Friday, 21 August 2020

ती. बाबा...



(आज तिथीप्रमाणे आमच्या बाबांना जाऊन २ वर्षे झाली.(हरतालिका २०१८) तारखेनुसार १२.९.२०१८.. 
परवा सहज खण आवरत असताना बाबांच्या पंचाहत्तरीनिमित्त मी लिहिलेलं टिपण सापडलं. आजचा ब्लॉग म्हणजे हेच टिपण ! आज परत सगळं वाचताना बऱ्याच आठवणी मनात गोळा झाल्या. पण एक समाधानही वाटलं. आपल्या मनातल्या भावना बाबांपर्यंत पोचवता आल्या याचं ! अर्थात सगळंच काही फक्त शब्दांत ( आणि शब्दानेच)  व्यक्त करता येत नाही हेही तितकंच खरं !)

१४.०२. २००९

कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावाचं नेमक्या शब्दांत वर्णन करणं हे सोपं काम नाही. त्यातही आपल्या वडिलांबद्दल बोलायचं तर अजूनच अवघड ! कारण आपल्याला त्यांचा खूप वर्षांचा सहवास असतो, असंख्य घटना घडून गेलेल्या असतात. त्यामध्ये कळत-नकळत,प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपलाही सहभाग असतो. म्हणून वस्तुनिष्ठपणे बघणं थोडं अवघडच जातं. तरीही आज आमच्या बाबांच्याविषयी काही ठळक गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात-

आमच्या बाबांच्या दिवसभरात करायच्या प्रत्येक गोष्टींमध्ये, कृतींमध्ये एक प्रकारचा क्रम आहे, ठराविकता  आहे, सातत्य आहे , नियमितता आहे. अमुक एक गोष्ट झाली की त्यानंतर पुढची करायची गोष्ट ठरलेली! एक प्रकारच्या  rhythm आणि पॅटर्नप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करतात. अगदी सकाळी दात घासताना होणाऱ्या आवाजापासून ते एकामागोमाग करत जाणाऱ्या प्रत्येक कामांमधून हे दिसून येतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि टापटीप आहे. घरी घालायच्या कपड्यांनासुद्धा ते स्वतः इस्त्री करतात आणि मगच घालतात. आणि या सर्व गोष्टी करायचा  त्यांना आळस अजिबात नाही. अतिशय meticulously ते या गोष्टी करत असतात. "Everything in its proper place" हे त्यांचं आवडतं वाक्य आहे. आणि ते तसं व्हावं यासाठी ते स्वतः खूप झटतात. पण इतरांनीही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागावं असा मात्र त्यांचा आग्रह नसतो. त्यांचं अक्षरही इतकं छान ठसठशीत आणि स्पष्ट आहे की अगदी बघत राहावं! संपूर्ण कागदावर कुठंही खाडाखोड नाही. कुठलंही काम करण्याची त्यांची एक पद्धत आहे, त्यांनी त्यासाठी एक व्यवस्था तयार केली आहे. (आमच्याकडे अगदी वर्तमानपत्राच्या बिलांसाठी फाईल केलेली आहे आणि अजूनही वर्षानुवर्षांची बिलं त्यात सहज सापडतील !)
या सगळ्यातून एक शिस्तबद्ध आयुष्य त्यांनी घडवलं आहे. अशा कामांचा त्यांना कधी कंटाळा आलेला मी तरी पाहिलेला नाही. या disciplined आयुष्याचा त्यांना डायबेटिसशी लढा देताना खूप उपयोग झाला आहे असं मला वाटतं. १९६० च्या दशकात त्यांच्या या आजाराचं निदान झालं. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं-"Consider Diabetes as your friend!It is going to stay with you for a lifetime!" त्यानंतर आमचे बाबा डायबेटिसशी कधी झगडले नाहीत, त्याला कधी deny केलं नाही, इतर कुठल्या पावडरी-चूर्ण-अर्क यांच्या आहारी कधी ते गेले नाहीत. तेव्हापासून निमूटपणे, विनातक्रार न चुकता दररोज दोनदा इन्शुलिन घेत आहेत. आणि इन्शुलिनच्या वेळा काटेकोरपणे सांभाळत प्रमाणबद्ध आहार घेत आहेत. यालाही आता ४०-४५ वर्षं होऊन गेली ! या शिस्तीमुळेच डायबेटिसला त्यांनी बऱ्यापैकी आटोक्यात ठेवलं आहे. मधूनमधून त्याने डोकं वर काढलेलं आहे पण त्यावरही बाबांनी यशस्वी मात केली आहे.

आमच्या बाबांना त्यांच्या लहानपणापासूनच खूपच स्ट्रगल करावा लागला आहे. त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षीच त्यांची आई गेली. त्यानंतर ते आणि इतर भावंडे देखील त्यांच्या आत्यांकडे राहून शिकली. बाबांना तिथे शारीरिक कष्टाची बरीच कामं करावी लागली. तिथंही परिवार मोठा त्यामुळे खाण्यापिण्याची तशी आबाळच झाली ! या सर्व परिस्थितीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा परिणाम झाला आहे. ते तसे अबोल आणि संकोची स्वभावाचे आहेत. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील त्यांना सन्मानाची/बरोबरीची वागणूक मिळाली नाही तरीही ते तिथे निष्ठेने काम करत राहिले. त्यांच्या या खासगी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आता कुठे ते थोडेसे निवांत झाले आहेत.

आजच्यासारखे  'सुजाण पालकत्व' किंवा 'Parenting' हे शब्दही ज्यावेळी फारसे प्रचलित नव्हते त्या काळापासून आम्ही त्याप्रकारच्या Parenting मुळे समृद्ध झालो. नोकरीच्या  किंवा इतर कुठलाही ताणाचा बाबांनी आमच्यासमोर कधीही उल्लेख केला नाही किंवा कधीही चिडचिड केली नाही. आम्हांला कधीही (आई-बाबा दोघांनीही) मारलं नाही. माझे कमी मार्क पाहून कधी माझी शाळा घेतली नाही! आम्हांला जे शिक्षण घेण्याची आवड होती ते त्यांनी आम्हांला घेऊ दिलं. करिअर बद्दलच्या त्यांच्या इच्छा-अपेक्षा आमच्यावर लादल्या नाहीत. शिक्षणाव्यतिरिक्त इतर छंद जोपासण्यासाठीही प्रोत्साहन दिलं.
याच अनुषंगाने असं सांगता येईल की आई-बाबांना मी कधीही तार स्वरात एकमेकांशी बोलताना ऐकलेलं नाही. मतभेद असले तरी ते आमच्यादेखत कधी त्यांनी व्यक्त केले नाहीत. तसंच त्यांनी त्यांची मतं (राजकीय/सामाजिक इ ) आमच्यावर कधीच लादली नाहीत. म्हणूनच बाबा जरी सश्रद्ध असले तरी मी माझी नास्तिकता जपू शकलो. माझ्या या मतांबद्दल त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही किंवा मला माझी मतं जबरदस्तीने, वादविवादाने  बदलायला लावली नाहीत. घरातल्या या स्वातंत्र्याचा, मोकळ्या वातावरणाचा आम्हांला खूपच फायदा झाला. आमची मतं स्वतंत्रपणे बनवण्याची सवय यातून आम्हांला लागली.
या आणि अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. खरं तर आपल्या आई-वडिलांबद्दलच्या या गोष्टी इतक्या औपचारिकपणे लिहाव्या का? काही गोष्टी न बोलता/न लिहिता समजून घेण्याच्या/फील करण्याच्या असतात असं मलाही वाटत होतं. पण बाबांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचं निमित्त साधून एका बैठकीत जे मनात आलं ते लिहून काढलं इतकंच !


Wednesday, 12 August 2020

आठवण आईची !



मागच्या आठवड्यात सकाळीच सोनचाफ्याचा मंद सुवास घरातच आला. त्या वासाचा माग काढत गेलो तर आमच्या समोरच्या बिल्डिंगच्या मागे एक मोठं झाड दिसलं. तिथून आमच्या घरापर्यंत वास येत होता. आम्ही पण आमच्या बिल्डिंगच्या मागे सोनचाफ्याचं एक झाड लावलंय. त्याला मात्र फुलं आलेली दिसली नाहीत. 

आमच्या या चाफ्याच्या झाडाचा किस्सा सांगण्यासारखा आहे. साधारण १२-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आमच्या आणि समोरच्या बिल्डिंगच्या मागे मधोमध महापालिकेने ठेवलेली एक मोठी कचराकुंडी होती. आठवड्यातून एकदा कधीतरी महापालिकेचा ट्रक येऊन त्या कुंडीतला कचरा घेऊन जाई. तोपर्यंत कचऱ्याने ती कुंडी ओसंडून वाहत असे. भरीतभर त्यात भटके कुत्रे येऊन कचरा उचकटून टाकत. लोकसुद्धा कचरा कुंडीच्या बाहेरच टाकत. त्या कचऱ्याचा एरवीही आणि विशेषतः पावसाळ्यात घाण वास येई. आम्ही तळ मजल्यात राहत असल्यामुळे या सगळ्याचा त्रास आम्हांलाच जास्त होई. आम्ही याबद्दल सोसायटीत तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 

यावर एक उपाय म्हणून आमच्या आईने सुचवलं की या कचराकुंडीजवळ आपण एक चाफ्याचं झाड लावू. पुढेमागे फुलं आली कि निदान त्या कचऱ्याची दुर्गंधी तरी कमी होईल. खरं तर सुरवातीला आईच्या या कल्पनेला आम्ही फारसं गांभीर्यानं घेतलंच नाही. पण मग तिनेच जवळच्या नर्सरीमधून चाफ्याचं रोप आणून आमच्या सोसायटीच्या माळ्याकरवी  ते रोप आमच्या घरामागे लावलं. ते तिथे रुजलं. हळूहळू मोठं होऊ लागलं. साधारण पुरुषभर उंचीचं झाल्यानंतर त्याची वाढ खुंटल्यासारखी झाली. मग आईनेच पुन्हा सोसायटीच्या माळ्याला बोलवून झाडाच्या फांद्या कापल्या. नंतर झाड वाढलं पण त्याला फुलं काही आली नाहीत. 

कालांतराने महापालिकेने कचरा विल्हेवाटाची वेगळी पद्धत काढल्यामुळे  आमच्यामागची कचराकुंडी हटली. ज्या कारणासाठी चाफ्याचं झाड लावलं होतं ते कारण हटलं तरी ते झाड रेलेव्हंट राहिलं. मागची कचराकुंडी गेल्यानंतर उपलब्ध झालेली मोकळी जागा गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरली जाऊ लागली. गाड्या वळवताना हे चाफ्याचं झाड मध्ये येतं या सबबीखाली सोसायटी ते तोडते की काय असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं झालं नाही. नंतर 'आले सोसायटीच्या मना' म्हणून आमच्या मागच्या मोकळ्या जागेत शहाबादी फरश्या बसवण्यात आल्या. त्याही अशा 'एन्ड टू एन्ड' की झाडाभोवती थोडीसुद्धा माती ठेवली गेली नाही. पावसाचं पाणी मातीत झिरपण्याची सोयही ठेवली गेली नाही. 

पण एखाद्याची जगण्याची उर्मी, तग धरण्याची चिकाटी खूप तीव्र असते तशी या झाडाची असावी. या सर्व प्रतिकूलतेवर मात करत एके दिवशी हे झाड फुलांनी बहरलं. ती फुलं बघताना आईला झालेला आनंद, तिचा हसरा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. 

चाफ्याच्या फुलांचा दिखावा/बडेजाव नसतो. बऱ्याचदा त्यांचा तुम्हांला आधी वास येतो आणि मग तुम्हांला ती हिरव्या पानांच्या आड लपलेली सापडतात. कित्येकदा झाडावर फळं दिसल्यावर मग लक्षात येतं की झाडाला फुलं आली होती ! सोनचाफ्याचा फुलांचा रंग सुंदर असला तरी बहाव्यासारखा तुमचं लांबूनही लक्ष वेधून घेणारा पिवळा धमक नसतो. या चाफ्याच्या फुलांच्या वासांवर आधारित मी एक 'कविता' केली होती. कविता कसली ! नुसतं ट ला ट जोडणं ते ! पण आईला त्याचं केवढं कौतुक! मला त्या कवितेच्या प्रिंट आऊट घ्यायला सांगितल्या आणि आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना ती कौतुकाने कविता वाचून दाखवत असे ! 

आजच आईला जाऊन दोन महिने झाले. आणि आज सकाळी आमचं चाफ्याचं झाड फुलांनी बहरलेलं दिसलं. त्या फुलांमध्ये आज एक वेगळीच शांतता, कृतकृत्यता  मला दिसून आली !

Wednesday, 22 July 2020

कोरोना डायरी २ (अर्थात) : लॉक डाऊन काळातील आवाज !

मला पक्षीनिरीक्षणाची थोडीफार आवड आहे. पक्षी दिसण्यापूर्वी बर्‍याचदा त्याचा आवाज आधी ऐकू येतो. यामुळे मला आवाजाचा वेध घेण्याची सवय लागली आहे. सध्याच्या लॉकडाऊन दरम्यान याचा मला खूप उपयोग झाला आहे. तसंही सध्या(माझ्यासह)प्रत्येकाकडे वेळ आहे. बरेचजण घरून काम करत आहेत. त्यामुळे आजूबाजूचा आवाज अचानक वाढला आहे. आम्हांला आवडो अथवा नाही,हवे असो की नाही, आमच्या घरात वेगवेगळ्या दिशेने आवाज आदळत आहेत! त्या आवाजांचीच ही काही निरीक्षणे!माझ्यावर विश्वास ठेवा,यापैकी कोणतेही निरीक्षण काल्पनिक नाही! जर आपण विचार करत असाल की मलाच इतके सगळे आवाज कसे ऐकू येतात... तर या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेले आहे!


 लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत  सर्वप्रथम आसमंतात 'थाली बजाओ'चा आवाज घुमला.आजही मला तो दिवस आठवत आहे .. लोकांमध्ये किती उत्साह होता! अगदी  उत्सवाचे रूप आले होते त्या दिवसाला!लोक जोरजोरात थाळ्या वाजवत होते ..आणि टाळ्या देखील! अर्थात मी यात भाग घेतला नाही. फक्त हे सर्व कोण करत आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो तेव्हा मला आमच्या  शेजारच्यांनी पाहिले. आधी मला वाटलं की माझी बायको आणि मी, आम्ही दोघेही आरोग्य सेवेत आहोत म्हणून आमच्या आदरार्थ ते आमच्याकडे पहात  टाळ्या वाजवत होते! पण तसे नव्हते. आम्ही या महान राष्ट्रीय कार्यात सहभागी का झालो नाही आणि त्यांच्यासाठी तरी आम्ही सहभागी  व्हावे म्हणून ते जोरात टाळ्यांचा कडकडाट करीत होते! कोणीतरी माझ्या राजकीय विचारांबद्दल मला छेडले देखील आणि त्याने मी बधतो की  काय हे पहाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दुर्दैवाने त्याचा काही उपयोग झाला नाही. 'थाली बजाओ' किंवा 'दिया जलाओ' असो, हे उपक्रम  सोशल मीडियावर लगेचच्या लगेच त्याचे फोटो/ व्हिडिओ  टाकून साजरे करण्यासाठीच होते असं आपलं माझं झालं.या उपक्रमांचं कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठीचे यशापयश  सर्वांसमोर आहेच!

 लॉक डाऊनच्या नव्या नवलाईचे पहिले काही दिवस होते,त्यात बाबा लोक्स घरी होते. म्हणून त्यांना घरातील कामात मदत करावी लागली. आमच्या वरच्या घरात अशा एका प्रेमळ वडिलांवर त्यांच्या गोड लहान मुलासाठी नाश्ता देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असावी. ते दररोज प्रेमाने आर्जवं करतानाचा आवाज ऐकू येई -"लाडू फिनिश कर ...". मला आश्चर्य वाटायचं की त्यांचा मुलगा इतका आज्ञाधारक कसा की तो नाश्त्याला दररोज गपगुमान फक्त लाडूच खातो ?! नंतर मला कळलं की लाडू हा नाश्त्याचा  प्रकार नसून ते आपल्या मुलाला लाडाने लाडू म्हणत असे! कारण एकदा ते  म्हणाल्याचं ऐकू आलं - "ए लाडू .... असं नको करू... ती मॅगी संपव ना बाळा!"

 या पहिल्या काही दिवसांतच घराघरातून भांडी पडण्याचा आवाज आला. म्हणजे असं  नाही की कोणी वाद घालत होतं. घरी कामवाल्या बायका येऊ न शकल्यामुळे नवऱ्यांना भांडी घासण्याचं काम पडल्यामुळे हे आवाज येत होते.  आता त्यांना हे  काम करण्याची सवय नव्हती की काम अनिच्छेने केले जात होते म्हणून भांडी पडण्याचाआवाज खूप जास्त येत होता हे कळायला मार्ग नव्हता!

 लॉक डाऊन च्या काळात घरी बसून काय करायचे हा प्रश्न आमच्या शेजार्‍यांनी आमच्यासाठी सोडवून टाकला  - ते टीव्हीवर सतत मोठ्या आवाजात बातम्यांचे चॅनेल लावून त्यांच्या घराचं दार उघडं ठेऊन महान सामाजिक कार्य करीत होते! बातम्यांमध्ये तरी नावीन्य असावे ना! त्याच त्या बातमी वेगवेगळ्या वाहिन्यांवर (कधीकधी फक्त भाषा बदलून)ऐकू येत होत्या."अमक्या शहरात कोरोनाचा कहर" "अमक्या ठिकाणी अनेक संशयास्पद रुग्ण सापडले"(जणू काही ते  रुग्ण गुन्हेगारच आहेत!)

 लोकांना  लॉक डाऊनची थोडीशी सवय होताच भांड्याला भांडं लागण्याचेही आवाज ऐकू येऊ लागले! छोट्या छोट्या कारणांमुळेही धुसफूस वाढून त्याचे पर्यावसन भांडणात होऊ लागलं.आता हेच बघा ना! आमच्या पुण्यासह इतर शहरांमध्येही बहुतेक घरांमध्ये रविवारी(विशेषतः संध्याकाळी) चूल  पेटत नाही! हा  एक अलिखित नियमच आहे म्हणा ना ! आमचे एक शेजारी देखील पिढ्यानपिढ्या दर रविवारी पाव भाजी खायला हॉटेलात जातात. लॉकडाऊन दरम्यान हॉटेल्स पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या शेजाऱ्यांसारख्या अनेक लोकांची पूर्णपणे गळचेपीच झाली ना ! करावं तरी काय!नंतर सरकारने घरी पार्सलने बाहेरचे खाणे आणण्याची मुभा देण्याचे एक चांगले काम केलं. पण जर असं पार्सल मागवण्यातून कोरोनाचा धोका निर्माण झाला तर? ज्याने तो आणला त्याला कोरोना असेल तर? एकीकडे हॉटेलमध्ये जाऊ न शकल्याने गंभीर पेच आणि दुसरीकडे हा धोका! आमच्या या शेजाऱ्याने हा धोका पत्करला.त्याची आई मात्र तार सप्तकात त्याला सतत सूचना देऊन त्याला बाहेर जाऊ नको असं  सांगत होती.आईच्या त्या सूचनांना अव्हेरून मुलाने पावभाजीच्या पार्सलची ऑर्डर दिलीच. मुलगा गाडीवरून पावभाजी आणायला निघेपर्यंत आईचे प्रयत्न चालूच होते. मुलगा एक इंच मागे हटायला तयार नव्हता. कारण त्याला सबळ पाठिंबा त्याच्या बायकोचा होता. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुनेचा थोडासुद्धा आवाज येत नव्हता. ती फक्त गॅलरीत  येऊन उभी राहिली होती. प्रतिष्ठेचा प्रश्न मुलाच्या आईसाठी होता. शेवटी गाडीला किक मारून तो मुलगा पाव भाजी आणायला गेला की नाही is anybody's guess!

 या लॉक डाऊनच्या काळात बीएसएनएल आणि इतर खासगी कंपन्या तसेच महावितरणचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ! इंटरनेट आणि विजेची मागणी अफाट वाढून देखील त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी समाधानकारक सेवा दिली आहे. लोक फक्त WFH च करत आहेत म्हणून ही मागणी वाढली आहे असं नाही. मध्यंतरी अचानक सगळीकडे एक वेबीनारचं पेव फुटलं. वेगवेगळ्या विषयांवर हे वेबिनार झाले. मी सुद्धा असे काही अटेंड केले. ऐन दुपारच्या वेळी एखाद्या कंटाळवाण्या विषयावर एखादा वक्ता जीव तोडून बोलत असला तर झोप टाळणे ही एक कसरतच असते. वेबिनार बरोबरच आणखी एक प्रकार सध्या दिसून येतो- Google Duo, Zoom किंवा Whatsapp कॉल द्वारे मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी! सध्या प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे या आधुनिक टेक्नॉलॉजी च्या आधारे ती कसर भरून निघत आहे! मग  "हा........ य ...... हॅ...... .... लो ... किती दिवसांनी भेटतोय ना आपण ..... हा हा हि ही ....."  हे आवाज येऊ लागले! या भेटींतून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताची सामरिक व्यूहरचना, देशाची आर्थिक परिस्थिती इथपासून ते अगदी नुकताच केलेल्या आणि सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या एखाद्या नावीन्यपूर्ण पदार्थाची पाककृती अशा अनेक विषयांवर चर्चा रंगल्या! सध्या मात्र शाळा चालू झाल्यापासून आमच्या समोरच्या घरी ऑनलाईन शाळा चालू आहे. हा मुलगा त्याच्या शिक्षिकेचं लक्ष वेधून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे - "मॅम... मॅम .... which colour book? yellow colour?" हे एकच वाक्य निदान १५-२० वेळा त्याने म्हटलं असेल...

 जसे जसे दिवस सरकू लागले तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की हा कोरोना काही मागे हटत नाही. दिवस-रात्र, वेळी-अवेळी ऍम्ब्युलन्सचे आवाज मात्र वाढू लागले. ठिकठिकाणी पेशंटची संख्या वाढू लागली. बाहेर काहीही झालं तरी इथे आपण सुरक्षित आहोत ही भावना हळू हळू लोप पावत चालली. दबक्या पावलांनी कोरोनाने आमच्या सोसायटीत प्रवेश केला आणि दबक्या आवाजात लोकांचं बोलणं सुरु झालं - "तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतो ना तो ... तो पॉझिटिव्ह निघाला! (जसं  काही यांनी रिपोर्ट पाहिलाच आहे !)तुला कळलं नाही? जपून राहा जरा !" आणि मग घरोघरी देवाची गाणी ऐकू येऊ लागली. बायका स्वयंपाक करताना देखील मोबाईल समोर ठेवून त्यावर देवाचे स्तोत्र -मंत्र ऐकू लागल्या. सध्या देवळं बंद असल्यामुळे आमच्या समोरच्यांनी (जे देवळाचे विश्वस्त आहेत) देवाची छोटी मूर्ती घरी आणली. मग सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेला साग्रसंगीत(आणि अर्थातच मोठ्या आवाजात)आरती सुरु झाली. हळूहळू आता त्या आरतीच्या वेळी त्यांच्याकडे गर्दी वाढू लागली आहे.

 या सगळ्या कोलाहलात मला काही चांगले आवाज ऐकू आले हे आवर्जून सांगितलं पाहिजे. शिक्रा, Fantail Flycatcher, Tickel's blue Flycatcher, Spotted Owlet या सारख्या कितीतरी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज मला ऐकायला मिळाले. दयाळ (Magpie Robin), खंड्या (White throated Kingfisher) आणि कोकीळ यांचे तर कॉल ऐकून मीच कंटाळून गेलो! कितीतरी पक्षी जे या आधी मी आमच्या भागात बघितले नव्हते ते बघायला मिळाले(उदा - Scaly breasted Munia).

मी संध्याकाळी फिरायला जात असताना नेहमी मला एक चौकोनी कुटुंब दिसतं. आई-वडील आणि त्यांची शाळकरी मुलं असे चौघेजण मिळून बॅडमिंटन खेळतात. बॅडमिंटन खेळापेक्षा त्यांचं हसणं-खिदळणं, दंगा -मस्ती, रुसवे-फुगवे हे बघायला मजा येते. हे family bonding खूप छान वाटतं.

 असाच फिरत असताना आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका घरातून कोणीतरी गिटार वाजवत असल्याचा आवाज ऐकून मी थबकलोच! गिटारबरोबरच एक तरुण मुलगा गातही होता. त्याला मी आवाजावरून ओळखलं. हा तर एक टग्या मुलगा होता. पण तोच आता गिटार वाजवतो आणि गातोसुद्धा? नंतर लक्षात आलं की तो नवविवाहित होता आणि त्याची बायको गिटार वाजवत होती. सध्याच्या या अनिश्चित काळात या नवपरिणीत जोडप्याचं स्थळ काळाचं भान विसरून Live as if there is no tomorrow अशा प्रकारे  गाणं बजावणं मला मनापासून आवडलं !

Thursday, 9 April 2020

कोरोना डायरी १

                                                                             १

कोरोनाची पार्श्वभूमि :

कोरोना विषाणू 
भारतात ३० जानेवारी २०२० ला CoVid-19 पहिला पेशंट  सापडला. त्याआधी चीनमध्ये या साथीची केव्हाच सुरुवात झाली होती. साधारणपणे २०-२२ जानेवारीला आमच्या शाळेतील एक मित्र चीनहून त्याचे काम आटपून परतला. तेव्हा दिल्ली विमानतळावर त्याचे स्क्रीनिंग झाले होते. त्यावेळी हा एक केवळ खबरदारीचा उपाय असेल आणि भारतात काही हा आजार इतका पसरणार नाही ( भारताचे उष्ण हवामान आणि पाश्चिमात्य देशांतील लोकांपेक्षा आपल्या लोकांची अशा आजारांना परतवू शकणारी चांगली प्रतिकारशक्ती ही काही कारणं असतील) असं तेव्हा वाटलं होतं. पूर्वी २००९ साली स्वाईन फ्लू ची देखील साथ आपल्याकडे होती. त्यामुळे त्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील परिणाम झाला होता. पण त्याचे खूप काही गंभीर परिणाम न होता ती साथ तशी लवकर आटोक्यात आली. तो अनुभव विचारात घेता यावेळी देखील भारत यातून सहज बाहेर येईल असं वाटलं होतं.
२००९ साली समाजमाध्यमं आजच्या तुलनेत एवढ्या प्रमाणात नव्हती. तेव्हा माहितीचा स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स  हेच  होते . आता मात्र जगभरातील स्थिती वेगवेगळ्या माध्यमांमधून अक्षरश: लाईव्ह कळते. तशाच प्रकारे  CoVid-19 चा जगभरात जाणवणारा परिणाम अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू लागला आहे हे विविध बातम्या, लेख आणि जगभरातील लोकांचे आजाराचे अनुभव यातून दिसू लागलं आणि खडबडून जाग आल्यासारखं झालं. चीनमधून साथीचं वास्तविक चित्र समोर येत नव्हतं पण हळूहळू इटली, इराण इथले या आजाराच्या रुग्णांचे आकडे आणि आजारामुळे दगावलेल्या पेशंटची संख्या भयावह वाटू लागली. ट्विटर वर लंडन स्थित अली नावाच्या मूळच्या इराणी माणसाने तिथले काही व्हिडिओ देखील टाकले. त्यातून रस्त्यात चालता चालता अचानक कोसळणारी माणसं, तिथल्या हॉस्पिटल्स मधले गंभीर पेशंट आणि त्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या पेशंटच्या संख्येला तुटपुंजी ठरणारी तिथली आरोग्य व्यवस्था हे तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करत होतं. त्याही परिस्थितीमध्ये तिथले डॉक्टर्स, नर्सेस पेशंटना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत होते आणि त्यात काही डॉक्टरांना प्राणही  गमवावे लागले. अशा नकारात्मक वातावरणाबरोबरच आय सी यू मधील नर्सेस आपला ताण हलका करण्यासाठी PPE घालून चक्क नाचत आहेत असाही व्हिडिओ पाहण्यात आला.
 मात्र तरीही चीन, इटली-स्पेन सारखे युरोपिअन देश किंवा अमेरिका हे भारतापासून लांब आहेत आणि तिथे हा आजार वेगाने पसरला असला तरीही भारतात तो इतका धुमाकूळ घालणार नाही अशी एक भाबडी आशा मनात होती. स्वत: बद्दलची माझी अशी समजूत होती की माझी मतं शक्यतो काही वाचन, त्यातून मिळणारे संदर्भ, पुरावे यावर आधारित असतात. या साथीच्या अनुषंगाने नेमका त्याचवेळी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा २००९ च्या स्वाईन फ्लूच्या साठी मागच्या खऱ्या कारणांचा वेध घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला. तसंच अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध हे देखील या साथी मागे आहे की काय अशी वाचनात आलं. अशाप्रकारच्या Conspiracy theories मुळेही  या साथीचं गांभीर्य कमी वाटू लागलं.
जानेवारी-फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या एक-दोन आठवड्यांपर्यंत रोजचे सर्व व्यवहार सुरळित चालू होते. ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराची जागतिक साथ(pandemic) असल्याची घोषणा केली आणि महाराष्ट्र सरकारने शाळा कॉलेज १६ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसंच गर्दी न करणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, सिनेमा थिएटर- नाट्यगृहं बंद असे जेव्हा आदेश आले तेव्हा लक्षात आलं की संकट अगदी दाराशी येऊन ठेपलं आहे. हे म्हणजे अगदी ऑफ गार्ड पकडल्यासारखं झालं. एखादा चेंडू फ्लिक करायला जावं आणि तो इन-स्विनगिंग यॉर्कर ठरून दांडी गुल करेल की काय असं वाटू लागलं.

                                                                         २
कोरोनाबद्दलची शास्त्रीय माहिती, त्या आजाराची लक्षणं, त्याचे निदान आणि उपलब्ध उपचार, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय हे सगळं सांगायचा या ब्लॉगचा हेतू नाही. आणि तशीही या सर्व बाबतीत माहिती सर्व माध्यमांवर उपलब्ध आहेच (अगदी प्रत्येक फोनवरच्या त्या कंटाळवाण्या रिंगटोन सह!) पण तरीही कोणाला ही माहिती हवी असल्यास या व्हिडिओ मधून ती मिळू शकेल -
https://www.youtube.com/watch?v=AFLTC842qY4


                                                                           ३
कोरोनाची साथ आणि माझं क्लिनिक -
वर उल्लेख  केल्याप्रमाणे मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. पेशंट WhatsApp वर फिरत असलेल्या कोरोना साथीच्या तथाकथित प्रतिबंधासाठी होमिओपॅथीच्या  एका औषधाविषयी (आर्सेनिक अल्बम) विचारत होते. त्यांना त्याबद्दलचे सत्य सांगणे आणि आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे हे सांगणे असं चालू होतं.मी हून कोणालाही असं जेनेरिक औषध दिलं नाही. पण एका पेशंटकडून कळलं की पुण्याजवळील एका गावात एका होमिओपॅथिक डॉक्टरने असे प्रतिबंधात्मक औषध देण्यासाठी एक शिबिर घेऊन त्यातून बक्कळ पैसा कमावला. होमिओपँथीच्या दुकानांमध्ये या औषधाचा तुटवडा निर्माण झाला.
२२ मार्चला केंद्र सरकारने एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' लागू केला आणि महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत वाढवल्यानंतर  मात्र  अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. २३ मार्च पासून क्लिनिकला जायचं की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे जरी आम्ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असलो तरीही कित्येक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवायला सुरुवात केली. संपूर्णपणे केवळ होमिओपॅथीचीच उपचारपद्धती वापरणारा माझ्यासारखा डॉक्टर त्यामुळे थोडा संभ्रमित झाला. अशा साथीच्या आजाराच्या काळात होमिओपॅथीचे नेमके स्थान काय? या प्रश्नाचे उत्तर कितीही नाही म्हटलं तरी -फारसे काही नाही !- हेच होतं. मी स्वतः ला कुठल्याहीप्रकारे कोरोनाच्या युद्धभूमीवरील एक योद्धा म्हणून बघू शकत नव्हतो (आणि अजूनही त्यात काही बदल झालेला नाही) मग अशा स्थितीत क्लिनिक चालू ठेवावं का? पण मग इतर जुनाट आजारांच्या पेशंटचं काय? त्यांच्या मनांतील शंकांचं निरसन करणारा, त्यांना आश्वस्त करणारा किंवा दिलासा देणारा डॉक्टर म्हणून माझी भूमिका असू शकते की नाही? या सगळ्या पलिकडे जाऊन क्लिनिक बंद ठेऊन माझ्या व्यवसायाकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्या प्रति माझी निष्ठा कमी पडते की काय ? असे काही तात्विक/नैतिक प्रश्न उपस्थित झाले. अशा प्रश्नांना आपल्याला कधी सामोरं जावं लागेल असं वाटलंही नाही. पण ही परिस्थितीच इतकी विचित्र होती कि तुम्ही कुठलीही बाजू बघा ती योग्यच वाटेल. म्हणजे दवाखाने चालू ठेवले तर डॉक्टर त्याच्याकडून अपेक्षित सर्व जबाबदारी पाडत आहे आणि समजा दवाखाने बंद ठेवले तरीही त्यात गैर काहीच नाही - कारण दवाखाने हा देखील आजार पसरण्याचा एक स्रोत होऊ शकतो. एकमेकांच्या संपर्कात आलेले पेशंट, क्लिनिकमध्ये जिथे पेशंट बसतात त्या खुर्च्या, दरवाज्याच्या कड्या इ सगळ्यामुळे आजार पसरू शकतो. आणि (माझ्या) क्लिनिकमध्ये बसल्यामुळे पेशंटला हा आजार झाला हे guilt घेणं मला जड गेलं असतं. शिवाय सगळीकडे Social Distancing हा परवलीचा शब्द झाला होता. त्यामुळे दवाखाना बंद ठेऊन एक प्रकारे आपण या सामाजिक अंतर राखण्याला मदतच करत नाही का ?
या सगळ्याचा सुवर्णमध्य म्हणून मी २३ मार्च पासून माझं क्लिनिक फक्त थोडा वेळ चालू ठेवू लागलो. म्हणजे पेशंटनी आदल्या दिवशी फोनवर त्यांची लक्षणं सांगायची आणि घरीच त्यांची औषधं मी करून त्यांना क्लिनिकमधून ती फक्त घेऊन जायला सांगायचो. काही पेशंट घरी येऊन औषध घेऊन जात होते. अशाप्रकारे सेवा देऊन (आत्मप्रौढीचा धोका पत्करून )कुठल्याही पेशंटला मी नाकारले नाही. फोनवर तर मी संपर्कात होतोच. पण या साथीमुळे एक झालं की येणारा प्रत्येक पेशंट हा 'त्याच' आजाराचा आहे की काय अशी शंका डोक्यात यायची. मग त्यातूनच Hand sanitizer वापर, तोंडाला मास्क लाव, वेटिंग एरिया सारखा पुसून काढ असे पॅरानॉईड उपाय करायला लागलो. शिवाय पेशंटला तपासण्यासाठी हात लावताना देखील विचार करावा लागला. पूर्वी माझा मामा एकदा मुंबई येथील एका नामांकित डॉक्टरांकडे गेला होता. तिथून आल्यावर तो म्हणाला -"आज डॉक्टरांनी माझे काही लाड पुरवले नाहीत. त्यांनी मला हातसुद्धा लावला नाही!" तसं मी देखील पेशंटना लांबूनच तपासत होतो.
या साथीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याच्याशी जोडला गेलेला social stigma ! या आजाराचे पेशंट म्हणजे कोणी गुन्हेगारच आहेत आणि ते इतरांना मुद्दामच हा आजार 'देत' आहेत असं वातावरण निर्माण झालं. एका डॉक्टरला हा आजार झाला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व पेशंटचा नंतर माग घेण्यात आला आणि त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले. या उदाहरणावरून असं वाटलं की असा प्रकार आपल्याकडे झाला असता तर? सरकारी यंत्रणा कामाला लागून त्यांनी contact tracing केलं असतं आणि मीडियामध्ये या सगळ्याची बातमी येऊन आपलं नाव त्यात खराब झालं असतं. त्यापेक्षा क्लिनिक कमी वेळ चालू ठेवणंच श्रेयस्कर असा विचार मी केला.
विचार करता करता मी या प्रश्नाकडे येऊन थांबलो की मला नेमकी भीती कशाची वाटते? आजाराची की या सर्वव्यापी/ सर्वाधिकार असणाऱ्या सरकारी यंत्रणेची ? की आणखी काही?....                            
                                                                                                                                   (क्रमश:)

Wednesday, 4 March 2020

परीक्षा दहावीची...



सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वातावरण आहे . म्हणून असेल कदाचित पण काल खूप दिवसांनी मला दहावीच्या परीक्षेचं स्वप्न पडलं -

स्वप्नात माझी बहीण मला परीक्षेला सोडायला आली होती. आम्ही  आमच्या घरापासून चालत चालत जात होतो. माझं परीक्षेचं सेन्टर बाजीराव रोड वरील घारपुरे प्रशाला हे होतं. सारसबागेपर्यंत चालत आल्यावर भर रस्त्यात कुठलीतरी सभा आयोजित करण्यात आल्यामुळे चालतसुद्धा पुढे जाणं शक्य नव्हतं.आता परीक्षेला पोचायला उशीर  होणार आणि पेपर बुडणार असं वाटू लागल्यामुळे मग आम्ही रिक्षा शोधू लागलो. सारसबाग ते घारपुरे प्रशाला हे खूप जवळचं अंतर असल्यामुळे अर्थातच २-३ रिक्षावाल्यांनी नकार दिला. मग एका रिक्षावाल्याच्या हाती पायी पडलो आणि कसातरी पोचलो... 

हे स्वप्नच होतं आणि त्याला काही वास्तवाचे फारसे संदर्भ नव्हते हे सांगायला नकोच !स्वप्नांचं विश्लेषण करू नये हे ही ठीकच!  म्हणजे प्रत्यक्षात (मला मनातून कितीही वेळा वाटून गेलं असलं तरी) असा कोणताही अडथळा माझ्या परीक्षेच्या वेळी आला नव्हता. परीक्षेचं माझं सेन्टर आमचीच शाळा होती. घारपुरे प्रशाला नव्हे ! 'नाही म्हणायला' रिक्षावाल्यांचं वास्तवातलं वागणं स्वप्नातसुद्धा अगदी तंतोतंत खरं दिसून आलं ! 

पण आता विचार केला तर आठवतं की एक अडथळा  माझ्या दहावीच्या परीक्षेआधी नक्कीच  आला होता. मला जेव्हा हॉल तिकीट मिळालं होतं त्यावर माझ्या मराठी -संस्कृत या (प्रत्येकी पन्नास मार्कांच्या) विषयां ऐवजी फक्त मराठी (१०० मार्क ) असं छापून आलं होतं. साधारण जानेवारीतली ही गोष्ट असेल. आत्तापर्यंत दहावीत  मी मराठीचे ६ धडे आणि ४ कविता एवढाच अभ्यास केला होता आणि आता अचानक एकदम जास्त कठीण आणि एकदम वेगळंच मराठी शिकून त्याचा पेपर द्यावा लागेल की काय असा एक पेच निर्माण झाला होता . बरं तसा हाती वेळही कमीच होता आणि माझ्यासाठी कर्दनकाळ गणित होता ज्याचा अभ्यास/सराव कितीही केला तरी माझ्या मार्कांवर त्याचा प्रभाव पडत नव्हता. तरीही कुठल्या तरी भरवश्यावर किंवा (फाजील) आत्मविश्वासावर मी घरी सांगून टाकलं- "काही काळजी करू नका. मी हायर मराठीचा अभ्यास आरामात करेन." (खरं तर पुस्तक आणण्यापासून सगळीच तयारी करायची होती !) सुदैवाने माझ्या आई वडिलांनी माझं पाणी ओळखलं होतं आणि मी म्हणालो असलो तरी मी ते करू शकेन की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. मग आमच्या बाबांनी SSC बोर्डात जाऊन(तेव्हाचं बोर्ड हे तसं पक्कं सरकारी खाक्या असलेलं होतं), कुणाचीतरी ओळख काढून हॉल तिकिटावर झालेली चूक दुरुस्त करून आणली आणि माझा एक नवीन विषय आयत्या वेळी शिकायचा त्रास वाचला.(आणि गणितात कमी मार्क का मिळाले यासाठी एक सबब पुढे करायची माझी आयती संधी हुकली!)

आता अर्थातच हे सगळं आठवलं की गंमत वाटते. शालाबाह्य संस्थेने परीक्षा घेऊन मार्क देणे या दहावीच्या वेगळेपणा व्यतिरिक्त या परीक्षेत असं काय आहे की ज्याचा बाऊ केला जातो? दहावीचे टक्के ही आपली ओळख होऊ शकत नाहीत हे जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तेवढं बरं! मला तर आता दहावीचे मार्कही आठवत नाहीत. नंतरच्या आयुष्यात एकदाच दहावीच्या मार्कांची गरज पडली होती आणि तेव्हा मार्कलिस्ट अक्षरश: उत्खननातून शोधून काढली होती.
(हे मी माझ्या '(जर्मन) भाषा पाहावी शिकून' या ब्लॉग मध्ये लिहिलं आहेच!
https://draft.blogger.com/blogger.g?tab=mj1&blogID=2409820389244950539#editor/target=post;postID=3228604851072649879;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=43;src=postname )

हे जरी खरं असलं तरी मला अजूनही कधीकधी दहावीच्या परीक्षेची आणि त्यातही गणिताच्या पेपरची स्वप्नं पडतात. उद्या पेपर आहे आणि आज माझा काहीही अभ्यास झालेला नाही किंवा आज मी गणिताचं पुस्तक आणायला जातोय अशा प्रकारची स्वप्नं पडतात. स्वप्न आणि वास्तव यांचा खरंच फारसा संबंध नसतो हेच खरं!

Tuesday, 13 August 2019

श्रीदेवीचा डान्स सिक्वेन्स, जयंत पदवाड आणि माझी फजिती….

(अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर २४.०२.२०१८ लिहिलेलं हे टिपण)


hqdefault
कालपासून श्रीदेवीच्या अकाली निधनाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. मला मात्र माझ्या कॉलेजच्या काळातल्या एका प्रसंगाची प्रकर्षाने आठवण येतेय. प्रसंग माझ्या फजितीचा असल्यामुळेच (कदाचित) तो माझ्या चांगलाच लक्षात  राहिलेला आहे!

माझ्या कॉलेजच्या काळात मी थोडंफार हार्मोनियम वादन करत असे. त्यावेळी कदाचित इतर कोणाला ते येत नसल्यामुळे मी वासरात लंगडी गाय (?शहाणी)  होतो. मी दुसऱ्या की तिसऱ्या वर्षाला असताना आमच्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात जयंत पदवाड नावाचा मुलगा आला. त्याला बघूनच कळत होतं की हा वयाने खूप मोठा आहे. लंबूटांग, अमिताभसारखे उंच केस, लांबसडक बोटं, लांबुळकी मिशी, जाड चष्मा, जाड (सिगारेट ओढल्यामुळे काळे झालेले) ओठ आणि मोठाले दात असं त्याचं एकंदरीत रूप होतं. त्याला कोणीही लांबूनही ओळखू शकेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. भरीत भर सिगारेटमुळे ‘कमावलेला’ भसाडा आणि मोठा आवाज आणि मोठ्या आवाजात बोलायची सवय! त्याच्या एकूण बोलण्या-वागण्यात एक प्रकारची बेफिकिरी होती. तो कॉलेजमध्ये चक्क प्रोफेसरांच्या देखत सिगारेट ओढायचा! याला सध्याच्या भाषेत 'ऍटिट्युड असलेला' म्हणतात. आमच्यावेळी आम्ही 'शायनिंग करणारा' किंवा 'शायनर' असं म्हणायचो . मला कुठूनतरी नंतर कळलं की एमबीबीएस ला ३-४ वेळा नापास होऊन हा आमच्या कॉलेजमध्ये आला होता. तसंच हे ही कळलं होतं की तो एक पर्कशन आर्टिस्ट आहे, उत्तम ड्रम्स वाजवतो. या मुलाशी माझा परिचय होण्याचं खरं तर काही कारण नव्हतं. पण साधारण जानेवारी महिन्यात  कॉलेजमध्ये गॅदरिंगचे वारे वाहू लागले. आणि त्यात एक दिवस तो मला भेटला आणि म्हणाला- “तू पेटी वाजवतोस असं कळलं. या वर्षी गॅदरिंगमध्ये आपण धमाल करूयात.” मला हे सगळे धक्क्यावर धक्के होते!त्याचं आपलं बोलणं चालूच होतं.” उद्या तुझ्याकडची एखादी कॅसेट आण. मी तुला एक म्युझिक पीस देतो.  तू त्यातली पेटी वाजव. मी सगळी ऱ्हिदम इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. सगळी लोकं वेडी होतील ऐकून!” मी वाजवणार नाही वगैरे म्हणायची काही सोयच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी त्याला कॅसेट दिली आणि त्याने तिसऱ्या दिवशी तो रेकॉर्डेड पीस आणून दिला. तो ऐकून मी तीन ताड उडालोच! श्रीदेवीच्या ‘चालबाज’ सिनेमातला दिड मिनिटाचाच तो पीस होता. पण तो पेटीवर वाजवणं काही खायची गोष्ट नव्हती. मी तरी तो पीस ‘बसवण्याचा’ प्रयत्न केला. कारण गाठ जयंत पदवाडशी होती, जो म्हणे बाप्पी लाहिरीकडे नियमितपणे ड्रम्स वाजवायचा!

१-२ दिवसांनंतर मी आणि तो कॉलेजमध्येच प्रॅक्टिससाठी भेटलो. मनात प्रचंड धाकधूक होती. तो मात्र कूल होता. आणि आम्ही वाजवायला सुरुवात केली. त्याच्या वाजवण्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. तो एकदम भारीच वाजवत होता. वाजवण्याच्या उत्साहात तो काहीसं जोरात वाजवत होता की माझं कुठे चुकतंय हे कळू नये म्हणून मी पेटी सॉफ्टली वाजवत होतो हे आता सांगणं अवघड आहे. त्यात भरीत भर तालाशी माझं वाकडं ! त्यामुळे गुलजारांचे ‘गोलमाल’मधल्या गाण्यातले शब्द उसने घ्यायचे तर- ‘ताल कहां … सम कहां.. तुम कहां… हम कहां’ अशी माझी अवस्था झाली होती. त्याचे बेफाट वादन सुरु होते आणि माझी फरपट झाली होती, अक्षरश: दमछाक झाली होती. दोन-तीन वेळा हा खेळ झाल्यानंतर त्याच्या बहुदा लक्षात आलं असावं की हा काही याचा( म्हणजे माझा!) घास नाही. म्हणून अतिशय decently त्याने सांगितलं- “बहुतेक तुला बरीच प्रॅक्टिस करावी लागेल असं दिसतंय. आत्ता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. परत कधीतरी करूया.”
मी खजील झालो पण एकीकडे अगदी सुटकेचा नि:श्वासही टाकला. कारण फजिती फक्त एकाच माणसापुढे झाली होती. संपूर्ण कॉलेजसमोर झाली नाही हे चांगलंच झालं. 

पण त्याचं ते 'परत  कधीतरी करूया' काही प्रत्यक्षात उतरलं नाही कारण  काही काळानंतर जयंत पदवाड आमच्याही कॉलेजमध्ये टिकला नाही. कॉलेज सोडून गेला. नंतर तर असंही कळलं की तोही अकाली गेला…..

श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यूनंतर सारखी तिची गाणी सगळ्याच चॅनेलवर दाखवत होते. त्यात हा पीस दाखवला की नाही माहित नाही. पण तो पीस भारीच आहे. कुठल्याही ऱ्हिदम आर्टिस्टची बोटं शिवशिवतील, कुठल्याही वादकाला वाजवावासा वाटेल आणि कुठल्याही नृत्यांगनेची पावले थिरकतील असाच हा पीस आहे. श्रीदेवीने तर यावर कमाल नृत्य केलं आहे…
आता जेव्हा जेव्हा हा डान्स सिक्वेन्स बघेन तेव्हा त्याचा संबंध  दोन अकाली झालेल्या मृत्यूशी आहे असं मात्र कायम जाणवत राहील …

Wednesday, 31 July 2019

'सुख़न' : एक महफिल !

(३१ जुलै २०१७ को हमने 'सुखन' इस कार्यक्रम का मजा लूटा. उसीके बारे में ये चंद अल्फाज !) 
'सुख़न' के बारेमें बहुत दिनोंसे सुना तो था मगर कल, इतवार की दोपहर को जाकर उसमें 'शामिल' होने का मौका मिला. 'सुख़न' में उर्दू जुबाँ की नज़ाकत, उसकी अदब और  मिठास का मुजायरा होता है. 'सुख़न' उर्दू का वो  जश्न है जिसमें शेरों-शायरी, नज्म, कहानियाँ, कव्वाली की उमदा पेशकश से हमें एक निहायती खूबसूरत तज़ुर्बा मिलता है. उर्दू अल्फाजोंकी हद को सिर्फ दिल-इश्क-दर्द-मयखाना-साकी तक ही समझना नाइन्साफी ही नहीं होगी बल्कि होगा एक किस्म का बेगानापन! 
इस जश्न का आगाज जयदीप वैद्य जी ने 'ओ हुसना' ये दर्दभरा नग्मा सुनाकर किया.
'सुख़न' की उर्दू की नुमाईश से आप उस दायरे के बाहर के कई लफ्जोंसें वाकिफ होंगे, उनका जायका लेंगे और  लुत्फ उठायेंगे.
 उर्दू जुबाँ को सिर्फ एक मजहबसे जोडना भी गलत होगा. कोई भी जुबाँ दिलोंको जोडने का ही काम करती है.
उसका मस्ला 'सुख़न' में सुने इस शेर से मिला-
किसी बच्चे के हाथ में नक्शा न दीजिएगा
क्या पता कहीं कोई सरहद ही न मिटा दे!
भौचक्का तो मैं तब रह गया जब देखा कि सुख़न में तश्रीफ रखनेवाले काफी सारे उम्र में जवाँ थे और उनमेंसे बहुतोंको तो कितने सारे शेर और  नज्में जुबानी याद थे.
'सुख़न'के फ़नकार ओम  भुतकर और  नचिकेत देवस्थळी का शायरी पेश करने का एक जबर्दस्त अंदाज़ है. पहले ओम जी शेर का मिसरा सुनाते हैं और फिर उस मिसरे को नचिकेतजी अपने अलग अंदाज़में उठाते हैं और फिर ओम जी उसे अलग तरीकेसे दोहराते हैं और मिसरा-ए- सानी सुनाते हैं. दोनोंका दोस्ताना खूब रंग लाता है. 
नचिकेत देवस्थळी और ओम भुतकर 

'सुख़न ' के पीछे एक गहरी सोच है ये तो नज्मों- शेरों- कहानी- कव्वाली के इन्तिख़ाब से पता चलता ही है और गौर तलब बात ये भी है कि उसका माहौल भी दिलचस्प होता है. फ़नकारोंके सामने रखें हुए चिराग, फ़नकार जब गाता है तब सिर्फ उसीपर रोशनी का दायरा होना उस माहौल को और खूबसूरत बनाता है. सुख़न के सभी फ़नकार अव्वल दर्जेके हैं. लेकिन खास जिक्र करना चाहूँगा जयदीप वैद्यजी का. क्या आवाज पाई है! क्या खूब गाते हैं! अवंती पटेलजी की आवाज को तो सभी पहचानते ही हैं. उन्होंने गायी हुई गझल 'आपकी याद आती रही' दिल को छू गई. 
और एक शख्स थे(उनका नाम मैं भूल गया)जिन्होंने शुरू में सारंगी बजाई और बादमें कव्वाली के लिए जोशसे ढोलक भी बजाया! क्या कहने!
पूना का हूँ तो जाहिर है सिर्फ तारीफ तो नहीं करूँगा! एक बात जरूर कहना चाहूँगा- आगाज से अंजाम तक मुसलसल शेर- नज्में सुनने को मिलते हैं लेकिन सारे के सारे जहन में रहते रहते सिमट जाते है. अब इसका हल कैसे ढूँढे? क्या इसकी कोई किताब बन सकती है?
आखिर में मैं मेरे सभी दोस्तोंको तहें दिलसे 'सुख़न' देखने की सिफारिश करता हूँ.
और मुझे उम्मीद है कि आप मेरी इस लिखाई में जाने- अन्जानेमें हुई गलतियोंको नजरअंदाज करेंगे!

Saturday, 9 March 2019

अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास ! भाग १


२३ फेब्रुवारीला २०१९ आमच्या शाळेच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर सिंगापूर येथे राहणाऱ्या माझ्या अतुल बिवलकर या मित्राने संत अमृतराय यांच्या कटाव वृत्तामधील 'आनंदे वंदावा गणनायक' ही गणेश स्तुतीची ऑडिओ क्लिप पोस्ट केली. या आधीही ही क्लिप ऐकली होती. सुप्रसिद्ध संगीत अभ्यासक डॉ अशोक रानडे यांचं या कटाव वृत्ताबद्दलचं निवेदन आणि प्रत्यक्ष संगीतरचना अशी ती क्लिप आहे.निवेदनात डॉ रानडे यांनी त्यांच्या खास शैलीत अमृतराय यांच्याबद्दल नेमक्या शब्दात माहिती दिली आहे. तसेच कटाव वृत्त म्हणजे अलीकडच्या रॅप संगीताच्या जवळ जाणारा प्रकार आहे आणि ते गाण्यासाठी अतिशय अवघड आहे हे देखील सांगितलं आहे. कारण त्यातले शब्द भराभर उच्चारले पाहिजेत आणि ते बरोबर उच्चारले पाहिजेत. ही गणेश स्तुती म्हणण्यासाठी एकाग्र व्हावंच लागतं आणि त्याची लय अशी आहे की दम श्वासाची परीक्षाच आहे ! म्हणूनच ही संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचं संगीत डॉ अशोक रानडे यांचंच आहे. 
डॉ अशोक रानडे 

ती ऐकणं हा खूप छान अनुभव होता. पण या गणेश वर्णनाचे शब्द फारसे काही कळले नाहीत कारण ते जुन्या काळचे अवघड शब्द आणि एका विशिष्ट लयीत केलेलं उच्चारण असल्यामुळे माझ्यासारख्याला समजायला आणि लक्षात ठेवायला अवघडच गेलं. पण हीच अडचण इतरही काही जणांना जाणवली असावी. कारण शाळेच्या ग्रुपवर त्या रचनेच्या शब्दांविषयी विचारणा झाली. पण कुणालाच त्याची माहिती नव्हती. इथून एका मनोरंजक प्रवासाची सुरुवात झाली आणि त्याचा शेवट आज होऊन ते शब्द मला मिळाले त्याचीच ही कथा !

 शब्द मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्थातच गुगल शरण गेलो ! विकिपीडियावर अमृतराय यांची माहिती
संत अमृतराय 
मिळाली(जन्म- १७ मार्च  १६९८ - मृत्यू १७५३). त्यांच्या जीवनकार्याचा माहिती मिळाली. पण या गणेश वर्णनाबद्दल काहीच हाती लागलं नाही. दुसऱ्या एका लिंकद्वारे 'केतकर ज्ञानकोश' मधील अमृतराय यांच्या साहित्यविषयक बऱ्यापैकी सविस्तर वाचायला मिळालं. त्यात त्यांनी अमृतराय यांच्या भाषेविषयी उदाहरण देताना 'सुदामचरित्रांतील जेवण' मधला एक भाग दिला आहे. अतिशय वेगळ्या प्रकारची नादमय भाषा आहे ती ! पण जे हवं होतं ते नाहीच मिळालं. असंच शोधता शोधता अमृतराय यांच्या 'अजि मी ब्रम्ह पाहिले' चे शब्द गवसले ! मला ही रचना त्यांची आहे हे देखील माहित नव्हतं ! जयजयवंती रागातली आशा भोसले यांनी गायलेली आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही सुंदर रचना या नवीन संदर्भासह ऐकताना आणखी आवडली.
https://www.youtube.com/watch?v=qQTxZx5sF1I

२३ फेब्रुवारीलाच योगायोगाने माझ्या संगीताच्या एका व्हॉट्सअँप ग्रुपवर हीच ऑडिओ क्लिप कोणीतरी पोस्ट केली. पण तिथेही त्याच्या शब्दांविषयी कोणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थोडं निराश झाल्यासारखं झालं. पण त्याच ग्रुपवर हे कळलं की ही गणेश स्तुती 'कला गणेश' या २ सीडीच्या संचातली आहे आणि गायक कलाकार आहेत- सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, प्राची दुबळे, समीर दुबळे, हर्षा बोडस इ. मग पुन्हा एकदा त्या गणेश वर्णनाचे शब्द मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या. कारण या गायक कलाकारांपैकी प्राची दुबळे आणि समीर दुबळे माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि त्यांच्या फेसबुक पोस्टवर माझा क्वचित प्रसंगी त्यांच्याशी संवादही झालेला आहे. अर्थात ही अगदीच जुजबी ओळख आहे याची कल्पना होतीच. पण मनात आलं की त्यांना विचारायला काय हरकत आहे? फार फार तर ते उत्तर देणार नाहीत किंवा माहित नाही असं सांगतील. म्हणून दोघांना इनबॉक्स मध्ये या रचनेविषयी विचारलं. आश्चर्य म्हणजे दोघांनीही तत्परतेने उत्तर दिलं. समीर दुबळे यांनी ते शब्द मिळवायचा प्रयत्न करतो असं सांगितलं तर प्राची दुबळे या तेलंगण मध्ये होत्या तरीही तिथून त्यांनी या जुन्या रेकॉर्डिंगच्या वेळच्या सह-कलाकारांना विचारून सांगते असं कळवलं.
यानंतर मध्ये एक आठवडा गेला. माझ्या मनातून हा विषय मागे पडू लागला. पुन्हा पुन्हा या मोठ्या कलाकारांना विचारून त्रास देणे मला प्रशस्त वाटले नाही. आणि सुखद धक्का म्हणजे अचानक ३ मार्चला प्राची दुबळे यांचा मेसेंजरवर मेसेज आला. त्यात त्यांनी डॉ चैतन्य कुंटे यांच्याकडे ते शब्द असतील आणि ते हिराबागजवळ असलेल्या डॉ अशोक रानडे आर्काइव्ज या केंद्रात मिळतील असं सांगितलं. तसंच या रचनेबद्दल डॉ कुंटे यांचा एक मेसेज ही दिला.तो मेसेज असा होता-
'सध्या व्हॉट्सअँपवर 'गणेश जन्माचे जुने दुर्मिळ रेकॉर्डिंग' म्हणून एका कटावाचे ध्वनिमुद्रण खूप फिरवले जातेय. मात्र त्याविषयी योग्य माहिती वा तपशील सोबत दिले जात नाहीयेत. म्हणून हे टिपण देत आहे -
१) हा कटाव 'गणेश जन्मा'चा नसून श्रीगणेशाच्या रूपलावण्याचे वर्णन करणारा आहे.
२) ज्येष्ठ संगीतज्ज्ञ, गायक व संगीतकार स्व. डॉ. अशोक दा. रानडे यांची संकल्पना, संगीतदिग्दर्शन व निरूपण असलेल्या 'कलागणेश' ह्या कार्यक्रमात हा कटाव सादर झाला होता.
३) १७व्या शतकातील मराठी कीर्तनकार कवी अमृतराय यांचे हे काव्य डॉ. अशोक दा. रानडे ह्यांनीच संगीतबद्ध केले आहे. ह्या रचनेत डॉ. रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना १४ मात्रांच्या आडाचौतालात निबद्ध आहे.
४) सदर ध्वनिमुद्रण श्री चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित 'कलागणेश' ह्या २ सीडीजच्या संचातील आहे.
५) 'आनंदे वंदावा' ह्या चरणापूर्वी जे सुंदर निरूपण आहे, ते स्वतः डॉ. रानडे यांचे आहे.
६) रचनेचे गायन त्यांचे शिष्य सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, समीर व प्राची दुबळे, हर्षा भावे इ. गायकांनी केले आहे.
मकरंद कुंडले, नीला सोहोनी, राजेंद्र भावे, कृष्णा मुसळे, हरी बागडे आणि शेखर खांबेटे ह्या वादक कलाकारांची पोषक साथसंगत आहे.
- डॉ. चैतन्य कुंटे
(डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज, पुणे) '
आता हे शब्द मिळवणं आणखी सोपं झालं असं मला वाटलं कारण हे केंद्र माझ्या रोजच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर होते. 
शेवटी आज(८ मार्च २०१९)  मी तिथे संध्याकाळी गेलो. तिथे 'कला गणेश'  सीडींबद्दल विचारलं. तिथे अतिशय छान आणि व्यवस्थित माहिती मिळाली. पण कळलं की त्या सीडी सध्या उपलब्ध नाहीत आणि इतक्यात मिळतील असंही नाही. पुढे मागे डॉ रानडे यांच्या नावाने असलेल्या वेब साईटवर त्यातल्या रचना ऐकता येतील. पुन्हा एकदा पदरी निराशा पडणार असं वाटलं. तरी मी तिथल्या स्टाफना विचारलं- "मला त्या कटाव वृत्ताचे शब्द हवे आहेत. ते मिळतील का?" त्यांना वाटलं की मला ती क्लिप हवी आहे.
तिथल्या बाजूच्याच एका टेबलावर १-२ मुली आणि एक बाई काहीतरी वाचत बसले होते. त्यातलीच एक तरुण मुलगी माझं सगळं बोलणं ऐकत होती. तिने मग आपणहून मला विचारलं- "तुम्हांला काय हवंय?" मी म्हणालो- "ती क्लिप आहे माझ्याकडे... मला त्याचे शब्द हवे आहेत". आणि त्या मुलीने तिच्या पर्स मधून एक कागद काढून मला हसत हसत सहजपणे दिला आणि म्हणाली- "हे घ्या त्याचे शब्द !" माझा विश्वासच बसेना ! मी लगेच त्याचा फोटो काढून घेतला. तिथल्या बाकीच्यांना पण या मुलीकडे कसे काय शब्द याचं आश्चर्य वाटलं. तेव्हा तिने सांगितलं- 'मी रेवा नातूंकडे गाणं शिकतेय आणि सध्या त्यांच्याकडे हेच शिकवत आहेत आणि डॉ कुंटे सरांकडून याच रचनेचे शब्द मिळाले !"
यात आणखी एक गंमत म्हणजे डॉ रेवा नातू या माझ्या शाळेतल्या आणखी एका मित्राची (डॉ अभिजित नातू) ची बायको ! म्हणजे मी जर अभिजितलाच विचारलं असतं तर मला हे शब्द मिळालेेही असते कदाचित! पण हा उत्कंठावर्धक प्रवास झाला नसता!
गणेश वर्णनाचे शब्द मिळाल्यामुळे मला अगदी हर्षवायूच व्हायचा बाकी होता ! त्या आनंदात त्या मुलीचे आभार मानले. पण गोडी अपूर्णतेची थोडीशी राहिलीच ! मला चुटपुट लागून राहिली की त्या मुलीचं नाव विचारायचं राहूनच गेलं !  खरं तर ते विचारायचं कसं याचा मला खूप संकोचही वाटला.
मात्र एक छोटीशी गोष्ट खूप छान अनुभव आणि समाधान देऊन गेली.जगात खूप  चांगली माणसं असतात याचा पुन्हा प्रत्यय आला ! .. 


तर आता या गणेश स्तुतीचे शब्द देत आहे -

ओम . . . . . 
आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक 

सा - 
रुंड मथन करि जननी जनक निज रुंड मालधर 
       अमल कुंड तो तृतिय नयन परि तनय विनय 
       विभु वक्रतुंड निज धुंडिराज करि शुंड सरळ मुनी 
       धुंडिती जनी वनी झुंडनिकाबहु विकट तुंड गण 
       पुंडरीक मणी हार प्रलंबित 

रे -    कुंडतीश कटिबंध तनुद्भव पुंड दमन मणी कुंडल 
        श्रुतीयुगी गंडस्थळी अळी  चंद्रखंडरघर गुणगण मंडित 
        किर्ती अखंडित खंड दुरित चय पंडित गामिनी 
        तांडव करि जो पदमभवांडी मंडलाकृती चंड पराक्रम 

रे -    विदण्ड खंडन विपक्ष दंडन स्वभक्त मंडन सुखात मुनिवर 
        सकल चराचर पावन करीनिज प्रसाद देवून पुरवी मनोरथ 
         विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. 

ग -    परम कृपालय भालविलस दली मालदान रसपान करिती 
         कलीकाल कापती परनिर्दाळण करित समरी जो 

ग -    पालन करि सुर चालक त्रिभुवनी शंभुबाल भवजाल तेच जंजाळ 
         कटन कर वाल स्मरण ते सप्तताल करि 
म-     नृत्य सरस तो झुणझुणझुणझुण प्रणित नुपुरे खुळखुळखुळखुळ 
         वाले वाकी पदी फुंफुंफु करि नागबंध कटि 

म'-   लळलळलळलळ ललित कुंडले चपचपचपचप न्यस्त पाऊले 
          किणीकिणीकिणीकिणी क्षुद्र घंटिका दणदणदणदण 

प -     उठति गुंजरव गुंगुंगुंगुं भ्रमर गुंजति खणखणखणखण ताल वाजती 
          धिक धिक धिलांग मृदूंग रवमृदु 

ध -     धिमिधिमिधिमिधिमि किट थथथथ 
          थरीकिट थरीकिट सा रे ग म सा रे ग म प ध नि .. नि ध प म ग रे सा 
          सप्तस्वर मुखी भेद आलापित 

ध-      स्वर वर्तुनिया वेष्टन संगीत तननम तननम राग रागिणी धृपद त्रिवट गती 
          गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि 

नि-     प्रबंध निबंध जगतल लगबग विसरुनी तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी 
          सादर समुदायसवे आयकतो.... 

आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक.....    

माझ्याकडे या गाण्याचा ऑडिओ ट्रॅक होता. त्याचा व्हिडिओ माझा मित्र श्रीधर अय्यर याने करून दिला आहे. त्यामुळे हे गणेश वर्णन आता इथे ऐकणं शक्य आहे.. 
https://www.youtube.com/watch?v=PAruU5DrF48

Tuesday, 29 January 2019

'पर्याय' २०१७: सिनेमा ‘वयात’ येताना...


('पर्याय' या होमिओपॅथी विषयक दिवाळी अंकातील माझा एक लेख)

'राजा हरिश्चंद्र’ हा दादासाहेब फाळके यांनी केलेला मूकपट 1913 साली आला आणि भारतीय चित्रपट जन्माला आला. त्यानंतर 1931 साली ’आलम आरा’ हा चित्रपट आला आणि सिनेमा ’बोलू’ लागला. पण सिनेमा वयात केव्हा आला? म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तो प्रगत झाला, कृष्ण-धवलचा रंगीत झाला, सिनेमास्कोप झाला वगैरे हे तर काळानुरूप झालंच.परंतु सिनेमा जे कथानक आपल्यापर्यंत पोचवत असतो त्याचं काय? प्रत्येक वयोगटाचा विचार करून असे किती सिनेमे निर्माण केले गेले? विशेषतः तरुणांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय, त्यांचे प्रश्न, त्यांच्यातले नातेसंबंध-मैत्री, प्रेम इ. त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं हे सगळं केंद्रस्थानी असलेले सिनेमे अलिकडेच बघायला मिळतात. म्हणजे फार तर गेल्या 30-40 वर्षांत! मी हे अर्थातच हिंदी सिनेमाच्या बाबतीत म्हणतोय. पण त्याआधीच्या मोठ्या काळाचं काय? जो काळ हिंदी चित्रपटसृष्टीचं सुवर्णयुग मानला गेला त्याकाळी मात्र तरुण आणि तारुण्य हा विषय अभावानेच दिसायचा. त्याची वेगवेगळी कारणं असावीत असं वाटतं. स्वातंत्र्योत्तर काळ हा तसा भाबडा आशावादाचा काळ होता. आताच्या तुलनेत तर तो काळ अगदी निष्पाप, निरागस म्हटला पाहिजे! तेव्हाचे सिनेमाचे विषय जास्त ध्येयवादी, सामाजिक, कौटुंबिक धाटणीचे होते. मांडणीत साधेपणा होता. त्यामुळे उत्फुल्ल तारुण्याचं कथानक मागेच पडलं असावं.
त्यावेळचे नायक तरी बघा ना कसे होते! त्याकाळच्या टॉप तीनही नायकांच्या (राजकपूर-दिलीपकुमार-देव आनंद) ऐन बहरातले सिनेमे जरी आपण पाहिले तरी त्यापैकी कोणीही कॉलेज-गोइंग तरुण वाटणार नाही. आठवून बघा- राजकपूर... त्याचे सिनेमे... दिलीपकुमार... त्याचे सिनेमे... या तिघांमधला त्यातल्या त्यात चॉकलेट हिरो देव आनंद- त्याचेही 16-24 या वयोगटातल्या नायकाचे  सिनेमे आलेच नाहीत! थोडक्यात हे सगळेच या तरुणपणाच्या भूमिका करण्याच्या वयाचे नव्हतेच! आणि सिनेमे तर त्यांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिले जात. त्यामुळे एक आख्खी पिढी सिनेमाद्वारे तारुण्य-सुलभ स्वप्नरंजन करण्यापासून मुकली. इतरही नट आठवून पाहा. अगदी राजकुमार पासून मनोजकुमार पर्यंत किंवा सुनीलदत्त पासून धर्मेंद्र पर्यंत! सगळेच थोराड दिसायचे. अगदी 1957 सालच्या ’प्यासा’ सारख्या क्लासिक सिनेमाचं उदाहरण घ्या. त्यातला नायक विजय (गुरुदत्त) आणि नायिका मीना (माला सिन्हा) यांचं प्रेम कसं जुळतं हे फ्लॅशबॅक मधून आपल्याला कळतं. त्यावेळी गुरुदत्त आणि माला सिन्हा दोघेही कॉलेजमध्ये जाणारे दाखवले आहेत. दोघे सायकलवर फिरून गाणं म्हणतात, बॅडमिंटन खेळतात वगैरे. पण दोघेही त्या वयाचे अजिबात दिसत नाहीत. भरीत भर त्यांची वर्गमैत्रीण टुन टुन दाखवली आहे! म्हणजे तर पुढे काही बोलायची सोयच नाही!

तरुणांचा लाडका शम्मीकपूर सिनेमात आला आणि त्याने हिरो या संकल्पनेत खूप बदल घडवून आणले. त्याच्यातल्या प्रचंड एनर्जीमुळे एका जागी खांबासारखे स्थिर उभे राहणारे नायक त्याने हद्दपार केले. त्याच्या अंग घुसळून टाकणाऱ्या नाचण्याच्या स्टाईलने चित्रपटसृष्टी अगदी हलवून टाकली. भाबडेपणा, रडेपणा आणि सच्चेपणा या तीन साच्यांभोवती फिरणाऱ्या नायकांपेक्षा थोडे वेगळे नायक त्याने रंगवले. नायिकेला ’पटवणं’ आणि हे करत असताना वेगवेगळ्या ट्रिक्स वापरणं (वेषांतर वगैरे), समाजमान्य चौकटीत राहून तिची छेडखानी करणं, त्याच्यातलं एक शरारती, नटखट मूल हे सगळं त्याकाळच्या लोकांना आवडलं. आणि शम्मीकपूर तरुण आणि तरुणी दोघांच्याही गळ्यातला ताईत बनला.
पण शम्मीकपूर हा त्यावेळचा अपवादच म्हणायचा! बाकी बरेचसे नट आपल्या राजेंद्रकुमारच्या पठडीतले! तरी एका गोष्टीसाठी राजेंद्रकुमारला दाद दिलीच पाहिजे! त्याने एक नाही तर चक्क दोन वेळा कॉलेजकुमारची भूमिका निभावली! एक ’धूल का फूल’ सिनेमात तर दुसरी ’मेरे मेहबूब’ मध्ये (हो... तोच तो सिनेमा ज्यात नायक-नायिकेने कॉलेजमध्ये एकमेकांना धडकणं, पुस्तकं खाली पडणं आणि त्यातून दोघांनी प्रेमात पडणं वगैरे होतं!)

इतका वेळ आपण फक्त नायकांचा विचार करतोय. नायिकांचं काय? मला वाटतं की त्यावेळी (खरं तर आताही परिस्थिती खूप काही वेगळी नाही) भारतीय समाजावर पुरुषी वर्चस्वाचा, पितृसत्ताक पद्धतीचा तसंच सरंजामशाहीचाही पगडा होता. त्याचंच प्रतिबिंब सिनेमांवरही दिसून येतं. काही सन्माननीय अपवाद सोडल्यास बहुतांशी नायिकांचं (नायकांच्या तुलनेत) सिनेमातलं स्थान तसं डावंच असायचं. नायिकेनं षोडशवर्षीय असावं, आखीव रेखीव असावं, गोरीगोमटी दिसावं, शालीन-सुस्वभावी- संस्कारी असावं, बंडखोर नसावं (आणि हो गृहकृत्यदक्ष मात्र असावं) या मात्र अपेक्षा असायच्याच! या घालून दिलेल्या चौकटीत राहून जे काही करता येईल ते करण्याची मुभा नायिकांना होती. मग यातच तिने अवखळपणा दाखवावा, प्रेमळ रुसवे-फुगवे करावेत, नाच-गाणी करावीत. सगळं करावं, पण चौकट मात्र मोडू नये. कित्येक सिनेमांत अल्लड नायिका दाखवतात. तिचं लहानपण संपून तिने यौवनात पदार्पण केलंय हे तिची मन:स्थिती सांगणाऱ्या गाण्यांवरून आपल्याला कळतं. उदा- 'सपने सुहाने लडकपन के' ('बीस साल बाद'-वहिदा रहमान) किंवा 'भाई बत्तुर' ('पडोसन'-सायराबानू) पण यांच्या स्वप्नातले राजकुमार म्हणजेच नायक कोण? तर विश्वजीत ('बीस साल बाद') आणि सुनील दत्त ('पडोसन')!

हा नायिकांवर भयंकर मोठा (सर्वार्थाने) अन्यायच आहे! म्हणजे आम्ही कसेही दिसणार आणि असणार (म्हणजे अर्थातच नायक), पण तुम्ही (म्हणजे नायिका)  मात्र आम्हांला (म्हणजे पुन्हा नायक!) हव्या तशाच असलं पाहिजे असंच जणू ते सांगू पाहतात!

1970 ते 1980 या दशकात मात्र हळूहळू हे चित्र बदलू लागलं. दशकाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच 1971 साली एक सिनेमा आला-'गुड्डी'!दिग्दर्शक होते हृषीकेश मुखर्जी आणि प्रमुख भूमिका होत्या जया भादुरी, उत्पल दत्त आणि धर्मेंद्र यांच्या! यात कुसुम उर्फ गुड्डी(जया भादुरी)ला तिच्या वयानुरूप सिनेमे बघण्याची खूप आवड असते. पौगंडावस्थेमधल्या गुड्डीचं अभिनेता धर्मेंद्र (’गुड्डी’मध्ये धर्मेंद्रने स्वत:चीच भूमिका केली होती) वर क्रश असतो. हे ही तसं या वयाला साजेसंच ! 
https://www.youtube.com/watch?v=nP9AInL_8Q8
पण गुड्डीचं सिनेमा आणि विशेषतः धर्मेंद्रवरचं प्रेम जरा टोकाचंच असतं. अगदी फँटसीच्या पातळीपर्यंत! तिच्या या आभासी जगात ती इतकी मश्गुल असते की प्रत्यक्षात जेव्हा तिला तिच्या वहिनीचा भाऊ नवीन (समित भांजा) लग्नाबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला सांगून टाकते की ती हे लग्न करू शकणार नाही कारण तिचं चक्क धर्मेंद्रवर प्रेम आहे. सिनेमाच्या पुढच्या भागात नवीन आणि त्याचे सायकॉलॉजिस्ट मामा (उत्पल दत्त) गुड्डीला हळूहळू त्या आभासी जगापासून वास्तवाकडे नेतात. ते ही प्रत्यक्ष धर्मेंद्रच्या मदतीने! सिनेमाचं जग आणि प्रत्यक्षातलं जग यातला फरक गुड्डीला छोट्या छोट्या प्रसंगांमधून कळू लागतो. सिनेमाच्या पडद्यामागचं जग हे तसं कंटाळवाणं, सिनेमाचं शूटिंग अतिशय मेहनतीचं, प्रसंगी धाडसाचं असतं. नट-नट्या या प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांसारखेच असतात हे कळल्यावर गुड्डीचं मत बदलतं आणि मग ती नवीनशी लग्न करायला तयार होते. गुड्डी सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे गुड्डीची समजूत घालणं, तिचं मतपरिवर्तन घडवून आणणं हे सगळं मामाजी अतिशय खेळकरपणे, तरीही संवेदनशीलतेने हाताळतात. कुठे धाकदपटशा नाही की जुलूम जबरदस्ती नाही. पौगंडावस्थेत गुड्डीच्या मनात येतात तसे रोमँटिक विचार येऊ शकतात हे स्वीकारून त्यावर तिच्या कलाने घेत ते मार्ग काढतात.

70च्या दशकात आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक कलाकार अवतीर्ण झाला आणि त्याने तोपर्यंतच्या चित्रपटसृष्टीवर आलेली ग्लानि, सुस्ती मरगळ पूर्णपणे झटकून टाकली.आणि त्याने खऱ्या अर्थाने सिनेमाला वयात आणलं. तो कलाकार म्हणजे ऋषी कपूर! वडील राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’मेरा नाम जोकर’ या सिनेमात ऋषी कपूरने बाल कलाकार
(लहानपणीचा राजू) म्हणून काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होतीच. त्यात पौगंडावस्थेमधला राजू त्याच्याहून वयाने मोठ्या असलेल्या  शिक्षिकेच्या (सिमी गरेवाल) प्रेमात पडतो आणि ती शिक्षिका त्याचं प्रेम आणि त्याला समजून घेते असं दाखवलंय. पुढे शिक्षिकेच्या लग्नाला राजू जातो आणि (आपलं प्रेमभंगाचं दुःख विसरून) सगळ्यांना हसवतो. इथेच त्याच्या जोकर बनण्याची सुरुवात होते.
1973 साली राज कपूर यांनी ’बॉबी’ सिनेमा दिग्दर्शित केला आणि त्याद्वारे एक adolescent लव्ह स्टोरी सादर केली. हिरो म्हणून ऋषी कपूरचा पहिलाच सिनेमा, डिंपल कपाडिया ही पदार्पण करणारी
अभिनेत्री-असे हे फ्रेश चेहरे, नवं संगीत असं वेगळेपण सिनेमात होतं. पहिल्या भेटीत नजरानजर होणं, त्यानंतरच्या भेटीत प्रेम जमणं, प्रेमात शारीरिक ओढ असणं, घरच्यांचा प्रेमाला विरोध आहे हे कळून देखील प्रेमाच्या उसळत्या भावनांना काबूत ठेवता न येणं, घरच्यांशी संघर्ष करणं, त्यामुळेच परिणामांची तमा न बाळगता दोघांनी घरातून पळून जाणं आणि शेवटी घरच्यांनी या प्रेमाला मान्यता देणं अशाप्रकारे या सिनेमाचा प्रवास होतो. कथानक पौगंडावस्थेमधलं आणि नायक- नायिकाही त्याच वयाचे त्यामुळे प्रेक्षकांना ’बॉबी’ एकदम रिफ्रेशिंग वाटला. दिसायला चिकणा, अभिनयात आणि देहबोलीत विलक्षण नैसर्गिक सहजता असणारा आणि उत्तम नाचू शकणारा असा सर्वगुणसंपन्न नायक ऋषी कपूरच्या रूपाने  ’बॉबी’त  दिसला आणि पब्लिकने त्याला डोक्यावर घेतलं. त्याच्या नाचण्याची एक वेगळीच शैली होती. त्यातून हे दिसायचं की तो नाचणं मस्त एन्जॉय करतोय आणि ’नाचणं हे खूप काही अवघड नाही, तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हांलाही ते जमेल’ असंच जणू तो त्याच्या नाचातून सांगू पाहायचा! मुलींना आधीच्या काळातल्या थोराड नायकांच्या मानाने या देखण्या ऋषी कपूरच्या रूपाने स्वप्नातला राजकुमारच मिळाला!
’बॉबी’ च्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक फॉर्म्युला सापडला. एक ’बॉबी’ हिट झाल्यामुळे त्याच पठडीतले अनेक सिनेमे निघाले. ती मालिका तशी अजूनही सुरूच आहे. यातला मुख्य भाग म्हणजे घरच्यांची भिन्न संस्कृती किंवा दोन घराण्यांमधलं वैर असणं. नवोदित चेहरे घेऊन सिनेमे काढण्याचीही  लाट आली (उदा- ’लव्ह स्टोरी’-कुमार गौरव-विजयता पंडित किंवा ’बेताब’- सनी देओल-अमृता सिंग) श्रीमंत मुलगी (माधुरी दीक्षित) ’गरीब’ मुलगा (आमीर खान) यांची प्रेम कहाणी- ’दिल’, दोन घराण्यांमध्ये वैर असलेल्या मुलगा आणि मुलगी यांची प्रेमकहाणी- ’कयामत से कयामत तक’ इ. भिन्न प्रांतांमधल्या, भिन्न भाषा आणि संस्कृती मधल्या मुलांची प्रेमकथा (’एक दुजे के लिए’ इ.)  

’बॉबी’ नंतर ऋषी कपूरचे अनेक सिनेमे आले. कॉलेज जीवनावर आधारित ऋषी कपूर-नीतू सिंग या हिट जोडीचा एक चित्रपट होता-’खेल खेल में’. यात कॉलेज जीवन, हॉस्टेल मधल्या गमती जमती यावर आधारित प्रसंग होतेच, शिवाय मित्रा-मित्रांनी हसत खेळत काढलेली एक खोडी किती महागात
पडते याचं एक रहस्यमय वळणही होतं.
ऋषी कपूरच्याच काळात आणखी एक नट (तोही मराठमोळा!) उदयास आला. त्यानेही बालकलाकार म्हणून आधी नाव मिळवलं आणि मग हिरोच्या भूमिका केल्या. तो नट म्हणजे सचिन पिळगांवकर! लहान चणीचा, निरागस चेहरा लाभलेल्या या नटाने रंजिता या नटीबरोबर एक सिनेमा केला होता- ’अखियों के झरोकोसे’. हा सिनेमा अमेरिकन लेखक एरिक सीगलच्या ’लव्ह स्टोरी’ या कादंबरीवर आधारित होता. कॉलेजच्या काळात फुलणाऱ्या रोमान्सने सुरू होणारा हा सिनेमा एक शोकात्म वळण घेतो- नायिकेच्या दुर्धर आजाराचं! सचिनने तरुणपणीच्या आणखीही काही भूमिका साकारल्या. (उदा- ’बालिका बधू’, ’गीत गाता चल’, ’कॉलेज गर्ल’ इ.)

1974 साली अजून एक ट्रेंडसेटर सिनेमा आला- ’इम्तिहान’! विनोद खन्ना, तनुजा आणि बिंदू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा इ. एम. ब्राथवेट या इंग्रजी लेखकाच्या ’To Sir With Love’ या कादंबरीवर आधारित होता. अर्थात मूळ कादंबरी खूप सरस होती. हा सिनेमा तसा अतिरंजितच होता. सिनेमाचा गाभा हाच होता की एक आदर्शवादी शिक्षक (विनोद खन्ना) एका कॉलेज मध्ये रूजू झाल्यानंतर बेशिस्त, टवाळखोर आणि टग्या मुलांमध्ये सुधारणा घडवून आणतो. विद्यार्थ्यांशी मैत्रीने वागून, त्यांना बरोबरीची वागणूक देऊन तो हे करतो. अशा शिक्षक-विद्यार्थी यांच्या नातेसंबंधांवर पुढेही काही सिनेमे आले. उदा- 1993 सालचा महेश भट दिग्दर्शित ’सर’ 2005 सालचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ’ब्लॅक’ नागेश कुकुनूरचा ’इक्बाल’ आमिर खानचा ’तारें जमीन पर’ इ. पण याची सुरुवात मात्र ’इम्तिहान’ने झाली असं म्हणता येऊ शकेल.
पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये अनिर्बंध ऊर्जा असते आणि म्हणूनच तिचा वापर खेळामध्ये करता येऊ शकतो. खेळ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हिंदीत काही सिनेमे आले. त्यात 1992 सालचा आमीर खानच्या ’जो जीता वोही सिकंदर’चा उल्लेख करावा लागेल. मन्सूर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे तसे वेगवेगळे पदर आहेत. त्यातला एक धागा आहे एकाच शहरामधल्या कॉलेजांमध्ये आर्थिक स्तरामुळे होणारी विभागणी आणि त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेलं तेढ! दुसरा पदर आहे पौगंडावस्थेमधला
संजू (आमीर खान) आणि त्याचे मित्र थोडेसे बेफिकीर, थोडेसे मस्तीखोर, थोडेसे वाया गेलेले देखील असतात! यातच संजूला वाटणारं देविका (पूजा बेदी) बद्दल आकर्षण आणि त्याच वेळी संजूच्याच मित्रांच्या ग्रुप मधल्या अंजलीला (आयेशा जुल्का) संजूबद्दल वाटणारं प्रेम हा आणखी एक धागाही आहे. संजूच्या वागण्यामुळे आणि खोटेपणामुळे त्याचे वडील त्याच्यावर खूपच नाराज असतात. म्हणून तो घर सोडून जातो. त्याचा मोठा भाऊ रतन (मामीक) मात्र समजूतदार आणि घरची जबाबदारी सांभाळणारा असतो. दोन कॉलेजमध्ये असलेल्या खुन्नसचं एक कारण असतं सायकल रेस जी आधीच्यावेळी रतन हरलेला असतो. नंतर योगायोगाने घडलेल्या प्रसंगांमुळे संजूला आपली चूक उमगते. आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि त्याला एक ध्येय सापडतं- सायकल रेस जिंकण्याचं. जी तो सिनेमाच्या शेवटी अर्थातच जिंकतो.
https://www.youtube.com/watch?v=hXxTe-rYHOY

1990 च्याच दशकात कॉलेज जीवनावर आधारित आणखीही काही सिनेमे आले ज्यात हळूहळू हिंसा केंद्रस्थानी होऊ लागली. याचं मुख्य उदाहरण म्हणजे राम गोपाल  वर्मा यांचा ’शिवा’ ज्यात कॉलेज जीवनातलं  राजकारण आणि त्यात मिसळणारी माफियागिरी हा विषय होता.

नंतर नंतरच्या काळात कॉलेज जीवन आणि त्यातले विद्यार्थी जरा अशक्य कोटीतले आणि बेगडी  वाटू लागले.शाहरुख खान, काजोल, रानी मुखर्जी यांच्या ’कुछ कुछ होता है’ मध्ये जे कॉलेज दाखवलंय किंवा त्यातले कॉलेज जीवनातले प्रसंग दाखवले आहेत तसं कुठे पाहायला मिळतं?! तीच गत 2000 साली आलेल्या शाहरुख खान-अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’मोहब्बतें’ या सिनेमाची! तीच गोष्ट शाहरुख खानच्याच ’मैं हूँ ना’ मधली किंवा अलिकडच्या ’Student of the Year’ ची ! यातल्या बऱ्याच सिनेमांत दाखवलेले प्रोफेसर किंवा प्राचार्य तर खालच्या पातळीवरचे दाखवले आहेत. (आठवा- मिस ब्रिगांझा (अर्चना पुरण सिंग, तसेच अनुपम खेर- 'कुछ कुछ होता है', चांदनी (सुश्मिता सेन) किंवा सतीश शाह- ’मैं  हूँ  ना’, ऋषी कपूर-’’Student of the Year’’) काही प्राचार्य तर एकाच वेळी कॉमेडी आणि व्हिलन दाखवलेले आहेत (उदा- वीरू सहस्त्रबुद्धे-बमन इराणी- '3 Idiots') तर ’मोहब्बतें’ सारख्या सिनेमात प्राचार्य (नारायण शंकर- अमिताभ बच्चन) जवळ जवळ व्हिलनच आहेत.

अलिकडच्या काळातल्या एका चित्रपटाचा वर वर्णन केलेल्या चित्रपटांपेक्षा थोडासा वेगळा चित्रपट म्हणून उल्लेख करावा लागेल. तो आहे ’उडान’ जो 2010 साली प्रदर्शित झाला आणि त्याचे लेखक होते अनुराग कश्यप आणि दिग्दर्शक होते विक्रमादित्य मोटवाने. पौगंडावस्थेसारख्या नाजूक काळात broken family असेल तर त्याचा एखाद्या मुलावर कशाप्रकारे परिणाम होतो हे कथानक ’उडान’मध्ये आहे. वडील (भैरव सिंग-रोनित रॉय) अगदी हिटलरच्या वरताण वागणारे, कडक शिस्तीचे, मारहाण करणारे, मुलाला (रोहित-रजत बरमेचा) त्याच्या मनाप्रमाणे करिअर न करू देणारे, त्याचं लेखक बनण्याचं स्वप्न साकार न करू देणारे, आपल्याच इच्छा लादणारे आणि या सगळ्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या मुलाशी आपले नाते उत्तरोत्तर बिघडवत जाणारे असं वडील- मुलगा यांच्या नात्यातला संघर्षाचं चित्रण सिनेमात आहे. दोघांमध्ये संवादाचा अभावच नाही तर विसंवाद आहे. दोघांचं नातं सांधणारी, दोघांमधलं अंतर कमी करणारी आई इथे नाही. रोहितची आई लहानपणीच गेली आहे. दुसऱ्या नात्यातून भैरवसिंगला अजून एक मुलगा आहे पण त्याचीही आई नाही. (आणि हे असं का हे सिनेमात दाखवलेलंच नाही.) चित्रपटाचा एकंदर कल मुलाकडे झुकलाय असं वाटत राहतं. वडिलांची काही बाजू असू शकते असा काही वावच इथे ठेवण्यात आलेला नाही. एखाद्या व्हिलनसारखी त्यांची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. हे इतर सिनेमांच्या बाबतीत ठीक होतं पण अनुराग कश्यप आणि वेगळी वाट चोखाळणाऱ्या दिग्दर्शकाच्या बाबतीत मात्र हे जरा खटकतंच! 
'उडान' सिनेमाच्या ट्रेलरची लिंक देत आहे-
https://www.youtube.com/watch?v=wEJxe2bE-cE

सध्याच्या वरवर भव्य दिव्य दिसणाऱ्या परंतु बऱ्याचशा उथळ आणि पोकळ असणाऱ्या सिनेमांच्या तुलनेत पुन्हा एकदा भूतकाळातल्या एका सिनेमाची प्रकर्षाने आठवण होते. हा सिनेमा म्हणजे 1984 सालचा, प्रकाश झा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा- ’हिप हिप हुर्रे’. सिनेमाची पटकथा गुलझार यांची होती तर राजकिरण, दीप्ती नवल, शफी इनामदार आणि नवोदित निखिल भगत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाची तांत्रिक अंगं कदाचित थोडीशी उणी जाणवतील (कारण सिनेमा तुटपुंज्या बजेटमध्ये केलेला होता) पण सिनेमा जी गोष्ट सांगतो, जो मेसेज देऊ इच्छितो तो मात्र आपल्यापर्यंत परिणामकारकरीत्या पोचतो. ’हिप हिप हुर्रे’ची गोष्ट रांची या छोट्या शहरात घडते. तिथे एका शाळेत संदीप (राजकिरण) क्रीडा शिक्षक म्हणून रूजू होतो. 
https://www.youtube.com/watch?v=bksblGRfGo0
संदीप खरं तर कॉम्प्युटर इंजिनियर असतो. पण नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मिळायला वेळ असतो म्हणून मधल्या काळात ही नोकरी पत्करतो. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक-मुख्याध्यापक या सगळ्यांनाच खेळाच्या बाबतीत उदासीनता असते. शाळेने दुसऱ्या प्रतिस्पर्धी शाळेकडून फुटबॉल सामन्यात सपाटून हार पत्करल्यामुळे त्यात आणखी भर पडते. संदीप हळूहळू हे वातावरण बदलतो. ते खेळांसाठी पोषक बनवतो. खेळांत हार जीत
होतच असते, आपली क्षमता आणि कौशल्य पणाला लावणं महत्त्वाचं, खिलाडूपणा महत्त्वाचा हे तो विद्यार्थी आणि शिक्षक यांना पटवून देतो. अर्थात त्याला सगळ्यांकडून सुरुवातीला विरोधच होतो. मुख्य विरोध पौगंडावस्थेमधल्या मुलांच्या एका ग्रुपकडून होतो. त्यांचा प्रमुख असतो रघु (निखिल भगत). रघु बंडखोर मुलगा असतो. त्याला शाळेतलीच एक शिक्षिका अनुराधा (दीप्ती नवल) हिच्याबद्दल आकर्षण असतं. तो तिला शाळेबाहेर भेटण्याचा, तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ग्रुपमधली मुलं शाळेचे तास बुडवून कँटीनमध्ये चकाट्या पिटणं, सिगारेट ओढणं, सिनेमाला जाणं, रस्त्यावरच्या जुगाराच्या अड्ड्यावर पैसे लावून जुगार खेळणं, शिक्षकांना उलट उत्तरं देणं, खेळाच्या तासाला अनुपस्थित राहून खोटं मेडिकल सर्टिफिकेट आणणं हे सगळे उद्योग करत असतात. संदीप या मुलांशी आवश्यक तिथे शिस्तीने, निग्रहाने, आवश्यक तिथे प्रेमाने, आपलेपणाने, समजुतीने, पण नेहमीच संयमाने आणि संवेदनशीलतेने वागतो. यातून तो मुलांबरोबर एक विश्वासाचे नाते निर्माण करतो, त्यांचा आदर्श बनतो. त्यांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनतो आणि त्यांच्यात बदल घडवून आणतो. या मुलांकडे असलेलं फुटबॉलचं कौशल्यही त्याने हेरलेलं असतं. बदल झाल्यानंतर ही मुलं खेळामध्ये त्यांच्यातली ऊर्जा channelize करतात. बंडखोर रघुसुद्धा अंतर्बाह्य बदलतो. या सगळ्या वाटचालीत त्याला अनुराधाची साथ मिळते. शेवटी संदीपच्या मार्गदर्शनाखाली रघुच्या प्रयत्नामुळे त्यांची शाळा फुटबॉल सामना जिंकते. आणि संदीपला अपॉइंटमेंट लेटर मिळाल्याची खबर मिळते. जड अंत:करणाने संदीप शाळा सोडून जातो. पण त्याने रूजवलेलं क्रीडा संस्कृतीचं बीज फळाला येतं. रघु शिक्षण संपल्यावर त्याच शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून परत येण्याचा निर्धार करतो. अशा रीतीने चित्रपट एका सकारात्मक वळणावर संपतो.
पौगंडावस्थेत जितका भावनांचा कल्लोळ स्वाभाविक, तेवढंच आयुष्याला एक दिशा मिळणंही! अर्थात हा मेसेज देणारे काही मोजकेच चित्रपट हिंदी रजतपटवर आले. मुख्यत्वेकरून, हिंदी चित्रपट हा फँटसीच्या विश्‍वातच जास्त रमतो. आत्मशोध, ध्येय, जीवनविषयक तत्वज्ञान इ. गोष्टींचे तसे ह्या सोनेरी दुनियेला वावडेच! त्याला थोडेफार आपण प्रेक्षकही कारणीभूत असणार... जे विकलं जातं तेच जोमानं बाजारात येतं.
जर लौकिक अर्थानं सिनेमा म्हणजे खऱ्या आयुष्याचा आपल्यासमोर धरलेला आरसाच असतो हे मान्य केलं तर आज ना उद्या हा रजतपट नक्कीच आणखीन वास्तववादी होईल यात काहीच शंका नाही...
निदान तशी आशा तरी करू या!

(तळटीप : या लेखात पौगंडावस्थेवरील सर्वच चित्रपटांचा विचार केला आहे असं अजिबात नाही. याशिवाय आणखीही काही सिनेमे नक्कीच असतील. तसंच विस्तारभयापोटी इथे मराठी सिनेमांविषयी लिहिलेलं नाही. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. जाताजाता फक्त काही मराठी सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो- ’शाळा’, ’दहावी फ’, ’फॅन्ड्री’, ’बालक-पालक’ ’कैरी’ ’सैराट’ इ.)
(या सर्व सिनेमांमधल्या गाण्यांविषयी किंवा त्यातल्या संगीताविषयी लिहायचं तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यावर पुन्हा कधीतरी !)