Tuesday, 29 January 2019

'पर्याय' २०१७: सिनेमा ‘वयात’ येताना...


('पर्याय' या होमिओपॅथी विषयक दिवाळी अंकातील माझा एक लेख)

'राजा हरिश्चंद्रहा दादासाहेब फाळके यांनी केलेला मूकपट 1913 साली आला आणि भारतीय चित्रपट जन्माला आला. त्यानंतर 1931 सालीआलम आराहा चित्रपट आला आणि सिनेमाबोलूलागला. पण सिनेमा वयात केव्हा आला? म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तो प्रगत झाला, कृष्ण-धवलचा रंगीत झाला, सिनेमास्कोप झाला वगैरे हे तर काळानुरूप झालंच.परंतु सिनेमा जे कथानक आपल्यापर्यंत पोचवत असतो त्याचं काय? प्रत्येक वयोगटाचा विचार करून असे किती सिनेमे निर्माण केले गेले? विशेषतः तरुणांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय, त्यांचे प्रश्न, त्यांच्यातले नातेसंबंध-मैत्री, प्रेम इ. त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं हे सगळं केंद्रस्थानी असलेले सिनेमे अलिकडेच बघायला मिळतात. म्हणजे फार तर गेल्या 30-40 वर्षांत! मी हे अर्थातच हिंदी सिनेमाच्या बाबतीत म्हणतोय. पण त्याआधीच्या मोठ्या काळाचं काय? जो काळ हिंदी चित्रपटसृष्टीचं सुवर्णयुग मानला गेला त्याकाळी मात्र तरुण आणि तारुण्य हा विषय अभावानेच दिसायचा. त्याची वेगवेगळी कारणं असावीत असं वाटतं. स्वातंत्र्योत्तर काळ हा तसा भाबडा आशावादाचा काळ होता. आताच्या तुलनेत तर तो काळ अगदी निष्पाप, निरागस म्हटला पाहिजे! तेव्हाचे सिनेमाचे विषय जास्त ध्येयवादी, सामाजिक, कौटुंबिक धाटणीचे होते. मांडणीत साधेपणा होता. त्यामुळे उत्फुल्ल तारुण्याचं कथानक मागेच पडलं असावं.
त्यावेळचे नायक तरी बघा ना कसे होते! त्याकाळच्या टॉप तीनही नायकांच्या (राजकपूर-दिलीपकुमार-देव आनंद) ऐन बहरातले सिनेमे जरी आपण पाहिले तरी त्यापैकी कोणीही कॉलेज-गोइंग तरुण वाटणार नाही. आठवून बघा- राजकपूर... त्याचे सिनेमे... दिलीपकुमार... त्याचे सिनेमे... या तिघांमधला त्यातल्या त्यात चॉकलेट हिरो देव आनंद- त्याचेही 16-24 या वयोगटातल्या नायकाचे  सिनेमे आलेच नाहीत! थोडक्यात हे सगळेच या तरुणपणाच्या भूमिका करण्याच्या वयाचे नव्हतेच! आणि सिनेमे तर त्यांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिले जात. त्यामुळे एक आख्खी पिढी सिनेमाद्वारे तारुण्य-सुलभ स्वप्नरंजन करण्यापासून मुकली. इतरही नट आठवून पाहा. अगदी राजकुमार पासून मनोजकुमार पर्यंत किंवा सुनीलदत्त पासून धर्मेंद्र पर्यंत! सगळेच थोराड दिसायचे. अगदी 1957 सालच्याप्यासासारख्या क्लासिक सिनेमाचं उदाहरण घ्या. त्यातला नायक विजय (गुरुदत्त) आणि नायिका मीना (माला सिन्हा) यांचं प्रेम कसं जुळतं हे फ्लॅशबॅक मधून आपल्याला कळतं. त्यावेळी गुरुदत्त आणि माला सिन्हा दोघेही कॉलेजमध्ये जाणारे दाखवले आहेत. दोघे सायकलवर फिरून गाणं म्हणतात, बॅडमिंटन खेळतात वगैरे. पण दोघेही त्या वयाचे अजिबात दिसत नाहीत. भरीत भर त्यांची वर्गमैत्रीण टुन टुन दाखवली आहे! म्हणजे तर पुढे काही बोलायची सोयच नाही!

तरुणांचा लाडका शम्मीकपूर सिनेमात आला आणि त्याने हिरो या संकल्पनेत खूप बदल घडवून आणले. त्याच्यातल्या प्रचंड एनर्जीमुळे एका जागी खांबासारखे स्थिर उभे राहणारे नायक त्याने हद्दपार केले. त्याच्या अंग घुसळून टाकणाऱ्या नाचण्याच्या स्टाईलने चित्रपटसृष्टी अगदी हलवून टाकली. भाबडेपणा, रडेपणा आणि सच्चेपणा या तीन साच्यांभोवती फिरणाऱ्या नायकांपेक्षा थोडे वेगळे नायक त्याने रंगवले. नायिकेलापटवणंआणि हे करत असताना वेगवेगळ्या ट्रिक्स वापरणं (वेषांतर वगैरे), समाजमान्य चौकटीत राहून तिची छेडखानी करणं, त्याच्यातलं एक शरारती, नटखट मूल हे सगळं त्याकाळच्या लोकांना आवडलं. आणि शम्मीकपूर तरुण आणि तरुणी दोघांच्याही गळ्यातला ताईत बनला.
पण शम्मीकपूर हा त्यावेळचा अपवादच म्हणायचा! बाकी बरेचसे नट आपल्या राजेंद्रकुमारच्या पठडीतले! तरी एका गोष्टीसाठी राजेंद्रकुमारला दाद दिलीच पाहिजे! त्याने एक नाही तर चक्क दोन वेळा कॉलेजकुमारची भूमिका निभावली! एकधूल का फूलसिनेमात तर दुसरीमेरे मेहबूबमध्ये (हो... तोच तो सिनेमा ज्यात नायक-नायिकेने कॉलेजमध्ये एकमेकांना धडकणं, पुस्तकं खाली पडणं आणि त्यातून दोघांनी प्रेमात पडणं वगैरे होतं!)

इतका वेळ आपण फक्त नायकांचा विचार करतोय. नायिकांचं काय? मला वाटतं की त्यावेळी (खरं तर आताही परिस्थिती खूप काही वेगळी नाही) भारतीय समाजावर पुरुषी वर्चस्वाचा, पितृसत्ताक पद्धतीचा तसंच सरंजामशाहीचाही पगडा होता. त्याचंच प्रतिबिंब सिनेमांवरही दिसून येतं. काही सन्माननीय अपवाद सोडल्यास बहुतांशी नायिकांचं (नायकांच्या तुलनेत) सिनेमातलं स्थान तसं डावंच असायचं. नायिकेनं षोडशवर्षीय असावं, आखीव रेखीव असावं, गोरीगोमटी दिसावं, शालीन-सुस्वभावी- संस्कारी असावं, बंडखोर नसावं (आणि हो गृहकृत्यदक्ष मात्र असावं) या मात्र अपेक्षा असायच्याच! या घालून दिलेल्या चौकटीत राहून जे काही करता येईल ते करण्याची मुभा नायिकांना होती. मग यातच तिने अवखळपणा दाखवावा, प्रेमळ रुसवे-फुगवे करावेत, नाच-गाणी करावीत. सगळं करावं, पण चौकट मात्र मोडू नये. कित्येक सिनेमांत अल्लड नायिका दाखवतात. तिचं लहानपण संपून तिने यौवनात पदार्पण केलंय हे तिची मन:स्थिती सांगणाऱ्या गाण्यांवरून आपल्याला कळतं. उदा- 'सपने सुहाने लडकपन के' ('बीस साल बाद'-वहिदा रहमान) किंवा 'भाई बत्तुर' ('पडोसन'-सायराबानू) पण यांच्या स्वप्नातले राजकुमार म्हणजेच नायक कोण? तर विश्वजीत ('बीस साल बाद') आणि सुनील दत्त ('पडोसन')!

हा नायिकांवर भयंकर मोठा (सर्वार्थाने) अन्यायच आहे! म्हणजे आम्ही कसेही दिसणार आणि असणार (म्हणजे अर्थातच नायक), पण तुम्ही (म्हणजे नायिका)  मात्र आम्हांला (म्हणजे पुन्हा नायक!) हव्या तशाच असलं पाहिजे असंच जणू ते सांगू पाहतात!

1970 ते 1980 या दशकात मात्र हळूहळू हे चित्र बदलू लागलं. दशकाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच 1971 साली एक सिनेमा आला-'गुड्डी'!दिग्दर्शक होते हृषीकेश मुखर्जी आणि प्रमुख भूमिका होत्या जया भादुरी, उत्पल दत्त आणि धर्मेंद्र यांच्या! यात कुसुम उर्फ गुड्डी(जया भादुरी)ला तिच्या वयानुरूप सिनेमे बघण्याची खूप आवड असते. पौगंडावस्थेमधल्या गुड्डीचं अभिनेता धर्मेंद्र (’गुड्डीमध्ये धर्मेंद्रने स्वत:चीच भूमिका केली होती) वर क्रश असतो. हे ही तसं या वयाला साजेसंच
https://www.youtube.com/watch?v=nP9AInL_8Q8
पण गुड्डीचं सिनेमा आणि विशेषतः धर्मेंद्रवरचं प्रेम जरा टोकाचंच असतं. अगदी फँटसीच्या पातळीपर्यंत! तिच्या या आभासी जगात ती इतकी मश्गुल असते की प्रत्यक्षात जेव्हा तिला तिच्या वहिनीचा भाऊ नवीन (समित भांजा) लग्नाबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला सांगून टाकते की ती हे लग्न करू शकणार नाही कारण तिचं चक्क धर्मेंद्रवर प्रेम आहे. सिनेमाच्या पुढच्या भागात नवीन आणि त्याचे सायकॉलॉजिस्ट मामा (उत्पल दत्त) गुड्डीला हळूहळू त्या आभासी जगापासून वास्तवाकडे नेतात. ते ही प्रत्यक्ष धर्मेंद्रच्या मदतीने! सिनेमाचं जग आणि प्रत्यक्षातलं जग यातला फरक गुड्डीला छोट्या छोट्या प्रसंगांमधून कळू लागतो. सिनेमाच्या पडद्यामागचं जग हे तसं कंटाळवाणं, सिनेमाचं शूटिंग अतिशय मेहनतीचं, प्रसंगी धाडसाचं असतं. नट-नट्या या प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांसारखेच असतात हे कळल्यावर गुड्डीचं मत बदलतं आणि मग ती नवीनशी लग्न करायला तयार होते. गुड्डी सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे गुड्डीची समजूत घालणं, तिचं मतपरिवर्तन घडवून आणणं हे सगळं मामाजी अतिशय खेळकरपणे, तरीही संवेदनशीलतेने हाताळतात. कुठे धाकदपटशा नाही की जुलूम जबरदस्ती नाही. पौगंडावस्थेत गुड्डीच्या मनात येतात तसे रोमँटिक विचार येऊ शकतात हे स्वीकारून त्यावर तिच्या कलाने घेत ते मार्ग काढतात.

70च्या दशकात आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक कलाकार अवतीर्ण झाला आणि त्याने तोपर्यंतच्या चित्रपटसृष्टीवर आलेली ग्लानि, सुस्ती मरगळ पूर्णपणे झटकून टाकली.आणि त्याने खऱ्या अर्थाने सिनेमाला वयात आणलं. तो कलाकार म्हणजे ऋषी कपूर! वडील राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्यामेरा नाम जोकरया सिनेमात ऋषी कपूरने बाल कलाकार
(लहानपणीचा राजू) म्हणून काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होतीच. त्यात पौगंडावस्थेमधला राजू त्याच्याहून वयाने मोठ्या असलेल्या  शिक्षिकेच्या (सिमी गरेवाल) प्रेमात पडतो आणि ती शिक्षिका त्याचं प्रेम आणि त्याला समजून घेते असं दाखवलंय. पुढे शिक्षिकेच्या लग्नाला राजू जातो आणि (आपलं प्रेमभंगाचं दुःख विसरून) सगळ्यांना हसवतो. इथेच त्याच्या जोकर बनण्याची सुरुवात होते.
1973 साली राज कपूर यांनीबॉबीसिनेमा दिग्दर्शित केला आणि त्याद्वारे एक adolescent लव्ह स्टोरी सादर केली. हिरो म्हणून ऋषी कपूरचा पहिलाच सिनेमा, डिंपल कपाडिया ही पदार्पण करणारी
अभिनेत्री-असे हे फ्रेश चेहरे, नवं संगीत असं वेगळेपण सिनेमात होतं. पहिल्या भेटीत नजरानजर होणं, त्यानंतरच्या भेटीत प्रेम जमणं, प्रेमात शारीरिक ओढ असणं, घरच्यांचा प्रेमाला विरोध आहे हे कळून देखील प्रेमाच्या उसळत्या भावनांना काबूत ठेवता न येणं, घरच्यांशी संघर्ष करणं, त्यामुळेच परिणामांची तमा न बाळगता दोघांनी घरातून पळून जाणं आणि शेवटी घरच्यांनी या प्रेमाला मान्यता देणं अशाप्रकारे या सिनेमाचा प्रवास होतो. कथानक पौगंडावस्थेमधलं आणि नायक- नायिकाही त्याच वयाचे त्यामुळे प्रेक्षकांनाबॉबीएकदम रिफ्रेशिंग वाटला. दिसायला चिकणा, अभिनयात आणि देहबोलीत विलक्षण नैसर्गिक सहजता असणारा आणि उत्तम नाचू शकणारा असा सर्वगुणसंपन्न नायक ऋषी कपूरच्या रूपाने  बॉबी  दिसला आणि पब्लिकने त्याला डोक्यावर घेतलं. त्याच्या नाचण्याची एक वेगळीच शैली होती. त्यातून हे दिसायचं की तो नाचणं मस्त एन्जॉय करतोय आणिनाचणं हे खूप काही अवघड नाही, तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हांलाही ते जमेलअसंच जणू तो त्याच्या नाचातून सांगू पाहायचा! मुलींना आधीच्या काळातल्या थोराड नायकांच्या मानाने या देखण्या ऋषी कपूरच्या रूपाने स्वप्नातला राजकुमारच मिळाला!
बॉबीच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक फॉर्म्युला सापडला. एकबॉबीहिट झाल्यामुळे त्याच पठडीतले अनेक सिनेमे निघाले. ती मालिका तशी अजूनही सुरूच आहे. यातला मुख्य भाग म्हणजे घरच्यांची भिन्न संस्कृती किंवा दोन घराण्यांमधलं वैर असणं. नवोदित चेहरे घेऊन सिनेमे काढण्याचीही  लाट आली (उदा- ’लव्ह स्टोरी’-कुमार गौरव-विजयता पंडित किंवाबेताब’- सनी देओल-अमृता सिंग) श्रीमंत मुलगी (माधुरी दीक्षित) ’गरीबमुलगा (आमीर खान) यांची प्रेम कहाणी- ’दिल’, दोन घराण्यांमध्ये वैर असलेल्या मुलगा आणि मुलगी यांची प्रेमकहाणी- ’कयामत से कयामत तक. भिन्न प्रांतांमधल्या, भिन्न भाषा आणि संस्कृती मधल्या मुलांची प्रेमकथा (’एक दुजे के लिए’ .)  

बॉबीनंतर ऋषी कपूरचे अनेक सिनेमे आले. कॉलेज जीवनावर आधारित ऋषी कपूर-नीतू सिंग या हिट जोडीचा एक चित्रपट होता-’खेल खेल में’. यात कॉलेज जीवन, हॉस्टेल मधल्या गमती जमती यावर आधारित प्रसंग होतेच, शिवाय मित्रा-मित्रांनी हसत खेळत काढलेली एक खोडी किती महागात
पडते याचं एक रहस्यमय वळणही होतं.
ऋषी कपूरच्याच काळात आणखी एक नट (तोही मराठमोळा!) उदयास आला. त्यानेही बालकलाकार म्हणून आधी नाव मिळवलं आणि मग हिरोच्या भूमिका केल्या. तो नट म्हणजे सचिन पिळगांवकर! लहान चणीचा, निरागस चेहरा लाभलेल्या या नटाने रंजिता या नटीबरोबर एक सिनेमा केला होता- ’अखियों के झरोकोसे’. हा सिनेमा अमेरिकन लेखक एरिक सीगलच्यालव्ह स्टोरीया कादंबरीवर आधारित होता. कॉलेजच्या काळात फुलणाऱ्या रोमान्सने सुरू होणारा हा सिनेमा एक शोकात्म वळण घेतो- नायिकेच्या दुर्धर आजाराचं! सचिनने तरुणपणीच्या आणखीही काही भूमिका साकारल्या. (उदा- ’बालिका बधू’, ’गीत गाता चल’, ’कॉलेज गर्ल.)

1974 साली अजून एक ट्रेंडसेटर सिनेमा आला- ’इम्तिहान’! विनोद खन्ना, तनुजा आणि बिंदू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा इ. एम. ब्राथवेट या इंग्रजी लेखकाच्या ’To Sir With Love’ या कादंबरीवर आधारित होता. अर्थात मूळ कादंबरी खूप सरस होती. हा सिनेमा तसा अतिरंजितच होता. सिनेमाचा गाभा हाच होता की एक आदर्शवादी शिक्षक (विनोद खन्ना) एका कॉलेज मध्ये रूजू झाल्यानंतर बेशिस्त, टवाळखोर आणि टग्या मुलांमध्ये सुधारणा घडवून आणतो. विद्यार्थ्यांशी मैत्रीने वागून, त्यांना बरोबरीची वागणूक देऊन तो हे करतो. अशा शिक्षक-विद्यार्थी यांच्या नातेसंबंधांवर पुढेही काही सिनेमे आले. उदा- 1993 सालचा महेश भट दिग्दर्शितसर’ 2005 सालचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शितब्लॅकनागेश कुकुनूरचाइक्बालआमिर खानचातारें जमीन पर. पण याची सुरुवात मात्रइम्तिहानने झाली असं म्हणता येऊ शकेल.
पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये अनिर्बंध ऊर्जा असते आणि म्हणूनच तिचा वापर खेळामध्ये करता येऊ शकतो. खेळ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हिंदीत काही सिनेमे आले. त्यात 1992 सालचा आमीर खानच्याजो जीता वोही सिकंदरचा उल्लेख करावा लागेल. मन्सूर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे तसे वेगवेगळे पदर आहेत. त्यातला एक धागा आहे एकाच शहरामधल्या कॉलेजांमध्ये आर्थिक स्तरामुळे होणारी विभागणी आणि त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेलं तेढ! दुसरा पदर आहे पौगंडावस्थेमधला
संजू (आमीर खान) आणि त्याचे मित्र थोडेसे बेफिकीर, थोडेसे मस्तीखोर, थोडेसे वाया गेलेले देखील असतात! यातच संजूला वाटणारं देविका (पूजा बेदी) बद्दल आकर्षण आणि त्याच वेळी संजूच्याच मित्रांच्या ग्रुप मधल्या अंजलीला (आयेशा जुल्का) संजूबद्दल वाटणारं प्रेम हा आणखी एक धागाही आहे. संजूच्या वागण्यामुळे आणि खोटेपणामुळे त्याचे वडील त्याच्यावर खूपच नाराज असतात. म्हणून तो घर सोडून जातो. त्याचा मोठा भाऊ रतन (मामीक) मात्र समजूतदार आणि घरची जबाबदारी सांभाळणारा असतो. दोन कॉलेजमध्ये असलेल्या खुन्नसचं एक कारण असतं सायकल रेस जी आधीच्यावेळी रतन हरलेला असतो. नंतर योगायोगाने घडलेल्या प्रसंगांमुळे संजूला आपली चूक उमगते. आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि त्याला एक ध्येय सापडतं- सायकल रेस जिंकण्याचं. जी तो सिनेमाच्या शेवटी अर्थातच जिंकतो.
https://www.youtube.com/watch?v=hXxTe-rYHOY

1990 च्याच दशकात कॉलेज जीवनावर आधारित आणखीही काही सिनेमे आले ज्यात हळूहळू हिंसा केंद्रस्थानी होऊ लागली. याचं मुख्य उदाहरण म्हणजे राम गोपाल  वर्मा यांचाशिवाज्यात कॉलेज जीवनातलं  राजकारण आणि त्यात मिसळणारी माफियागिरी हा विषय होता.

नंतर नंतरच्या काळात कॉलेज जीवन आणि त्यातले विद्यार्थी जरा अशक्य कोटीतले आणि बेगडी  वाटू लागले.शाहरुख खान, काजोल, रानी मुखर्जी यांच्याकुछ कुछ होता हैमध्ये जे कॉलेज दाखवलंय किंवा त्यातले कॉलेज जीवनातले प्रसंग दाखवले आहेत तसं कुठे पाहायला मिळतं?! तीच गत 2000 साली आलेल्या शाहरुख खान-अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्यामोहब्बतेंया सिनेमाची! तीच गोष्ट शाहरुख खानच्याचमैं हूँ नामधली किंवा अलिकडच्या ’Student of the Year’ ची ! यातल्या बऱ्याच सिनेमांत दाखवलेले प्रोफेसर किंवा प्राचार्य तर खालच्या पातळीवरचे दाखवले आहेत. (आठवा- मिस ब्रिगांझा (अर्चना पुरण सिंग, तसेच अनुपम खेर- 'कुछ कुछ होता है', चांदनी (सुश्मिता सेन) किंवा सतीश शाह- ’मैं  हूँ  ना’, ऋषी कपूर-’’Student of the Year’) काही प्राचार्य तर एकाच वेळी कॉमेडी आणि व्हिलन दाखवलेले आहेत (उदा- वीरू सहस्त्रबुद्धे-बमन इराणी- '3 Idiots') तरमोहब्बतेंसारख्या सिनेमात प्राचार्य (नारायण शंकर- अमिताभ बच्चन) जवळ जवळ व्हिलनच आहेत.

अलिकडच्या काळातल्या एका चित्रपटाचा वर वर्णन केलेल्या चित्रपटांपेक्षा थोडासा वेगळा चित्रपट म्हणून उल्लेख करावा लागेल. तो आहेउडानजो 2010 साली प्रदर्शित झाला आणि त्याचे लेखक होते अनुराग कश्यप आणि दिग्दर्शक होते विक्रमादित्य मोटवाने. पौगंडावस्थेसारख्या नाजूक काळात broken family असेल तर त्याचा एखाद्या मुलावर कशाप्रकारे परिणाम होतो हे कथानकउडानमध्ये आहे. वडील (भैरव सिंग-रोनित रॉय) अगदी हिटलरच्या वरताण वागणारे, कडक शिस्तीचे, मारहाण करणारे, मुलाला (रोहित-रजत बरमेचा) त्याच्या मनाप्रमाणे करिअर न करू देणारे, त्याचं लेखक बनण्याचं स्वप्न साकार न करू देणारे, आपल्याच इच्छा लादणारे आणि या सगळ्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या मुलाशी आपले नाते उत्तरोत्तर बिघडवत जाणारे असं वडील- मुलगा यांच्या नात्यातला संघर्षाचं चित्रण सिनेमात आहे. दोघांमध्ये संवादाचा अभावच नाही तर विसंवाद आहे. दोघांचं नातं सांधणारी, दोघांमधलं अंतर कमी करणारी आई इथे नाही. रोहितची आई लहानपणीच गेली आहे. दुसऱ्या नात्यातून भैरवसिंगला अजून एक मुलगा आहे पण त्याचीही आई नाही. (आणि हे असं का हे सिनेमात दाखवलेलंच नाही.) चित्रपटाचा एकंदर कल मुलाकडे झुकलाय असं वाटत राहतं. वडिलांची काही बाजू असू शकते असा काही वावच इथे ठेवण्यात आलेला नाही. एखाद्या व्हिलनसारखी त्यांची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. हे इतर सिनेमांच्या बाबतीत ठीक होतं पण अनुराग कश्यप आणि वेगळी वाट चोखाळणाऱ्या दिग्दर्शकाच्या बाबतीत मात्र हे जरा खटकतंच! 
'उडान' सिनेमाच्या ट्रेलरची लिंक देत आहे-
https://www.youtube.com/watch?v=wEJxe2bE-cE

सध्याच्या वरवर भव्य दिव्य दिसणाऱ्या परंतु बऱ्याचशा उथळ आणि पोकळ असणाऱ्या सिनेमांच्या तुलनेत पुन्हा एकदा भूतकाळातल्या एका सिनेमाची प्रकर्षाने आठवण होते. हा सिनेमा म्हणजे 1984 सालचा, प्रकाश झा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा- ’हिप हिप हुर्रे’. सिनेमाची पटकथा गुलझार यांची होती तर राजकिरण, दीप्ती नवल, शफी इनामदार आणि नवोदित निखिल भगत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाची तांत्रिक अंगं कदाचित थोडीशी उणी जाणवतील (कारण सिनेमा तुटपुंज्या बजेटमध्ये केलेला होता) पण सिनेमा जी गोष्ट सांगतो, जो मेसेज देऊ इच्छितो तो मात्र आपल्यापर्यंत परिणामकारकरीत्या पोचतो. ’हिप हिप हुर्रेची गोष्ट रांची या छोट्या शहरात घडते. तिथे एका शाळेत संदीप (राजकिरण) क्रीडा शिक्षक म्हणून रूजू होतो
https://www.youtube.com/watch?v=bksblGRfGo0
संदीप खरं तर कॉम्प्युटर इंजिनियर असतो. पण नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मिळायला वेळ असतो म्हणून मधल्या काळात ही नोकरी पत्करतो. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक-मुख्याध्यापक या सगळ्यांनाच खेळाच्या बाबतीत उदासीनता असते. शाळेने दुसऱ्या प्रतिस्पर्धी शाळेकडून फुटबॉल सामन्यात सपाटून हार पत्करल्यामुळे त्यात आणखी भर पडते. संदीप हळूहळू हे वातावरण बदलतो. ते खेळांसाठी पोषक बनवतो. खेळांत हार जीत
होतच असते, आपली क्षमता आणि कौशल्य पणाला लावणं महत्त्वाचं, खिलाडूपणा महत्त्वाचा हे तो विद्यार्थी आणि शिक्षक यांना पटवून देतो. अर्थात त्याला सगळ्यांकडून सुरुवातीला विरोधच होतो. मुख्य विरोध पौगंडावस्थेमधल्या मुलांच्या एका ग्रुपकडून होतो. त्यांचा प्रमुख असतो रघु (निखिल भगत). रघु बंडखोर मुलगा असतो. त्याला शाळेतलीच एक शिक्षिका अनुराधा (दीप्ती नवल) हिच्याबद्दल आकर्षण असतं. तो तिला शाळेबाहेर भेटण्याचा, तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ग्रुपमधली मुलं शाळेचे तास बुडवून कँटीनमध्ये चकाट्या पिटणं, सिगारेट ओढणं, सिनेमाला जाणं, रस्त्यावरच्या जुगाराच्या अड्ड्यावर पैसे लावून जुगार खेळणं, शिक्षकांना उलट उत्तरं देणं, खेळाच्या तासाला अनुपस्थित राहून खोटं मेडिकल सर्टिफिकेट आणणं हे सगळे उद्योग करत असतात. संदीप या मुलांशी आवश्यक तिथे शिस्तीने, निग्रहाने, आवश्यक तिथे प्रेमाने, आपलेपणाने, समजुतीने, पण नेहमीच संयमाने आणि संवेदनशीलतेने वागतो. यातून तो मुलांबरोबर एक विश्वासाचे नाते निर्माण करतो, त्यांचा आदर्श बनतो. त्यांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनतो आणि त्यांच्यात बदल घडवून आणतो. या मुलांकडे असलेलं फुटबॉलचं कौशल्यही त्याने हेरलेलं असतं. बदल झाल्यानंतर ही मुलं खेळामध्ये त्यांच्यातली ऊर्जा channelize करतात. बंडखोर रघुसुद्धा अंतर्बाह्य बदलतो. या सगळ्या वाटचालीत त्याला अनुराधाची साथ मिळते. शेवटी संदीपच्या मार्गदर्शनाखाली रघुच्या प्रयत्नामुळे त्यांची शाळा फुटबॉल सामना जिंकते. आणि संदीपला अपॉइंटमेंट लेटर मिळाल्याची खबर मिळते. जड अंत:करणाने संदीप शाळा सोडून जातो. पण त्याने रूजवलेलं क्रीडा संस्कृतीचं बीज फळाला येतं. रघु शिक्षण संपल्यावर त्याच शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून परत येण्याचा निर्धार करतो. अशा रीतीने चित्रपट एका सकारात्मक वळणावर संपतो.
पौगंडावस्थेत जितका भावनांचा कल्लोळ स्वाभाविक, तेवढंच आयुष्याला एक दिशा मिळणंही! अर्थात हा मेसेज देणारे काही मोजकेच चित्रपट हिंदी रजतपटवर आले. मुख्यत्वेकरून, हिंदी चित्रपट हा फँटसीच्या विश्वातच जास्त रमतो. आत्मशोध, ध्येय, जीवनविषयक तत्वज्ञान इ. गोष्टींचे तसे ह्या सोनेरी दुनियेला वावडेच! त्याला थोडेफार आपण प्रेक्षकही कारणीभूत असणार... जे विकलं जातं तेच जोमानं बाजारात येतं.
जर लौकिक अर्थानं सिनेमा म्हणजे खऱ्या आयुष्याचा आपल्यासमोर धरलेला आरसाच असतो हे मान्य केलं तर आज ना उद्या हा रजतपट नक्कीच आणखीन वास्तववादी होईल यात काहीच शंका नाही...
निदान तशी आशा तरी करू या!

(तळटीप : या लेखात पौगंडावस्थेवरील सर्वच चित्रपटांचा विचार केला आहे असं अजिबात नाही. याशिवाय आणखीही काही सिनेमे नक्कीच असतील. तसंच विस्तारभयापोटी इथे मराठी सिनेमांविषयी लिहिलेलं नाही. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. जाताजाता फक्त काही मराठी सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो- ’शाळा’, ’दहावी फ’, ’फॅन्ड्री’, ’बालक-पालक’ ’कैरी’ ’सैराट.)
(या सर्व सिनेमांमधल्या गाण्यांविषयी किंवा त्यातल्या संगीताविषयी लिहायचं तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यावर पुन्हा कधीतरी !)


Wednesday, 23 January 2019

'शम्मी कपूर... तुमसा नहीं देखा' अनुवादक :मुकेश माचकर

Shammi Kapoor

"शम्मी कपूरचा पडद्यावर स्फोट होण्याच्या आधीचे नायक अगदीच शामळू होते. मिळमिळीत,गुळमुळीत,अतिआदर्शवादी आणि मचूळ. बिचारे नायिकेशी प्रणयही असा करायचे जणू नाइलाजाने एरंडेल पितोय. ... ज्याच्याकडे पाहून बहकावं, उधळावं, घुसळावं असा कोणी नायकच नव्हता तरुणांच्या डोळ्यांसमोर...." हा ब्लर्बवरचा मजकूर वाचून 'शम्मी कपूर... तुमसा नहीं देखा' हे रौफ अहमद लिखित (मूळ पुस्तकाचं नाव- Shammi Kapoor- The Game Changer) आणि श्री. मुकेश माचकर अनुवादित पुस्तक लायब्ररीतून लगेच घेतलं आणि जवळजवळ एका बैठकीत वाचून संपवलं.  ब्लर्बवर असलेली भाषा ज्यांना मुकेश माचकरांची 'म.टा' पासूनची लिखाणाची खमंग  शैली माहित आहे त्यांच्यासाठी नवी नाही. अर्थात या पुस्तकाच्याबाबतीत बोलायचं तर मुकेश माचकर स्वतंत्र लेखक नसून एका अनुवादकाच्या भूमिकेत आहेत. पण तरीही या पुस्तकाच्या लिखाणाला  एक ओघ आहे आणि त्यामुळे ते खाली ठेवावंसं वाटत नाही.

श्री माचकर प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणेच माझाही शम्मी कपूर यांच्याबरोबर कधीच वास्ता नाही आला. आता विचार करता लक्षात येतंय की मी त्यांचा एकही सिनेमा थिएटर मध्ये पाहिलेला नाही. कारण मीही ७० च्या पिढीचा म्हणजेच राजेश खन्ना-अमिताभ च्या पिढीचा प्रतिनिधी! पण पुस्तक वाचताना माझ्या लहानपणी आमच्या सोसायटीत त्यावेळी राहणाऱ्या रोहित दंडवते या आमच्या परिचिताची खूप आठवण आली. तो माझ्याहून ६-७ वर्षांनी मोठा असेल. अतिशय हुशार पण तरीही पुस्तकी किडा वगैरे नव्हता. एकदम मिश्किल, मार्मिक बोलायचा. त्याला शम्मी कपूर खूप आवडायचा आणि तो आम्हांला शम्मीच्या 'जंगली', 'काश्मीर की कली', 'तीसरी मंझिल' मधले प्रसंग, त्यातली गाणी वगैरेंबद्दल छान रंगवून सांगायचा. (त्याने तेव्हा असंही सांगितलं होतं की शम्मी कपूरच्या प्रत्येक सिनेमात एक गाढव दाखवतातच! खरं खोटं माहित नाही ) तेव्हा पहिल्यांदा शम्मी कपूरबद्दल कळलं. आणि हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे ही लक्षात आलं. त्यानंतर दूरदर्शनवर पाहिलेले शम्मी कपूरचे सिनेमे आणि त्याच्या समकालीन नटांचे सिनेमे यांच्यात कळत-नकळत तुलना होऊ लागली. शम्मी कपूरचा सळसळता उत्साह, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैली आणि हिरॉईनला पटवण्यासाठी त्याने केलेले नटखट प्रयत्न आवडून गेले. त्यातुलनेत बाकीचे अभिनेते मेंगळट, शेळपट किंवा 'यांना जाऊन कोणीतरी गदागदा हलवा रे'या प्रकारचे वाटले.
पुस्तकात शम्मीचा संपूर्ण जीवनपट उलगडून मांडलेला आहे. म्हणजे त्याचा फक्त वैभवशाली काळच नव्हे तर त्याचा 'तुमसा नहीं देखा' येण्याच्या आधीचा स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा संघर्षाचा काळ आणि 'अंदाज' नंतरचा पडता काळ याबद्दलही सविस्तरपणे लिहिण्यात आलं आहे. राज-दिलीप-देव या त्रिकुटासमोर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणं आणि ते सुमारे दशकभर टिकवून ठेवणं ही खरं तर एक अद्भुत गोष्ट आहे. ती सहजसाध्य गोष्ट नव्हे. एक प्रकारे कालसुसंगत बंडखोरीच ती ! त्याकाळाबद्दल, शम्मीच्या त्यावेळच्या सिनेमांबद्दल, त्या सिनेमांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल पुस्तकात सुंदर वर्णन आहे. शम्मी कपूरसह वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखतींमधून हा चरित्रपट उलगडतो. त्यामुळे पुस्तकाला एक अनौपचारिक संवादाची शैली आहे. मुख्य म्हणजे पुस्तकात कुठेही शम्मी कपूरचे दैवतीकरण करण्यात आलेले नाही. त्याच्या अभिनयाबद्दल पुस्तकात उदात्तीकरण नाही, त्याच्या फ्लर्टींग, बायकांच्याबाबतीतला रंगेलपणा, दारू इ बद्दलचे संदर्भ वेळोवेळी येत राहतात आणि त्यातून शम्मी कपूरही एक माणूसच होता हे ठसत राहतं. पण एक आहे की त्याने या कुठल्याही गोष्टी नाकारल्या, लपवल्या असं दिसत नाही. जे काही आहे ते त्याने खुलेपणाने मांडलं आहे. तो एक रसरशीत आयुष्य जगला. निवृत्तीनंतरचं  अध्यात्म आणि त्यानंतर इंटरनेट फारसं कोणाला माहित नसण्याच्या काळात त्याने या क्षेत्रात घेतलेला रस आणि केलेलं काम विस्मयकारक आहे.
शम्मी कपूरचा थिएटर मध्ये सिनेमा पहिला नसला तरी त्यांना 'पंचममॅजिक' च्या पुण्याच्या कार्यक्रमात मी प्रत्यक्ष पाहिलं होतं हे पुस्तक वाचताना आठवलं. आपल्या स्वतंत्र नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेला, चैतन्यमयी अभिनेता व्हील-चेअर वर बघून कसं तरीच वाटलं होतं. आदल्याच दिवशी ते डायलिसीस घेऊन आले होते. पण चेहरा मात्र प्रसन्न होता. डोळ्यात चमक होती आणि छान मूडमध्ये ते गतस्मृतींना उजाळा देत होतो. पुण्यात १९५० च्या आगेमागे मधुबालाच्या सिनेमाचं शूटिंग चोरून बघायला ते आले होते. आणि त्यांच्याबरोबर होते झुल्फिकार अली भुट्टो! 'तीसरी मंझिल' च्या रेकॉर्डिंगचा प्रसंग, जो पुस्तकातही आहे, तो त्यांनी अगदी 'दिवाना मुझसा नहीं' हे गाणं गाऊन आणि ते ज्यावर आधारित आहे ते मूळ गाणं गाऊनही दाखवलं होतं. याच सुमारास पत्नी गीता बालीच्या मृत्यूनंतर तीन महिने बंद केलेलं शूटिंग पुन्हा चालू केल्यावर लगेचच 'तुमने मुझे देखा' हे अतिशय भावस्पर्शी गाणं शूट करताना कोणत्या भावावस्थेतून ते गेले असतील याबद्दलही ते बोलले होते.
पुस्तकाचा अनुवाद माचकरांनी चांगला केला आहे. आपण अनुवादित पुस्तक न वाचता एक स्वतंत्र पुस्तक वाचत आहोत असं वाटतं हे त्या अनुवादकाचं यश! काही ठिकाणी त्यांनी स्वतःची मतं देखील मांडली आहेत.
शेवटेसरती पुस्तकात काही गोष्टी खटकतात. काही वेळा काही प्रसंगांची किंवा वाक्यांची पुनरावृत्ती होते जी रसभंग करते. तसंच काही तपशिलाच्या चुका आहेत. 'चायना टाऊन' या सिनेमाची नायिका पद्मिनी नसून शकीला आहे तर त्याच सिनेमाचे संगीतकार शंकर- जयकिशन नसून रवी आहेत. पुस्तकाच्या शेवटी शम्मी कपूरची चित्रसंपदा देण्यात आली आहे. मात्र त्यात १९८७ सालच्या गुलझार दिग्दर्शित 'इजाजत' या सिनेमाचा उल्लेख नाही. त्यात शम्मी कपूरने महेंदर( नासिरुद्दीन शाह) च्या आजोबांची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका केली होती.

हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असं मी निश्चितच सांगेन...

Saturday, 19 January 2019

'भाई : व्यक्ती की वल्ली' (सिनेमा)च्या निमित्ताने....



'भाई' सिनेमा येऊन दोन आठवडे झाले तरीही अजून त्यावरील (बहुतांशी नकारात्मक) चर्चा/वाद  थांबत नाहीत. म्हणून अजूनही माझे मत मांडायला खूप काही उशीर झाला आहे असं मला वाटत नाही. 
सर्वप्रथम हे सांगतो की माझ्या पिढीतल्या सगळ्यांप्रमाणेच माझे देखील पु. ल. देशपांडे हे अत्यंत आवडते लेखक आहेत. माझा एक मोठा काळ त्यांच्या लिखाणामुळे खूप आनंदात गेला याचं ऋण कायमच माझ्या मनात राहील. (माझा ब्लॉग नंबर १०२ हा पुलंवर त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेला आहे. तो ही आपण वाचू शकता.)


आता सिनेमाविषयी आणि त्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांविषयी-

१) बऱ्याच जणांना सिनेमात पु. ल. देशपांडे सिगरेट ओढताना (तेही त्यांच्या आई समोर !) आणि दारू पिताना दाखवले आहेत हे खूपच खटकलं आहे. मला दारू सिगरेटचं समर्थन करायचं नाही (स्वतः चे कौतुक म्हणून नाही पण तरीही सांगतो -आजवर मी या गोष्टी कधीच शिवल्या नाहीत) पण जर पु ल स्वतः या गोष्टी करत होते तर ते दाखवण्यात गैर काय आहे हे मला कळलेलं नाही. आणि मुख्य म्हणजे याबाबतीत पु ल मोकळेपणे बोलत/ लिहीत असत. त्यांच्या 'अंतू बर्वा' या कथाकथनाच्या ऑडिओ मध्ये त्यांनी सुरुवातीलाच हे सांगितलं आहे की ते बापू हेगिष्टेच्या दुकानात सिगरेट आणायला गेले होते तिथे त्यांना पहिल्यांदा अंतू बर्वा भेटले. त्यांनी हे इतकं सहज सांगितलं आहे की असं वाटावं की ते एखाद्या किराणा मालाच्या दुकानात काही सामान आणायला गेले होते! म्हणजे या सांगण्यात काही चोरी-छुपेपणाचा अंशसुद्धा नाही !कथाकथन ऐकणाऱ्या श्रोत्यांसमोर तेव्हा ही गोष्ट उघडच झाली ना ! म्हणजेच जी गोष्ट सगळ्यांना माहीत आहे ती लोकांसमोर मांडल्याने असा काय फरक पडतो?
 ('अंतू बर्वा'ची लिंक देत आहे. कृपया २.१४ मि ऐकावे)
https://www.youtube.com/watch?v=JRs0PxdLC6o

तसंच पु. लंनी मदिरा आणि मदिरापान याविषयी त्यांच्या प्रवासवर्णनांत रसिकतेने लिहिलेलं आहे. त्यांनी आयुष्याचा मनमुराद आस्वाद घेतला. पण मला नाही वाटत या गोष्टींमुळे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतात वा त्यांच्या लिखाण किंवा इतर क्षेत्रांतील कर्तृत्व आणि मुशाफिरीवर या गोष्टींमुळे उणेपणा येतो. 

२) मला असं वाटतं की इतर कुठल्याही चित्रपटापेक्षा या सिनेमाच्या बाबतीत खूपच चिकित्सा केली जात आहे. छोट्यातल्या छोट्या तपशिलाच्या चुका दाखवून दिल्या जात आहेत.याचं मुख्य कारण लोकांच्या मनांत अजूनही पुलं हे आराध्यदैवतच आहेत ! आणि मराठी माणूस त्याच्या दैवताबद्दल काहीही 'वावगं' ऐकायला/बघायला तयार होण्याची शक्यता तशी कमीच! आपल्याला महात्मा गांधी किंवा नेहरूंविषयी चर्चा करण्यात काहीही प्रॉब्लेम नसतो(अगदी त्यांच्या खाजगी आयुष्यासकट!) पण पुलं (आणि इतर काही मराठी व्यक्तिमत्वे यांच्या) बद्दल आपण नको इतके हळवे होतो. या सगळ्याच (मराठी) व्यक्तिमत्वांची चिकित्सा करता येत नाही. अजून आपण दारू/सिगरेट यातच अडकलो आहोत तर पुलंच्या साहित्याविषयी आणि ते कालातीत आहे की  नाही यावर  साधकबाधक चर्चा/समीक्षा होणार तरी कधी आणि कशी? 

३) सिनेमाबद्दल लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात सिनेमा वेगळा असणं यात एक तफावत आहे याचं एक कारण मला वाटतं की सिनेमात बऱ्याचवेळा सुनीताबाई देशपांडे यांच्या 'आहे मनोहर तरी' चे संदर्भ/प्रसंग  येतात किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून सिनेमातील  प्रसंग दिसतात. खरं तर सिनेमात पुलं आणि सुनीताबाई यांचं उमलत जाणारं नातं खूप छान पद्धतीनं मांडलंय. पुलंचा वेंधळेपणा,विसरभोळेपणा,एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वतः मध्ये रममाण असणं, त्यांच्यातली निरागसता हे छान दाखवलं आहे. पुलं आणि सुनीताबाई यांच्या पती- पत्नी या नात्यामध्ये मूल आणि आई या नात्याचा पोत दाखवणं हे खरं तर अवघडच! पण तेही सहजपणे येतं.उदा - 'अंमलदार' नाटक लिखाणाच्या प्रसंगात लहान मुलाला कसं -तू अमुक अमुक केलंस तर तमुक तमुक देईन- सांगतात, त्याच पद्धतीनं सुनीताबाई पुलंकडून एका रात्रीत नाटक लिहून घेतात. 

४) 'आहे मनोहर तरी' मुळे सर्वप्रथम लोकांना पु ल या त्यांच्या प्रिय दैवताची मानवीय बाजू समजली आणि धक्का बसला. (पहिल्यांदा वाचल्यावर त्यावेळी मलाही तो बसला होता) पण आजही लोकांना तसाच धक्का बसत आहे  हे बघून सखेद म्हणावं लागेल की 'आहे मनोहर तरी' कदाचित शहरो-शहरी (वा गावो गावी) गेलं, लोकांनी वाचलं पण लोकांच्या मनापर्यंत पोचलं नाही. ते म्हणावं तसं स्वीकारलं गेलं नाही. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं. या पुस्तकाची आवृत्ती संपली असेल तर ती नव्याने उपलब्ध व्हावी असं वाटतं. 

५) सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या मैफिलीबद्दलही बरेच आक्षेप घेण्यात आले आहेत. पण मला तर हा प्रसंग पटकथाकार- संवादलेखक आणि दिग्दर्शकाचा खास टच म्हणून अफलातून वाटतो. बायोपिकमध्ये जुना काळ फक्त केशभूषा, वेशभूषा, नेपथ्य यातूनच उभा करायचा नसतो तर तो काळ, त्यामधील लोकांचे नातेसंबंध हे देखील लोकांसमोर आणायचं असतं. काय काळ असेल पुलं आणि भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांचा ! सगळेच ऐन उमेदीत... बहरत असणारे ! आणि जिवाभावाचे मित्र देखील! त्यांच्यात निखळ मैत्री होती आणि निकोप स्पर्धाही ! आपल्याला कोणालाच हा काळ प्रत्यक्षात अनुभवता आलेला नाही. पण या सगळ्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न या शेवटच्या मैफिलीतून करण्यात आला आहे. आणि हा केवळ दृक अनुभव नाही तर श्राव्य अनुभवसुद्धा आहे ! त्या तीन दिग्गज कलाकारांच्या आवाजाशी साधर्म्य असणारे जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे आणि भुवनेश कोमकली यांच्या बहारदार गाण्याने या प्रसंगात आणखी रंगात निर्माण होते.(यासाठी संगीतकार अजित परब यांनाही श्रेय जाते !) सिनेमात हा प्रसंग बघताना मंगेश पाडगांवकर यांचे शब्द उसने घेऊन म्हणावंसं वाटतं- 'भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा' ! त्यामुळे हा प्रसंग बघत असताना हिराबाई टाळ्या कशा वाजवतील, त्यांच्या घरात दारूच्या बाटल्या कशा? या गोष्टी मनात आल्यासुध्दा नाहीत ! 
बरं या मैफिलीचा पुलंच्या लेखक म्हणून जडणघडणीशी काही संबंध आहे का? नक्कीच आहे. सर्जनशीलतेसाठी समृद्ध अशा वातावरणात पुलं राहिले त्याचा त्यांच्या लिखाणावर नक्कीच सकारात्मक परिणाम झाला असेल.

६) ज्यांनी या सिनेमावर इतके आक्षेप घेतले आहेत त्यांनी हेही विचारात घ्यावं की हा सिनेमा एक बायोपिक आहे. म्हणजे या दिग्दर्शकाला पु ल जसे उमगले/ भावले तसे त्याने ते मांडायचा प्रयत्न केला आहे. ही पुलंवरची डॉक्युमेंटरी नव्हे! त्यामुळे सिनेमात अपेक्षित असतं तसं नाट्य निर्माण करण्यासाठी थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेणं स्वाभाविक आहे. त्यात काही गैर नाही. या सगळ्याचा हेतू(intent) महत्त्वाचा ! आणि दिग्दर्शक आणि सगळ्याच टीमचा हेतू प्रामाणिक आहे यात काहीच शंका नाही. 

७) मला असं वाटतं की 'भाई' हा सिनेमा एक स्वतंत्र कलाकृती म्हणून बघितला जावा. त्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत आणि त्यांचे आधीचे चित्रपट कसे वाईट होते. म्हणून हाही सिनेमा वाईट आहे असे निष्कर्ष काढू नयेत. किंवा या सिनेमाची तुलना 'आणि डॉ काशिनाथ घाणेकर' शीही  करू नये. कारण असं करणं म्हणजे या सिनेमाकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघण्यासारखं आहे आणि ते सिनेमावर अन्यायकारक आहे.
(ज्यांनी अजून 'भाई : व्यक्ती की वल्ली'(पूर्वार्ध) हा सिनेमा पाहिलेला नाही त्यांच्यासाठी सिनेमाच्या ट्रेलरची लिंक देत आहे )-
https://www.youtube.com/watch?v=FbcKVZ1IPDw

Thursday, 3 January 2019

आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि मेलडी....

( ४ जानेवारी २०१९... संगीतकार आर डी बर्मन यांना जाऊन २५ वर्षे झाली. त्यानिमित्त लिहिलेला हा ब्लॉग)

आर डी बर्मन 

लता मंगेशकर 



असं म्हणतात की आशा भोसले यांनी कधीतरी आर डी बर्मन यांना
लटक्या रागात / तक्रारीच्या सुरात सांगितलं होतं की ते नेहमी चांगली गाणी लता मंगेशकर यांनाच देत. ही त्यांची तक्रार खरीच होती की काय असं वाटावं इतकी सुंदर गाणी आर डी साठी लता मंगेशकर यांनी म्हटली आहेत. त्यापैकीच काही गाण्यांवर आधारित हा ब्लॉग-
(इथे विस्तारभयापोटी फक्त सोलो गाण्यांचाच विचार करण्यात आला आहे !)

 १) पहिलं गाणं अर्थातच आर डी च्या पहिल्याच चित्रपटातलं- छोटे नवाब(१९६१) मधलं ! या सिनेमात लता मंगेशकर यांची २ सोलो आणि २ डुएटस आहेत. मोहम्मद रफी यांची २ सोलो आणि शिवाय एक डुएट शमशाद
बेगम बरोबर आहे. 
तरीही या सिनेमातलं एकच  गाणं अजूनही त्या सिनेमाची ओळख बनून राहिलं आहे. ते म्हणजे - 'घर आजा घिर आई बदरा सावरिया'. गंमत म्हणजे इतकं नितांतसुंदर गाणं सिनेमात नायिकेच्या (अमिता) तोंडी नाही. तर ते शीला वाझ या नर्तकीवर चित्रित करण्यात आलं आहे.

                                                                           
अर्थात या गाण्यातून नायिकेच्या मनातील काहूर आणि हुरहूर या भावना  पुरेपूर व्यक्त होतात. अतिशय गोड अशा मालगुंजी रागावर आधारित ही रचना. रूपक तालात बांधलेली. गाण्यात जयराम आचार्य यांनी सतार वाजवली आहे. त्याचबरोबर गाण्यात सारंगी आणि घुंगरांचा आवाज येतो- ज्यावरून लक्षात यावं की  हे गाणं म्हणजे मुजरा आहे. बाहेर पाऊस भरला आहे.. रात्रीची वेळ... विजा चमकत आहेत. नायिका घरी एकटीच आहे... तिला एकटीला घर खायला उठतंय !खिडकीपाशी ती पावसाचा आवाज ऐकत उभी आहे आणि तिच्या डोळयांतून देखील अश्रूंचा पाऊसच वाहत आहे... नायकाचा  विरह तिला सहन होत नाही. तो येईल याची वाट बघणंदेखील तिला असह्य होतंय. आणि नायक मात्र...
या गाण्यात 'टप टिप' या जागेवर एक नाजूकसा ठेहराव आहे जो गाण्याला एका वेगळ्याच उंचीला नेऊन ठेवतो.
साधारणपणे आपल्याला या गाण्याची दोनच कडवी माहित आहेत. पण आणखी एक कडवं आहे (जे खरं तर पहिलं कडवं आहे)  इथे या गाण्याची लिंक देतोय त्यात ही तिन्ही कडवी समाविष्ट आहेत -
https://www.youtube.com/watch?v=_kH3dseWuAU

२) 'ओ मेरे प्यार आजा'- भूत बंगला(१९६५)
नावावरून हा सिनेमा भयपट वाटतो. तसाच तो एक विनोदी चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. यात मेहमूद बरोबर आर डी नेही काम केलं होतं. सिनेमातली 'आओ ट्विस्ट करें' (मन्ना डे ) आणि 'जागो सोनेवालों' (किशोरकुमार ) ही अतिशय गाजलेली गाणी ! पण यात लता मंगेशकरांचं हे एकमेव सोलो गाणं देखील उठून दिसतं. गाणं तनुजावर चित्रित करण्यात आलं आहे. गाणं सुरु होताना थोडासा एको इफेक्ट आहे. नंतर लताबरोबर गिटारची संगत सुरु होते ती अगदी शेवटपर्यंत ! अंतऱ्यात सूर वरच्या पट्टीत असल्यामुळे तसं हे गाणं गायला अवघडच ! ओ... मेरे... प्यार... आजा या शब्दांशी केलेला नजाकतदार खेळ खूपच छान आहे. गाण्याच्या चित्रीकरणातली   एक गोष्ट मात्र खटकते. गाण्यात तबला व्यवस्थित ऐकू येतो. मात्र पडद्यावर तबला/ तबला वादक कुठेही दिसत नाहीत ! सगळे पाश्चात्य वादक दिसतात ! गाण्याची लिंक - यात सुरुवातीला सुप्रसिद्ध निवेदक आमीन सयानी यांचं गमतीशीर निवेदनही आहे-
https://www.youtube.com/watch?v=RaPA2TLobQk


३) 'किस लिये मैंने प्यार किया'-दि ट्रेन (१९७०)

या गाण्यातही पुन्हा विरह... वाट बघणं  आहे. नायिका (नंदा) नायक (राजेश खन्ना) च्या भेटीसाठी आतुर...अधीर आहे. ती त्यासाठी साज शृंगार करून तयार आहे. कोणत्याही क्षणी तो येईल आणि ठरलेल्या भेटीचा वादा पूर्ण करेल  अशी तिला आशा आहे. पण तिचा तिलाच असाही प्रश्न पडतो -खरंच येईल ना तो? की भेट होणारच नाही ? अशा त्या काळच्या स्त्रीसुलभ भावनांवर आधारित हे गाणं. नंदासारख्या सोज्वळ नायिकेसाठी एकदम चपखल! गाण्यात दोन्ही कडव्यात दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत कोमल स्वरांच्या वापरामुळे नायिकेच्या अस्वस्थ अवस्थेचं यथार्थ दर्शन घडतं.
खरं तर 'दि ट्रेन' मध्ये 'गुलाबी आँखे जो तेरी देखी'हे रफीचं लोकप्रिय गाणं, 'मैंने दिल अभी  दिया नहीं 'हा आशा भोसले यांच्या आवाजातला कॅब्रे, 'ओ मेरी जा मैंने कहा' हे आर डी- आशा यांचं जबरदस्त गाणं, 'सैय्या रे सैय्या 'हे अरुणा इराणीवर चित्रित गाणं तसंच रफी लता यांचं डुएट असूनदेखील हे सॉफ्ट, सोज्वळ, शांत गाणं मनात घर करून राहतं.
https://www.youtube.com/watch?v=Z1nYnTWP5TY

४) 'जिया लागे मोरा ना जा'-बुढ्ढा मिल गया (१९७१)

आर डी बर्मन यांच्या मेलडीबद्दल  विचार करत असताना खमाज रागाचा उल्लेख न करणं हे अगदीच अशक्य !  हे गाणं खमाज रागावर आहे. याच सिनेमात 'आयो कहा से घनश्याम' हे मन्ना डे यांच्या आवाजातलं खमाज रागावर आधारित आणखी एक गाणं आहे. शिवाय सिनेमातली ' भली भली सी एक सूरत' (किशोर-आशा) आणि 'रातकली एक ख्वाब में' (किशोरकुमार) ही गाणी देखील सुप्रसिद्ध आहेतच ! पण या गाण्यांमध्ये देखील लताचं हे सोलो गाणं लक्षात राहतं. थोडीशी ठुमरी किंवा उपशास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारी चाल... त्यातही 'ना' या शब्दाशी केलेल्या लडिवाळ हरकती... गाण्यातले आलाप आणि पुन्हा एकदा सूक्ष्मसा ठेहराव ! सगळंच मोहक !
गाण्याची लिंक-
https://www.youtube.com/watch?v=9zxjUNb56ZI

लता मंगेशकर आणि आर डी बर्मन 


५) 'रैना बीती जाये' -अमर प्रेम (१९७२)
तथाकथित बदनाम वस्तीतून दारू पिऊन अडखळत पावलं टाकत जाणारा नायक(राजेश खन्ना) ... आणि अशा ठिकाणी  त्याला अचानक आर्त आवाजातली जीवघेणी तान ऐकू येते. त्या आवाजाचा मागोवा घेत नकळत तो नायिकेसमोर(शर्मिला टागोर) जाऊन पोचतो आणि त्याच्या येण्यामुळे बंद झालेलं गाणं परत सुरु करण्याची तिला विनंती करतो. नायक आणि नायिकेची ही पहिलीच भेट! तिच्या आवाजातली शुद्धता, पावित्र्य त्याला भुरळ घालते आणि इथेच त्या दोघांच्या वेगळ्या प्रेमकथेची सुरुवात होते. सिनेमातल्या अशा प्रसंगासाठी आर डी ने दिलेलं 'रैना बीती जाये' हे अजरामर गाणं ! गाण्याची पहिली ओळ तोडी रागात आणि दुसरी ओळ खमाज रागात( आणि पुढे अंतऱ्यात पुन्हा खमाज) अशी ही रचना ! तबला, संतूर, गिटार, तार शहनाई आणि अर्थातच बासरी अशा मोजक्या वाद्यांचा वापर या गाण्यात आहे. गाण्यात 'निंदिया ना आये' किंवा 'शाम ना आये' मधल्या 'आये' वर लता मंगेशकरांनी घेतलेल्या जागा अफाट आहेत. 'अमर प्रेम' सिनेमात किशोरकुमार यांची ३ सोलो गाणी आहेत. (यातही 'कुछ तो लोग कहेंगे' हे खमाज रागावर आधारित गाणं आहेच !) एस. डी. बर्मन यांचंही एक सोलो गाणं आहे. लता मंगेशकर यांचं आणखी एक सोलो (बडा नटखट है रे- पुन्हा खमाज !) आहे. पण 'रैना बीती जाये' हे गाणं एका वेगळ्याच पातळीवरचं ! देवघरात शांतपणे तेवणाऱ्या समईसारखं!
गाण्याची लिंक -
( तीन कडवी असलेल्या गाण्याचा मूळ व्हिडिओ युट्यूबवर सापडला नाही त्यामुळे या lyrical video वर समाधान मानावे लागत आहे)

६) 'शर्म आती है मगर'- पडोसन(१९६८)
'पडोसन' हा आऊट अँड आऊट कॉमेडी सिनेमा ! फुल्ल टू धमाल ! या सिनेमातल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे किस्सेही तसे सुप्रसिद्ध! किशोरकुमार यांच्या नेतृत्वाखाली मेहमूद, आर डी आणि गीतकार राजिंदर कृष्ण यांनी सेटवरच improvisation करून 'मेरी प्यारी बिंदू' हे गाणं तयार केलं. किशोरकुमार आणि मन्ना डे यांची जुगलबंदी असलेलं 'एक चतुर नार' हे गाणं काय ... एकूण सिनेमाचा मूडच वेगळा ! या मूडला साजेशी हलकीफुलकी, खट्याळ गाणी सिनेमात आहेतच. 'शर्म आती है'शिवाय लता मंगेशकर यांनी गायलेली आणखी  दोन गाणी सिनेमात आहेत. 'मैं चली मैं चली'(आशा भोसले यांच्यासह) आणि 'भाई बत्तूर  अब जायेंगे कितनी दूर' ही ती  दोन गाणी. या दोन्ही गाण्यांमध्ये एक अल्लडपणा आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीच्या भावविश्वाचं वर्णन यात आहे. त्या मूडप्रमाणे लता मंगेशकरांनी ही गायली आहेत (आठवून पाहा - 'मैं चली' मधला 'ली' म्हणतानाचा त्यांचा आवाज किंवा 'भाई बत्तूर' मधले आलाप!)  पण 'शर्म आती है' हे गाणं लता मंगेशकरांनी वेगळ्या प्रकारे म्हटलं आहे. हे गाणं  एखाद्या कोरीव लेण्याइतकं सुंदर आहे. अभोगी कानडा रागावर आधारित! या गाण्यात एक स्त्रीसुलभ लज्जा आहे, एक शालीनता आहे, एक अदब आहे. सुरुवातीलाच त्यात एक सॉफ्टनेस आहे. प्रेमात आकंठ बुडलेल्या मुलीमध्ये झालेला बदल... तिच्यातला समजुतदारपणा हा या गझल मधून व्यक्त होतो. अवखळ अल्लडपणा ते 
समजुतदारपणा हा नायिकेचा प्रवास या तीन गाण्यांमधून लता  मंगेशकर यांनी सुंदररीत्या सादर केला आहे. म्हणूनच हे गाणं सिनेमात मिसफिट वाटत नाही. तसंच संगीतकार म्हणून आर डी बर्मन कथानकावर किती विचार करत असे याचं हा सिनेमा एक उत्तम उदाहरण आहे.. 

या गाण्याची जादू बराच काळ रेंगाळत राहते. माझ्यामते आर डी बर्मनच्या सर्वोत्तम दहा गाण्यात याचा समावेश नक्कीच करता येईल. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. बकुळीच्या फुलांच्या मंद सुवासाप्रमाणे या गाण्याचा दरवळ तुम्हांला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे खेचत घेऊन जातो... आणि हा दरवळ मनात कायम राहतो.
गाण्याची लिंक -
https://www.youtube.com/watch?v=qqzrRjKksmA 

आर डी आणि लता मंगेशकर यांची  १९६१ ते १९७२ या कालावधीमधली ही काही मधुर गाणी ! याच काळातली आणि कदाचित नंतरचीही काही गाणी असतील. त्यावर पुन्हा कधीतरी ! 

( याचा पुढचा भाग मी लिहिला आहे. त्याची लिंक इथे पोस्ट करत आहे-

Wednesday, 2 January 2019

आठवण डॉ रमेश बिडवे यांची...

आज सोसायटीत फिरताना सुबाभळीची झाडं दिसली. झाडाच्या टिपिकल चॉकलेटी शेंगा अगदी लांबूनही ओळखू येतात. अलीकडे सोसायटीत माणसं बोलावून गुलमोहोर सारखी झाडं तोडली जात आहेत. आधीचे एक निष्पर्ण झाड तोडून त्याचा फक्त एक खोड ठेवण्यात आला आहे. सकाळच्या वेळेत त्या झाडावर थोडा वेळ पोपटांची लगबग आणि काही वेळा राखी धनेश चिरक्या आवाजात ओरडताना ऐकू यायचे. ते आता कुठे जातील कोण जाणे! आमच्या सोसायटीत गुलमोहोर, नीलमोहोर यासारखी परदेशी झाडं आहेत. तसंच अशोकाची पण झाडं आहेत. आज फिरत असताना का कोण जाणे अचानक डॉ रमेश बिडवे यांची खूप आठवण आली.
मी त्यांच्या 'विहंगमित्र' या संस्थेचा पक्षी निरीक्षणाचा छोटासा अभ्यासक्रम फार पूर्वी म्हणजे १९८६-८७ मध्ये केला होता. तेव्हा ते आणि किरण पुरंदरे यांनी आम्हाला वेगवेगळ्या फील्ड ट्रिप ना नेऊन पुणे आणि आसपासच्या भागातल्या पक्ष्यांची छान माहिती सांगितली होती. पक्षिनिरिक्षणातली गोडी या दोघांनी लावली जी अजूनही कमी अधिक प्रमाणात टिकून आहे.
एकदा डॉ बिडवे आमच्या सोसायटीत आले होते. त्यावेळी अशीच सगळी झाडं होती. मला तेव्हा वाटलं होतं की ते इतकी हिरवळ बघून खुश होतील. पण त्यांनी अगदी नाराजीचा सूर काढला होता - "पक्ष्यांच्या दृष्टीनं ही झाडं एकदम निरुपयोगी! या परदेशी झाडांवर कुठलाच पक्षी घरटं बांधत नाही. शिवाय या झाडांची मुळं खूप कमजोर असतात. त्यामुळे दिसायला यांची फुलं आकर्षक दिसली तरी जरा जोराचा वारा आला की ही झाडं पडू शकतात." त्यांच्या या बोलण्याने तेव्हा मी अवाक् झालो होतो. पण हळूहळू ते म्हणाले त्याची प्रचिती येऊ लागली. वळवाच्या पावसात सोसाट्याचा वारा आला की या झाडांच्या फांद्याच नव्हे तर मुळासकट झाड उन्मळून पडणं हे आमच्या सवयीचं झालं.
डॉ बिडवे यांच्या बोलण्यात एक अनौपचारिक सहजता असे. ते मनमोकळ्या स्वभावाचे होते. ते नेहमीच कुठल्याही बारीक सारीक शंकांचं निरसन करत. ते फक्त पक्षी निरीक्षक नव्हते तर निसर्ग संवर्धनाच्या कार्यात त्यांचा मोठा वाटा होता.
२००५ डिसेंबर अखेरीला अंदमानला आलेल्या त्सुनामी लाटेत ते आणि पुण्यातलेच डॉ राजेश खनाडे बेपत्ता झाले. अतिशय चटका लावणारी ही घटना होती. त्यांचं हे असं बेपत्ता होणं ही एकूणच निसर्ग संवर्धनाच्या चळवळीची सुद्धा मोठी हानीच होती. डिसेंबर अखेरीला हमखास डॉ. बिडवे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही!