Thursday, 27 June 2024

आर डी बर्मन : एक चिरतरूण संगीतकार!


१ 

आर डी बर्मन यांच्यावर याआधी मी तीन ब्लॉग लिहिले आहेत. त्यांची लिंक इथे पोस्ट करत आहे. ज्यांनी हे ब्लॉग वाचले नसतील त्यांनी ते जरूर वाचावेत-

1) R D Burman: one song different moods- 

२) आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि मेलडी -

३) आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि गाण्यातले भाव-

आर डी बद्दल त्याच्या मृत्यूनंतर तीस वर्षे होऊन गेली तरी अजूनही लिहिलं जातं, बोललं जातं, त्याच्या गाण्यांवर आधारित ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम अजूनही हाऊसफुल्ल होतात. त्याचं संगीत रिमिक्स करून आजही ऐकलं जातं...त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत, ब्रम्हानंद सिंग यांनी तर आरडी वर एक डॉक्युमेंटरी देखील काढली आहे. त्याची गाणी त्याच्या जयंती/पुण्यतिथीला एफ एम रेडिओ वर दिवसभर ऐकवली जातात... आरडीचे शेकडो हजारो फॅन त्याचे भक्त आहेत.आरडी जवळजवळ एक कल्ट बनला आहे...आरडीच्या संगीताची, त्याच्या शैलीची चिकित्सा केली, कोणी टीका केली तर त्या व्यक्तीच्या विरोधात भांडणारे अनेक जण मैदानात उतरतील इतकं या कल्टने टोक गाठलं आहे. आणि म्हणूनच कदाचित बाकीच्या संगीतकारांच्या फॅन्सना ही खटकणारी गोष्ट झाली आहे. असं असताना मी पुन्हा आर डी वर का लिहितो आहे? 
माझा पण आरडी एक अत्यंत आवडता संगीतकार आहे पण केवळ तो एकमेव आवडता संगीतकार नाही (माझे आजवरचे  ब्लॉग बघितले तर मी ३ ब्लॉग ओ. पी. नय्यर यांच्यावर लिहिले आहेत, २ मदनमोहन यांच्यावर, प्रत्येकी एक सलील चौधरी आणि रोशन यांच्या वर, एक ब्लॉग पं रविशंकर यांच्या 'अनुराधा'  या चित्रपटाच्या संगीतावर, तर एक-एक ब्लॉग पं ह्रदयनाथ मंगेशकर आणि वसंत प्रभू यांच्यावर लिहिले आहेत) 
आर डीचा प्रभाव, त्याचं गारूड मनावर आहे. त्याचं संगीत हे माझ्या तरुणपणाच्या काळातलं संगीत आहे. त्यामुळे आजही मी ते ऐकल्यावर माझ्या त्या काळाशी जोडला जातो. म्हणून त्याच्यावर पुन्हापुन्हा लिहावंसं वाटतं. 
आर डी काय वा इतर कुठलाही संगीतकार काय..तो आपल्याला का आवडतो याबद्दल सोदाहरण आणि काही तथ्यांच्या आधारे लिहिलं तर ती नुसतीच भक्ती न होता ते बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ लिखाण होऊ शकतं आणि हा  ब्लॉग लिहिण्यामागे माझा हाच हेतू आणि प्रयत्न आहे.

२ 

 
१) तीसरी मंझिल (६)
२) पडोसन (८)
३) अमर प्रेम (६)
४) कटी पतंग (७) 
५) आप की कसम (६)
६) दि ट्रेन (६)
७) कारवाँ (८) 
८) हरे रामा हरे कृष्णा (७)
९) सागर (७) 
१०) मेरे जीवन साथी  (८)
केवळ वानगी दाखल दहाच सिनेमांची यादी(कंसात प्रत्येक सिनेमात किती गाणी आहेत हे दिलं आहे) इथे दिली आहे. यापेक्षा आणखीही कितीतरी सिनेमे असतील- पण वरील सर्व सिनेमांमधील जवळपास सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय आहेत. अशी किमया सातत्याने साधणं ही अवघड गोष्ट आहे. माझ्यामते सी रामचंद्र, एस डी बर्मन, ओ पी नय्यर आणि शंकर जयकिशन यांनाच इतक्या सातत्याने हे जमलं आहे. आर डी चं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच सिनेमांतील लोकप्रिय गाण्यांमध्ये देखील वैविध्य आहे. उदाहरणार्थ 'हम किसीसे कम नहीं'(एकूण गाणी १०)  मध्ये - रोमँटिक गाणी आहेत, एक प्रेमातील विश्वासघातावरचं गाणं आहे (क्या हुआ तेरा वादा ), कॉम्पिटिशनची सलग ४ गाणी आहेत आणि या शिवाय एक कव्वाली देखील आहे. 

३ 

आर डी चं  हिंदी सिनेसंगीत क्षेत्रात स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण  साठच्या दशकात झालं . सुरवातीला आलेल्या  'छोटे नवाब' सारख्या सिनेमातील त्याचं संगीत आणि नंतरचं संगीत यात बराच फरक आहे. आणि हा बदल झाला त्यामागे काही गोष्टी आहेत असं मला वाटतं. -
१) आपलं  वेगळं स्थान निर्माण करायचं तर इतर संगीतकारांसारखंच संगीत देऊन ते होणं शक्य नाही. त्यापेक्षा वेगळा विचार केला पाहिजे हा विचार आर डी ने केला असणार. (एस डी बर्मन यांनीही त्याला हे सांगितलं होतंच )
२) साधारण साठच्या दशकातील उत्तरार्धात जगभरात आणि भारतात संक्रमणाचं  वातावरण होतं.  तरुण पिढीमध्ये एक अस्वस्थता होती. सर्वसाधारणपणे डाव्या चळवळींनी प्रामुख्याने युरोपमध्ये जोर धरला होता. अमेरिकी वर्चस्ववाद, भांडवलशाही, युद्धखोरी या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात तरुण पिढीने बंड पुकारलं होतं कारण या व्यवस्थेमध्ये त्यांच्या आशा- आकांक्षा- स्वप्नं पूर्ण करणारं काही नव्हतं किंवा जे होतं त्याने त्यांचं समाधान होत नव्हतं. ही बंडखोरी केवळ आंदोलनं, संप इत्यादी मार्गांमधूनच व्यक्त होत नव्हती तर कला क्षेत्रात देखील यामुळे प्रचंड उलथापालथ झाली होती. वेशभूषा , केशभूषा इथपासून ते चित्रकला, संगीत या सर्व क्षेत्रांत या बंडखोरीने आपला ठसा उमटवला होता.  भारताला स्वातंत्र्य मिळून २०-२५ वर्षे झाली होती. सुरवातीचा आशावाद आणि आदर्शवाद (जो सिनेमांमधून ही प्रकट झाला) लोप पावू लागला होता आणि इथेही प्रस्थापित व्यवस्थेला आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. समाजात ज्या गोष्टी घडतात त्यांचं प्रतिबिंब सिनेमांमध्ये दिसतं तसंच आपल्या कडे होऊ लागलं होतं.  जगापेक्षा कदाचित दहा पाच वर्षे उशिरा झालं असेल पण झालं एवढं नक्की!
३)  आपल्याकडेही सिनेमा बदलू लागला होता. प्रस्थापित  राज-दिलीप-देव-शम्मी हे नायक हळूहळू मागे पडायला लागले होते आणि त्यांची जागा राजेश खन्ना -अमिताभ बच्चन - धर्मेंद्र - ऋषी कपूर - रणधीर कपूर या सारख्यांनी घेतली. एक पिढी बदलून तिची जागा सळसळत्या तरूण रक्ताने घेतली.  नायकांची पिढी बदलल्यामुळे सिनेमांच्या कथानकात बदल झाले आणि या कथानकांना अनुसरून सिनेसंगीतात बदल होणं अपरिहार्य होतं. जुनं संगीत म्हणूनच हळूहळू मागे पडू लागलं. 
४) योगायोगाने याच काळात( प्रामुख्याने सत्तरच्या दशकात)  सिनेसंगीताच्या सुवर्ण काळाचे मानकरी असलेले एक एक संगीतकार अस्तंगत होऊ लागले - अनिल विश्वास पासून सी रामचंद्र ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, नौशाद यांच्या सांगीतिक प्रतिभेला ओहोटी लागली. एस डी बर्मन रेलेव्हंट राहिले पण १९७५ साली निर्वतले. मदनमोहन, रोशन यांनी तर अकाली एक्झिट घेतली. सलील चौधरी आणि हेमंतकुमार यांनी हिंदीतील काम कमी केले. 
अशा पार्श्वभूमीवर  आर डी चा उदय झाला आणि तो इथे जम बसवू लागला. त्याच्याकडे एक जमेची बाजू होती ती म्हणजे त्याला कुठल्याही संगीताचं वावडं नव्हतं. पाश्चात्य संगीताचा तो मोठा चाहता होता आणि नवनवीन संगीताच्या तो शोधात राही आणि त्या संगीताला आपल्या सिने संगीतात कसे वापरता येईल याचा विचार करत राही. त्यामुळे वर उल्लेखलेले पाश्चात्य संगीताचे बदलते प्रवाह ( त्यातील द्रुत आणि वैशिष्ट्यपूर्ण लयीसह) त्याला इथे आणता आले. यापूर्वीही संगीतकार पाश्चात्य संगीताने प्रभावित (इन्स्पायर ) झालेले आहेत. कोणीही त्याला अपवाद नाही. आर डी ने हे मोठ्या प्रमाणावर केलं इतकंच. 
याचंच एक उदाहरण - आर डी च्या  'जवानी दिवानी ' मधलं हे गाणं  म्हणजे  पाश्चात्य संगीत(यात स्केल चेन्जही आहे)  आणि तरुण पिढीला आवडेल अशा वेगवान लयीचा अनोखा मिलाफ असलेलं आहे.. 
तरुण पिढीला आवडेल असं संगीत देणारा संगीतकार हे नाव कमावल्यामुळे कदाचित जेव्हा नव्या हिरोचा पदार्पणाचा  सिनेमा यायचा तेव्हा त्याच संगीत आर डी ने द्यावं हीच मागणी असायची. उदाहरणार्थ- कुमार गौरव (लव्ह स्टोरी ) संजय दत्त ( रॉकी ) सनी देओल ( बेताब) आणि याही सिनेमांमधली जवळपास सगळीच गाणी लोकप्रिय झाली. https://youtu.be/9z6EEprP4rA?si=lYLeJVesbCHJZM71 

४ 
आर  डी बर्मन हा रिदम आणि आवाजाचा चाहता होता. वेगवेगळे रिदम आणि अनोखे आवाज त्याने त्याच्या गाण्यात आणि पार्श्वसंगीतात वापरले. ('सत्ते पे सत्ता'  मधला दुसऱ्या अमिताभच्या एंट्रीच्या वेळचा गायिका ऍनेट ने gargling मधून काढलेला  आवाज सुप्रसिद्ध आहे ) पॉलिश पेपर घासून काढलेला ट्रेनचा आवाज ( होगा तुमसे प्यारा कौन-जमाने को दिखाना है ) गडगडाटासाठी मेटल शीटचा वापर ( भीगी भीगी रातो में- अजनबी ) ही उदाहरणं ज्यांनी 'पंचम मॅजिक' या संस्थेने आयोजित केलेले कार्यक्रम बघितले असतील त्यांना नक्कीच माहित असतील.  पाश्चात्य (लॅटिन अमेरिकेतील) एक रिदम पॅटर्न बोसानोवा आर डी बर्मन पहिल्यांदाच हिंदी सिनेमात वापरला- 
रिदमचा  आणखी एक प्रयोग म्हणजे- मादलतरंगचा अप्रतिम वापर-

आर डी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या बाबतीतही वेगळ्या विचारांचा होता आणि त्यातही त्याने प्रयोग केले ( ज्याबद्दल मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये  'क्या जानू  सजन' या गाण्याबद्दल लिहिलं होतं) 

५ 
पण आर डी बर्मन म्हणजे केवळ उडत्या आणि वेगवान ठेक्यांची, पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी देणारा संगीतकार इतकी त्याची मर्यादित ओळख नाही. वर उल्लेख केलेले सगळे चित्रपट करत असतानाच दुसरीकडे त्याने हृषीकेश मुखर्जींबरोबर -'नमकहराम', 'गोलमाल',' खूबसूरत', 'बेमिसाल', 'जुर्माना', 'रंगबिरंगी', 'किसीसे ना कहना' यासारखे सिनेमे, बासू चॅटर्जी यांच्याबरोबर 'मंझिल', 'शौकीन' यासारखे चित्रपट तर गुलझार यांच्याबरोबर 'परिचय' पासून ते 'लिबास' पर्यंत असे वेगळ्या धाटणीचे सिनेमेही केले. जणू काही ही दोन वेगवेगळी माणसं असावीत अशा प्रकारचं संगीत त्याने अशा सिनेमांमधून दिलं ! अशा सिनेमांमधून त्याच्या सर्जनशीलतेला आव्हान मिळालं आणि त्याने ते पेललंही ! गुलझार आर डी काय किंवा हृषीकेश मुखर्जी आर डी काय- हे स्वतंत्र ब्लॉगचे विषय आहेत. त्यावर लिहीन की नाही माहीत नाही पण या ब्लॉगचा शेवट मात्र माझ्या या आवडत्या गाण्याने करत आहे- 




Thursday, 2 May 2024

हिमाचल डायरी ७- खानपान आणि सुकून !

१ 

आमच्या हिमाचल ट्रीपला आम्ही धरमशाला मध्ये अमितकुमार यांच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो याविषयी हिमाचल डायरी २ मध्ये लिहिले आहेच.  तिथल्या वास्तव्यादरम्यान आम्हांला हिमाचल प्रदेशमधील  काही खास पदार्थ खायला मिळाले. आपण जिथे जातो तिथलं स्थानिक खावं असं मला वाटतं आणि म्हणून मी अमितकुमारांना तसं सांगितलंही होतं. मात्र पहिल्या दिवशी आम्हांला टिपिकल मिक्स कुर्मा, चिकन करी असं जेवण होतं. ते मला म्हणाले की ते दुसऱ्या दिवशी हिमाचली पदार्थ करतील. दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा त्यांनी आणून दिला आणि तिथपासूनच वेगळ्या चवीला सुरुवात झाली. वरवर पाहता आपला नेहमीचाच दुधाचा चहा दिसत होता. पण चव घेतल्याघेतल्या काहीतरी वेगळं जाणवत होतं. मला आधी वाटलं की चहात बडीशेप आहे की काय. पण त्यांना विचारल्यावर आणखी धक्का बसला - ते म्हणाले चहात चक्क ओवा आहे! एवढंच नाही तर त्यांच्याकडे चहा करताना पाणी घातल्यावर त्यात मीठ घालायची पण पद्धत आहे. पण मीठ घालूनही दूध नासत नाही असंही ते म्हणाले. तिथे दोन दिवस वेगळी चव म्हणून मला तरी तो चहा आवडला. पण रोज असा चहा प्यायला आवडेल का माहित नाही. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाला आम्हांला अमितकुमारांनी हिमाचल प्रदेशचे चार खास पदार्थ खिलवले. एवढंच नाही तर ते पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईला मुद्दाम बोलावून घेतलं.(त्या आम्ही राहात होतो त्या हॉटेलपासून ११ किमी अंतरावर राहतात.) अमितकुमार जर पस्तीस- चाळिशीचे असतील तर त्यांची आई साठीच्या आगे मागे असाव्यात. हे सगळे पदार्थ त्यांनी एकटीने केले होते. आणि ते करणं नक्कीच मेहनतीचं काम आहे. त्या म्हणाल्या की हिमाचल प्रदेश मधील लग्नांमध्ये हे आणि असे एकूण १२ पदार्थ करतात ज्यांना धाम असं म्हटलं जातं. हे पदार्थ आधुनिक भांड्यांमध्ये न करता पारंपरिक लोखंडी/पितळ्याच्या भांड्यांमध्ये करतात ज्यामुळे पदार्थांना एक वेगळाच स्वाद येतो.

तर आम्ही खाल्लेले हे हिमाचली पदार्थ- 

 

डावीकडून-
तेलिया माह , नंतर साध्या भाताच्या उजवीकडे चना खट्टा आणि त्याच्या खाली रोंगी मद्रा. हे तिन्ही पदार्थ कडधान्यांपासून बनवले आहेत. तेलिया माह (जिला माहनी असंही म्हणतात) ही भाजी काळ्या मसुरापासून, चना खट्टा ही काळ्या हरभऱ्यापासून तर रोंगी मद्रा  चवळीसारख्या कडधान्यापासून बनवतात. तिन्ही पदार्थ मोहरीच्या तेलात केले जातात. हवेचा आणि वातावरणाचा खाण्यापिण्यावर कसा परिणाम होतो याबद्दल अमितकुमारांनी अगदी सहज जाता जाता सांगितलं. ते म्हणाले की इथे भाज्या मिळत नाहीत म्हणून बरेच प्रकार 
कडधान्यांपासून करतात तर तिथल्या हवेत फारसा घाम येत नसल्याने तिथले पदार्थ जास्त मसालेदार असतात. 
आणि चौथा पदार्थ म्हणजे-
 

हा आहे कडा सूजी . आपल्या शिऱ्यासारखाच. पण रवा जास्त खरपूस भाजत असावेत की काय माहित नाही. म्हणून कदाचित त्याचा रंग असा चॉकलेटी होता. असाच कडा प्रशाद आम्हांला गुरुद्वारांमध्ये देखील मिळाला होता. सगळे पदार्थ चविष्ट होते. हिमाचली पदार्थांनी आमच्या ट्रीपची लज्जत नक्कीच वाढवली. माझा करंटेपणा असा की मी पदार्थांचे फोटो काढले पण ज्या माऊलीने हे केले तिचा फोटो काढायचा राहूनच गेला. म्हणजे खरं तर त्यांचा फोटो कसा काढायचा असं मला संकोचल्यासारखंच झालं. 

कसोलला आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज असं थुक्पा नूडल सूप देखील घेतलं. मला जास्त चिकन सूप आवडलं. यात आल्याचा मुबलक वापर केला होता -म्हणजे पुन्हा थंड हवेसाठी उपयुक्त असा हा पदार्थ आहे. 
 

२ 

हिमाचल विषयी ब्लॉग लिहीन असं वाटलं होतं. दोन चार ब्लॉग लिहीन असं वाटलं होतं पण तब्बल सात ब्लॉग लिहीन असा विचारही मनात आला नव्हता. हिमाचल ट्रीपच्या अनेक फलितांपैकी एक मुख्य फलित हेच म्हणता येईल- या ट्रीपने मला पुन्हा लिहिते केले ! लिखाणाच्या बाबतीत एक प्रकारे मरगळ आली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. आम्ही खूप प्रवास केला, अमृतसर ते धरमशाला, धरमशाला मधली ठिकाणं, डलहौसी, खज्जियार, परत धरमशाला ते कसोल आणि शेवटी कसोल ते दिल्ली- एवढा प्रवास कार  किंवा बसने केला. चिकार दमणूक झाली. झोप अर्धवट झाली. वेळी अवेळी खाण्यामुळे थोडाफार पोटावर देखील परिणाम झाला. पण तरीही शेवटी कसोलला असताना एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळाली आणि सगळा शीण निघून गेला. आम्ही राहत होतो तिथे बाजूलाच पार्वती नदी वाहत होती....

 

नदीच्या पाण्याची गाज सतत आम्हांला साथ करत होती. या शांततेत हा नाद आणखी गहिरा वाटत होता. शहरातील तऱ्हेतऱ्हेचे आवाज ऐकण्याची सवय झालेल्या कानांना हा नाद ऐकणं ही एक पर्वणीच होती! कसोलच्या एका बागेत वा आमच्या हॉटेल बाहेर कितीतरी वेळ आम्ही काहीही न करता नुसतेच बसून हा आवाज ऐकून कानात साठवून ठेवत होतो. या नादावर इतर कुठलाही आवाज हावी होत नव्हता. त्यामुळे त्याची एक लय तयार झाली होती जी आपोआपच लक्ष वेधून घेत होती. तो नाद...ती लय मनात अजूनही गुंजत राहिली आहे. हा निवांतपणा..ही शांतता अगदी meditative होती... या सहलीत आलेल्या अनुभवांचा कळसाध्याय कसोल मधील या काहीही न करता खूप काही करण्यात होता..
हिमाचल प्रदेशात परत कधी जाईन माहित नाही...गेलो तरी असेच अनुभव येतील का हेही माहित नाही पण मनाच्या एका कोपऱ्यात  हिमाचल प्रदेश साठी राखीव जागा कायमच राहील यात काही शंका नाही.

                                 (समाप्त)






Tuesday, 30 April 2024

हिमाचल डायरी ६- निसर्ग सौंदर्य...

१  

हिमाचल प्रदेशवर  निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे हे तिथे अगदी पाऊल टाकल्या टाकल्याच लक्षात येतं. आपण उष्ण प्रदेशातून तिथे जातो. आम्ही पुण्यातून गेलो तेव्हा पुण्यात ३८-३९ डिग्री तापमान होतं. अमृतसरला सुद्धा उकाडा होता. मात्र हिमाचल प्रदेशला पोचल्यावर लगेच वातावरणातला फरक जाणवला. आणि समोर जेव्हा बर्फाच्छादित शिखरं बघितली तेव्हा तेव्हा नकळत वा ! असा उद्गार आला. ही हिमशिखरं बघूनच अंगाची झालेली लाही लाही कुठल्याकुठे पळून गेली ! 


 

या धौलाधार  पर्वतरांगा -शिवालिक पर्वतातून निर्माण झालेल्या, कांगडा आणि मंडीच्या उत्तरेला असलेल्या. हिमाचल प्रदेशच्या वायव्य दिशेपासून सुरु होऊन मनालीजवळील पीर पंजाल पर्यंत विस्तार असलेल्या. सर्वसाधारण उंची ३५०० ते ६००० मीटर. याच रंगात मणिमहेश पर्वत देखील आहे-

तर कसोल या पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या सुंदर,टुमदार गावातून दिसलेला हिमालयाचा हा नजारा-

 

 


डोळ्यांचं पारणं फिटेल अशी आणि डोळ्यांना सुखावह वाटेल अशी ही निसर्गाची नेपथ्यरचना ! 

२ 

आम्ही एप्रिल महिन्यात हिमाचलला गेलो होतो. त्यामुळे बर्फवृष्टीचा काळ संपला होता . तरी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बर्फ साठलेला आम्हांला दिसला. 
 

आम्हांला बरीच झाडं आणि फुलं बघायला मिळाली. उंचच उंच पाईन, देवदार वृक्ष तर बघितलेच- 
हा फोटो खज्जियारचा आहे.  


याशिवाय इतरही बरीच झाडं दिसली. पण सगळ्यात पहिल्यांदा काय जाणवलं असेल तर आसमंतात दरवळणारा आंब्याच्या मोहोराचा सुगंध!  तिथे आत्ता  मोहोर आहे म्हणजे प्रत्यक्ष फळ येईपर्यंत महिने-दोन महिने नक्कीच लागतील. धरमशाला मधील वॉर मेमोरियल मधल्या बागेतला हा आंब्याच्या झाडाचा फोटो- 
 

आम्हांला हिमाचल प्रदेशाचं राज्य फूल ऱ्होडोडेंड्रॉन सुद्धा दिसलं. झाडांवर लाल लाल फुलांचे गुच्छ लगडलेले बघायला मिळाले. जणू काही झाडं सुद्धा वसंत ऋतूचं तोरण लावून उत्साहात स्वागतच करत आहेत असं ते दृश्य होतं- 




 

हे फूल मी खाल्लं सुद्धा- छान आंबट-गोडसर चव होती. याच ऱ्होडोडेंड्रॉन पासून होमिओपॅथीमध्ये सांधेदुखीसाठी औषध तयार केलं जातं. 
याशिवाय आम्हांला जागोजागी पांढऱ्या फुलांनी बहरलेली झाडं दिसली. लांबूनही ती चित्ताकर्षक दिसत होती. या झाडाला स्थानिक भाषेत कचनार म्हणतात. इंग्रजीत माउंटन एबोनी तर शास्त्रीय नाव- Bauhinia variegata (म्हणजे आपल्याकडे जसं कांचन असतं तसंच. फक्त कांचनची फुलं जांभळ्या रंगाची तर ही पांढरी असतात ) -
 



 
या फुलांचं लोणचं करतात. तसंच यातही औषधी गुणधर्म आहेत. Anti oxidant आणि Anti cancer गुणधर्म आहेत. आमचा ड्राइव्हर तर म्हणाला होता की थायरॉईड च्या आजारांसाठी देखील ही फुलं उपयुक्त आहेत. 
याशिवाय आणखी काही सुंदर फुलं दिसली. त्यांचे फोटो आणि नावं - 

Crofton Weed (Ageratina adenophora) 

Oxalis debilis

Rumex acetosella 

Bradford Pear (Pyrus calleryana)

Indian Nard (Nardostachys jatamansi)

Bergenia ciliata 

also called पाषाणभेद 

Ageratum houstonianum  

३  

हिमाचलला पक्षी निरीक्षणासाठी जायचं असं काही ठरवलं नव्हतं. फक्त २ कॅमेरे नेले होते. सहज पक्षी दिसले तर फोटो काढायचे एवढाच उद्देश आणि पक्ष्यांनी सुद्धा निराश केलं नाही ! बरेच पक्षी दिसले. काहींचे फोटो काढले. काहींचे काढता आले नाहीत. पण त्याचं एवढं दुःख झालं नाही. उलट कोणतीही अपेक्षा नसताना काही सुंदर पक्षी बघायला मिळाले याचाच आनंद जास्त मिळाला. तर तिथे दिसलेल्या काही पक्ष्यांचे हे फोटो -


 
Plumbeous Redstart 

White capped Redstart 





Brown fronted Woodpecker 

Streaked Laughing Thrush 

Himalayan Bulbul 


Yellow billed Blue Magpie 


Verditer Flycatcher 

Gray Wagtail 

Brown Dipper  


 
Brown Dipper juvenile 

 Kalij Pheasant Female 
 
Blue Whistling Thrush 


 
Himalayan Griffon Vulture 


 
Green backed Tit 




४ 

संकीर्ण: 

खरं म्हणजे या गोष्टीला कुठे जागा द्यायची याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. म्हणून तिला संकीर्ण या नावाखाली घातलं आहे. आम्ही धरमशालाहून रात्रीचा प्रवास करून भून्तर या गावी उतरलो. इथून टॅक्सीने कसोलला गेलो. रात्रभर प्रवासाचा तसा शीण होता. पण ड्राइव्हर गप्पीष्ट होता त्यामुळे जरा इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या. वाटेत डाव्या बाजूला एक उंच डोंगर दिसला आणि त्यावर वस्तीसुद्धा दिसत होती. पण खरं तर हा डोंगर इतर भागांशी अजिबात संपर्क नसलेला वाटत होता. मी आपलं ड्राइव्हरला सहज विचारलं - इथले लोक जगाशी कसे कनेक्टेड राहतात ? कारण सर्वार्थाने एकदम कट ऑफ असलेला हा भाग दिसतोय. त्यावर त्याने दिलेली माहिती एकदम उद्बोधक होती. तो म्हणाला की हे मलाना नावाचं गाव आहे. इथले लोक स्वतःला भारताचा नागरिक मानतच नाहीत. इथले कायदे कानू वेगळे आहेत. भारतात अफूची शेती करणं बेकायदेशीर आहे पण इथे ती सर्रास केली जाते. इथे कोणी बाहेरचे लोक आले तर त्यांनी कुठल्याही वस्तूला हात लावायची परवानगी नसते.ते कधी शेक हॅंड करत नाहीत आणि म्हणूनच कदाचित कोव्हिड काळात इथे कोणीही कुठलीच लस देखील घेतली नाही. इथल्या लोकांची भाषा सुद्धा वेगळीच आहे आणि ती फक्त त्या गावातील लोकांनाच बोलता येते. मागे आम्ही काश्मीरला गेलो असताना बारामुल्ला जवळ आम्हांला पलहलन गाव लागलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या संपूर्ण गावाने एकदाही कुठल्याही मतदानात भाग घेतला नव्हता असं आम्हांला आमच्या ड्राइव्हर ने सांगितलं होतं त्याची या मलानावरून आठवण झाली. एकदा वाटलं की हा ड्राइव्हर कशावरून खरं बोलत असेल? म्हणून विकिपीडिया वर जाऊन बघितलं तर आणखी आश्चर्यकारक माहिती मिळाली. इथले लोक म्हणे अलेक्झांडरच्या सैनिकांचे  वंशज आहेत. त्यांना वाटतं की त्यांचं गाव हे जगातलं  सर्वात जुनं  प्रजासत्ताक आहे. ड्राइव्हर म्हणाला तसे खरोखरच त्यांचे वेगळे कायदेकानू आहेत. मलानाचे फोटो काढता आले नाहीत पण ही माहिती खूपच नवीन आणि वेगळी वाटली. अधिक माहितीसाठी विकिपीडिया ची लिंक -

                                                                                                                                                        (क्रमश:)