(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. २०२४ सालच्या दिवाळी अंकाचा विषय 'वेदना व्यवस्थापन ' होता. या अनुषंगाने मी लिहिलेला लेख ब्लॉग स्वरूपात प्रकाशित करत आहे )
“One good thing about music is, when it hits you, you feel no pain.” असं जमैकाच्या सुप्रसिद्ध गायक आणि गिटारवादक बॉब मार्ले यांनी म्हटलं आहे. आणि हे किती खरं आहे हे आपल्या अनुभवातून आपणही सांगू शकतो. हृदयाला भिडणारं कुठलंही गाणं किंवा संगीत आपल्या मनाचा इतका ताबा घेतं की त्या स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलत असताना आपल्याला सगळ्या चिंता,काळजी दु:खं, शारीरिक वा मानसिक वेदना यांचा तात्पुरता का होईना पण विसर पडतो. संगीत हे आपल्याला एका अनोख्या आणि अद्भुत दुनियेत घेऊन जातं. तिथे अशा नकारात्मक विचारांना स्थान नसतं आणि म्हणूनच आयुष्यातल्या अशा मळभ भरल्या रात्री संगीत हे शीतल चंद्रप्रकाशाची ओंजळ घेऊन येतं.
वेदनेचा सामना करणं हा एक थकवणारा प्रवास आहे. तो कोणाला कधीही करावा लागू नये हेच खरं ! पण अशी वेळ आलीच तर या खडतर मार्गात आपल्याला दिलासा देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात संगीताला एक खास महत्त्व आहे. मात्र ही वेदनेवरची फुंकर वरवरची आहे असं अजिबात नाही. कारण अभ्यासांती असं सिद्ध झालं आहे की संगीत ऐकल्यामुळे (वा गायल्यामुळे/वादन केल्यामुळे) आपल्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात. शास्त्रोक्त भाषेत सांगायचं झालं तर -
१) संगीत हृदयाची गती कमी करतं, रक्तदाब कमी करतं, ताण निर्माण करणाऱ्या cortisol सारख्या संप्रेरकाचं प्रमाण कमी करतं, तर dopamine सारख्या तणाव हलका करणाऱ्या व आनंद निर्मिती करणाऱ्या संप्रेरकाचं प्रमाण संगीत ऐकल्याने वाढतं. यामुळे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने संगीत उपयुक्त आहे असं म्हटलं जातं.
२) याच dopamine चं प्रमाण वाढल्यामुळे नैराश्य आणि चिंता या भावना कमी होण्यास मदत होऊ शकते. नैराश्यासारखी भावना व्यायाम केल्याने जशी कमी होऊ शकते तशाच प्रकारे ती संगीत ऐकूनही कमी होऊ शकते.
३) वेदना व्यवस्थापनात म्युझिक थेरपीचा हल्ली वापर करण्यात येतो. यामध्ये संगीत या माध्यमाचा वापर करून वेदनेची तीव्रता कमी करणं, वेदनेसारख्या नकारात्मक गोष्टीपासून व्यक्तीचं लक्ष संगीत या सकारात्मक गोष्टीकडे वळवणं, व्यक्तीचा मूड उंचावणं यासारख्या गोष्टी केल्या जातात.
परंतु म्युझिक थेरपीकडे(म्हणजे कुठलीही व्यावसायिक मदत घेण्याअगोदर) जाण्याअगोदर आपण जर स्वतःच संगीत ऐकण्याची (ज्यांना शक्य आहे त्यांनी गायन/वादन शिकण्याची ) आवड जोपासली तर आपला हा वेदनेशी सामना करण्याचा प्रवास थोडातरी सुसह्य आणि सुखकर होईल हे निश्चित! अर्थात काय आणि कुठल्या प्रकारचं संगीत ऐकावं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. कोणी शास्त्रीय संगीत ऐकेल तर कोणी हिंदी सिनेसंगीत, कुणाला मराठी भावगीतं आवडतील तर कोणी पाश्चात्य संगीत ऐकेल. याबाबत 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न:' हे खरंच. पण संगीत ऐकणं हा छंद आपण जाणीवपूर्वक जोपासला तर याचा दीर्घकालीन फायदा नक्कीच आहे.
आपण भारतीय काही बाबतीत निश्चितच भाग्यवान आहोत. आपल्याला संगीताचे एकाच वेळी कितीतरी प्रवाह ऐकायला मिळत असतात. एकीकडे आपल्याकडे गौरवशाली हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीताची परंपरा आहे तर दुसरीकडे तितकीच समृद्ध अशी लोकसंगीताचीही परंपरा आहे. आपल्याकडे बारसं ते बारावं व्हाया लग्न अशा प्रत्येक प्रसंगासाठी गाणं आहे आणि तसं बघितलं तर संगीत हे आपल्या नसानसात भिनलं आहे. संगीत आपल्या आजूबाजूला आणि आपल्यामध्येच आहे.शिवाय आपल्यावर संगीत ऐकण्याचे संस्कार लहानपणापासून कळत नकळत होतच असतात. रेडिओ, टीव्ही, नाटक-सिनेमे, संगीत समारोह/महोत्सव, गणेशोत्सव पासून ते आता मोबाईल अशा वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या कानांवर संगीत पडतच असते. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कितीतरी दिग्गज आणि उत्तुंग कलाकारांनी एवढं काम करून ठेवलं आहे की त्याला तोड नाही.आपलं संपूर्ण आयुष्य जरी आपण वेचलं तरीही या महासागरातले काही थोडेफार मोतीच आपल्या हाती लागतील. म्हणजेच 'किती घेशील दो कराने' अशीच आपली परिस्थिती आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की हे सर्व आपल्याला युट्यूब सारख्या ठिकाणीही सहज उपलब्ध आहे. .
पुढील विवेचनात आपण कोणत्या प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकून आपला मूड सकारात्मक करू शकतो याचा विचार करणार आहोत. शास्त्रीय संगीत असं वाचल्यावर काही वाचकांच्या भुवया उंचावतील. काहींना ते रटाळ वाटेल तर काहींना ते क्लिष्टही वाटू शकेल. काही म्हणतील की आम्हांला त्यातलं काही कळत नाही. पण क्षणभर थांबून थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की इथे आपल्याला शास्त्रीय संगीताच्या तांत्रिक अंगाची सुरवातीला माहिती नसली तरी काही हरकत नाही. आपल्याला फक्त ते नीट ऐकायचं आहे. आणि आपली कितीतरी भक्ती संगीताची गाणी व हिंदी-मराठी सिनेमांतील गाणी ही शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारित असतात.बऱ्याचदा आपल्याला हे माहितही नसतं. पण तरीही ती गाणी आपल्याला आवडत असतात. (उदाहरणार्थ 'सुंदर ते ध्यान' हा सुप्रसिद्ध अभंग यमन रागावर आधारित आहे )तर आपल्याला आता इथे फक्त एक दोन पाऊलं पुढे टाकायची आहेत आणि आपल्या सर्व संगीताची जननी जिला म्हटलं जातं अशा शास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने विचार करायचा आहे.
शास्त्रीय संगीतामध्ये जास्त महत्त्व बंदिशीच्या शब्दांना नसून त्या संगीतामधून निर्माण होणाऱ्या भाव व अभिव्यक्तीला जास्त असतं. इतर सर्व लोकप्रिय संगीताचा एक भाग असा असतो की त्यात शब्द येतात आणि त्या शब्दांमधून एक विशिष्ट प्रसंग वा ठराविक भावना प्रतीत होतात. आपल्याला शब्दांच्या पलीकडे जायचं आहे. शिवाय इतर लोकप्रिय संगीताची कालमर्यादा शास्त्रीय संगीतापेक्षा थोडी कमीच असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ - कुठलेही सिनेमातले गाणे ३-४ मिनिटांत संपून जाते. पण आपल्याला त्यापेक्षा थोड्या जास्त कालावधीचा विचार इथे करायचा आहे.राग श्रवणातून मनाचं रंजन करून आपल्याला आनंद निर्मिती करायची आहे. आता पुढील भागात मी आपण शास्त्रीय संगीतामधील काय ऐकलं तर वेदना कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होईल याविषयी लिहिणार आहे.
अर्थात यात सुरवातीलाच सांगतो की इथे माझ्या आवडीचा प्रभाव माझ्या पुढील लिखाणावर आहे आणि तसं ते स्वाभाविकही आहे. तसंच लेखाच्या विस्तारभयामुळे संक्षिप्त स्वरूपात लिहिलं आहे. शिवाय मी केवळ एक हौशी संगीत श्रोता आहे. मी काही या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे. त्यामुळे लिखाणात काही दोष असल्यास ते अनवधानाने आहेत असं समजावं!
भारतीय शास्त्रीय संगीताला जशी मोठी परंपरा आहे तशीच एक मोठी वैचारिक बैठक देखील आहे. सूत्रबद्ध नियम आहेत. प्रत्येक रागाचं एक स्वरूप आहे- कुठले स्वर त्या रागात आहेत आणि कुठले नाहीत याचे नियम आहेत. कोणता राग दिवसाच्या कोणत्या प्रहरी गायला जावा ज्यामुळे भावनिर्मिती पूर्णपणे व्यक्त होते याचेही काही नियम आहेत. जसं आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतो, ज्याप्रमाणे आपण होमिओपॅथीच्या औषधांच्या देखील वैशिष्ट्यपूर्ण प्रकृती आहेत असं म्हणतो तसंच भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांचे देखील काही स्वभावगुण आहेत. उदाहरणार्थ काही राग आक्रमक स्वभावाचे आहेत (उदा:अडाणा) काही राग वीररसपूर्ण आहेत (उदा- हंसध्वनी) तर काही शांत, धीरगंभीर आहेत (उदा : दरबारी कानडा ) तर काही नटखट,शृंगाररसप्रधान(उदा: मारुबिहाग, खमाज ). म्हणजेच शास्त्रीय संगीताच्या रागातून विविध भावनांचे प्रकटीकरण होत असते. आपण प्रचलित नवरसांपैकी बीभत्स, रौद्र, भयानक आणि काही प्रमाणात कारुण्य रस प्रधान राग सोडले तर बाकीचे रस निर्माण करणारे राग ऐकावेत जे आपल्याला वेदना व्यवस्थापनेच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. ( म्हणजेच शांत, अद्भुत, शृंगार,वीररस, हास्य रस )
विषयाच्या सुलभीकरणाच्या दृष्टीने आपण इथे दिवसाचा प्रहर आणि त्या प्रहरात कोणते राग ऐकावेत याचा ढोबळ मानाने विचार करूया. याचं एक कारण असंही आहे की दिवसाच्या प्रहराप्रमाणे आपली भावावस्था देखील बदलत जाते आणि त्याला अनुसरून रसनिर्मिती करणारे राग असतात.
१) सकाळचा प्रहर - हा प्रामुख्याने सकाळी ६-९ हा काळ ! सूर्याचा पहिला बारीकसा किरणदेखील रात्रीचा भयाण अंधकार घालवण्याचं सामर्थ्य घेऊन येतं. कितीही छळणारा अंधार असला तरी तो एका रात्रीचाच पाहुणा आहे. नंतर येणारी सकाळ ही आशा आणि एक आश्वासकता लेऊन येते.सकाळ होणे म्हणजे झाडं वेली फुलारणे, वाऱ्याची शांत शीतल झुळूक वाहणे आणि पक्ष्यांची गाणी गायची लगबग सुरु होणे असा प्रसन्न काळ ! आताचे संदर्भ कदाचित बदलले आहेत पण पूर्वीच्या काळातील सकाळ म्हणजे सडा-संमार्जन, रांगोळी, आन्हिके उरकून देवपूजा अशी मांगल्याची असे. ( याचं एक टिपिकल उदाहरण म्हणजे 'भाभी की चुडियां' सिनेमातलं देसकार रागावर आधारित 'ज्योती कलश छलके' हे गाणं ). सकाळचं हे वातावरण भक्तिरसाला पोषकच !अशा रम्य आठवणी आणि भावना जागवणारे शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे भैरव, ललत, तोडी, रामकली,जोगिया, विभास,भटियार इत्यादी. इथे आपण प्रभा अत्रे यांनी गायलेली 'मन रे तू कर ध्यान' ही भैरव रागातील बंदिश ऐकू शकता जी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल -
तसेच उस्ताद आमिर खान यांनी
गायलेल्या ललत रागातील ही 'जोगिया मोरे घर आये' ही बंदिश -
शहनाई हे आपण मांगल्याचं प्रतीक समजतो. त्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या शहनाई वादनात तोडी या सकाळच्या रागाचा इथे आपण आस्वाद घेऊ शकता-
२) दुसरा प्रहर - सकाळी ९ -१२ हा काळ - दुसरा प्रहर म्हणजे उपजीविकेसाठी कार्यप्रवण होण्याचा काळ. या काळातील शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे आसावरी, जौनपुरी, दुर्गा,बिलावल इत्यादी .
इथे पं भीमसेन जोशी यांनी गायलेल्या कोमल रिषभ आसावरी रागातील 'सकल जगत को' या बंदिशींची लिंक दिली आहे-
३) तिसरा प्रहर- हा साधारण दुपारी १२-३ चा काळ ! सूर्याची तप्त किरणे अंगांगाची काहिली करणारा काळ. या काळात ऐकण्याजोगे राग म्हणजे गौड सारंग, मुल्तानी, भीमपलास इत्यादी. अशा वेळी मनाला शांत करणारं हे बासरी वादन नक्की ऐका- पं पन्नालाल घोष राग गौड सारंग -
उन्हाळ्याच्या अशाच अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात सगळ्यात जास्त प्रतीक्षा कशाची असेल तर ती पावसाची! उन्हामुळे जमीन तापून हवा गरम होऊन पाऊस पडणार हे निसर्गचक्र अव्याहत सुरूच आहे. या निसर्गचक्राप्रमाणे शास्त्रीय संगीतात ऋतूंप्रमाणे गायचे रागदेखील आहेत. मेघ, मेघ-मल्हार हे त्या पैकीच. खरं तर हे राग रात्री गायले/ऐकले जावेत असं म्हणतात पण पावसाळी हवेत ते कोणत्याही वेळी ऐकावेत. मल्हारचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. खाली दिलेल्या लिंकमध्ये सुरवातीला पं रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मियां की मल्हार आहे तर पुढे जयपूर-अत्रौली घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला राग रामदासी मल्हार आपल्याला ऐकता येईल-
४) चौथा प्रहर- हा साधारण दुपारी ३ ते ६ चा काळ.. तापलेल्या उन्हाचा प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि अशावेळी मनाला शांत करणारे राग ऐकावेत. या काळातील राग आहेत-मधुवंती, पटदीप, धानी, शुद्ध सारंग इत्यादी. विदुषी मालिनी राजूरकर यांनी
गायलेला मधुवंती इथे ऐकता येईल-
तसंच उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतारवादनात राग पटदीप -
५) पाचवा प्रहर - संध्याकाळी ६ ते ९-
हा संधिप्रकाशाचा काळ... दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात शरीर आणि मन दोन्ही थकून गेलेलं आहे आणि आता एक अनामिक हुरहूर आहे.चांगला गेला असो की वाईट, पण तो दिवस संपल्याची! दिवसभरात आठवण झाली नसली तरी संध्याकाळी हमखास विरह आणि इतर सर्वच वेदना प्रकर्षाने जाणवू लागतात आणि याच वेळी रात्रीची चाहूलही लागते. त्यामुळे या वेळेत एक प्रकारची आर्तता आहे जी शास्त्रीय संगीताच्या काही रागांमध्येही दिसून येते.उदाहरणार्थ -
'दूर कुठे राऊळात दरवळतो पूरिया
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !
असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमांस पूर या!' हे गाणं पूरिया रागावर आधारित आहे.
किंवा
'मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !' हे गाणं मारवा रागावर आधारित आहे.
उस्ताद राशीद खान यांचा मारवा इथे ऐकता येईल-
अशी ही भावावस्था पूरिया, मारवा, खमाज,तिलक कामोद या सारख्या रांगांमधून व्यक्त होते. मात्र याच वेळेत यमन, कल्याण आणि पहाडी यासारखे आल्हाददायक, प्रसन्न राग देखील गेले/ऐकले जातात. कदाचित हे राग त्या नकारात्मक भावनांवरचे उतारेच असावेत जणू ! तर अशाच पहाडी रागाची धून इथे ऐकता येईल. कलाकार आहेत- पं शिवकुमार शर्मा -
याच वेळी भूप रागही गायला जातो. त्या रागावरील किशोरीताई आमोणकर यांचं सुप्रसिद्ध
'सहेला रे' हे मन प्रफुल्लित करणारं आहे -
६) सहावा प्रहर - रात्री ९ ते १२- हा भोजन आणि त्यानंतर निद्रेचा काळ. या काळात बागेश्री, रागेश्री, जयजयवंती, काफी, बिहाग, मारू बिहाग, नंद यासारखे प्रसन्न, मनमोहक वा शृंगाररसप्रधान राग गायले जातात.
कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेला मारू बिहाग इथे ऐकता येईल.
तसंच पं शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनात मारू बिहाग -
तर पं मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला हा दैवी 'नंद'-
७) सातवा प्रहर- रात्री १२- ते ३ . हा शांत झोपण्याचा काळ. म्हणूनच कदाचित या काळात धीर गंभीर प्रकृतीचे राग गेले जात असतील. उदा- दरबारी कानडा, बसंत बहार, मालगुंजी, शिवरंजनी इत्यादी. इथे संगीत मार्तंड पं जसराज
यांनी गायलेला दरबारी कानडा ऐकता येईल-
८) आठवा प्रहर - पहाटे ३ ते ६
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष: काल' असं कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटलंय. रात्रीच्या उदरात पुढच्या दिवसाची बीजं पेरलेली आहेत. त्यामुळे हा अंधःकार संपणार आहे आणि परत उद्याची सोनेरी सकाळ उगवणार आहे अशी अशा जागवणारा हा काळ. या काळातही पहिल्या प्रहराचे म्हणून उल्लेख केलेले राग गायले जातात (भैरव, ललत, जोगिया इ)
कोणत्याही मैफिलीचा शेवट भैरवी रागाने केला जातो म्हणून या लेखाच्या शेवटी देखील सर्व रसांचा समावेश असलेली भैरवी आहे.
उस्ताद बडे गुलाम अली खान
-बाजू बंद खुल खुल जाये-
सरतेशेवटी मंगेश पाडगावकरांच्या कवितेमध्ये थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं -
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत/ऐकत
तुम्हीचं ठरवा!
काळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
सूर लावून उभं असतं
काळोखात कुढायचं की सुरांसवे गुणगुणायचं
तुम्हीच ठरवा!