळतो.  

श्रीधरच्या वागण्यात एक सहजता आहे. समोरच्या माणसाला तो आपलंसं करून टाकतो आणि म्हणूनच त्याची कोणाशीही मैत्री व्हायला वेळ लागत नाही. बांधवगढहून पुण्याला येताना रेल्वे प्रवासात आमच्या बर्थसमोर एक बिहारी कपल आणि त्यांची तान्ही मुलगी होती. त्या ७-८ महिन्याच्या मुलीला श्रीधरच नाही तर सुवर्णा आणि त्यांची मुलगी श्रीया -तिघेही इतके छान खेळवत होते की काही विचारता सोय नाही ! मी हे असं कधीच करू शकलेलो नाही. याच रेल्वे प्रवासात श्रीधरने अचानक -आपण गाणी म्हणू यात का असं विचारलं. मी ढुढ्ढाचार्यासारखा गप्प होतो. श्रीधर हसत हसत सहजपणे म्हणाला- काय होईल जास्तीत जास्त? आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय परस्पर होईल !(म्हणजे आमचं गाणं ऐकून लोक पैसे टाकतील!) आणि खरंच त्याने गायला सुरुवात केली. मग मीही गाऊ लागलो आणि आम्ही प्रवास मस्त एन्जॉय केला. त्या बिहारी कपलमधल्या नवऱ्यानेही पुण्याला उतरताना आमच्या गाण्याला चक्क दाद दिली! त्याअर्थी आम्ही बरं गायलो असू ! 

श्रीधर आणि इंग्रज यांच्यात आणखी एक साम्य म्हणजे त्याचा लोकशाही या मूल्यावरचा दृढ विश्वास ! शिवाय त्याला debate करायलाही आवडतं. मी त्याच्या debating स्किल्स बद्दल खूप ऐकलं आहे(देव आहे की नाही या विषयावर खूप गरमागरम चर्चा एका ट्रेकला झाली होती म्हणे!) पण मी प्रत्यक्ष अनुभवलेलं  नाही. वादाच्या दोन्ही बाजूंकडचे मुद्दे त्याच्याकडे असतात. Whatsapp वर काही वेळा राजकीय विषयांवर वाद-विवाद होतात. तेव्हा कर्मधर्मसंयोगाने आमची एकच बाजू असते. त्यावेळी तो कुठून कुठून references आणतो आणि समोरच्याशी मुद्देसूद प्रतिवाद करतो. वातावरण थोडं तापतंय असं लक्षात आलं तर तो कुठला तरी शेर/कविता टाकून ताण एकदम हलका करून टाकतो.त्याचा सर्वसमावेशक लोकशाही आणि त्यातून साधला जाणारा विकास यावर विश्वास आहे. सध्या तो आणि मी एका बाजूला आहोत. पण मला खात्री आहे की जरी आमची बाजू बदलली(सध्या तरी ते होईल असं दिसत नाही !) तरीही आमच्यातली मैत्री कायम राहील. 

पुन्हा एकदा श्रीधरला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 

   

No comments: